ग्रामगीता अध्याय ३१


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


ईश्वर-भजनाचा करितां प्रचार । होईल आमुचा उध्दार । परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगीं तें ॥१॥


तें कार्य संतचि करूं जाणे । जे देवचि झाले जीवेंप्राणें । येरा गबाळांनी केलीं भजनें । तरी काय होतें ? ॥२॥


रामनामें  तरले पाषाण । परि तें लिहिणारेहि तैसेचि पूर्ण । इतरांनी खडा टाकतांहि बुडोन । जाईल आता ॥३॥ 


निर्जीव चालविली भिंत । केले सोन्याचे पर्वत । विषासहि बनविलें अमृत । तेचि खरे शक्तिशाली ॥४॥


रेडयामुखीं वदविले वेद । डोहीं कोरडे ठेविले कागद । ऐसे थोर संत प्रसिध्द । विश्व-तारक ॥५॥


तेचि आपुल्या भजनें वचनें । जगासि उध्दरितील दयेने । आमुच्या भजनाचें तुणतुणें । फुकेंच सारें ॥६॥


संत मायबाप कृपाळ । ’ आपणासारिखे करिती तत्काळ ’ । कृपा करितां न लागे वेळ । पतितहि तरावया ॥७॥


त्यांचा मंत्र पडतां  कानीं । होय पातकांची हानि । जडजीवहि जाती उध्दरोनि । अन्य भजनी हें करूं न शके ॥८॥


ऐसा श्रोतियाचा विचार । म्हणे संत करितील चमत्कार । तरीच तरेल हा संसार । साधन येर वाउगें ॥९॥


याचें उत्तर ऐका श्रोते ? संत जरि चमत्कारें तारिते । तरि कोणीच न उरते । आजवरि बध्द जनीं ॥१०॥


कारण संत अपार झाले । ज्यांची देशावरीहि सत्ता चाले । त्या संतांसि सर्वचि आपुले । कां न तारिले दयेने ? ॥११॥ 


संतांसि ’ सर्वाचेंच बरें व्हावें ’ । ऐसें वाटे जीवेंभावें । परि ज्यांनी कर्तव्य करावें । तेचि होती अधिकारी ॥१२॥


जनीं कर्तव्य न करितां । संत लाभ न देती आइता । नुसता त्यांचा मंत्र घेतां । मोक्ष होतो म्हणूं नये ॥१३॥


संत आपणासारिखे करिती । परिसें सोने केलें लोहाप्रति । परंतु खापर सोने नोहे निश्चिती । जाणावें हें तारतम्य ॥१४॥


उध्दार करणें हें संतांचें कर्म । परि त्यांत आहे निराळें वर्म । समजोनि घ्यावा शिष्यधर्म । कोणता आपुला ॥१५॥ 


संत जें ज्या कोणां सांगती । तैसेचि जरि ते जन वागती । त्यांचाचि उध्दार होतो जगतीं । ऐसें आहे ॥१६॥ 


उध्दार संत न करिती । मार्ग सांगती जनाप्रति । त्यांच्या बोधवचनें प्रगति । केली पाहिजे साधकें ॥१७॥


चोरासि वाटे चतुर निघावे । विषयी म्हणे शौकीन व्हावे । तैसे साधूसि वाटे सज्जन बनावे । लोक आपुले ॥१८॥


सर्वचि करिती आपुला प्रचार । तैसाचि साधूचा व्यवहार । कोणता उत्तम कोण अपवित्र । मार्ग जाणावा साधकें ॥१९॥


मागे कोणत्या मार्गे जन गेले ? कोणाच्या प्रचारें कल्याण झालें ? कोणें जीवनासि पुढारिलें । कीर्तिरूपें ? ॥२०॥


एक गेला जुगारापायीं । एक मेला बुडोनि विषयीं । एक झाला चोर अन्यायी । गांवगुंड ॥२१॥


एक संतापाशी गेला । तोच सन्मार्गी लागोनि तरला । तयाचा उत्तम प्रचार झाला । सर्व लोकीं ॥२२॥ 


