ग्रामगीता अध्याय २९


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


श्रोतीं शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । परंतु ’ परधर्म भयावह ’ बोली । गर्जविली गीतेने ॥१॥ 


स्वधर्मी मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय । मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥ 


ऐका ग्रंथींचा दाखला । परधर्म भयावह जरी ठरला । तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥


हिंदु बुध्द मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन । ऐसें नव्हतें नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥ 


भिन्न धर्मांचा जन्महि नव्हता । मग परधर्म कां सांगे गीता ? तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानीं तियेच्या ॥५॥


एकाची प्रकृति ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेंचि । त्यासि गुणकर्में दुसर्‍याचीं । साधती केंवि ? ॥६॥


कोणात शक्ति कोणांत युक्ति । कोणांत ज्ञान, सेवावृत्ति । साधे त्याचि साधनें करावी भक्ति । जनताजनार्दनाची ॥७॥ 


त्याने आपल्या प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी । दुसर्‍याचें कर्तव्य घेतां शिरीं । विनाश त्याचा ॥८॥


म्हणोनि परधर्म भयावह । ऐसें कथिलें नि:संदेह । तुपांत नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि उत्तम जरी ॥९॥


स्वधर्म म्हणजे आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम । यासाठीच करणें जीवनाचा होम । श्रेयस्कर हें सर्वां ॥१०॥


असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार । हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥ 


आत्मवश तें तें सुख । परवश परतंत्र तें दु:ख । ऐसेंहि धर्मग्रंथीं अनेक । कथिलें थोरांनी ॥१२॥


परधर्म म्हणजे विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता । हें समजण्याचें तत्त्व हातां । दिलें तयांनी ॥१३॥ 


आपुला म्हणोनि हृदयीं धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा । ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥


मुसलमान म्हणतां मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकूनि द्यावा । आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥ 


कोणी म्हणती आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु । ख्रिश्चनासि कधी न वंदूं । भाऊ म्हणोनि आपुला ॥१६॥ 


मी म्हणतों वंदन गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ? हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान कां  द्यावा ? ॥१७॥ 


मुसलमानाचें उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन । हें कोणीं दिलें न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥


ख्रिश्चन दूरदेशाहुनि आला । सेवा करतां करतां मेला । त्याने जरि धर्म नाही बिघडविला । तुमचा कांही ॥१९॥ 


तरी त्यासि तुम्हीं अव्हेरावा । हें म्हणणें नाही पसंत जीवा । तो आपुलाचि म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥ 


जो कोणी सत्य सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति । तो असो कोणत्याहि धर्मजमातीं । समजावा चित्तीं आपुलाचि ॥२१॥ 


धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती । न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥ 


परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली । तेणें धर्मपंथांत फूट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥ 


मूळतत्त्वें विलया गेलीं । महंती-बुवागिरी वाढली । सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगें ॥२४॥ 


ऐसा प्रकार होत आला । म्हणोनि खरा धर्म मातींत मिळाला । आतां उठणेंचि त्या धर्माला । कठीण झालें ॥२५॥


गुणकर्मांचा लोप झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ? गोंधळोनि समाज गेला । गर्तेमाजीं भेदभ्रमें ॥२६॥ 


’ विष्णुमय जग ’ हाच स्वधर्म । ऐसें संतीं कथिलें वर्म । तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥ 


’ मानव ’ हेंचि आपुलें नाम । मग स्वधर्म म्हणजे ’ मानवधर्म ’ । हें तरी ध्यानीं घ्या सत्य वर्म । साध्या बोलीं ॥२८॥


आपण आहोंत मानव । मानव्याचा वाढवावा गौरव । सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेंचि कार्य आपुलें ॥२९॥ 


मज मान्य धर्म न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति । करी जो समाजाची धारणास्थिति । समान भावें ॥३०॥ 


हें जोंवरि वर्म नेणें । तोवरि धर्म हो कोणी म्हणे । ती अपूर्णतेचीं धर्मलक्षणें । समजों आम्ही ॥३१॥ 


मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न । मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥


ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता । यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची ॥।३३॥


