करा करा रे करा कितितरी समाधान नच दिसे

( चाल : दयामयी अवतार शान्ति का...)
करा करा रे करा कितितरी समाधान नच दिसे ।
जोवरी संतकृपा शिरि नसे ॥धृ०॥
वाचा पोथी तीर्थ फिरुनिया देऊळ धरुनी बसा ।
वासना सोडिच ना अवदसा ॥
दान करा वा रान फिरा किति यज्ञ - यागही करा ।
सोडिना अहंकार बावरा ॥
त्यासाठी पाहिजे मस्त कुणी पाठिशी ।
मग सफल होतसे धरा भावना जशी ।
धर बसल्या येति सर्व हसी अन् खुशी ।
संत गजानन वली - अवलिया - समान साधु जसे ।
पावती तरिच शान्ति होतसे ॥१॥
मोह नसे ज्या धन - दारेचा सत्तेचा कोणचा ।
मान ना पान शरिरादिचा ॥
भान नसे शरिराचे तिळही काम - क्रोध मग कुठे ?
लाजुनी पळती कुठच्या कुठे ॥
निज स्वरुपाची लागली धुंद अंतरी ।
कुणि काहि म्हणा नच भान तया तिळभरी I
वस्त्र ना अंगि अति नग्न - रूप संचरी ।
भेद-भाव हा समूळ गेला मनुष्य ना स्त्री सुचे ।
सर्व हे ब्रह्मचि अंतरि वसे ॥२॥
म्हणुन सांगतो स्थितप्रज्ञ तो त्याचि कृपा घ्या शिरी ।
पालटे वृत्ती मग अंतरी ॥
शेगावी दरबार तयाचा लखख समाधी दिसे ।
चित्त अति प्रेमळपण घेतसे ॥
घ्या दर्शन त्यांचे व्यसनांशी सोडूनी ।
सत्कर्म कराया बुद्धी घ्या मागुनी ।
वाईट वागणे पाप मनी समजुनी I
तुकड्यादास म्हणे मग साधे साधन कोणी असे I
लागु द्या गुरुदेवाचे पिसे ! ॥३॥