ऐसी आहे संतांची संगति । आपण ऐकिल्या होते गति । पण कर्तव्य केल्यासचि उन्नति । दिसों लागे ॥२३॥


संत म्हणती सत्य बोलावें । आपण नेमकें खोटें करावें । बोल शेवटीं संतांवरि ठेवावे । कोण्या न्यायाने ? ॥२४॥


संतांनी सांगावें दुर्गुण सोडा । आपण पापांनी भरावा गाडा । कासया सांगावा संत-पोवाडा । ’ उध्दार होतों ’ म्हणोनि ? ॥२५॥


ज्याने संतवचन पाळावें । आपुले दुर्गुण आवरावे । त्यानेच कृपापात्र व्हावें । संताठायीं ॥२६॥


कृपा हा संतांचा स्वभाव । वेगळी नाही कृपेची ठेव । करावयासि देवघेव । प्रयत्नाविण ॥२७॥ 


एकचि आहे विशेष खूण । संतांच्या वाणींत प्रेमळपण । मनासि लागे आकर्षण । सत्कर्मांचें ॥२८॥


त्यांची वागणूक पाहोन । प्रसन्न होतें पाहणाराचें मन । तैसेंचि कर्म करावें आपण । वाटे लोकां ॥२९॥


परि ज्याचे वाईट संस्कार । वृत्ति असे बहिरंग फार । त्यासि बोध होणें अति दुर्धर । समजा लोकीं ॥३०॥ 


वृत्ति उत्तम कार्यीं वळे । त्यावरि संताचा बोध मिळे । निश्चय होतां भाग्य उजळे । थोरपणाने ॥३१॥


मनुष्य दु:खानें होरपळला । विचारें वैराग्यभावीं वळला । त्यावरि गुरुचा बोध उजळला । मार्ग कळलां भाग्याचा ॥३२॥


कोणी समजोनि पाऊल टाकलें । आपुलें सत्कर्मातचि आहे भले । त्याने संतांचे चरण धरिले । तेहि तरले भाग्यशाली ॥३३॥


ऐसें ज्याने साधन केलें । संतवचनासि प्रतिपाळिलें । त्याचें कौतुक कितीहि वानिलें । तरी तें अपुरें ॥३४॥


संताचा शुध्द संकल्प । त्यासि कळला प्रगटला दीप । धरोनि निश्चायाचा प्रताप । उन्नत झाला सतशिष्य ॥३५॥


शेतीची जमीन झाली उत्तम । त्यावरि बीं पडलें सक्षम । वाढलें कुटुंबियांचेहि प्रेम । वाढतां पीक ॥३६॥ 


तैसेंचि साधकाचें होतें । प्रथम शुध्दाचरण शुध्दचित्तें । वरि संतबोध होतां तेथे । पीक वाढे भक्तीचें ॥३७॥


ऐसें ज्याने सिंचन केलें । अंकुर फुटले वाढों लागले । अनुभवाचें फळ आलें । संतकृपाकटाक्षें ॥३८॥


परंतु ऐसी सांडोनि रीति । उगीच बुवांच्या पायां पडती । त्यानेच सर्व होतें समजती । अंतरीं लोक आपुल्या ॥३९॥


पायां पडल्याने सर्व होतें । मग काम कासया करावें तें ? पोटासि मिळेल आइतें । मोक्ष लाभेल बुवापायीं ॥४०॥


चुकीची ही धारणा अति । ऐसी नव्हती याची रीति । नम्र व्हावें सर्वांभूतीं । ऐसा सिध्दान्त आहे याचा ॥४१॥


सर्वांनीं सर्वांसि नम्र व्हावें । आपलें हितगुज विचारावें । थोरांनी लहानांसि सांगावें । कर्तव्य म्हणोनि ॥४२॥ 


परि लाखो लोकांनी पयांवरि पडावें । थोर सांगती तें न करावें । हें अजबचि घेतलें स्वभावें । भाविकांच्या ॥४३॥ 


ही प्रथाचि बंद करावी । श्रवणीं रुचि वाढवावी । मनन करोनि आचरावी । वाणीं संता-थोरांची ॥४४॥


