ग्रामगीता अध्याय २०

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥ 


विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥ 


’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच जगातें उध्दरी ।’ ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥


मातेच्या स्वभावें पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचें वर्तन । स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचें मोठेपण । ऐसें आहे ॥४॥


म्हणती जरी ’ बाप तैसा लेक ’ । परि माऊलीचें महत्त्व अधिक । मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुलें चारित्र्याने ॥५॥ 


पुरूष सर्वकाहीं करी । परि बांधला राहे घराबाहेरी । सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥


उत्तम महिला हेंचि करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशीं ॥७॥


याच गुणें ’ मातृदेवो भव ’ । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥


प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथीं ॥९॥ 


कांही पुराणीं सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरीं ॥१०॥


वियोगाने वैराग्य दृढ करावें । मन इंद्रियसुखांतूनि परतवावें । म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यांत ॥११॥


वैराग्यांत न कथिलें दोषविरोधा । नसली साधनांत आपदा । कीर्तीत नसली कांही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥


म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचें नश्वरत्व ओंगळपण । हें वैराग्यार्थ केलें कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥ 


जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावें । लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसें म्हणोनि ॥१४॥


हें पुरुषास कथिलें स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयीं तिचें पोटीं । तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयांसि शास्त्र म्हणे ॥१५॥


परि छीः छीः नेहमीच म्हटलें । तरि पालनपोषणचि बिघडलें । संसारचक्रचि थांबोनि गेलें । त्यांतूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥


म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिंलें । महिलेविण विश्व न चाले । काय होतें पुरुषाने केलें ? अभद्र झालें घर सारें ॥१७॥


घरचा उत्तम कामधंदा । हें महिलेचेंचि लक्षण सदा । आलिया-गेलियासि आपदा । महिला असतां न वाटे ॥१८॥ 


खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणें बारीक कार्या । करूं जाणती उत्तम भार्या । न कंटाळतां काळजीने ॥१९॥


पुरुष-हृदया नाकळे जेवढें । स्त्रियेचें समजणें तितुकें गाढें । तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥ 


सर्वांगीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । जें जें  ठरवील तें सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥


जगांत असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥


देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥ 


माऊलीचें स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । माऊलीचें उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोकां ॥२४॥


संती माऊलीचें रूप धरिलें । तरीच ते देवपणासि पावले । नाना साधनें करोनि फिरले । त्यांना न गवसलें देवरूप ॥२५॥


तें हें स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥ 


स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचें लक्षचि न जाय । तेवढें शिक्षण मुलाबाळांस ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥


पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । दोघांचे स्वभाव मिळतांक्षणीं । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥ 


उत्तम पुरुषासवें उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥


जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । हें मी पाहिलें घरीं अपार । प्रसंग येतां जाण्याचे ॥३०॥


निरीक्षोनि जीं जीं घरें पाहिलीं । तेथे सरसता अनुभवा आली । चातुर्य-लक्षणें अधिक दिसलीं । महिलांमाजीं ॥३१॥


मानवी स्वभावांचें अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचें अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥३२॥


स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । तिच्यानेच हालतीं वाटे संपूर्ण । संसारचक्रें ॥३३॥ 


म्हणजे पुरुषाचें कांहीच नाही । ऐसें म्हणणें नोहे कांही । सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥ 


हें सर्व जरी सांगितलें । तरी त्यांत भावनेनेचि रंग भरले । कारण, मी नाही अनुभवलें । सुखदुःख संसाराचें ॥३५॥ 


माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजें तें तें बोललों ॥३६॥ 


परि यांतूनि एकचि घ्यावें । स्त्रियेसि कोठे अव्हेरावें । कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावें हें तारतम्यें ॥३७॥


कोठे वागवावें मित्रभावें । कोठे देवी म्हणोनि पुजावें । कोठे वैरिणीसारखे बघावें । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥ 


हें ज्या पुरुषांना नाही कळलें । ते जरी रानीवनी पळालें । तरी काय होतें केलें । सोंग ऐसें वरपंगी ? ॥३९॥ 


ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडें पडले हे ॥४०॥ 


केवळ आपुल्या वृत्तीकरितां । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । तेथे माऊलीपणाचिया माथां । दोष देतां पाप लागे ॥४१॥ 


