ग्रामगीता अध्याय २३


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । तो आमुच्याहि मनीं वाटला । उत्तम ऐसा ॥१॥ 


परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवें । तेणें ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वांसि ॥२॥ 


तयांसि आपण गौण ठरविलें । याचें कारण पाहिजे बोलिलें । तरि आता उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥३॥


आजचे करूं जातां सणवार । दिवस न पुरती वर्षभर । त्यांत जयंत्या-पुण्यतिथ्या येती फार । वाढदिवस निराळे ॥४॥ 


हे सर्वचि पाहिजेत केले । तरि कामधंदे सर्व गेले । एवढेंच करोनि सर्व भागलें । होईल कैसें ? ॥५॥ 


म्हणोनि त्यांत सानथोर निवडावे । तारतम्याने करीत जावे । प्रसंगमान पाहोनि वर्तावें । सर्वकाळ ॥६॥ 


जें जें करावें तें समजोन । सांगतां यावें त्याचें कारण । उगीच लाडूपेढे खाया जयंतिदिन । पाळूं नये ॥७॥ 


पूर्वजांनी जो हेतु योजिला । तो पाहिजे समजोनि घेतला । त्याचि उद्देशाप्रमाणे झाला । पाहिजे सणवार ॥८॥


भारतवर्षाची चालीरीति । अत्यंत योजनाबध्द होती । त्याने सहज चाले सुस्थिति । समाजाची ॥९॥ 


तेंचि पुन्हा उजळावें । म्हणोनि बोलिलों सहजभावें । तत्त्वता उत्सवासि गौणत्व द्यावें । ऐसें नाही ॥१०॥


उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव । सणवारमुहूर्ताचा त्यासि गौरव । विशेष कार्यासाठी धाव । नेहमी त्याची ॥११॥ 


विशेष कांही कार्य व्हावें । ऐसें घेतलें त्याच्या जीवें । न घे आढेवेढे, मनोभावें । खर्च करी मनमाने ॥१२॥ 


ऐसें उत्सवाचें नांव घेवोनि । धन व्यर्थ उधळूं नये कोणी । तें लागावें  सत्कारणीं । बोलिलों म्हणोनि बचत करा ॥१३॥ 


नाहीतरि घरीं दिवाळी केली । दिवाळें निघावयाची सोय झाली । जनता हसेल गांवांतली । ’ हौसी नटराज ’ म्हणोनि ॥१४॥


तैसी होऊं न द्यावी फजीती । बसावें तरि सर्वांचे पंगतीं । परि होऊं न द्यावी जीवनाची माती । कधीहि आपुत्या ॥१५॥


एके दिवशीं सण केला । तें भोगणें आलें दुसर्‍या दिवसाला । ऐसा कोणीच नाही सांगितला । गृहस्थ-धर्म ॥१६॥ 


पुढेहि आहेत सणवार । समजोनि करावा विचार । प्रसंग येती पुढे थोर । त्यासहि देणें सहकार्य ॥१७॥ 


कांही प्रसंगमानासाठी । पैसा ठेविला पाहिजे गांठीं । सण येतांचि उठाउठी । खर्चूं नये सर्व शक्ति ॥१८॥ 


कोणीहि करितां सणोत्सव । पाहावी आपुली आधी उणीव । मग पुढे टाकावा पाय रेखीव । हर्षासाठी ॥१९॥


चार जणांसि मिळवावें । आनंदीआनंद करीत राहावें । त्यांतूनि नेहमीचे धडे घ्यावे । वागण्यासाठी ॥२०॥ 


वाढवितां यावें जीवनज्ञान । कधीहि न वाढावेत दुर्गुण । मग करावें निर्भय मन । प्रसंगासाठी ॥२१॥ 


कांही सण घरीं करावे । कांही सार्वजनिक जागीं ठरवावे । सर्व मिळोनि उचलीत जावे । ओझे कांही ॥२२॥ 


उत्सवाच्या निमित्ताने । सुंदर करावीं सहभोजनें । बंधुप्रेम वाढेल जेणें । आचरावें तैसेंचि ॥२३॥


घरोघरच्या शिदोर्‍या आणून । अथवा स्वयंपाक सर्वांमिळून । तेणें प्रेमानंद ये उचंबळून । एकत्र खातां ॥२४॥


असला नसला प्रसादचि द्यावा । प्रसंग गोड करोनि घ्यावा । परि खाण्यांतचि वेळ न जावा । समाजाचा ॥२५॥


