ग्रामगीता अध्याय ३५


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन । हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥ 


आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची । आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद ॥२॥ 


जें झालें तें होऊनि गेलें । आता पुढे पाहिजे सूधारलें । इच्छा-कर्तव्यें लाभती फलें । सर्व कांही ॥३॥ 


यावरि श्रोत्याने प्रश्न केला । आपण इच्छा-कर्तव्याला मान दिला । परि अचानक मृत्यु घडतो त्याला । कोणती इच्छा सांगाना ? ॥४॥ 


कोणी अकस्मातचि मेले । थोडेहि बिमार नाही पडले । छातीमाजीं कळ आली वाटलें । तैसेचि गेले मृत्युमुखीं ॥५॥ 


कोणीं एकाएकी विहिरींत पडला । अथवा रानीं व्याघ्राने भक्षिला । तो काय त्या प्रसंगाला । इच्छीत होता त्या पूर्वी ? ॥६॥ 

कोणास मार्गात मारोनि टाकिती । कोणी ठोकर लागतां मरती । त्यांची काय ती इच्छा होती ? अथवा कर्तव्य ? ॥७॥ 


अहो ! हो देवा-दैवाची लीला । ठावी असोनि आपणाला । आम्हांसि लावाया कार्याला । सांगतां भलतें ॥८॥ 


मित्रा ! ऐसा न धरी भ्रम । सत्यचि आहे कथिलें तें वर्म । इच्छा-प्रयत्नेंचि देव-काल-कर्म । देती फळें ॥९॥ 


मीं तर आधीच सांगितलें । अचानक कर्तृत्व नाही दिसलें । परि पूर्वी तेंचि कार्य असेल घडलें । आघाताचें ॥१०॥ 


करतेवेळीं कळलें नाही । प्रसंग येतां वाटलें कांही । परि दैवावरि भार देवोनि राही । मोकळा बिचारा ॥११॥ 


जैसें, धन संग्रहीं न करता । तरि चोर कासयासि मारता ? पाहोनिया वाट चालता । तरि ठोकर कैसी लागती ? ॥१२॥ 


देह, स्थान, संग निवडोनि । आधीच घेता उत्तमपणीं । आहारविहार करिता समजोनि । तरि दु:खी होता कैसा तो ? ॥१३॥ 


अविवेक, क्रूरता, गर्व, बेहोशी । लागलीं मृत्यूच्या मार्गासि । निमित्त केलें व्याघ्रादिकांसि । परि तो प्रयत्न आपुलाचि ॥१४॥ 


आणि अचानक दिसे घडलें । तें तरी देहावरीच पडलें । जन्मचि न घेतां कोठलें । संकट त्यासि ? ॥१५॥ 


जन्म हाचि इच्छेचा खेळ । जगीं अनेक इच्छांचा मेळ । तेथे संघर्ष असे अटळ । सुखदु:खफळ कर्माचें ॥१६॥ 


येथे दैव मारतें, देव मारितो । काय म्हणून आम्हीं म्हणतों ? आम्हीं काय कुणाचें खातों ? सांगा मज ॥१७॥ 


देवदैव आपुल्याने करी । तरि दोष लागेल देवावरि । तैसी नाहीच देवाची कामगिरी । दु:ख देणें मानवासि ॥१८॥ 


आपणचि मार्ग चुकतों । इच्छेने संगतीने वाया जातों । मग ’ कैसें झालें ’ म्हणतों । एकाएकी फळ येतां ॥१९॥ 


तेथे जबाबदार धरतों दैव । अथवा म्हणतों देवाची माव । नाहीतरि ग्रहगोलांचा प्रभाव । समजतों शुभाशुभ ॥२०॥ 


कोणी करिती ग्रहशांति । वाचती पोथी गिर्‍हे बांधती । परंतु दुराग्रह बसला चित्तीं । तो न काढिती भ्रांतीचा ॥२१॥ 