यानेच संतपण वाढ घेई । संतसंगें संतचि होई । परि ’ संत ’ म्हणतां संसार सोडूनि जाई । ऐसें नव्हे ॥४५॥


संसारीं असोनि संत असती । व्यवहारीं राहोनि आदर्श होती । बुवा न म्हणवितांहि अधिकार ठेविती । सदगुरुचा ॥४६॥


ऐसें आहे संतपण । तें मिळे सत्संगें करोनि साधन । नसे अंगीं विचित्रपण । कोणतेंहि तयांच्या ॥४७॥


पावडीमाजी पाय ठेवितां । दावा म्हणे ब्रह्मसत्ता । त्या जयत्पालराजासि तारिलें तत्त्वता । शेवटीं ग्रंथचि बोधूनि ॥४८॥


करोनिया चमत्कार । संत न करिती उध्दार । हाचि मनीं राखा निर्धार । बोधचि सार तयांचा ॥४९॥


चमत्काराच्या भरीं भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी । संतचमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू सज्जन हो ! ॥५०॥


यावरि श्रोता प्रश्न करी । काय संत नव्हती चमत्कारी ? आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें तरी । कां न लोकां सांगावें ? ॥५१॥


एकाने नालींतील घाण फेकली । ती अत्तरसुगंधें घमघमाटली । एकाने मुठीमधूनि काढिली । खडीसाखर प्रत्यक्ष ॥५२॥


एकाने कटोरींतूनि पंगती वाढल्या । श्रोतियानेत्रीं धारा काढल्या एकाने घडयाळीच बंद केल्या । सर्व गांवाच्या ॥५३॥ 


मित्रा ! त्वां पाहिलें साच । परि हा आभास मिथ्याच । संताचें हें लक्षण नव्हेच । कोणत्याहि, कदाकाळीं ॥५४॥


हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ । कोणी मानितील यांस सबळ । तरि ते मुकतील प्रांजळ । सेवाव्रत महत्त्वाचें ॥५५॥


लटिकें अदृश्य तें आणावें । कांही लोकांस जेवूं घालावें । आणि आणिलें तेथे खळगे पाडावे । हें दिसे त्या नवल कैसें ? ॥५६॥


कोणी कीर्तिस्तव दान करी । पैसे मिळवोनि काळयाबाजारीं । तैसे दुसरीकडोनि आणोनि भरी । वस्तु अदृश्य ॥५७॥


एकाचे खिसे कापावे । दुसर्‍यास म्हणे दान घ्यावें । तैसेंच चमत्कारलाघव आघवें । समजावें हें ॥५८॥ 


कोणी गुरुची सेवा करी । जीवन वाही चमत्कारावरि । अडक्याचें साधन साधूनि झुगारी । आयुष्यरत्न ॥५९॥


पैसा देवोनि नांवेंतूनि जावें । तेथे तपाने पाण्यावरि चालावें । शेवटीं अहंकारें भ्रष्ट व्हावें । यांत थोरवी कशाची ? ॥६०॥


परि हें जनासि कळेना । संतांपासूनि इच्छा नाना । करिती देवोनि दानदक्षिणा । लोभासाठी ॥६१॥ 


लोकांचिया या ओळखोनि भावा । अनेक दांभिक येती गांवां । लुटती जनासि ढोंगी बुवा । मागे लावोनिया ॥६२॥


ही बुवाबाजी भुलवी जना । भ्रष्ट करी ग्रामजीवना । फसवोनि भोळया-बापडयांना । भलत्या छंदा लाविती ॥६३॥ 


कांही देती शेतीधन । मग पाहती मागे फिरोन । हें तंव आहे वेडेपण । आपुल्या स्वार्थांधतेचें ॥६४॥


कांही वर्गणी करोनि गोळा । गांवीं करिती भक्ति-सोहळा । भिकारी करोनि स्त्रियाबाळां । ठेविती कोणी ॥६५॥


प्रयत्नांचा मार्ग सोडिती । अल्पायासें लाभ इच्छिती । चमत्कारांच्या थापेंत जाती । गारूडियांच्या ॥६६॥ 


