सुराज्य येण्यासाठि उभे पण
(चाल : अवताराचे कार्य कराया...)
सुराज्य येण्यासाठि उभे पण - मार्ग मधातुनि रुकलाना ॥धृ0॥
धनीक लोभी पैसा सोडि ना
मजुर न कामा नेट धरी ।
शेति - शक्ति वाढेल कशी ? गोवंश वधाने दुखलाना ॥१॥
नैतिकता प्रार्थना विसरुनी
नाच - तमाशे घरोघरी I
भांग दारु हौसिने पिण्याला तरुण अमुचा शिकलाना ॥२॥
कितितरि बहिणी विधवा फिरती
जुन्या रुढ्या पापे करवी ।
धर्म - वेड गेले न अजुनिही जातिवर्ण हा चुकलाना ॥३ ॥
कार्य विधायक करावयासी
जीव सदाचा लाज धरी ।
उठला सुटला होइ पुढारी मान जनाचा मुकलाना ॥४॥
बहुजन जनता साक्षरतेला
पात्र न झाली पूर्णपणे ।
तुकड्यादास म्हणे यासाठिच बाग प्रगतिचा सुकलाना ॥५॥