नक्षत्रांचा सृष्टीवरि प्रभाव । परि ते निमित्तमात्रचि सर्व । आपुल्याचि शुभाशुभ कर्मांची ठेव । फळा येई त्या त्या वेळीं ॥२२॥ 


आपण बरें-वाईट बीं पेरलें । तें त्या त्या ऋतूंत उदया आलें । येथे कालाने काय केलें ? साह्य दिलें उदय होण्या ॥२३॥ 


परि नारळीस न येती रुई-फळें । पेरिलें तेंचि उगवतें बळें । त्यासि फक्त साह्यचि दिलें जळें । तैसा देव साह्यकारी ॥२४॥ 


तो स्वत: कांही न करी । ज्याचें त्यास देई निर्धारी । ’ प्राप्त काळघडी ’ सारी । निमित्तमात्र करोनि ॥२५॥ 


काळ चाले आपुल्या गतीं । ईश्वर व्यापक सम स्थितीं । कर्मे आपचि फळा येती । सृष्टिनियमें आपुलीं ॥२६॥ 


कर्म करायाची स्वतंत्रता । ही जीवाहातीं महान सत्ता । आपुल्या दैवाचा विधाता । आपणचि आहे ॥२७॥ 


ग्रहगोलांचा अनिष्ट प्रभाव । न पडावा म्हणोनि शोधिले उपाव । यांतहि कर्तबगार मानव । सिध्दिचि असे ॥२८॥ 


उपासनेद्वारें मानसिक शक्ति । वाढतां दु:खींहि सुखाची प्राप्ति । ही ईश्वरी कृपाहि असे हातीं । जीवाच्याचि ॥२९॥ 


मित्रा ! हें विसरूं नको आता । आपणचि सर्व कर्ताहर्ता । यांत देव-दैवाची वार्ता । आपणचि केली ॥३०॥ 


ऐसें धरूनि राहा जीवीं । शुध्द कर्मे करीत जावीं । तरीच गति पावे बरवी । पुढे पुढे ॥३१॥ 


असो निसर्ग वा योगायोग । असो प्रारब्धाचाहि भोग । उत्तम प्रयत्नें त्यांचाहि ओघ । वळवितां येई ॥३२॥ 


तैसी नसती जरि शक्यता । जीव सर्वस्वीं पराधीन असता । तरि शास्त्र कोण देते हातां । नाना उपाय सांगोनि ? ॥३३॥


’ धर्मे वाग, सत्य वद ’ । ऐसा कां सांगता वेद ? । सारेचि होतील विधिनिषेध । अनाठायीं मग ॥३४॥ 


पडोनि दैवादिकांच्या प्रवाहीं । जीव अधिकचि बुडेल डोहीं । निघायासि मार्गचि नाही । उरला मग, ऐसें होतां ॥३५॥ 


परंतु मिथ्या हा विचार । जीवास असे कर्मस्वातंत्र्य । प्रयत्न करतां होतो उध्दार । आपुला शत्रुमित्र आपणचि ॥३६॥ 


वाईट चिंतितां वाईट होतें । जें जें साधूं तें साधतें । मग कां न घ्यावें थोरपण येथे । सदगुण सारे शिकोनि ? ॥३७॥ 


यावरि श्रोता म्हणे ऐका । माझी अजूनि आहे शंका । जगीं धडपडती सर्वचि सर्वचि सुखा । परि एक एका न मिळे ॥३८॥ 

बरें करतांहि ब्रह्महत्त्या । लागे कित्येकांच्या माथां । कित्येकां जन्मभरि टाळ कुटतां । ताल तोहि न साधे ॥३९॥ 


याचें काय आहे कारण ? काय नाही केला प्रयत्न ? उलट सुखी असती पापें करून । कित्येक लोक ॥४०॥ 


याचें ऐका समाधान । लोक दिसती भिन्न भिन्न । परि त्यासि कारण त्यांचेच प्रयत्न । वेगळाले ॥४१॥ 


भिन्न संस्कारें भरले लोक । म्हणोनि न मिळती एकासि एक । कोणी जन्मतांचि गुणी सुरेख । ताल न जन्मीं साधे कोणा ॥४२॥ 


