ग्रामगीता अध्याय ३६


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव । ऐसें वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥ 


परंतु पाहतां जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । व्यक्ति तितक्या प्रकृतींचे पाढे । ठायीं ठायीं ॥२॥ 


वाटे ही निसर्गाचीच रचना । तेथे ठाव नाही प्रयत्ना । ऐसी धारणा बसली मनां । श्रोतियांच्या ॥३॥ 


म्हणोनि करूं निरूपण । ऐका ऐका श्रोतेजन ! प्रकृति ठायीं ठायीं दिसे भिन्न । परि ती स्वतंत्र म्हणों नये ॥४॥ 


प्रकृति पुरुषाच्या आधीन । त्याच्या इशारें करी नर्तन । बहु होण्याचा संकल्प पूर्ण । तीच भिन्न प्रकृति ही ॥५॥ 


परम पुरुष जो परमात्मा । त्याच्या शक्तीसि नाही सीमा । मानव त्याचीच प्रतिमा । अंशरूप निश्चयें ॥६॥ 


म्हणोनि जीवांत सामर्थ्य अनंत । अभ्यासाने प्रकटे निवांत । नलगे आत्मशक्तीचा अंत । कोणासहि ॥७॥ 


सर्व होतें केलें असतां । सर्व मिळतें धरितां हातां । अभ्यासें तंव ब्रह्मसत्ता । पावती योगी ॥८॥ 


आणि अभ्यासाच्याचि बळें । भिन्न मार्गीं वाढले जीव सगळे । जैसी श्रध्दा तैसीं फळें । श्रध्दामय पुरुष म्हणोनि ॥९॥ 


जैसी श्रध्दा जैसा संकल्प । जैसा यत्न पुण्यपापरूप । तैसाचि जीव होई आपोआप । अभ्यासाने तयार ॥१०॥ 


नैसर्गिक दिसे प्रकृति-भेद । तो पूर्व अभ्यासानेच सिध्द । मुळीं एक परि कलांनी विविध । जाहले जीव ॥११॥ 


पूर्व जन्मींची अभ्यासकला । तैसा या जन्मींचा यत्न आपुला । यांनीच भिन्नत्व आणिलें जीवाला । नानापरी ॥१२॥ 


आपुली आपणा कला फळली । म्हणोनि प्रकृति भिन्न झाली । येथे निसर्गावरि बोली । देवोंचि नये ॥१३॥ 


देवाने निर्मिली ही क्षिती । जिच्या पोटीं अनंत जीव होती । न करवे तयांची गणती । गणित-मार्गाने ॥१४॥ 


निसर्गत: लाभलें सारखें जीवन । परि कलेने भरलें भिन्नपण । एक-एकशी मिळते गुण । क्वचितचि आढळती ॥१५॥ 


एकचि वस्तु विश्वीं संचली । परि प्रकृतिगुणें भिन्न भासली । रचना बोली निराळी झाली । कला केली जीवांनी ॥१६॥ 


प्रत्येक जीवचि अवतार पाही । परि कोठे कांही कोठे कांही । एक आहे एक नाही । ऐसें वैशिष्टय सर्वत्र ॥१७॥  


प्रत्येक जीव आपुल्यापरी । कलापूर्णतेने खेळे भूमीवरि । एक-एकाची स्वभाव-कुसरी । दुसरा पाहतां दिसेना ॥१८॥ 


सृष्टींत खेळती जे जीव । पहा तयांचें लीलालाघव । अंग-अंग अभिनव । नाना तर्‍हा तयांच्या ॥१९॥ 


नाना कला नाना रंग । नाना स्वभाव नाना उद्योग । नाना वस्त्रें, भूषणें, उपभोग । भोगणारे निर्मिले ॥२०॥ 


निसर्ग नानापरी नटला । तो भिन्न जीवांच्या वाटयासि आला । प्रकृतीकडोनि साथ मिळाला। जीवाचिया कलेऐसा ॥२१॥ 


जीवांत नखशिखान्त भरली कला । गुणावगुणांचा मेळा झाला । इंद्रियें भोगती वस्तूला । आपुलाल्या भिन्न भावें ॥२२॥ 


जीव आपणचि संकल्प करी । कल्पोनि आरोप वस्तूवरि । मग तदाकार होवोनि व्यवहारीं । रागद्वेष पाहतसे ॥२३॥ 


