ग्रामगीता अध्याय १०

संघटन-शक्ति

॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥ 

    

एक सेवानुभवी श्रोता । गहिवर दाटोनिया चित्तां । म्हणे माझी ऐका शोककथा । एकदा कानीं ॥१॥ 


सेवावृत्तीने वागतां । ग्रामोध्दाराचें फळ ये हातां । लोकवशीकरणाचा सेवेपरता । मंत्र नसे कोणी ॥२॥ 


हें आहे सर्वचि खरें । अनुभवासहि ये निर्धारें । परि काहीं लोक स्वार्थभरें । व्देषी होती सेवेचे ॥३॥ 


त्यांत कांही विद्वान कांही श्रीमान । राजदरबारींहि कांहींचें वजन । त्यांना गांवाचें हवें पुढारीपण । स्वार्थासाठी जेथे तेथे ॥४॥ 


लोक राहावेत पंखाखाली । म्हणजे आपुली पोळी पिकली । म्हणोनि खेळती अनेक चाली । सोंग घेवोनि सेवेचें ॥५॥


देती मिळवोनि दुर्मिळ सामान । कोणास कांही प्रलोभन । व्यसनी गुंडांस देती प्रोत्साहन । करिती संपादन प्रेम ऐसें ॥६॥ 


तेथे आमुची सेवा सगळी । प्रसंगीं होऊनि पडे दुबळी । जनता फसते भोळीभाळी ।  जाऊनि जाळीं तयांच्या ॥७॥ 


आमुच्या गांवीं हेंचि झालें । गांव सेवकांनी उत्तम केलें । परि पुढे दुर्भाग्य ओढवलें । याच मार्गे ॥८॥


सुंदर वेली लावल्या अंगणीं । घालोनिया परिश्रमाचें पाणी । फुलाफळांनी गेल्या बहरोनि । गगनभेदी ॥९॥


तैशांत सोसाटियाने आणावें वादळा । गळावा फळें फुलें पाचोळा । त्यांसवें वेलींचाहि चोळामेळा । व्हावा क्षणीं ॥१०॥ 


कैसें दु:खी न होईल मन । ज्याने वाढविलें करोनि जतन । गेलें घराचेंचि सुंदरपण । एकाएकीं ॥११॥.


तैसें गांव नीतीने जतन केलें । मुलांबाळांसहि सांभाळिलें । परस्परांत प्रेम नांदलें । सेवागुणें खेळींमेळीं ॥१२॥ 


परि घुसले गांवचे भेदी । लाविली स्वार्थासाठी उपाधि । उगीदुगी करोनि भ्रमविली बुध्दि । पाडली फूट ॥१३॥ 


सेवेचें सोंग उभें केलें । आपले स्तुतिपाठक घुसविले । वाईट झालें तें तें माथीं मारलें । खर्‍या सेवकांच्या ॥१४॥ 


नथींतून जैसा मारावा तीर । तैसे असती बहादूर । परि गांव केला चकनाचूर । द्वैत पाडोनि ॥१५॥


नाना तर्‍हेचे वाद वितंड । नाना पक्षांचें माजविलें बंड । कधी आड कधी उघड । सुरू झालें कार्य त्यांचें ॥१६॥ 


गोंधळवोनि टाकिलें जनमना । झाला प्रेम-शक्तीचा धिंगाणा । जिकडे पाहावें तिकडे कल्पना । फुटीर वृत्तीच्या ॥१७॥ 


कांही सज्जनांनी गांव जमविलें । कांही गुंडानी गांव नाशविलें । नाना तर्‍हेचे तमाशे झाले । गांवीं आमुच्या ॥१८॥ 


व्यक्तिस्वार्थ बोकाळला । जो तो मनाचा राजा झाला । वेगवेगळया प्रलोभनीं गुंतला । समाज सारा ॥१९॥ 


आमिषामाजी लपला गळ । परि माशासि दिसे आमिषचि केवळ । तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ । प्रलोभनापायीं ॥२०॥ 


कांही अतिनम्रता दाखविती । साहेबांचे जोडेहि पुसती । मनीं वासना वाईट धरती । अधिकारी व्हाया गांवाचा ॥२१॥ 


