लाभेल भाग्य भारता सुदिन हा अता
( चाल : शिवराया जाइ तो रणा ... )
लाभेल भाग्य भारता सुदिन हा अता झंणि येता हे ।
त्या स्वर्गसुखाचे स्वप्न रंगुनी पाहे ॥धृ0॥
जातील भेद विलयाला जें दिसली आज जगाला ।
कोणी ना भिववि कुणाला समतोल शक्ति सर्वाला I
धनधान्य विपुल घरोघरी ज्वारिबाजरी सुखाने खा हे -
गावात करा उद्योग मनाला जो ये ॥१॥
कोणि ना व्यसनि राहतील जे दारू - भांग पितील I
नच जुगार डोकावील चाहड्यास न वेळ मिळेल I
होतील कायदे असे गुंड़ माणसे नितीने राहे ।
का जरा संशयित दिसे पकडला जाये ॥२॥
जातीयवाद हा सारा लाजुनी फिरे माघारा I
दैवास मिळेना थारा चढतील मुकुट गुणिविरा ।
शस्त्रास्त्र जळूनि शक्तिने होऊनी मने शुध्द जणु राहे -
या भारतदेशा जग हे झूरूनी पाहे ॥३॥
नांदेल राज्य रामाचे येतील पुढे कामाचे ।
श्रीमंत धनी सर्वांचे होईल हृदय समतेचे I
जो कष्ट करिल तो सुखी एरवी दुःखी भेद ना राहे -
मागती भीक जे करिति न उद्योग हे ॥४॥
मठमंदिरक्षेत्रहि सारे होतील आश्रमचि प्यारे ।
हे साधुपुजारी सारे झटतील देश - उपकारे ।
प्रत्येक वीर भारती कलेची मती अनुभवीताहे ।
कोणि ना कुणाचे अन्न बसोनी खाये ॥५॥
हे धर्म - वर्म सर्वांचे धरतील मार्ग सत्याचे ।
वैमनस्य जे स्वजनांचे जाईल मिटोनी साचे ।
गोधने वाढतिल अती शेतिची स्थिती सुधारूनि जाये ।
घरोघरि दूध आणि तूप मुलाबाळा हे ॥६॥
स्वराज्य सुराज्यासाठी ही वसेल बुध्दी पोटी ।
त्या विश्वबंधुतेसाठी ही सत्य - अहिंसा मोठी I
हा दिसे भाव अंतरी स्वप्न बहुपरी लपूनी बघताहे I
तुकडयास सुचिन्हाची गमे हर्ष ना माये ॥७॥