कृष्ण म्हणे ’ समं हि ब्रम्ह ’ । समता हाचि ईश्वरी धर्म । समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म समत्वचि ॥३४॥


सर्वठायीं वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव । दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजीं ॥३५॥ 


सर्व धर्म सोडोनिया । शरण जावें एका देवराया । सर्वव्यापक जाणोनि तया । हेंचि वर्म उध्दाराचें ॥३६॥ 


सर्वांविषयीं समभाव । सर्वांभूती वासुदेव । हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा ॥३७॥


या दृष्टीने करी जें जें कांही । ती सर्वेश्वराची पूजाच होई । जेथे आप-पर भेद नाही । समन्वयीं चित्त आलें ॥३८॥


मग तो असो कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा । तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानूं आम्ही ॥३९॥ 


यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सर्व धर्मी समत्व कथिलें । परि याचे फायदे घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥


कोणीं युध्द करोनि लोकां जिंकिलें । बळेंचि आपुल्या धर्मी ओढिलें । कोणीं प्रलोभनांनी मोहविलें । वाटे का हें योग्य तुम्हां ? ॥४१॥


कांही दूरदेशींचें लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती । भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥


वाढवोनि आपुलें संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ । ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेंतूनि ॥४३॥ 


सर्व धर्मीं समभाव । म्हणतां धर्मान्तरासि मिळे वाव । येणें बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि कांही ॥४४॥ 


यावरि ऐकावें उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर । ह्या गोष्टींत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे ॥४५॥ 


धर्मान्तराचा करितां विचार । ज्ञात्याचेंचि योग्य धर्मान्तर । परि ज्यासि कळलें सारासार । त्यासि धर्मान्तर कशासाठी ? ॥४६॥ 


ज्यासि कळलें धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचें नुरे महत्त्व । मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे तें तें ॥४७॥


न करील कोणावरि आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन । लोभें भयें परधर्मग्रहण । हें अध:पतन वाटे तया ॥४८॥ 


दुसर्‍या धर्मासि युध्दें छळिलें । त्यासि धर्मसेवा नाम दिलें । हें महापातक असे बोलिलें । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥


तैसाचि जो समान अज्ञानी । त्यासि विधर्मी नेलें मोहवूनि । त्यायोगेंहि उन्नति कोठूनि ? तें तों सोंग बहुरूप्याचें ॥५०॥ 


मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला । कांही गरजांमुळे वश झाला । तरी त्याचा फायदा असला । घेऊं नये दुसर्‍यांनी ॥५१॥ 


कोणींहि सेवा करायासि यावें । परि धर्मान्तर मोहाने करवावें । आपले जनगण वाढवावे । हें तों दुष्ट राजकारण ॥५२॥ 


धर्मवर्में एकचि असती । परि हे राजकारण त्यांत गोविती । संख्याबल वाढवोनि करिती । परस्परांचा वैरभाव ॥५३॥ 


धर्मप्रचाराचे नांवाखाली । राज्यसाधना आंतूनि घाली । त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि ॥५४॥


तो नव्हे कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेंचि धर्म त्याचा । अव्हेरूनि द्यावा जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥ 


तैसाचि न ओळखतां स्वत्व । दुसर्‍यांचें मानोनि महत्त्व । उगीच परधर्मीं घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे ॥५६॥ 


समजोनि तत्त्व सर्वांत मिळावें । परि पोटाकरितां धर्मा न सोडावें । आत्ममार्ग न समजतांचि करावें । कासयासि हें सारें ? ॥५७॥


ऐसें जेथे जेथे झालें । त्यांना कलंकचि लागले । पाहतांना आजहि दिसलें । अनुभवियासि ॥५८॥


येथे आपणहि आहों कारण । याचें असूं द्यावें स्मरण । खर्‍या धर्माचें सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन जनां ? ॥५९॥ 


लोक धर्म-धर्म ओरडती । प्रसंग पडल्या कामीं न येती । संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचें ॥६०॥


धर्माचा बाळगती अभिमान । परि धर्मबांधवां नाही स्थान । कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तयां धर्मलंड ॥६१॥