संस्कारचि हे नान तर्‍हांचे । कांही गायनाचे कांही विद्वत्तेचे । कांही चित्रकलेचे, धाडसाचे । चातुर्याचे कित्येक ॥४३॥ 


कांही धनाचे कांही मानाचे । कांही अध्यात्म आणि भक्तीचे । कांही असती कार्यशक्तीचे । संस्कार नाना ॥४४॥ 


ज्या प्राण्याने जो यत्न केला । तो संस्कार त्याच्या वाटयासि आला । म्हणोनि सर्वचि सर्वाला । येतां दिसेना ॥४५॥ 


एकास मिळे संपत्ति । परि अक्कल नाही त्यासि पुरती । एकास विद्वत्ता पिसे अति । परि खाया पुरेना ॥४६॥ 


एक अतीच धाडसी दिसतो । परि बुध्दीने शून्यचि भासतो । म्हणोनि जीवनांत तो ठरतो । वेडा अथवा गुंड जैसा ॥४७॥ 


एक शब्दसृष्टि उभी करितो । एक गायनें जग डोलवितो । एक अदभुत वाद्यें वाजवितो । लहानपणीं ॥४८॥ 


एक ध्यान करण्यांत प्रवीण । एका भक्तीचेंचि अवधान । एकास विश्वज्ञान आत्मज्ञान । लहानपणीं ॥४९॥ 


याचें एकचि कारण । ज्याने जें कर्तव्य केलें समजोन । तेचि त्याचे संस्कार पूर्ण । पावले तया पूर्वीचे ॥५०॥ 


इच्छा-संस्कार कर्तव्य-संस्कार । यांचेंच हें रूपान्तर । ज्याने केला जो व्यवहार । तोच फळला यत्नें त्यासि ॥५१॥ 


प्रयत्नशील त्यासीच म्हणावें । इच्छेंत तेंच चिंतनीं असावें । हातांनी कार्य तेंचि घडावें । सर्वकाळ ॥५२॥ 


मनीं वसे तें ध्यानीं दिसे । ध्यानीं ठसे तेंचि स्थानी भासे । तैसेंचि कर्तव्य इच्छाउल्हासें । उमटों लागे जीवनीं ॥५३॥ 


या सर्वांचा मेळ झाला । तरीच यश प्रयत्नाला । नाहीतरि अवघा गलबला । एक मिळेना एकाशीं ॥५४॥ 


याचा अनुक्रम ऐसा आहे । प्रथम मनीं संकल्प राहे । संकल्प दृढ होतां निश्चय । सत्कार्याचें रूप घेई ॥५५॥ 


कुणाचे संकल्प अवधी न लाविती । त्यांची तैसीच असते प्रकृति । कांही संस्कार मागील असती । कांही लाभती मातापित्याचे ॥५६॥ 


ऐसे संग्रहित होत जाती । त्यांची पुढे पुढे होई प्रगति । तैसी तैसी लाभे गति । बर्‍यावाईट फळांची ॥५७॥ 


पूर्वी केले उत्तम यत्न । म्हणोनि हातीं आलें रत्न । वाईट वर्तनाने पुढे पतन । फळा येईल आपैसें ॥५८॥ 


पूर्वीची कमाई भोगली । पुढे सुकृत-जोड नाही केली । त्यासि भोगावी लागली । राज्याअंतीं नर्कगति ॥५९॥ 


पूर्वी कांही पुण्य घडलें । म्हणोनि सुख वाटयासि आलें । परि पाप करतां येतील घाले । निश्चयाने या पुढती ॥६०॥ 


पुण्यवंता आज कष्ट । याचें कारण आहे स्पष्ट । एका संस्कारें तो पुण्यनिष्ठ । परि दुसरा फळला दु:खरूपें ॥६१॥ 


प्रयत्न सर्वांगीण आदर्श । सर्वचि संस्कारांचा उत्कर्ष । ऐसें न होय म्हणोनि पुरुष । विचित्र फळें भोगिती ॥६२॥ 


तुकाराम आणि एकनाथ । दोघें सारखेचि अधिकारी संत । परि एका त्रास एक धनवंत । फळें हीं भिन्न संस्कारें ॥६३॥ .