म्हणोनि वैराग्यें स्त्री अव्हेरली । त्यांनी  विवेकें साधना केली । त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥ 


परि हें एकांगीपणें नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥ 


हीन-दुबळें केलें स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झालें जग सारें ॥४४॥


कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । त्याने घरोघरीं शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥


म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । हें म्हणणें शोभेना शहाण्यातें । स्वार्थांधतेचे ॥४६॥


म्हणती स्त्री ही कार्यांत धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतींत पाडावा खंड । ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥


वास्तविक दोन्ही संस्कारें जन्मती । अपुल्या प्रयत्नेंच उन्नत होती । शेवटी उध्दारही तिच्याच हातीं । असे तियेचा ॥४८॥


काय देवें देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥


काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? नाना विद्याकला भेद । यांत प्रवीण कितीतरी ॥५०॥ 


काय स्त्रियांनी युध्द नाही केलें ? पतिपुत्रां नाही प्रोत्साहन दिलें ? काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥  


हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । त्यांचें करावें तेवढें कौतुक । थोडेंचि आहे ॥५२॥


स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥


परि तिचें लक्ष कोणीकडे न्यावें । काय संस्कार तिच्यांत भरावे । काय शिकवोनि तयार करावें । हें आहे संगतीहातीं ॥५४॥ 


संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । तिच्यांत वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडांसहि ॥५५॥


प्राण देईल आपुल्या हातें । परि भ्रष्ट न होईल लोभें-भयें ते । ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषें ॥५६॥ 


त्यासाठी तिला तैसेंचि ठेवावें । सुसंगति द्यावी आणि शिकवावें । नातेंगोतें सर्व तैसेंचि राखावें । स्त्रीचेप्रति ॥५७॥ 


अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतींची राहणी । कार्यी चपल, सावध जीवनीं । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥ 


कांही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥ 


तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥ 


परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । लोक स्त्रियांचें जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥ 


कांही लग्न होतां गुंतविती घरीं । नसे बोलण्याचीहि उजागरी । ’ चूल आणि मूल ’ हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥ 


कांही घरांतचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजातीं । जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥ 


मुलीने सदा लपोनि राहावें । मुलाने गांवीं रागरंग पाहावे । ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हां ॥६४॥


अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजीं उत्तम भाषण देते । तुलाहि शहाणपण शिकवूं जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥


ऐसें असतां दाबून ठेवावें । आजच्या युगीं शोभा न पावे । जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूंना ॥६६॥ 


ईश्वरानेचि निर्मिलें हें सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । मुलांनीच काय केलें सर्वत्र । राहाया पुढे जगामाजीं ? ॥६७॥ 


वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधीं । विधवा होतां विवाह-बंदी । निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥ 


कांही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावें हें ॥६९॥ 


आपुला झांकोनि दुबळेपणा । करावी दुसर्‍याची विटंबना । हा तों आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥


संन्यास घेणें असेल विधवेला । तरि वनीं आश्रमीं ठेवावें तिला । सेवाशिबिरीं अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छें ॥७१॥


आपण खावें ल्यावें साजिरें । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । त्याहूनि तिचें मरणें बरें । होतें पति-चितेमाजी ॥७२॥ 


तिने वृत्तीने राहावें उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥ 


विधवेसि मानावें अभद्र । मुलगी जन्मतां ती दळभद्र । वय वाढतां समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥


जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असूं शकते कुमारी । अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥


स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही कांही बेरडी । हें म्हणणें नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥ 


नियमन असावें तें सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघांसि । विशाल करावें विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥ 


समाजीं जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांशि असावा व्यवहार । किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजीं ॥७८॥


येथेच समाजाचें चुकलें । एकास उचलोनि दुसर्‍यास दाबलें । याचें कटुफळ भोगणें आलें । कितीतरी स्थानीं ॥७९॥


परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । कुरण वाढूं द्यावें ढोरांसाठी पुढे । तैसें झालें समाजाचें ॥८०॥ 