सुंदर करावें कथाकीर्तन । दिंडया खेळ मनोरंजन । परि लागावी उत्तम चालचलन । समाजासि ॥२६॥ 


खरा उत्सव रोजचें कर्म । विचारें सांभाळावा धर्म । परि नैमित्तिक सणांचेंहि वर्म । जाणोनिया आचरावें ॥२७॥


दत्तजयंति रामनवमी । हनुमानजयंति गोकुळाष्टमी । शिवरात्रि आषाढी ऋषिपंचमी । विविध कार्यांनी पाळावी ॥२८॥ 


वटसावित्री शारदोत्सव । रक्षाबंधन संक्रांतिपर्व । गौरीपूजनादि महिलांचे उत्सव । सामुदायिक करावे ॥२९॥


उद्योगदिन स्नेहसंमेलन । बलोत्कर्ष आणि प्रार्थनादिन । गीताजयंतीस बुध्दिविकासदिन । पंचमहोत्सव आवश्यक ॥३०॥ 


सर्व जाती-जमाती मिळून । हळदकुंकू तिळगूळ सुवर्णदान । चढाओढी ग्रामशुध्दि रामधून । भाषणें आदि करावीं ॥३१॥ 


तैसाचि आला पोळा सण । हाहि आहे महत्त्वपूर्ण । यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन । शेती-सामानासहित ॥३२॥


उत्तम रांगेंत बैल ठेवावा । साजेल तैसा अंगीं भूषवावा । त्यांत ज्याची सफल सेवा । त्याचा गौरव त्या दिवशीं ॥३३॥


कोणीं जोडी उत्तम ठेवली । कोण बैलास खुराग घाली । इनामें द्यावीं त्यांस भलीं । सर्व गांवकर्‍यांनी ॥३४॥ 


कोणाचें उत्तम शेतीसाधन । कोणीं ठेवले नोकर प्रसन्न । त्याचें वाढवावें उच्च स्थान । पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥


घरोघरीं जोडी फिरवावी । मिरवीत मिरवीत घरीं न्यावी । इनामपोळी माणसांनी घ्यावी । प्रसन्न ठेवावी वृत्ति त्यांची ॥३६॥


कांही पाडवां जुगार खेळती । ही आहे समाजाची अधोगती । कांही लोक जिंकोनि जाती । कांही हरती वस्त्रेंहि ॥३७॥


ऐसी रीति बंद करावी । हवीं तर दंगलेंहि भरवावीं । कामगारासि इनामें द्यावीं । काटक चपल म्हणोनिया ॥३८॥


ऐसाचि आहे दशहरादिन । विजयादशमी उत्साहपूर्ण । त्याने वाढे स्नेहसंघटन । उत्तम गांवीं ॥३९॥


सगळयांनी मिळोनि मिरवीत जावें । थोर पुरुषांचे गोडवे गावे । पूर्वऋषींचें कौतुक करावें । गौरवावें राष्ट्रासि ॥४०॥


ते दिनीं उत्तम संकल्प करावा । ’ आपुलें तें सर्वांचें ’ हा बोध घ्यावा । मतभेद समूळचि विसरावा । सोनें देवोनि एकमेकां ॥४१॥


पुढे वितंडणेंचि नसावें । सकळांनी सकळांसि वंदावें । 

परस्परांचे आशीश घ्यावे । बंधु-बंधु म्हणोनि ॥४२॥ 


मिरवीत मिरवीत यावें घरीं । संतदेवासि वंदोनि अंतरीं । वाडवडिलांचे वरदहस्त शिरीं । धारण करावे कौतुकाने ॥४३॥ 


नवीन कार्यसंकल्प करावा । मग वर्षभरि तो टिकवावा । ऐसा सोहळा सगळयांनी साधावा । एकात्मतेने ॥४४॥ 


दिवाळीचा सण आला । सर्वांनीच पाहिजे केला । परि पाहावा कोण राहिला । भुकेला घरीं ॥४५॥ 


त्यास आमंत्रित करावें । गोडधड भोजन द्यावें । परस्परांनी मिळून चालवावें । वैभव सर्वांचें ॥४६॥ 


गांवचें एकचि असावें लक्ष्मीपूजन । प्रचंड मंडपीं करोनि स्थान । सर्वांस द्यावें फराळ भोजन । सर्वांमिळोनि ॥४७॥ 