सकाळीं उठण्याचें फळ निराळें । अभ्यासाचें फळचि वेगळें । उत्तम राहणीचें फळ आगळें । झाकवितां झाकेना ॥६४॥ 


चित्तशुध्दीचें वेगळें फळ । दानादिकांचें भिन्न सकळ । ज्ञान-साधनाचें फळ प्रांजळ । नाही मेळ एक-एका ॥६५॥ 


उत्तम कार्या फळ उत्तम । परि दुसरें एक वाईट कर्म । म्हणोनि फळ लाभे अधम । मागे-पुढे याचें त्याचें ॥६६॥ 


कल्याणकर्म केलें जेवढें । तें कधीतरी फळेल मागेपुढे । हा सिध्दान्त व्यर्थ न घडे । कदाकाळीं ॥६७॥ 


म्हणोनि उपकार नाही फळले । पुण्य करितां अपकार झाले । हें म्हणणेंचि नाही शोभलें । शहाण्या जना ॥६८॥ 


फळ वेगळेंचि आज दिसतें । परि आलें कैसें धुंडितां तें । सहज कळेल, प्रयत्नचि होते । मागे केले ॥६९॥ 


उपकरपुण्य संग्रहीं पडलें । अपकाररूपें पूर्वपाप फळलें । ऐसा मिश्र व्यवहार चाले । ओळखूं येना ॥७०॥ 


कोणत्या कर्माचें कोणतें फळ । हें जाणतां येना तत्काळ । तेणें चित्तीं होय गोंधळ । वाढूं लागे कुशंका ॥७१॥ 


प्रत्येक कर्माचें वेगळें फळ । परि जाणताचि लावी मोल सकळ । प्रयत्न-फळांची गुंतवळ । उकलेना सहजपणें ॥७२॥ 


उत्तमगाण्याचें फळ खाद्य नोहे । परि त्याहूनि त्यांत सुख आहे । हें कैसें कळेल ? जोंवरि रुचि नये । गायनाची ॥७३॥ 


उपकार-सेवेंत आत्मसमाधान । हें फळचि असे महान । तेथे कां इच्छावें बक्षीस अन्य । सज्जनांनी ? ॥७४॥ 


आपुले प्रयत्नचि सरस करावे । केले तरी करीतचि राहावें । थोडें उणें होऊं न द्यावें । प्रयत्नामध्ये ॥७५॥ 


क्षण एक चुकीं न द्यावें । प्रयत्नासि दूरदृष्टीने जपावें । प्रयत्नहि सर्वांगीण व्हावे । सर्व सुखें भोगावया ॥७६॥ 


एरव्ही प्रयत्नाशिवाय कोणीच नाही । प्रयत्न होती सर्वदाहि । परि दु:खचि देती प्रयत्न कांही । जीवजना ॥७७॥ 


कांही प्रयत्न नांवलौकिका नेती । कांही प्रयत्नें होय फजीती । कांही प्रयत्न प्राणचि घेती । आपुले आणि परक्यांचे ॥७८॥ 


म्हणोनि प्रयत्न करावे चांगले । कर्त्या सज्जना पाहिजे पुसलें । लोभप्रतिष्ठेसि जे नाही भाळले । तेचि खरे प्रयत्नशील ॥७९॥ 


कांही प्रयत्न उलटे घडती । त्यांचीं फळें मरणतुल्य येती । कांही प्रयत्न प्रांजळ होती । तेणें पावती उत्तम जन्म ॥८०॥ 


मरणासीहि प्रयत्नचि कारण । जन्मण्यासहि प्रयत्नचि प्रमाण । भोग-सुख-दु:खांचें निधान । प्रयत्नचि ॥८१॥ 


कांही प्रयत्न योजनारूप होती । त्यांनी कीर्तिपळें लाभती । कांही प्रयत्नीं शिकस्त करिती । मुक्ति पावती साक्षात्कारें ॥८२॥ 