मानवाचा स्पर्शहि पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप । विधर्मी जातां मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥


दीनदलितांची तहानभूक । दीनदलितांचें  सुखदु:ख । कांहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक चालविती ॥६३॥ 


सर्वांठायीं म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखें करिती कर्म । ऐसें नाही धर्माचें वर्म । बोलिलें संतीं कोठेहि ॥६४॥


परि हे शिकवाया उपदेशक कुठले ? कोण लोकांस समजावी भलें ? हे तों सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावें ॥६५॥


पोटपुजार्‍यांनी केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार । मानवांमाजीं पाडलें अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥


हें सर्व आडाणपण । जोंवरि जाणार नाही मानवांतून । तोंवरि जगाची उन्नति पूर्ण । होणें कठिण समजावें ॥६७॥ 


त्यासाठी एकचि करावें । आपापलें धर्मक्षेत्र सुधारावें । सकळांसीच सकळांचें द्यावें । तत्त्वज्ञान समजावोनि ॥६८॥ 


हें ज्या धर्मास जातीस फावे । तेणेंचि सुखसोहळे बघावे । यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी ॥६९


कांहींनी करावा आदिवासी-सुधार । जावोनि रानीं खेडयांवर । पाहावें गरीब लोकांचें कुटीर । कैसें आहे ॥७०॥ 


गरीब जंगली आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती । झाडाखालीच असते वसती । कित्येकांची ॥७१॥ 


त्यांसि बोलणें चालणें समजेना । भिवोन पळती बघतांचि आपणा । प्रेम लावोनि त्या कुटुंबांना । करावें आपण आपलेंसें ॥७२॥


त्यांना औषधपाणी पुरवावें । लिहिणें वाचणेंहि शिकवावें । उत्सवीं सहभोजनीं मिसळावें । कार्यकर्त्यांनी ॥७३॥


जनीं भोजनीं मंदिरीं । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी । स्थान-मान सर्वतोपरीं । एक करावें सर्वांचें ॥७४॥


स्वच्छ राहणी निर्व्यसनी । शिकवावी स्वयें त्यांत मिसळोनि । तुच्छ न मानावें दुरोनि । उणीव दावोनि परभारें ॥७५॥


दूर कराव्या अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी । सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्नें ॥७६॥ 


आजवरि यांची केली उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा । घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि सदभावें ॥७७॥


जे कोणी असती अडले-नडले । रंजले-गांजले रोगें पिडले । त्यांसाठी पाहिजे धाम निर्मिलें । सुखशांतीचें, आरोग्याचें ॥७८॥ 


क्षय अथवा कुष्टरोग । हे न मानितां दैवाचे भोग । त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे गांवोगांवीं ॥७९॥ 


भंगलेल्या मानवी मूर्ति । यांच्या सेवेंतचि ईश्वरभक्ति । आर्तासि दिल्यावांचूनि शांति । मागतां मुक्ति मिळे कैसी ? ॥८०॥


जीवनांतूनि जे जे उठले । त्यांशी सहृदयपणें पाहिजे भेटलें । अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा ॥८१॥


अंध पंगु मूक बधीर । अशक्त अपंग निराधार । या ईश्वरी चित्रां रंगविती सुंदर । ते ते थोर धर्मशील ॥८२॥ 


विधर्मी लोक हें कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति । किळस आळस आमुच्या चित्तीं । अधोगति आमुची ही ॥८३॥ 


सोडोनिया ऐसा स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव । दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म ॥८४॥ 


हाचि धर्म संतीं आचरिला । जनीं जनार्दन ओळखिला । निर्लोभ प्रेमें सजविला । विश्वबगीचा ॥८५॥ 


धर्मावतार रामकृष्ण । जटेने झाडी अस्पृश्यांचें अंगण । एकनाथ केलें भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचें ॥८६॥ 


चैतन्य महाप्रभूने हृदयीं । आलिंगिले दलित, रोगीहि । गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि ॥८७॥ 