ईश्वरनिर्मित एकचि सृष्टि । परि पाहणाराची भिन्न दृष्टि । आपुल्या भावें सुखी-कष्टी । होय व्यष्टि-समष्टीने ॥२४॥ 


ईश्वरनिर्मित स्त्रीरूप सत्ता । ती कुणाची माता कुणाची कांता । आपुल्या भावें सुखदु:खभिन्नता । भोगी जीव ॥२५॥ 


एकाच निसर्गसृष्टीवरि । जीव आपली सृष्टि करी । तैसेंचि सुखदु:ख भिन्न अंतरीं । अनुभवा येई ॥२६॥ 


रागद्वेषादि दृढ विकार । ऐकिलें भोगिलें त्यांचे संस्कार । हे घेवोनि जन्मती पुन्हा नर । आपापल्या कलेसह ॥२७॥ 


पूर्व अभ्यास, प्रयत्न, संकल्प । त्यापरी लाभे वेगळें रूप । जीवांच्या अनंत कलांचा गोफ । ती ही सृष्टि ॥२८॥ 


’ बहु व्हावें ’ हा ईश्वरी संकल्प । जीवांद्वारें घेई रूप । म्हणोनि दुजियांची ओढ आपोआप । जीवाअंगीं ॥२९॥ 


एका जीवाचा भिन्न संकल्प । दुसर्‍या जीवाचा निराळा व्याप । परि प्रबल शक्तीचा कार्यकलाप । ओढोनि नेतो दुसर्‍यासि ॥३०॥ 


एकाहूनि दुसरा कलाधिकारी । अधिक टाकी मोहनी समाजावरि । आपुले मंत्र साजवी मधुरी । वाणी-वीणा वाजवोनि ॥३१॥ 


कोणी कल्पिली गायनकला । वाद्यकला चित्रकला तंतुकला । शब्दकला नृत्य शृंगारकला । मोहावया अन्य जीवांसि ॥३२॥ 


राहणें कला पाहणें कला । बोलणें कला हसणें कला । सर्वांमाजीं सौंदर्य-कला । ओतप्रोत दर्शवी ॥३३॥ 


कुणाचे मंजुळ बोल गोजिरवाणे । कुणाचें व्याघ्रापरी गर्जणें । रणकर्कशता जीवीं बाणे । कलंकशोभा कोणाची ॥३४॥ 


कुणास पाहोनि मोह वाटे । कुणास पाहतां येती कांटे । कुणाचे देखतां मुखवटे । छाती फाटे धीरांची ॥३५॥ 


कुणाची गंभीर मुद्रा सजली । वैराग्य येतें दृष्टीच पडली । कुणाकडे पाहतां वृत्ति गेली । विषय-वाटेने ॥३६॥ 


कुणास पाहतां चीड दाटे । कुणाचा संग सोडतां न सुटे । जीवभाव ओवाळावा वाटे । चरणीं तयाच्या ॥३७॥ 


हा सर्व निसर्गचमत्कार नोहे । प्रत्येक कलेचें सामर्थ्य आहे । प्रयत्नशील मानवचि राहे । परि देव म्हणती तयासि ॥३८॥ 


कृष्णाचाचि मामा कंस । परि एक देव एक राक्षस । मुळीं पाहतां एकचि वंश । परि भेद केला कलांनी ॥३९॥ 


कला मानवासि देव बनविते । परि अवकळा नसावी जरा तेथे । पूर्णताहि कलेनेच येते । रमतां अंगीं आत्मबोध ॥४०॥ 


अवकलेने छी:थू: होते । कला येतां देवत्व लाभतें । जैसा प्रयत्न करावा तयातें । फळ येतें याच देहीं ॥४१॥ 


विश्वामित्रें केली कला । राजर्षीचा ब्रह्मर्षि झाला । ब्रह्मवंशीय रावण राक्षस ठरला । मेला आपुल्या कलेने ॥४२॥ 


रावणें कला संपादिली । देवदेवता प्रसन्न केली । आपुली शक्ति वाढवोनि घेतली । कलाकुसरीने ॥४३॥ 


परि ती पचवितां नाही आली । उपभोगाची भावना झाली । म्हणोनि कला अवकळा पावली । अहंकारें ॥४४॥ 