नाही कोणा सेवेचें भान । घालिती सत्तेसाठी थैमान । गांव केलें छिन्नभिन्न । निवडणुकी लढवोनि ॥२२॥


गांवीं होती निवडणुकी । माणसें होती परस्परांत साशंकी । कितीतरी पक्षोपक्षांनी दु:खी । व्यवहारामाजी ॥२३॥ 


तैसीच येथे गति झाली । कोणी जातीयतेची कास धरिली । कुचेष्टा करोनि प्रतिष्ठा मिळविली । वचनें दिलीं हवीं तैसीं ॥२४॥ 


कांहीकांनी मेजवानी दिली । दारू पाजूनि मतें घेतलीं । भोळी जनता फसवोनि आणिली । मोटारींत घालोनिया ॥२५॥


ऐसा सर्व प्रकार केला । गुंडगिरीने निवडून आला । म्हणे संधि मिळाली सेवकाला । सेवा करीन सर्वांहूनि ॥२६॥ 


साधन ज्याचें मुळांत अशुध्द । त्याचा परिपाक कोठूनि शुध्द ? लोकां पोळोनि व्हावें समृध्द । गांवीं दुफळी माजवोनि ॥२७॥


सत्तेसाठी हपापावें । वाटेल तैसें पाप करावें । जनशक्तीस पायीं तुडवावें । ऐसें चाले स्वार्थासाठी ॥२८॥


याने गांवाची होय दुर्दशा । मतमतांतराचा वाढे तमाशा । सज्जनांची होय निराशा । मरणापरी ॥२९॥ 


आतां सांगा काय करावें ? कासयाने गांव सुधारावें ? जें जें होईल तें तें पाहावें । ऐसें वाटे निराशपणें ॥३०॥


ऐसा श्रोतयाने प्रश्न केला । मीं तो मनापासोनि ऐकला । मित्रहो ! उपाययोजना तुम्हांला । सांगतों माझेपरीं ॥३१॥ 


परिस्थिती ही साचचि आहे । परि निराश होणें काम नोहे । दुर्जनांचें बळ वाढाया हे । कारण होई निराशा ॥३२॥


आपणांस काय करणें । ऐसे बोलती लोक शहाणे । तरि समजावें गांव या गुणाने । नष्ट होईल सर्वस्वीं ॥३३॥


मग तो मुखंडहि नव्हे । ऐसें कां न समजावें ? निर्धाराने प्रयत्न करावे । सर्व मिळोनि जाणत्यांनी ॥३४॥ 


ऐसें असावें धोरण । तेंचि कार्यकर्त्यांसि भूषण । गांव निर्मावया आपुले प्राण । पणा लावावे ॥३५॥ 


विरोध येतां बसावें घरांत । ऐसें नोहे सेवेचें व्रत । गंगा घाबरती पाहोनि पर्वत । तरी सागरा न मिळती ॥३६॥


कोरडया हौदामाजीं तरावें । याने गौरव कोणा पावे ? पुरांच्या लाटांतूनि पोहूनि जावें । यांतचि वैशिष्टय आपुलें ॥३७॥


म्हणोनि कर्तव्य सांभाळावें । गांवशील जतन करावें । सोसाटयाने झडपूं न द्यावें । गांवचें कोणी ॥३८॥


ग्रामसेवाचि ईश्वर-सेवा । ऐसें समजावोनि जीवा । गांव सेवेसि तत्पर करावा । सर्वतोपरीं ॥३९॥ 


नि:पक्षपणें बौध्दिकें द्यावीं । सर्वांची समजून पटवावी । बुध्दि गांवाची सांभाळावी । प्रचाराद्वारें ॥४०॥


जनजागृति झालियाविण । न संपेल गांवाचें दैन्य । दृष्टि येतां लोकांसि, दुर्जन । मेख गडवूं न शकती ॥४१॥


या कार्यासि मिळावी जोड । म्हणोनि हातीं कांही मुखंड । तेणें शक्ति लाभे तोडीस तोड । पटती फिके ग्रामशत्रु ॥४२॥


असो नसो साथ सत्तेचा । सहयोग मिळवावा सज्जनांचा । जनसेवकांनी ग्रामराज्याचा । पाया रचावा सत्यावरि ॥४३॥


