जन्म आणि बालपण

जिल्हा तहसिल अमरावती नामी ।
यावली या ग्रामी जन्म माझा ॥
लहानसे गाव खेडे देशमुखी । 
लोक होते सुखी तये काळी ॥
गणेश ठाकुर  भक्त त्या गावीचा । 
होता पंढरीचा वारकरी ॥
लक्षुमी तयाची नाव तानाबाई ।
तिनेही करावी वारी सदा 
दोघेही समाप्त झाले पंढरीसी ।
तयाच्या आत्म्याशी सुख लाभो 
तयाचिया कुळी बंडाजी ठाकुर । 
यावलीसी घर होते त्यांचे ॥
तयाची लक्षुमी नाव मंजुळाबाई । 
भक्त हे दोघेही राहती तेथे ॥
तयाचिये पोटी जन्म माझा डाला । 
कार्तिक पौर्णिमेला माध्यान्हासी ॥
माझे जन्म नाव माणिक सांगती। 
परि माझी मति तैसी नाही ।।
तुकड्या नावाने लोकी मी खेळलो। 
उजेडीया आलो तुकडे खाता ।।

यावली या गावी गेले तान्हपण ।
साधु संत जन आर्शीवादे ॥
भोळी भाळी माता, कांही समजेना ।
परि नारायणा न सोडी ती ॥
तान्हपणी मज संत-दर्शनास ।
धरोनिया हौस नेई भावे ।॥
आकोट ग्रामीचे  हरिबुवा सिद्ध । 
देती आर्शीवाद तान्हपणी ॥
संत गुलाबराव माधान गावीचे ।
आशिर्वाद त्यांचे बालकासी ॥
तुकड्यादास म्हणे नवसे मी झालो । 
प्रसादे लाभलो निधानाच्या ॥

लहानशा वयी बिकट प्रसंग । 
ओढवले चांग आई सांगे ॥
भोळीभाळी माता समजेना कांही । 
सांगे आईबाई तिजलागी ॥
रोड तुझा पुत्र बिबे लाव यासी । 
बाळसे देहासी येई तेव्हां  ॥
ऐकोनी आईने लावियले बिबे । 
अंग झाले बंबे सुजोनिया ॥
दाखवी पतीसी पहा माझे बाळ । 
जाहले प्रबळ कैसे दिसे ! ।
तुकड्यादास म्हणे सर्व अंग सुजे । 
तिजवाटे साजे बाळ माझे ॥

माझी जन्म-कथा मज नाही ठावी । 
वडिले सांगावी कळे आम्हां ।
माय बहू भोळी, कळे ना तिजला । 
कोणी कांही बोला सहन करी ।
बिबे लावावया सांगे एक बाई । 
लाविले अंगीहि सर्व माझ्या ।।
सुजलासे देह म्हणे लट्ठ झाला । 
बाळपणी गेला काळ ऐसा ।
तुकड्यादास म्हणे आम्ही भिकाऱ्याचे । 
परि सुभाग्याचे देव-कृपे ॥