पंढरिये मज जादु केलि कोणी।
पंढरिये मज जादु केलि कोणी। कळो द्या हे मनी झटो त्यासी ॥
आम्ही सहज गेलो वाटसरुसंगे । जाता चंद्रभागे बरे आलो ॥
दिसले निशाण भगव्या रंगाचे । तेथेचि अंगाचे पाणी झाले ॥
उठले रोमांच गळा दाटियला । अंगी संचरला अष्टभाव ॥
नाद ऐकू येता ओढले हे मन । विसरले भान साथियांचे ॥
तुकड्यादास म्हणे महाव्दारी येता। तन्मयता चित्ता झाली माझ्या ॥