लोक चमत्कारावरि भुलती । मागाहूनि पश्चात्ताप करिती । कांही भुरळ पाडली म्हणती । आम्हांवरि ॥६७॥


वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार । हा तों चालत आहे व्यवहार । पोटभर्‍यांचा ॥६८॥ 


चमत्कार तेथे नमस्कार । तेणें जादुगिरीस चढे पूर । खर्‍या संतांस ओळखीना नर । चमत्काराअभावीं ॥६९॥


याच भ्रांतीने भुलोनि । ’ संत आले गांवीं भुवनीं । परि पाप न गेलें धुवोनि ’ । म्हणती जन यापरी ॥७०॥ 


कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि न झालें रोग-निवारण । कोणी म्हणती नाही संतान । दिलें संतांनी आम्हांसि ॥७१॥


कोणी म्हणती मंत्र घेतला । परि उध्दारचि नाही झाला । दु:खचि जाळी अजूनि मनाला । अहोरात्र आमुच्या ॥७२॥


कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि नाही मिळालें आम्हां धन । कोणी म्हणती नोकरी लावून । द्यावी संतीं आम्हांसि ॥७३॥ 


कोणी म्हणती मुलगी वाढली । संताने सोयरीक नाही जुळवली । कोणी म्हणती गेलों पायवणी घेतली । परि ताप न गेला आमुचा ॥७४ll


कोणी म्हणती गेलों दर्शनासि । परि आठ दिवसांचा आहे उपाशी । सट्टा नाही दिला आम्हांसि । साधुसंताने एकहि ॥७५॥


कोणी म्हणे दर्शन घेतलें । परि चोर तुरुंगांतूनि नाही सुटले । चोरी केली म्हणोनि काय झालें । दर्शन घेतां मुक्त व्हावें ॥७६॥ 


कोणी म्हणती संत घरीं आले । आमुचें पाहिजे भाग्य उघडलें । कर्तव्य न करितांहि राज्य भेटलें । पाहिजे आम्हां ॥७७॥


कर्तव्य करितां सर्व होतें । मग संतदर्शन काय करावें तें ? संताने कर्महीनासि द्यावें आइतें । आणूनिया ॥७८॥ 


तुम्ही म्हणतां संत दयाळ । आमुचें वेडें झालें बाळ । त्याने कृपा करोनि तत्काळ । बरें करावें ॥७९॥


आम्ही जरी असलों पापी । त्याने संकल्प करावा सुखरूपी । आम्हांस न कळतां उपदव्यापी । मिटवाव्या तेणें ॥८०॥


संताने मंत्र देताक्षणीं । आम्हांसि न्यावें उध्दरोनि । पाहूं नये अधिकार पडताळोनि । आमुचा त्यानें ॥८१॥


तरीच त्यास संत म्हणावें । नाहीतरि त्या ढोंगी गणावें । आम्ही बोलतों हे चूक मानावें । कोण्या कारणें ? ॥८२॥


ऐसें जनाचें म्हणणें चाले । परि सांगा ऐसें कोठे झालें ? कोणत्या संताने केलें । सुखी समृध्द सर्वांलागी ? ॥८३॥

याचा विचार न करिती । चमत्कारासाठी मरमरती । काय संतांपाशी आहे भेदवृत्ति । इतरां शांति न द्याया ? ॥८४॥

साधुसंतचि मूल देती । तरि कां वांझ जगीं राहती ? संत धनवैभव अर्पिती । तरि भिकारी न दिसावे ॥८५॥


संत बिमारी बसविती । मग बुवांचेहि कां प्राण जाती ? जगीं कोणीच ना मरती । ऐसें कां होऊं नये ? ॥८६॥ 


संतांचा मंत्र कानीं पडे । उघडती मोक्षाचीं कवाडें । मग ऐसें कां न घडे । सर्व लोकीं सर्रास ? ॥८७॥ 

त्यांच्या संकल्पेंचि सर्व होतें । तरि दु:खी कोणीहि न राहतें । काय तुम्हांविषयींच दुजाभाव ते । करिते कांही ? ॥८८॥


जरि म्हणाला आमुच्या नशिबीं नाही । तरि प्रारब्धचि प्रधान होई । मग संतचमत्काराची राही । महिमा कोठे ? ॥८९॥


