शेतकरी बंधुनो ! ऐकता काय विनंती जरा ?

(चालः हटातटाने पटा रंगवुनि...)
शेतकरी बंधुनो ! ऐकता काय विनंती जरा ?
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥धृ०॥
का विकता गायिला कसाबा ? बैल नको का तुम्हा ?
कपाळी पुरेल का ती जमा ?
उगीच घेउनि पाप शिरावर जाता शेतावरी ।
पिके का भूमी असल्यापरी ?
( अंतरा ) घ्या दूध - दही गायिचे चारुनी तिला ।
संतुष्ट करा पाजुनी बाळ तान्हुला ।
द्या शेजाऱ्यांच्या मुला म्हणुनि आपुला
या मार्गाने सुखसंपत्ती येईल आपुल्या घरा ।
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥१॥
निर्व्यसनी राहुनी जगी या सोडुनि द्या हो चहा ।
पिउ नका गांजा दारु पहा ॥
या व्यसनांच्या पायि बुडाले धनी कितीतरि महा ।
लागले भिके समजुनी रहा ।
( अंतरा ) का वधता निरअपराधि जीव खायया I
ना मिळे तुम्हा का अन्नचि पोटासि या ।
सांगाल काय पुस घेतां देवा तया ?
कष्ट करा आनंदि रहा कामात राम हा स्मरा ।
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥२॥
का करिता भांडणे आपल्या धर्म - देश - बंधुशी ?
समजुनी रहा सदा एकिसी॥
निष्कपटाने करा आपुल्या व्यवहारा मानसी ।
भरु नका घरे कुणाची अशी ॥
( अंतरा ) अम्हि मूर्ख म्हणोनी कुणी भोंदिती किती ।
अमुच्याच घनावर धनी मजा मारिती ।
अजवरी फसविले असे भ्रमवुनी मती ।
अशा प्रसंगी द्रव्य उडवुनी कर्ज कशाला करा ?
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥३॥
होस दावुनी लग्नप्रसंगी कर्ज काढिती किती ।
जन्मभर दुःख पुढे भोगती ॥
कर्ज फिटेना दुःख मिटेना सणवारादी अती ।
कशाला भ्रमी पाडिता मती ?
( अंतरा ) करुनिया खादिचे वस्त्र वापरा घरी ।
शेतीत पिकवुनी धान्य ज्वारी - बाजरी ।
साधीच राहणी ठेवा देवापरी ।
जिवंतपणि वडिलांची सेवा देव समजुनी करा ।
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥४॥
मुलीबाळिचा घेउनि पैसा लग्न लाविता तिचे ।
म्हणावे वडिल तुम्हा कोणचे ?
पैसा पाहुनि देता मुलगी जन्म गमविता तिचे ।
ज्ञान हे कुणी दिले कोठचे ?
( अंतरा ) पडु नका अशा लोभात पचेना धन ।
लावाल कुळाला कलंक याच्या गुण ।
द्या मुलगी शोभे जोड असा पाहुन ।
समाजसेवा - व्रता देउनी पुनीत त्यांना करा ।
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥५॥
देवि म्हसाई - खाई - मराई नवसाला पावती ।
तरी का वांझ जगी राहती ?
उगीच देती बळी बिचाऱ्या बकऱ्या मेंढ्या किती I
करुनिया पाप पुण्य भाकिती ॥
( अंतरा ) हे कोण सांगतो लोभिलबाडाविना ?
अनुभवास येई तरी ध्यान राहिना ?
सोडुनी सुखी व्हा असा आंधळेपणा ।
तुकड्यादास म्हणे या वचना सदैव कानी धरा ।
अल्प ही सेवा हृदयी धरा ॥६॥