चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू
चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू ।
भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥॥धृ०।॥।
बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी ।
करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ।।१॥।
आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना ।
प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ।॥।२॥।
विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्विची पेठ ।
दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू 11३ ॥।
न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा ।
म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ।।४॥।