अंबिके ! तारक सकलांची I प्रीय तू मायचि जगताची

               आरती
( चाल : आरती कुंजबिहारीची ... )
अंबिके ! तारक सकलांची I प्रीय तू मायचि जगताची ॥
निर्मिशी स्फूर्ति ज्ञानाची । शक्ति आदिच्या अनादिची ॥
रुप सुंदर लावण्याची I झळकली कळा नभावरची ॥
मुनीजन ध्याती तुज ध्यानी I
सृष्टिची तूच उपादानी I
निर्मिशी सहज लोक तिन्ही I
पदी घे दास पुरवि मम आस करी रिपुनाश ।
वास तव सदा असो वाची । स्मराया वेदऋचा साची ॥१॥
सुवर्णापरी रंग तनुचा । कुंकुमित मळवट श्रीशिरिचा ॥
दिव्य मणि तेजवि नेत्रीचा । प्रबल ओज हा सुशक्तीचा ॥
मर्दुनी मद तू असुरांचा । करिशि प्रतिपाळ भाविकांचा ॥
न घे बलिदान सज्जनांचे ।
ओढिशी प्राण पापियांचे ।
वर्णिती ख्याति सर्व साचे ।
सिद्ध करि काम धरिति जे प्रेम धन्य तव नाम ।
धाम तव सृष्टिच ही साची । प्रगटली माय ज्ञानियांची ॥२॥
कुठे कालिचे रूप धरुनी । कुठे तू महिषासुर - मथनी ॥
कुठे मंगलादेवि म्हणुनी । कुठे जगदंब विश्वजननी ॥
कुठे तू योगेश्वरि भुवनी । कुठे संक्रांतिदेवि म्हणुनी ॥
अमित तव रुपे सृष्टिमाजी ।
गमे मज तूच जगा साजी ।
तुझ्याविण ब्रह्म न ये काजी ।
सर्वमय आई ! सदा सुखदायी ! नमो तव पायी ।
होइ रथ - वाहक तुकड्याची । भक्ति मज दे श्रीसद्गुरुची ॥३॥