ज्यांना ज्यांना न्यायाची चाड । आणि गांव-सेवेची आवड । त्यांचीच संघटना व्हावी दृढ । करावी वाढ दिसंदिस ॥४४॥ 


जाणता दिसेल तो निवडावा । जिव्हाळयाचा पुरुष वेचावा । थोरांचिया नेतृत्वें चालवावा । कारभार ग्रामोन्नतीचा ॥४५॥


श्रोता म्हणे तेंहि झालें । महाप्रयासें सज्जन जमविले । परंतु एकदा चुकलें । तें सुधरेचना की ॥४६॥ 


अहो ! एक कमेटी बसली । गांवीं सुंदरता आणाया भली । म्हणे पाहिजे निवडणूक केली । पुढार्‍यासाठी ॥४७॥ 


कोण गांवाचा पुढारी ठरवावा ? आधी मान कोणास द्यावा ? कोणाच्या हातें चालवावा । कारभार गांव-सेवेचा ? ॥४८॥


म्हणोनि निवडणूक ठरविली । ती जणुं आगींत बारूद पडली । अथवा राकेलाची टाकीच ओतली । अग्निमाजी ॥४९॥


तेणें जाहला अग्निबंबाळ । मतामतांचा हलकल्लोळ । एकमेकासि पाहती महाकाळ । शहाणे गडी ॥५०॥ 


जो तो म्हणे मीच शहाणा । कोणीच कोणाचें ऐकेना । अरे ! तोबातोबा ! आरडाओरडांना । सुमारचि नाही ॥५१॥


घरोघरीं मारामारी । बायको उठूनि नवर्‍यासि मारी । मुलें म्हणती आम्ही शहाणे भारी । पुस्तकें सारीं शिकलों की ॥५२॥


कोण पुढारी समजावा ? विचार झाला सगळया गांवा । एकएकाच्या न मिळे भावा । सांगा काय करावें ? ॥५३॥


श्रोतयाचा हा अनुभव । येत आहे गांवोगांव । परंतु येथे मुळांतचि ठेव । चुकली सारी ॥५४॥


गढूळ पाणी ढवळों जातां । घाणचि उफाळोनि ये हातां । जेथे सेवेची नाही आत्मीयता । तेथे गोंधळ सहजचि ॥५५॥ 


यासाठी आधी सेवाभावी । लोकांचीच संघटना व्हावी । तेथे रीघचि नसावी । अन्य कोणासि ॥५६॥


गांवांतील एकेक सज्जन । शोदूनि घ्यावे त्यासि जोडून । सेवाभावी मंडळचि संपूर्ण । तयार करावें प्रयत्नें ॥५७॥


त्याचें प्रामाणिक सत्कार्य । लोकांपुढे येतां निर्भय । आपोआपचि होईल निश्चय । लागेल सोय गांवासि ॥५८॥ 


सेवेची ही नैतिक सत्ता । वजन मिळवील गांवहिता मग कोणी विरोध तत्त्वता । न टिके तेथे ॥५९॥ 


टाकूनि दाब कोणावरि । लालुच दावूनि करिती फितुरी । विघ्नें आणिती सत्कार्यावरि । होतील दुरी ते सर्व ॥६०॥ 


सेवासंघटनेचा प्रमुख । तो निवडोनि देतां चोख । हळुहळू गांव होईल सुरेख । सर्वतोपरीं ॥६१॥


श्रोता म्हणे ठीक हें सारें । परि गांवीं आलें निवडणुकीचें वारें । तेणें गांव आमचें भरीं भरे । भलतैशाचि ॥६२॥


स्वार्थापायीं सेवा-विरोध । करणारे जे गांवचे मैंद । ते नाना मार्गे करिती बुध्दिभेद । जनतेचा तयेवेळीं ॥६३॥ 

तेथे आम्हीं काय करावें ? गांव कैसे सुधारावें ? याचें समाधान ऐकावें । श्रोतेजनीं ॥६४॥ 


सांगितलें ते साचचि आहे । गांवोगांवीं अनुभवा ये । यासाठी सरळ दावावी सोय । विचाराने गांवलोकां ॥६५॥