कुंभकर्णें सुखमार्ग धरिला । आहारनिद्रेची वाढविली कला । क्रूरपणाचा खेळचि झाला । नाश पावला सर्वासह ॥४५॥ 


तोचि बिभीषण कला शिकला । रामनामीं रंगोनि गेला । राम धांवोनि घरीं आला । सौख्य दिलें अंतर्बाह्य ॥४६॥ 


दिलें लंकेचें राज्य हातीं । परि नाही उपभोगाची प्रीति । म्हणोनीच आजवरि कीर्ति । अमर तया सज्जनाची ॥४७॥ 


कलेचे ऐसे तीन प्रकार । राजस, तामस, सात्विक सुंदर । जो जयासि सजवी चतुर । तो ओळखावा त्या गुणाचा ॥४८॥ 


या सकळामाजीं जीवनकला । सात्विकतेचा प्रवाह भरला । मोहवूनि प्रेमाने सकलां । कीर्तिमार्ग दावी भूलोकीं ॥४९॥ 


एरव्ही सर्वांतचि आहे कला । एक चातुर्ये खाय एकाला । मोठी खातो लहानाला । नियम ऐसा जीवनीं ॥५०॥ 


परि हा नियम मानवी नाही । पशुपक्ष्यांना शोभे सर्व कांही । अंडज जारज उदभिज स्वेदजहि । याच मार्गीं ॥५१॥ 


याच मार्गे मानव गेला । तेणें जगीं हाहा:कार झाला । ’ बळी तो काळ पिळी ’ या बोला । जीवनकला म्हणों नये ॥५२॥ 


सामुदायिक वृत्तीविण । जगीं टिकले प्राणी कोण ? जगावें जगवावे जीवजन । हीच खरी जीवनकला ॥५३॥ 


हेंच वैशिष्ठय मानवाचें । जगीं सौख्य नांदवी साचें । त्याविण सार्‍या प्रगतीचें । मंदिर मिळे धुळीमाजीं ॥५४॥ 


म्हणोनि सर्व जीवांची कला वेगळी । जगावें दुसरे घेवोनि बळी । परि मानवांची कला निराळी । उन्नत करी दुर्बलांहि ॥५५॥ 


पशुपक्ष्यांचें नर्तन गायन । मानव सर्वांतचि झाला निपुण । परि तयाचें मानवपण । असे भिन्न सर्वाहूनि ॥५६॥ 


तो कातिणीपरी काती-विणी । कोकिळेपरी गाई गाणीं । मत्स्यापरी तरे जीवनीं  । उडे गगनीं पक्ष्यांपरी ॥५७॥ 


मधमाशीपरी संचय करी । मुंग्यासारिखे किल्ले उभारी । रंग बदली सरडयापरी । नृत्य करी मोराऐसें ॥५८॥ 


फुलपाखरांचे धरी वेष । चिमण्यांपरी घरटयांची हौस । ऐशा सर्वचि कला साधती त्यास । परि त्याची कला निराळी ॥५९॥ 


तो राहतो नीटनेटका । वायां न धाडी आपुला पैका । सर्वां सांभाळितो सारखा । आपुल्यापरी ॥६०॥ 


मनुष्य स्वभावेंचि भिन्न पडतो । तो सर्वांसीच सांभाळितो । मर्यादेने वागत जातो । सदधर्माच्या ॥६१॥ 


विवेक-बुध्दीने चालतो । पडलेल्यासि उचलोनि घेतो । दुसर्‍याचिया हितास्तव जातो । बळी प्रसंगीं ॥६२॥ 


देतो सर्वांसि आपुला हिस्सा । गांवीं न यावी म्हणोनि अवदशा । त्याचें कुटुंब गांवचि सहसा । वाटे तया ॥६३॥ 


आपण जें जें कांही करावें । त्याने इतरांसि दु:ख न व्हावें । अहर्निशीं ऐसेंचि वर्तावें । आवडे तया ॥६४॥ 


दूरदृष्टीचा विचार धावे । कार्यकारण तयासि ठावें । व्यक्तिऐसें विश्व सुखी व्हावें । म्हणोनि करी कष्ट नाना ॥६५॥ 