आनंद उसळावा घरोघरीं । सुखी गायीवासरें नरनारी । भाऊबहिणीचें परोपरीं । नातें वाढे ऐसें व्हावें ॥४८॥


बंधुभाव भगिनीपण । हें नातें ओसरलें समाजांतून । तें वाढाया नव्या पीढींत पूर्ण । योजना भाऊबीजेची ॥४९॥ 


तैसेंचि भरवावें गोप्रदर्शन । कोणत्या गायी दुधाळ पूर्ण । कोणता वळू गुणसंपन्न । उंचपुरा पहावा ॥५०॥ 


तो सगळयांनी गौरवावा । सर्वांमिळोनि इनाम द्यावा । गायीगुरांचा महिमा पटवावा । सर्व जना ॥५१॥ 


आपापली गाय प्रभावी । पुढे करावयासि सांगावी । पुढची गुढी उभारावी । इनाम देऊं म्हणोनि ॥५२॥ 


तैसेंचि वाढवावें खताचें महिमान । नर्कासुरास निमित्त करून । शेणखतादिकांचें वर्णन । विशद करून सांगावें ॥५३॥


याच खतामुताच्या संयोगें । शेती उत्तम राहोनि पिके । म्हणोनि सर्वांनी योग्य खळगे । करोनि खत सांभाळावें ॥५४॥ 


शेतीमाजीच शेणदि जावें । तरीच भूमिमाता पावे । हें घरोघरीं सांगावें । हाचि खरा दिवाळसण ॥५५॥


गांवीं ज्याने लक्ष्मी नांदे । लोक जगतील आनंदें । ऐशा प्रयत्नांनीच साधे । खरी दिवाळी ॥५६॥ 


बारा महिन्यानी दिवाळी आली । घरेंदारें स्वच्छ झालीं । भिंत-ओसरी सारवोनि ठेविली । रंगरंगोटी लावोनि ॥५७॥


दुसरे दिवशीं सडा नाही । झाडझूड तीहि नाही । घाण पसरली सर्वहि । जिकडे तिकडे ॥५८॥ 


ऐसी करितां दसरादिवाळी । अवदशाचि येई कपाळीं । त्यापेक्षा रोज सकाळीं । उठणें हाचि दिवाळसण ॥५९॥


सण म्हणोनि करावें अभ्यंगस्नान । नाहीतरि फासावें वंगण । हें कोठचें शहाणपण । शिकलों आम्ही ? ॥६०॥


रोजचि थोडें करीत जावें । स्नानध्यान पाठादि बरवें । श्रम करोनि सौंदर्य वाढवावें । घरींदारीं ॥६१॥


दिवाळींचें निमित्त करोनि । स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी । उकिरडाहि नीट करोनि । दिवा लावावा स्वच्छतेचा ॥६२॥


नेहमी स्वच्छ ठेवावें घर । श्रम करावेत अंगभर । हाचि खरा सणवार । नित्य सुंदर वर्तणूक ॥६३॥ 


जो नेहमीच स्वच्छता करी । त्याने उत्सव पाळले सर्वतोपरीं । उत्तम जेवावी भाजीभाकरी । देवादिकां अर्पोनि ॥६४॥


ऐसें व्रत जो सांभाळी । त्याची खरी दसरादिवाळी । नाहीतरि समजा होळी । आपुल्या सार्‍या जीवनाची ॥६५॥ 


होळीचा आला शिमगासण । त्यांत मोठी मारहाण । लोक इभ्रतमान सोडोन । पळती मार्गी वेडेसे ॥६६॥


हा वाढला विचित्रपणा । ऐसा नोहे शिमगा जाणा । त्यांतहि आहे तात्विकपणा । घेण्यासारिखा समाजा ॥६७॥


याच दिवशीं प्रल्हादाची छळणा । केली होती होळीने जाणा । परि दु:ख न झालें प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि ॥६८॥


शेवटीं छळणारेचि जळले । हें गांवासि कौतुक झालें । 

म्हणोनि जन ओरडले । उपहास त्यांच करोनि ॥६९॥ 


त्याच दिवशीं शंकराने । काम जाळिला तिसर्‍या नयनें । म्हणोनि कामास धिक्कारिलें भूतसेनेने । हलकल्लोळ करोनि ॥७०॥ 


त्याच दिवशीं सज्जनांनी । वार्षिक यज्ञाची केली आखणी । संपूर्ण गांव साफ करोनि । द्यावें पेटवोनि कैचण तें ॥७१॥ 