निवडणुकीची चालू प्रथा । हीच मुळीं सदोष पाहतां । म्हणोनि योग्य दृष्टि द्यावी समस्ता । गांववासियां ॥६६॥ 


जीवनाची जबाबदारी । किती आहे निवडणुकीवरि । हें पटवोनि निवडणूक खरी । करवावी न गोंधळता ॥६७॥


विचार केलिया हळूहळू । आपैसाचि मार्ग ये कळूं । निवडणुकीचें तत्त्व जातां आकळूं । मिटेल गोंधळ सहजचि ॥६८॥ 


अहो ! पुढारीपण कशाला ? सेवा गांवाची करावयाला । मग सेवेची कसोटी लावा कीं आपुला । समजेल पुढारी कोण तो ॥६९॥ 


कोण गांवासाठी झटे । कोण उठतो रोज पहाटे । घेऊनि हातामाजीं खराटे । झाडतो कोण ॥७०॥


साध्या राहणीने दिवसभरि । कोण गरीबाचें काम करी । कोण पायीं फिरोन करी वारी । गांवाची आमुच्या ॥७१॥


कोण नीतीने असे चांगला । पक्षपात न आवडे कोणाला । छदामासि नसे लाजीम झाला । गांव-निधीच्या ॥७२॥


कोण सर्वांचें पाहतो सुख:दुख । कोणाचें दिसे सेवेंसाठी मुख । हीच त्याची जाणावी ओळख । निवडावया ॥७३॥ 


किंवा सकळांना सांगा काम । सोडा हुकूम आपुला बेफाम । कोण पहा न करितां आराम । काम करी गांवाचें ॥७४॥ 


मग तोचि म्हणावा पुढारी । आंधळाहि त्याची निवड करी । येथे कासयास ही टिमकी भरजरी । जाहिरातींची ? ॥७५॥ 


गांवचा जो प्रत्येक घटक । त्यासि ठाऊक असावा माणूस एकेक । कोण चुकार, कोण सेवक । चालक कोण ? ॥७६॥ 


कोण गांवाची सेवा करतो । कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो । सांगावा प्रसंग येतां स्पष्ट तो । गांवामाजी ॥७७॥


तेथे नसावी लाजशरम । त्याने बिघडेल गांवाचें काम । म्हणोनि सर्वांनी द्यावें त्याचेंच नाम । न गोंधळतां ॥७८॥


ज्यासि गांवाचा जिव्हाळा । जो कार्यज्ञानाचा पुतळा । तोचि सुखी करील गांव सगळा । निवडोनि देतां ॥७९॥ 


ऐसें न करतां भांडणें माजती । गांवची होईल अनावर स्थिति । मग फावेल स्वार्थीजनाप्रति । सज्जन राहती वेगळेचि ॥८०॥ 


यासाठी उत्तम गुणी निवडावा । ज्याची सर्व करिती वाहवा ! गांवाचा बागडोर त्यासि द्यावा । आपुला पुढारी म्हणोनिया ॥८१॥ 


नाहीतरि गांवचे म्हणविती पुढारी । दांत बसला सवाई-दिढीवरि । आपण होऊनि वाघापरी । गांव मारिती उपवासी ॥८२॥ 


कांही लोक भाषणें करिती । बोलूनि पक्षभेद पाडिती । जुळल्यांची तोडूनि मति । भरती करिती झगडयांची ॥८३॥ 


ऐसा नकोच पुढारी । ज्याने नाही केली कर्तबगारी । तो मित्र नव्हे, वैरी । समजतों आम्ही ॥८४॥


ज्याने केलें असेल उन्नत ग्राम । अथवा समुदायाचें आदर्श काम । तोचि बोलण्याचा अधिकारी उत्तम । समजतों आम्ही ॥८५॥


एरव्ही पैशाचे मिळाले तीन । देती भरभरा भाषण । न बसावें कोणाचेंहि मन । तयांवरि ॥८६॥ 


ऐसे पुढारेपण जेथे दिसे । गांवाने लावूनि न घ्यावें पिसें । जो इमानदार सेवक असे । तोचि समजावा गांवधनी ॥८७॥ .