विधवा अनाथ-अपंगसेवा । पैगंबरें मानिला पुण्यठेवा । जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥ 


श्रीरामें शबरीचीं खादलीं बोरें । गुहका आलिंगिलें प्रेमभरें । मित्र केलीं आदिवासी वानरें । अहिल्येसि उध्दरिलें ॥८९॥


श्रीकृष्ण गोवळयांत नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला । जोबवतीशीं विवाह केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥


भीष्माचिया वडिलाने । वरिलें कोळियाच्या कन्ये । ऐसीं शेकडो प्रमाणें । सापडती पूर्व ग्रंथीं ॥९१॥


सीता शकुंतला कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र । समाजें सांभाळितां झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन ॥९२॥ 


ज्ञानदेव नामदेवादि संतीं । आलिंगिलें दलित समाजाप्रति । किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यांत त्याकाळीं ॥९३॥


संत चोखोबाचें सारें घर । झालें भक्तीचें मंदिर । उपेक्षिल्या समाजीं देवत्व थोर । देतां संस्कार प्रगटे तें ॥९४॥ 


सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार । कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे ॥९५॥ 


तैसेचि आजहि उदया येती । घरोघरीं नामांकित पुरुष-युवती । त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या समाजांची ॥९६॥ 


महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हें ओळखलें । दलितोन्नतीचें कार्य केलें । कर्तव्य आपुलें तेंचि असे ॥९७॥


मानवें मानवा समान समजणें । परस्परां उन्नत करणें । संसारासि या आनंदें भरणें । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥ 


कोणी कोणास त्रासवूं नये । कोणी कोणास फसवूं नये । कोणी कोणास दुरावूं नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥ 


पाहाव्या त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी । भेदभावना समूळ जाई । जीवन ऐसें निर्मावें ॥१००॥ 


मग त्यांचा विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे । वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचें ॥१०१॥


हेचि आहे धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा । मागासल्या सर्वचि बांधवां । बंधु समजोनि शिकवावें ॥१०२॥


पडित रान हें उठवावें । फुलाफळांनी बहरूं द्यावें । आहारीं जाऊंच न द्यावें । कोणाचिया कोणा ॥१०३॥ 


परि अन्य धर्मांशीं वितंडावें । कोणी कोणाचे दोष मांडावे । हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवूं नयेत सेवकांनी ॥१०४॥


आपुला पिता जरी वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य । हेंचि धर्माचें सूत्र आद्य । सर्व धर्मी समभावनेचें ॥१०५॥


ही दृष्टि सर्वांसीच द्यावी । समाजीं मानवता वाढवावी । म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गांवीं । उरणार नाही ॥१०६॥


साधनांमाजीं उत्तम साधन । संस्कारें तयार करावें मन । सेवामार्गे मनीं घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥ 


कलापथक प्रवचन कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण । नाटकादि प्रत्येक साधन । याच कार्यीं योजावें ॥१०८॥ 


जें जें ज्यासि असेल ठावें । तें तें समाजा शिकवीत जावें । जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥ 


खरा धर्म जाणतील लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक । मग न गडेल परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥


यासाठी भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचें साधन । प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावें संपूर्ण त्यांतूनि ॥१११॥


आपुल्या गांवचा कोणीं प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी । हीच खरी गांवाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो ! ॥११२॥


हेलावतां सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार । मग कोठे धर्म धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वां ॥११३॥ 


भ्रामक रूढयांच्या कल्पनांतून । वर येऊं द्या धर्मनिधान । त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया म्हणे ॥११४॥ 


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय संपूर्ण ॥११५॥ 

  

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

अभंग


कांहो केशीराजा ! दुजें पै धरितां ? हे तों आश्चर्यता वाटे मज ॥ 

एकासि आसन एकासि वसन । एक तेचि नग्न फिरताति ॥ 

एकासि कदान्न एकासि मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांहि ॥ 

एकासि वैभव राजाची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥ 

हाचि न्याय तुमचे दिसतो कीं घरीं । चोखा हरि ! कर्म माझें ॥ 

                        

---श्रीसंत चोखामेळा