कांही प्रयत्न संचितीं पडती। प्रारब्ध भोगतां  जे जे घडती । नाही मुळीच उपभोगाची वृत्ति । त्यांचे प्रयत्न कळसाचे ॥८३॥ 


त्यांचे प्रयत्न शुभप्रारब्ध झाले । दोन्ही मिळोनि देवपणासि आले । आपण आपणांत मिळाले । साक्षात्कारें आत्मत्वें ॥८४॥ 


मित्रा ! म्हणोनि प्रयत्नशील व्हावें । प्रारब्धाचें थोरपण न मानावें । कर्तव्याने चमकून उठावें । भूमंडळीं उत्साहें ॥८५॥ 


अमका प्रारब्धें श्रीमंत झाला । अमका पुण्य करितां दैवें गिळिला । अमका ’ देव देव ’ म्हणतां तरला । प्रयत्नाविण ॥८६॥ 


हें तों म्हणणें अज्ञानाचें । पुन्हा करूं नको उच्चार वाचें । सुप्रयत्नासि फळ सौख्याचें । निश्चयें आहे ॥८७॥ 


दुसर्‍याचें फळ पाहोनि झुरावें । आपण कांहीच न करावें । हें तों लक्षण आहे बरवें । अधोगतीचें आपुल्या ॥८८॥ 


आमुचें पूर्वसुकृत नाही बळी । म्हणोनि हात ठेवावा कपाळीं । हें तों आमुच्याने कधीकाळीं । घडोंचि नये ॥८९॥ 


नाही तेंचि आता कमावूं । आहे तें तें अधिक वाढवूं । इच्छा फलद्रूप करोनि घेऊं । हाचि करावा निर्धार ॥९०॥ 


याच निर्धारें वाल्या कोळी । पुण्यश्लोक झाला भूमंडळीं । संत योगी वीर बळी । गाजले मानव-इतिहासीं ॥९१॥ 


वेश्यागामी बिल्वमंगल । यत्नें झाला सूरदास निर्मल । आपणासह महीमंडल । केलें पावन भजनाने ॥९२॥ 


हेंचि शिकावें सत्संगतीने । यानेचि मानव होती शहाणे । भाग्य उजळेल सूर्याप्रमाणें । उद्योगशील झालिया ॥९३॥ 


प्रत्येक उद्योगा फळ पावे । शेतकर्‍यासि हितगुज पुसावें । प्रयत्नें एक बीज लावावें । फळ पावावें कणसापरी ॥९४॥ 


प्रयत्नविण स्वयंपाक झाला । प्रयत्नाविण घास मुखीं गेला । प्रारब्धानेच व्यवहार चालला । ऐसें कोण सांगो शके ? ॥९५॥ 


पटवावया प्रारब्धवाद । त्यासहि लागे प्रयत्न सिध्द । विमान, दूरध्वनि आदि शोध । लाविले काय प्रारब्धें ? ॥९६॥ 


उघड आहे प्रयत्नाची थोरी । प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण करी । हें म्हणणेंचि अपुरें सर्वतोपरीं । दूरदृष्टीने पाहतां ॥९७॥ 


मुख्य असे प्रयत्नचि केवळ । प्रारब्ध हेंहि प्रयत्नाचें फळ । वृक्षावांचोनि  झालें फळमूळ । कोण म्हणे ? ॥९८॥ 


प्रयत्न सोडोनि प्रारब्ध धरलें । तरि ते प्राणी दोघांतूनि गेले । नाही प्रयत्नहि पूर्ण केले । प्रारब्ध पळालें दूरदेशीं ॥९९॥ 


कोणी एक झाड लावलें । दिवसेंदिवस सुकतचि गेलें । त्याचेकडे दुर्लक्ष केलें । कोणी एकीं ॥१००॥ 


लोक म्हणती आयुष्य सरलें । कोणी म्हणती किडयांनी ग्रासलें । कोणी म्हणती त्याचें प्रारब्ध आलें । मरणस्थानीं ॥१०१॥ 