ऐसें करन्यासि जे जे चुकले । ते मानवचि नव्हती भले । 

मानवदेहीं जन्मासि आले । परि राहिले पशूचि ते ॥६६॥ 


जें जें असेल माझ्या घरीं । सगळया सुख लाभावें तयाचि परी । ऐसी चिंता नित्य करी । तोचि धन्य मानव ॥६७॥ 


तो आपुली कलाकुसरी । सर्वांचिया जीवनीं भरी । शोषण पतन कुणाचें न करी । आपुल्या कलेने ॥६८॥ 


कलेकरितां कला न ठेवी । जीवनासि कला भूषवी । आपण सजवूनि दुसर्‍या दाखवी । मनुष्यपण गोड शब्दें ॥६९॥ 


लोभासाठी गोड बोलणें । ही जरी कला घेतली कोणें । तरि तें जाणावें दु:खदवाणें । प्रेमळपण दिसे जरी ॥७०॥ 


कोणी विषयासाठी नटला थटला । तोंडा रंग फासोनि फिरला । तरी अंतरींच्या काळिमेला । बघती जन तयाच्या ॥७१॥ 


कोणी शिकला चातुर्यकला । साहित्य अभिनय मोही जगाला । परि तेणें स्वार्थापायीं घातला । समाज पतनीं ॥७२॥ 


कोणी नृत्यगायन नटविलें । चित्रादि कलांना शृंगारिलें । म्हणती आम्ही मानवां केलें । उन्नत ऐशा कलांनी ॥७३॥ 


परि पाहतां अनुभव आला । मानव क्षुद्र वृत्तींनी घेरला । याचें कारण बाजार झाला । स्वार्थापायीं कलांचा ॥७४॥ 


प्रत्येक कलाकौशल्यामागे । सदगुणांचीं असती अंगें । परि 

तेवढेंच विसरती जन संयोगें । घेती त्यांतूनि वाईट ॥७५॥ 


याचें कारण एक आहे । समजदार प्रलोभनीं दंग राहे । तेथे उपायचि होती अपाय । रंगविले किती तरी ॥७६॥ 


परि ती कला नव्हे-करंटेपण । तो शृंगार नव्हें-तें मरण । मधुर बोलणेंहि जहरासमान । वाटे कळतां अंतरींचें ॥७७॥ 


अंतरींचें दिसती डोहाळे । क्षणोक्षणीं वरि उफाळे । काय होतें बोलोनि प्रेमळें । कलाकुसरीचें ? ॥७८॥ 


हा दंभ विसरायाची कला । जो कोणी साधकजन शिकला । त्यासीच लोक मानिती भला । सदभावाने ॥७९॥ 


त्याची प्रत्येक कला निर्मळ । अनुपानें विषहि दे अमृतफळ । मानवतेचें वाढवी बळ । तीच कला महाथोर ॥८०॥ 


मुख्य कलेची सांगता । असावी लागते तारतम्यता । सदा सावध असावा माथा । उन्नतीसाठी सर्वांच्या ॥८१॥ 


मग कला मागे धावती । न कळत्या खुणा कळों येती । जीवनकला पाववी सुमति । सर्वांगीण उध्दाराची ॥८२॥ 


कुणाचें बिघडलें सुधारावें । कुणाचें भांडण तोडोनि द्यावें । कुणासाठी योजनाबध्द व्हावें । मार्ग सांगावया ॥८३॥ 


हीच खरी कला शिकावी । यानेच जीव तरतील भवीं । मरणावरीहि कीर्ति रहावी । कलाकाराची ॥८४॥ 


एरव्ही चौदा विद्या चौसष्ट कला । काय करावें शिकोनि गलबला ? जो दुसर्‍याच्या कामीं न आला । व्यर्थ मेला अभिमानाने ॥८५॥ 


कमींत कमी गरजांत राहिला । अधिकांत अधिक उपकार केला । समाजाशीं समरस झाला । तोचि खरा कलावंत ॥८६॥ 


ही जीवनकला ज्यांना गवसली । त्यांची मानवता विकास पावली । ’ मानवी देव ’ पदवी लाभली । सात्विक कलावंतासि ॥८७॥ 


जो ही ऐसी कला चुकला । तो गांवीं जगण्यासचि मुकला । सर्व संसार फाटका झाला । सहकार्याविण बिचार्‍याचा ॥८८॥ 