संत आपुल्यापरी झटोनि । सौख्य देती सर्वजनीं । सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी । परि तो नव्हे चमत्कार ॥९०॥ 


संतांच्या शुध्द हृदयांतूनि । अनुभवा येई निघाली वाणी । परि त्याचीहि कल्पना त्यांनी । केली नाही चमत्कारें ॥९१॥


मुंगीसि हत्तीचे ओझें जैसें । वाटे नवलाचें भलतिसें । परि तें सहज घडे शक्तिविकासें । संतकार्य तैसें वाटे जना ॥९२॥


त्यासि चमत्कार मानलिया । लोक विसरती कर्तव्यपाया । भजों लागती सकामपणें तयां । आंधळया भावें निष्क्रिय ॥९३॥


म्हणोनि महत्त्व नको चमत्कारा । शोधावी सत्कार्य-परंपरा । ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा । घ्यावा संत-जीवनांतूनि ॥९४॥


वस्तुत: मार्गदर्शनचि कार्य संतांचें । पुत्रधन देणें नव्हे साचें । बिमारी बसविणें हें वैद्याचें । काम आहे सर्वथा ॥९५॥


संत अज्ञानरोगाचे वैद्य । जीवनविकासाचे सर्वाद्य । शुध्द कर्मांनी असती वंद्य । तिन्ही लोकीं ॥९६॥ 

त्यांचा एकचि चमत्कार । अल्पज्ञ जीव केला । विश्वाकार । सर्वांभूतीं देखिला ईश्वर । ठायीं ठीयीं याच डोळां ॥९७॥


त्यांचें तेंवढें करणें जाणणें । या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे । तेथे कोण पुसतो तुणतुणें । क्षुद्र सिध्दीचें वाजतांहि ॥९८॥


संत सेवेचे अवतार । सर्वांभूतीं नम्र, सत्य व्यवहार । तयांसि देवहि मानी थोर । अन्य चमत्कार कासया ? ॥९९॥


साधूचा सरळ प्रेमळपणा । हा या जगीं चमत्कारचि जाणा । त्याने ’ अन्यहि मीच ’ म्हणावें आपणा । हा चमत्कार केवढा ! ॥१००॥


अहो ! सर्वांत मोठा चमत्कार । तो मानी ’ विश्वचि माझें घर ’ । त्यासाठी कष्टतो अहोरात्र । जीवें फार उल्हासें ॥१०१॥


उणें दिसे तें पूर्ण करी । जगाचा तोल बोधें सावरी । परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरीं । चमत्कारी संत ऐसे ॥१०२॥ 


मात्र संतचि सर्व कांही करी । आणि कर्तव्यचि नाही माणसावरि । ऐसी संतांची एकांगी थोरी । गाती तें नोहे उचित ॥१०३॥


ऐसें गांवीं होऊं न द्यावें । जनासि सत्य ज्ञान कळावें । खर्‍या संतांसि ओळखावें । कर्तव्यासाठी ॥१०४॥


संतांचे विचित्र व्यवहार । तैसेचि त्यांचे चमत्कार । हें वगळोनि दावावा सत्य सार । ग्रामीण जनासि ॥१०५॥


आपुला आपण उध्दार करावा । संतदेवांचा सहारा घ्यावा । हाचि संतग्रंथांचा गवगवा । चित्तीं धरावा सर्वांनी ॥१०६॥


यांतचि गांवाचें कल्याण । निघोनि जाईल दुबळेपण । कर्तव्य आपुलें जाणतील जन । तुकडया म्हणे करा ऐसें ॥१०७॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । संत-सामर्थ्य कथिलें येथ । एकतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥ 


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*


" साधुसंतांचा स्वभाव लोककल्याणकारी असतो. त्यांचें सर्व आचरण जगतहितासाठीच होत असतें . श्रीकृष्ण-संकीर्तन हेंच विश्वाला शांति देण्याचें साधन त्यांनी अवलंबिलेलें असतें. तृणापेक्षाहि स्वत:ला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात. " 


---श्रीसंत महाप्रभु चैतन्य