कोणी म्हणती येथे झाड जगेना । कोणी म्हणती चुकूं द्या यातना । कोणी म्हणती काय आपणा- । हातीं आहे ? ॥१०२॥ 


अरे ! हें सर्वचि आहे खरें । परि प्रयत्न करोनि पहा बरें । झाड जगतें की ऐसेंचि मरे । प्रयत्न केलिया ? ॥१०३॥ 


म्हणोनि त्यास खत घातलें । तारतम्य ठेवोनि सांभाळिलें । पाणी देवोनि वाचविलें । मूळडाळ सर्वचि ॥१०४॥ 


पुढे पुढे झाड फुललें । पुष्पींफळीं बहरोनि आलें । प्रयत्न केल्यानेचि झालें । आहेना हें प्रत्यक्ष ? ॥१०५॥ 


कलमें करोनि नानापरीं । फुलें आणिलीं  बहुप्रकारीं । हात ठेवितां कपाळावरि । ऐसें कधी होईल का ? ॥१०६॥ 


तैसेंचि मानवाचें जीवन । उन्नत व्हावया हवा प्रयत्न । अपमृत्यु आदि धोके दारूण । टळती संशोधन केलिया ॥१०७॥ 


मानव सृष्टीहूनि थोर । तो ईश्वराचा अंशावतार । अचूक प्रयत्न दैवी हत्यार । निर्मू शके प्रतिसृष्टि ॥१०८॥ 


म्हणोनि सांगतों प्रयत्न करा । विचारशक्ति प्रयत्नांत भरा । शिका शिकवा, प्रयत्न सारा । व्यापूं द्या गांवोगांवीं ॥१०९॥ 


ज्या ज्या राष्ट्रांनी ऐसें केलें । त्यांचें वैभव शिगेस गेलें । जीवनमान आदि वाढलें । इच्छेसारिखें तयांचें ॥११०॥ 


प्रारब्धवादी शिथील झाला । प्रयत्नवादी चेतना पावला । शोध करीत पुढे गेला । दिगंतरीं ॥१११॥ 


केलें मंगळावरि उड्डाण । चढला हिमगिरिशिखरीं पूर्ण । शोधिलें अग्निअस्त्र अणुअस्त्र महान । हैड्रोजनादि ॥११२॥ 


ऐकती करोडो मैलांवरून । परस्परांचें गायन-भाषण । विश्व हें आटोक्यांत आणून । घर केलें राहण्याचें ॥११३॥ 


प्रयत्नाची शिकस्त झाली । अजूनिहि जागा आहे उरली । धाव कधीच नाहीं संपलीं । प्रयत्नशीलांची ॥११४॥ 


प्रयत्नें देवपण पावला भक्त । प्रयत्नें योगी झाला जीवन्मुक्त । प्रयत्नें बध्द झाला निरासक्त । विषयामाजीं ॥११५॥ 


प्रयत्नें गांव झाला आदर्श । प्रयत्नें सुखी होय स्वदेश । प्रयत्नें विश्वशांतीचे सायास । सफल होती ॥११६॥ 


यासाठी प्रयत्न करावे आपण । मिरवावें देवाचें थोरपण । अंगां येईल अहंकार म्हणोन । देव मध्यस्थीं घालावा ॥११७॥ 


प्रयत्नें राज्य समृध्द करावें । प्रयत्नें भूमंडल डोलवावें । प्रयत्नेंचि दासपण शोभवावें । कार्यप्रभावें ॥११८॥ 


प्रयत्नें मानव होई उन्नत । गांवचि नव्हे, हालवी दिक्प्रांत । ही अनुभवाची मात । विसरूं नका तुकडया म्हणे ॥११९॥ .


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला प्रयत्नवाद समर्थ । पस्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥ 


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

दोहा


बाँह छुडाये जात हो निर्बल जानिकै मोही । हिरदेतें जब जाओग सबल कहूँ मैं तोही ॥ 


---भक्तोत्तम सूरदास