यास पाहिजे आता वळविलें । ठिकठिकाणीं शिक्षण दिलें । मुलीमहिलांचें जीवन जागविलें । तरीच जगलें गांवराज्य ॥८१॥


शहाण्यांनी हें विसरूं नये । गांवीं सर्वांची करावी सोय । जेणें पुरुषांचें तैसेंचि स्त्रियांचें होय । उत्थान आता ॥८२॥


तरीच ग्राम शोभूं लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागें । जेणें स्वर्गचि उतरेल कार्यायोगें । विकासाच्या ॥८३॥ 


महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसें शिक्षण खास । जरि दिलें जाईल त्यांस । तरीच भावी जग पालटे ॥८४॥ 


महिलांचें उच्चतम शिक्षण । शिक्षणांत असावें जीवनाचें स्थान । जीवनांत असावें स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचें ॥८५॥ 


समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । लिहितां-वाचतां येईल एवढें । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥


तैसीच शिकवावी टापटीप । गाणें बोलणें वागणें अनुरूप । घर पाहतांचि कळावें आपोआप । कैसी येथील महिला तें ॥८७॥


मुलीबाळीस उत्तम ठेवणें । हें तों मातापित्यांचें कर्तव्य प्रमुखपणें । त्यानेच राष्ट्राचें फेडील पारणें । घर संतानें आपुलिया ॥८८॥


मीं पाहिलें मुलें फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥


ऐसें समाजीं न व्हावें । मुलांपरीच मुलींना शिकवावें । त्यांचें स्थानमान नेहमी असावें । सहकारितेचें  ॥९०॥ 


मुलांस विविध उच्च ज्ञान द्यावें । तैसेंचि मुलींनाहि शिकवावें । हेळसांड करूं नये हें जाणावें । समाजाने ॥९१॥ 


परि स्वतंत्र असावें मुलीचें शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । जेथे होतें दोघांचें मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥ 


विचारें जें जें कांही होतें । त्यांत योजनाबध्दता राहते । अविचाराने जातां मोहपंथें । धोका मागुतां पावती ॥९३॥


म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावें । दोन्ही रथचक्रां सारखें करावें । शक्तियुक्तींनी भरावें । गांव सारें आपुलें ॥९४॥ 


परंतु नेहमी भयभीत करावें । प्रत्येकाचें स्थान भिन्न ठेवावें । मग स्वभावास वळण कोणीं द्यावें । संसर्ग येतां ? ॥९५॥ 


स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्परांच्या मना । यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधें ॥९६॥


शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें ॥९७॥ 


दोघांनाहि आपुलें ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । एरव्ही पिंजर्‍यांत जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥ 


म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगें । जरि नैतिकभाव राहती जागे । शिक्षणीं जागृति ठेवणें सर्वांगें । काम नेत्या वडिलांचें ॥९९॥ 


शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥१००॥ 


जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । तेव्हां महिलांत असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥ 


जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनीं ॥१०२॥


पुरुषांचें जैसें स्फूर्तिस्थान । तैसेंचि महिलांचें असावें उन्नतिभुवन । त्यांत सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥


दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥ 


उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंति-पुण्यतिथी पर्व तयांचे । वाचनालयादिक महिलाविभागाचें । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥


स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥ 


माझें म्हणणें श्रोतयांतें । जें जें सुख असेल पुरुषातें । महिलांसीहि असावें अभिन्नपणें तें । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥ 


सर्व सोयी पुरुषांकरितां । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । हें कोण बोलतें शास्त्र आता ? द्यावें हातां झुगारोनि ॥१०८॥ 


पुरुष उन्नतीस चढला । परि कांहीच न कळे महिलेला । तरि तो गांवहि एक कल्ली झाला । नशीबीं आला र्‍हास त्रास  ॥१०९॥ 


म्हणोनि रथाचीं दोन्ही चाकें । मजबूत करावी कांतोनि सारखें । तरीच संसारगाडी सुखें । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥


आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुतां । ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥ 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥ 


   ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*


अभंग

दळूं कांडू खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥ 

सर्व जीवांमध्ये पाहूं । एक आम्ही होऊनि राहू ॥ 

जनी म्हणे ब्रह्य होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥ 


---श्रीसंत जनाबाई