त्याच्या प्रकाशीं सर्वांनी जमावें । आपलें दुष्कृत्य निवेदावें । पुढे तैसें न करण्याचें योजावें । अनुतापाने ॥७२॥ 


हें मनोधैर्य कमी पडलें । म्हणोनि दुसरे जन ओरडले । गांवाचें पाप धुवोनि काढले । ऐसियापरीं ॥७३॥ 


पुढे याचा विपर्यास झाला । शिवीगाळ देती परस्पराला । पोथ्याहि सांगती ’ अभद्र बोला ’ । मूळ त्याचें न जाणतां ॥७४॥


म्हणती कोणी वर्षातून । शिव्यासाठीच एक दिन । परि सज्जनासि याचें काय कारण ? ये उत्तेजन दुर्जना ॥७५॥ 


या सणीं मुख्य धूलिवंदन । जें ग्रामसफाईचें प्राचीन चिन्ह । अस्पृश्यांनाहि स्पर्शावें म्हणून । सांगितलें ग्रंथीं त्या दिवशीं ॥७६॥


आधी सार्वजनिक अग्निपूजन । त्यांत वाईट वृत्तींचें दहन । मग राख न्यावी उकिरडीं पूर्ण । करावें स्नान समुदायें ॥७७॥ 


ऐसा ग्रामसेवेचा आनंद । त्याने परस्परां लाविला सुगंध । प्रसन्नता दाखवाया विशद । योजिला प्रसंग रंजनाचा ॥७८॥


ठिकठिकाणीं गाणें वाजवणें । रंगगुलाल आदि उधळणें । प्रसन्न ठेवावया मानवी मनें । शिमगा सण योजिला ॥७९॥ 


राजेरजवाडयांचिया दरबारीं । त्यास रूप आलें शृंगारी । श्रीकृष्णाचिया नांवें रंगपिचकारी । उघविण्याचें ॥८०॥


गांवीं वेगळाचि विपर्यास झाला । ग्रामशुध्दीचा उद्देश गेला । नालीमोरींचा उडवोनि मैला । दु:ख देती जनतेसि ॥८१॥ 


कुणाचीं लाकडें चोरूनि नेती । घरच्या वस्तूहि होळींत टाकती । गाडी घोडयांचें सामान जाळती । खाट नेती स्मशानीं ॥८२॥


या सणाने होतें सणसण । गांव दिसूं लागतें भणभण । ऐसा हा प्रसंग वाईट म्हणोन । करिती टिका धीर प्राणी ॥८३॥


परि यासि वळण लावावें । ऐसें वेडेपण होऊं न द्यावें । त्यांत सौंदर्य पावित्र्य भरावें । गाणें वाजवणें ठेवोनि ॥८४॥


होळी निमित्तें जमवोनि नरनारी । घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरि । ग्रामसुधारक नाटिका बरी । मनोरंजनासि योजावी ॥८५॥


होळी म्हणजे ग्रामशुध्दिजन । तैसेचि मातृदिन बालकदिन । श्रमिकदिन मानवतादिन । स्वातंत्र्यदिनादि कितीतरी ॥८६॥ 


तैसेचि अनेक लहान सण । सर्वांत असावें तत्त्वानुसंधान । उदरपूर्तीचें दिखाऊ साधन । ऐसें झालें तरि व्यर्थ ॥८७॥ 


प्रगतीसाठी सणवार करावे । कांही सण एके ठायींच घडवावे । सर्वांमिळोनि आचरावें । सहकार्याने ॥८८॥ 


पूर्वी घरोघरीं गणेशोत्सव । नाना रूढयांचे उपद्रव । लोकमान्यांनी आणिलें महत्त्व । राष्ट्रीय रूपें तयासि ॥८९॥ 


गांवाचा एकचि गणपति । सर्वांसाठी कार्यक्रम होती । जेणें वाढेल राष्ट्रीय वृत्ति ऐसी असावी धारणा ॥९०॥


तोचि उत्तम सण, उत्सव , दिन । जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण । हेंचि घडावया महाकारण । संतीं बोधिलें समाजा ॥९१॥


जनता असते उत्सवप्रिय । म्हणोनि त्या मार्गेचि लावावी सोय । राष्ट्रीय भावना जागे निर्भय । तोचि करावा उत्सव ॥९२॥


विशेष निमित्तें संघटित व्हावें । सर्वांमिळोनि कार्य करावें । जेणें बोझ न पडावा जीवें । कोणावरि ॥९३॥ 