बोलणें एक चालणें एक । लपविणें एक दाखविणें एक । हें गांवासि होईल घातक । समजावें श्रोतीं ॥८८॥


भिडेखातरहि विष खादलें । किंवा चोरूनिहि सर्पा दूध पाजलें । वाघाशीं सोईरपणहि संपादलें । तरी नाश होईल निश्चयें ॥८९॥ 


ऐसें न करावें वर्तन । असतील जे इमानदार सेवकजन । तेचि द्यावेत निवडोन । एकमतें सर्वांनी ॥९०॥ 


सर्वांस असावी चिंता समाजीं । कोण आहे लायक जनामाजी । कोण घेई गांवाची काळजी । सर्वकाळ ॥९१॥ 


तोचि करावा पुढारी । एरव्ही पडों नये कुणाच्याहि आहारी । धन वेचतो म्हणोनि गांवाधिकारी । करूं नये कोणासि ॥९२॥ 


पुढारीपण सेवेनेच मिळे । हेंचि बोलावें मिळोनि सगळे । तेथे पक्षबाजीचे चाळे । वाढोंचि न द्यावे ॥९३॥


नातीं गोतीं पक्ष-पंथ । जातपात गरीब-श्रीमंत । देवघेव भीडमुर्वत । यासाठी मत देऊंचि नये ॥९४॥


भवितव्य गांव अथवा राष्ट्राचें । आपुल्या मतावरीच साचें । एकेक मत लाख मोलाचें । ओळखावें याचें महिमान ॥९५॥ 


मत हें दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर । तरि आपलाचि उलटतो वार । आपणावर शेवटीं ॥९६॥


दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळतां आधार । सर्व गांवास करितील जर्जर । न देतां सत्पात्रीं मतदान ॥९७॥


मतदान नव्हे करमणूक । निवडणूक नव्हे बाजार-चुणूक । निवडणूक ही संधि अचूक । भवितव्याची ॥९८॥


निवडणूक जणुं स्वयंवर । ज्या हातीं देणें जीवनाचे बागडोर । त्यासि लावावी कसोटी सुंदर । सावधपणें ॥९९॥ 


फोड चोखाया लावोनि जैसे । शिष्य निवडिले रामदासें । मृत्यूच्या कसोटीवरि पाहणें तैसें । गुरु गोविंदसिंहाचें ॥१००॥.


गडी पळावयासि लागले । कोण थकले कोण बाद झाले । कोणाचे नंबर पुढे आले । सहजचि कळे या रीतीं ॥१०१॥ 


तैसेंचि आहे निवडणुकीचें । कामचि पाहावें सगळयांनी त्यांचें । ज्याचें काम अधिक मोलाचें । तोचि निवडावा मुख्य ऐसा ॥१०२॥ 


ऐसें सकळां पटवोनि द्यावें । तेणें गोंधळ मिटती आघवे । कार्यकर्त्यासीच संधि पावे । ऐसें होतें यायोगें ॥१०३॥ 


मग त्याचेंचि म्हणणें ऐकावें । सगळें गांव पुन्हा जमवावें । बाष्कळ बोले त्यास दाटोनि द्यावें । गांवकर्‍यांनी ॥१०४॥


ऐसें झालें की झाली संघटना । लागली सुरूं गांव-सुधारणा । झाला मुलामाणसांचा बाग पुन्हा । जिताजागता प्रेमळपणें ॥१०५॥ 


तेथे नवनवीं योजना-फुलें । विकसोनि देतील गोड फलें । ग्रामराज्याचें स्वप्नहि भलें । मूर्त होईल त्या गांवीं ॥१०६॥


कोणी उडवूं लागे धुरळा । तरि तो त्याचेचि जाईल डोळां । सुखें नांदेल गांव सगळा । तुकडया म्हणें ॥१०७॥ 


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला ग्रामराज्याचा निर्वाचन-पथ । दहावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥ 


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


*

चौपाई


* गुरुघर जन्म तुम्हारा होये । पिछले जातिबरण सब खोये ॥ 

चार बरणके एको भाई । धर्म खालसा पदबी पाई ॥ 

* सोउ धम मैं अचल चलाऊं । भेडोंको मैं सिंह बनाऊँ ॥ 

गौओंसे मैं शेर मराऊँ । भूप गरीबनको करवाऊँ ॥ 

            

-श्रीगुरु गोविन्दसिंहजी