म्हणोनि बोललों मुख्य कला । मानवतेने सजविणें विश्वाला । सर्व मिळोनि संसार केला । पाहिजे हा स्वर्गापरी ॥८९॥ 


आपुलें आपुलें सर्व करा । सर्वांच्या सुखाचाहि मार्ग धरा । सर्वांत आपुल्याहि सुखाचा झरा । दिसों लागे ॥९०॥ 


सर्व कलांहूनि श्रेष्ठ कला । सर्वांत समरसता लाभावी जीवाला । दृष्टीसि जो जैसा दिसला । आनंद वाटला पाहिजे मना ॥९१॥ 


मनचि न व्हावें वेगळें । जें दिसतें तें सुंदरचि सगळें । हें कळावया आत्मबळें । पाहिजे कला बोधाची ॥९२॥ 


आत्म्याची ओळखी ही कला । साधूनि विश्वाशीं समरस झाला । तोचि कसोटीला लागला । शेवटीं पूर्णत्वाच्या ॥९३॥ 


पूर्णत्वीं दु:खदोषादि कांही नाही । परि ही कला विरळाचि घेई । दु:खदोष निवारूनि जना पाही । तोहि थोर कलावंत ॥९४॥ 


ज्यासि आहे जगाचें भान । त्यावरि जगाची जबाबदारी पूर्ण । त्याने केलेंचि पाहिजे दु:ख निवारण । समाजाचें स्वकलेने ॥९५॥ 


म्हणोनि ऐका करा उल्हासें । मानवमात्र सुखी व्हावे ऐसें । उणीव दिसतां सहकार्य हर्षें । नेहमी करा सर्वांशीं ॥९६॥


सर्वांशी सर्वांचा सहकार । हाचि आहे मार्ग थोर । गांवीं ये स्वर्गीयता सुंदर । याच कलेने निश्चयेंसि ॥९७॥ 


ही मानव्याची जीवनकला । गांवीं शिकवा सर्वांला । मग उणें न पडे कोणाला । कधी कांही ॥९८॥ 


योगियांची जीवनकळा । सत्रावीचा अमृतसोहळा । तैसी सुखी अमर करील मानवकुळा । कला ही गांवीं ॥९९॥ 


गांव होईल आरोग्यवंत । ज्ञानवंत सदभाग्यवंत । सहकार्यावरीच जग जिवंत । विचारें पाहतां ॥१००॥ 


हजार साधनांहूनि अमोल । एक सहकार्यवृत्ति निर्मल । ही गांवीं फोफावूं द्या अमरवेल । नाना प्रयत्नें ॥१०१॥ 


याने मानवांअंगींची शक्ति । प्रकट होईल महादीप्ति । सेवा करील निसर्ग-प्रकृति । सर्व जीवांची ॥१०२॥ 


जीव ईश्वराचे अंश । त्यांचें गांवचि कां राक्षस ? जिकडे तिकडे सुखसंतोष । नांदेल या प्रयत्नांनी ॥१०३॥ 


म्हणोनि शिका मानव्यकला । आत्मविकास साधा आपुला । आता पुरे हा गलबला । दैववादाचा ॥१०४॥ 


अनुभवें सांगतों तुम्हांप्रति । करूं म्हणाल तें साधेल निश्चिती । करा करा आत्मोन्नति । तुकडया म्हणे ॥१०५॥ 


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । जीवनकला कथिली उन्नत । छत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०६॥ 

  

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

दोहा


" जेव्हा आम्ही व्यक्तिभावाच्या पलिकडे जाऊं तेव्हाच वास्तविक ’ मनुष्य होऊं त्यासाठी मनुष्यांना सहाय्य करा पण त्यांना त्यांच्या शक्तीपासून वंचित करू नका. त्यांना पथप्रदर्शन करा, शिक्षण द्या, पण त्यांची कर्तृत्वशक्ति व मौलिकता मारली जाणार नाही इकडे लक्ष असूं द्या. त्यांना आपलेसें करा पण बदल्यांत त्यांच्या आंतील पूर्ण दिव्यत्व त्यांना प्रदान करा. हें सर्व करूं शकेल तोच खरा नेता, खरा कलावंत व खरा गुरु ! " 


---योगी अरविंद