नाहीतरि आपुलें मनोरंजन । त्यासाठी जावे दुसर्‍यांचे प्राण । ऐसें करील जो उत्सव सण । तो तो हीन या लोकीं ॥९४॥ 


परका सुखी आपणहि सुखी । तत्पर परस्परांचे कौतुकीं । वागणूक सर्वांची सारखी । सर्वांसाठी असावी ॥९५॥


ही मानव्यबुध्दि उपजावया । गांवोगांवीं बदलावी उत्सवप्रक्रिया । जेणें धडा मिळे लोकांसि या । नेहमी वागणुकीसाठी ॥९६॥ 


सकल धर्मामाजी सणवार । याचिसाठी केले सानथोर । जेणें मनुष्याची कदर । मनुष्य करील सर्वदा ॥९७॥


सामुदायिकता वाढे सर्वत्र । हेंचि सणवारांचें मूळसूत्र । सामुदायिकपणाचा प्रकार । तोंचि खरा उत्सव ॥९८॥ 


ज्या दिवशीं गांव झालें एक । तोचि उत्सवदिन अलौकिक । ओळखूं न येती रावरंक । उत्सवामाजी ॥९९॥ 


ज्यासि नाही त्यासि देणें । जो बिघडला त्या सरळ करणें । आप्त समजोनि उचलोनि घेणें । पडला त्या सर्वतोपरीं ॥१००॥ 


हेंचिं खरें औदर्य आहे । गांवाच्या सुखांत उत्सव पाहे । तेणें सदाचा सणवार राहे । आपुल्या गांवीं ॥१०१॥ 


पूर्वी गांवीं बारा बलुते । अठरापगड जातीचे जत्थे । परस्परांवरि अवलंबून होतें । सहकारी जीवन ॥१०२॥ 


कोळी जाळें घेवोनि येई । सोनार जिवती लावोनि देई । न्हावी धोबी गोवळी नेई । धान्यादिक सणावारीं ॥१०३॥ 


परि तो आता नुरला कायदा । उत्सवास येणें हा नव्हे फायदा । सणवार सांगणें हा नव्हे धंदा । कोणाच्याहि पोटाचा ॥१०४॥ 


ही आहे निर्मळ सेवा । उजळावया अंतरींचा दिवा । पोट भरण्याचा प्रश्न उत्सवां । आणोंचि नये ॥१०५॥


सकळांनी कामधाम करावें । उरल्यावेळीं सणवार सांगावे । मंडपादि करण्यास लागावें । सेवाभावें सर्वांनी ॥१०६॥ 


ऐसें सांगणें हें निराळें । परि त्या निमित्ताने भुलवावे भोळे । तेणें घोटाळोनि लोक सगळे । नास्तिक जैसे बोलती ॥१०७॥ 


श्रम-विभागणी होती पूर्वी । त्यांतूनि ही वाढली स्वार्थचवी । त्याच कामीं लागले भिक्षुकगोसावी । नांव बुडवाया पूर्वजांचें ॥१०८॥ 


जो कोणी एवढेंचि करी । त्यासि गांवाने द्यावी चाकरी । उदर भरण्याची व्यवस्था पुरी । परिश्रमाने सर्वकाळ ॥१०९॥ 


बेकारी न ठेवावी ग्रामाप्रति । उधळपट्टी न करावी कोणेरीतीं । उत्सवाने उत्तम गति । लागे तैसेंचि करावें ॥११०॥


उत्तमगति तोचि उत्सव । एरव्ही मोलें घेतले उपद्रव । तैसें न व्हाया करावें गांव । संघटित आणि क्रियाशील ॥१११॥ 


साधावा कार्याचा उसाह । तोचि उत्सव नि:संदेह । तुकडया म्हणे गांवीं प्रवाह । वाहूं द्या शांतिसुखाचा ॥११२॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुणशास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला सणोत्सवांचा मुख्यार्थ । तेविसावा अध्याय संपूर्ण ॥११३॥ 


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*


 धार्मिक उत्सव म्हणजे गौरवाचें जीवन प्राप्त करून देणार्‍या गोष्टी शिकण्याच्या शाळाच ! आमची धर्मबुध्दिजागृत, नैतिक व राजकीय मनोवृत्ति जोमाची व राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमी प्रकाश देणारी राहावी म्हणूनच उत्सवांची योजना करण्यांत आली आहे. " 


---लोकमान्य टिळक