सांभाळूनि घे पाय पुढे बघ धोका आहे तुला
( चाल : नरजन्मामधि नरा ... )
सांभाळूनि घे पाय पुढे बघ धोका आहे तुला I
भारता ! धुंद कसा जाहला ? ॥धृ0॥
आंतरीय या पक्षबाजि आणि प्रांतबाजीच्या निशी I
शत्रु तव चाल करी छातिशि ॥
खळबळले चहुंकडे शत्रु तव मित्रचि म्हणसी तया I
भोळसट राह नको अजुनिया ॥
( अंतरा ) रे उघड नेत्र हो ऐक कर्णि आरळी ।
बसशील स्वस्थ तरि जाशि शत्रुसी बळी ।
जोड़ रे आपुली जोड अता साखळी ।
सर्व तऱ्हेने तयार हो म्हणविसी जरी तू भला ।
भारता ! धुंद कसा जाहला ? ॥१॥
एक एक क्षण फुका तुझा आणि शत्रु तयारी करी ।
व्याप हा कोण पुढे आवरी ? ॥
जबाबदारी तुझ्यावरचि ही अनपढ जनता खरी ।
बिचारी हाय हाय मनि करी ॥
गुलामगिरितुनी अताच सुटली पुन्हा नशीबी परी ।
न येवो ग्रहण अता सामुरी ॥
( अंतरा ) बिघडु दे शेत परि कुंपण घे घालुनी ।
त्यापरी शिपायी सज्ज करी सजवुनी ।
साहित्य सर्व घे भीति न दावो कुणी ।
लाव छातिला माति उभा हो रक्षण करण्या खुला ।
भारता ! धुंद कसा जाहला ? ॥२॥
सोड मोह सत्तेचा अपुल्या पंथाचा जातिचा ।
अगोदर विचार कर शत्रुचा ॥
तुझ्यावरचि जे टपून असती शक्ति - युक्ति घेउनी ।
न त्यांना भीक घाल जाउनी ॥
बोल गांधिजी बोल शिवाजी रंग चढू दे पुरा ।
भारता ! होऊ नको घाबरा॥
( अंतरा ) खाऊनी भाकरी - मिरची लढ जाऊनी ।
स्वातंत्र्य रक्षण्या घेइ धडक धावुनी ।
अमर हो प्राण जरि गेला समरांगणी ।
मानवधर्मा जाग जाग रे सोडनिया गलबला ।
भारता ! धुंद कसा जाहला ॥३॥
तुझ्या शांक्तिचा तुझ्या युक्तिचा ठाव असू दे तुला ।
पुढे चल बघत बघत आपुला ॥
साधुसंत आणि थोर - तरुणही याच कार्यि रंगु दे ।
विषय हा घरोघरी सांगु दे ।
हीच वेळ आणि हाच काळ बघ कठिण तुझ्या राशिला ।
स्मरूनि कर कार्य पूज्य गांधीला ॥
( अंतरा ) प्रार्थुया प्रभुला यश दे देशाप्रती ।
फडकूं दे तिरंगा अमर अता भारती I
या साठिच सगळे एक होऊ सन्मती I
तुकडयादास म्हणे सावध हो घे गीता साथिला I
भारता ! धुंद कसा जाहला ? ॥४॥