तुझ्या स्मृतीचा उदो - उदो हा कार्यास्तव भासला
(चाल : पटातटाला फोडूनि आलीस...)
तुझ्या स्मृतीचा उदो - उदो हा कार्यास्तव भासला ।
म्हणुनि हा प्रसंग आरंभिला ॥
तु गेला अणि दया - अहिंसा मनी लाजु लागली ।
सोडुनी जनता दुर चालली ॥
सत्य बोलणे विरले आता स्वार्थबुध्दि वाढली ।
कुटिलता घरोघरी पसरली ॥
चारित्र्याचा भासचि उरला नीतिन्याय - कल्पना ।
घडेना दर्शन त्यांचे मना ॥
( अंतरा ) सावरील याला कोण ? कळेना मला ।
तव अपूर्ण इच्छा तृप्त कराया तुला ।
सेवकास द्या या शक्ति - बुद्धि अणि कला ।
अफाट जन त्या मार्गि लागण्या शब्द बोलण्या खुला ।
म्हणुनी हा प्रसग आरंभिला 0॥१॥
उदास झाले जन हे सगळे माणुसकी हरपली ।
पळाली कुळे तरी माऊली ॥
कष्ट कराया कोणि मिळेना पुढारिपण वाढले ।
तमाशे हेच दिसू लागले ॥
जो तो खातो खातो म्हणतो आपसात आपणा ।
धिंगाणा नाचतसे दणदणा ॥
(अंतरा) हे बघूनि परके दारावर धडकले ।
अति निर्भय होउनि मधे फिरु लागले ।
असुनिया चोर अम्हि मालक म्हणती भले ।
राहु नये ही विटंबना जनि मार्ग कळो आपुला ।
म्हणुनि हा प्रसंग आरंभिला 0 ॥२॥
जरि जाहला स्वतंत्र तरिही समाज शिकला नसे ।
कळेना कार्य हक्कही तसे ॥
सरळ चालणे गोड बोलणे नियमाने वागणे ।
न कळते घरा स्वच्छ ठेवणे ॥
घरचे करण्या कार्य मानवा लाज आज वाटते ।
कळेना पुढे काय होइ़ ते ॥
( अंतरा ) जिवनास हवे जे तेच विसरला गडी ।
धनधान्य-कमाई यात नसे आवडी ।
फिरतसे पिउनिया दारु - गांजा - बिडी ।
असे बनूनी देश न गमवी सदा जाचते मला ।
म्हणुनि हा प्रसंग आरंभिला 0 ॥३॥
भारतभूच्या प्रीय महात्म्या ! शक्ति देइ आतुनि ।
कराया कार्य सेवकातुनी ।
पंथ - पक्ष अणि जाति - धर्म हे एकतत्त्वि वागण्या ।
समता मानवता सांगण्या ॥
गांव असो वा शहर कुणीही उन्नत हो झडकरी ।
बंधुता वाढो घरी - परघरी ॥
( अंतरा ) स्वातंत्र्य रक्षिण्या सर्वचि शक्ति जमो ।
अभिमान जाउनी कार्यास्तव शिर नमो ।
पक्षांध वृत्ति वाढण्या न बुध्दी भ्रमो I
तुकडया दास म्हणे यासाठिच जना कळाया कला I
म्हणुनि हा प्रसंग आरंभिला 0 ॥४॥ .