श्रीसद्गुरुचरणाविण अन्य नसे मज भवाब्धि तरण्याला

(श्रीसद्गुरु - महिमामृत)
श्रीसद्गुरुचरणाविण अन्य नसे मज भवाब्धि तरण्याला ।
महिमा श्रेष्ठ तयाचा देवादिक वर्णिती यया बोला ॥१॥
गुरुसेवा ही माझ्या आजापणजास मान्य झालीसे ।
होता कृपा तयाची बद्ध जिवा शुद्धता फळालीसे ॥२॥
नच अन्य उपायांनी अपरोक्षा प्राप्त हो कुणी प्राणी ।
सद्गुरु भजता भावे होऊ नये तो स्वयेचि हो ज्ञानी ॥३ ॥
का ते अधिक वदावे अंत नसे त्या गुरुत्व - शक्तीचा ।
ध्याता पदा तयाच्या करील अधिकारि मोक्ष - मुक्तीचा ॥४ ॥
परि जो गुरुसेवेवरि अश्रद्धा ठेवि मानसी अपुल्या ।
भोगित पतन फिरे तो न चुके चौऱ्यांशि जन्म वावरल्या ॥५॥
धर्मे पुण्यफळाचे आशे भोगी अनंत जन्माते I
तेवि नव्हे गुरु - सेवा टाळी स्मरता अनंत जन्माते ॥६॥
शास्त्र पुराणे श्रवणी ऐकोनी मानसी तया ध्यावे I
न पुढे काम तयांचे निश्चिते गुरु -पदासी सेवावे ॥७॥
सद्गुरु - पदास मानी धन्य जगी तो मनुष्य जाणावा ।
भक्त नव्हे नर याच - नारायण निश्चयेसि मानावा ॥८॥
मूळ परम धर्माचे श्रीगुरु आधिष्ठ जाण बापारे ।
याविण सोपे नाही साधन मान्यांस मान्य जाणारे ॥९ ॥
सकळी ज्ञान कळावे ऐसे असल्यास सद्गुरु ध्यावा ।
त्वंपद झापडमोडी तत् - पद स्वरुपी करी यया नावा ॥१०॥
सद्गुरु .- सेवेऐसी न जडी कोठेही धुंडधुंडावी ।
ऐसे मत शास्त्राचे सद्गुरु - सेवेस लाज सांडावी ॥११॥
हास्य - विनोद सारे सोडुनिया सद्विचार विवरावा ।
व्यसने सोडुनि मागे सत्संगति लाभ तो तिथे घ्यावा ॥१२॥
निर्मळ अंग स्वभावी सद्गुरु - वचनास नित्य पाळावे ।
उल्हासे आनंदुनि आदर मानास नित्य जाळावे ॥१३॥
घरगाणे ओरडुनी मग का लाभेल नित्य ती जोड ? ।
नाशिवंत सांडुनिया लाभावी सत्य नित्य ती जोड ॥१४॥
साक्षी रूप जयाचे मम मानस त्या पदावरी लोळे ।
श्रीमत् आडकुजी - पद ध्याता जळतील अंतरी काळे ॥१५॥
करुणाकर दासाचा आश्रय करिताचि भाग्य फळलेसे ।
तुकड्या अंकित स्मरता भावे गायास चित्त वळलेसे ॥१६॥