ग्रामगीता अध्याय ४०


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥ 


गांवोगांवीं ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥ 


गांव व्हावया वैकुंठपूर । काय कामीं न येती ग्रंथ इतर ? कोणत्या उपायें होतील संस्कार । दृढ गांवाचे ? ॥३॥ 


याचें उत्तर ऐका आता । वेगळी नोहे ग्रामगीता । येथे नाही अन्य सदग्रंथा । विरोध कांही ॥४॥ 


सर्व उपनिषदादि गायी । दोहूनि केली गीतामाई । तैसेंचि संतग्रंथ सर्वहि । साररूपें या ग्रंथीं ॥५॥ 


सर्वांभूतीं भगवदभाव । हा संतश्रेष्ठांचा अनुभव । त्या तत्त्वाचीच उठाठेव । या ग्रामगीतेमाजीं ॥६॥ 


गीतेचें विश्वरूपदर्शन । वेदाचें विराटपुरुष-वर्णन । संतांच्या विश्वात्मक देवाची खूण । लाभे येथे सक्रिय ॥७॥ 


अनेक ग्रंथांतील वर्णनें । अनेक तीर्थांतील दर्शनें । अनेक कथाकीर्तनांतील उदाहरणें । तींहि याचसाठी ॥८॥ 


लोक भुलले सहकार्य देणें । झालें स्वार्थांध विकृत जिणें । आपुल्यासाठी फजीत करणें । लोकांसहि सुरू झालें ॥९॥ 


हें कोण्यारीतीं निघोनि जाय । याचाच शोध आणि उपाय । करावया महापुरुषांनी सोय । अनुभव घेवोनि लाविली ॥१०॥ 


वाट चालतां त्यांच्या पाउलीं । बोल बोलतां त्यांच्या बोलीं । जीवन-सफलता होय आपुली । सर्वतोपरीं निश्चयें ॥११॥ 


यासाठी ग्रंथ-पोथी वाचावी । जनता सगळी जागृत करावी । गांवें संस्कारांनी भरावीं । सहकार्याच्या या मार्गें ॥१२॥ 


मानवतेची जागवाया शिकवण । गांवीं असावें कथाकीर्तन । पोथीपुराणांचें वाचन । हेंचि शिकविण्या गांवासि ॥१३॥ 


नाना दृष्टांत कथा अनंत । सांगोनि मानवां  करणें उन्नत । याचसाठी ग्रामगीतेचेंहि गीत । गायिलें आम्हीं ॥१४॥ 


नको उगीच अवडंबर । आपुलें जीवन करावें सुंदर । गांवीं फुलवावें सुखाचे अंकुर । हेंचि कर्तव्य मानवाचें ॥१५॥ 


मनुष्य निरोगी सात्विक बनावा । त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा । त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा । कोणासहि ॥१६॥ 


हेंचि शिकणें असतें पोथींतूनि । भजनांतूनि कीर्तनांतूनि । याचसाठी हीं साधनें योजूनि । ठेविलीं संतीं ॥१७॥ 


साधनांत साधन-रचना । मुख्य दृष्टि राष्ट्रीय जाणा । साधूनि मानवतेच्या अनुसंधाना । जन लावावे सुमार्गीं ॥१८॥ 


त्यासाठी तात्त्विकता दावावी । वरकड उपांगें समजावोनि द्यावीं । आवश्यक तीं साधनें लावावीं । आपुल्या गांवीं ग्रंथादि ॥१९॥ 


ग्रंथ ओवीबध्दचि असावे । हेंहि म्हणणें सोडोनि द्यावें । सहज कळेल तेंचि उत्तम समजावें । गद्यपद्य ॥२०॥ 


कांही ग्रंथ ऐतिहासिक । कांही चरित्रें, कांही तात्त्विक । कांही अभंग पुराणें सम्यक । पठणीं ठेवावीं ॥२१॥ 


उगीच भरले चमत्कार । पूजापातीचा डोंगर । जीवनाचें कांहीच सार । नसेल तें काय कामीं ? ॥२२॥ 


प्रसादासाठी पोथी लाविली । चमत्कार ऐकतां वेळ गेली । आपुली बुध्दि गहाण पडली । ऐसें न व्हावें यापुढे ॥२३॥ 


रूपकात्मक पूर्वीचें ग्रंथ । जनसाधारण भुलले तेथ । काढूं लागले उलटा अर्थ । विश्वास सहसा बसेना ॥२४॥ 


पदोपदीं ऐसें उदाहरण । ग्रंथ वाचूनि बिघडे मन । अर्थ न लागतां वेडावून । जाती जन भाविकहि ॥२५॥ 


मी हरिविजय ग्रंथ ऐकला । कथिलें, नारद नारदी झाला । साठ पुत्र देवोनि गेला । एके रात्रीं ॥२६॥ 


ग्रंथ ऐकिला पांडवप्रताप । थोरथोरांचें कथिलें पाप । व्यभिचाराचें लागलें माप । आपोआप जेथे तेथे ॥२७॥ 


कुणाचा जन्म कानांतून । कोणी जन्मला तोंडांतून । कोणी झाला घागरीमधून । ऐसेंहि ग्रंथीं ऐकियलें ॥२८॥ 


शिंपींतून कोणी जन्मास आला । कोणी जटेंतूनचि जन्मला । कोणी लघवी करितां उध्दरोनि गेला । शिवलिंगावरि ॥२९॥ 


कोणी प्रसाद टाकोनि जात । म्हणोनि नांव बुडे पाण्यांत । प्रसाद घेतांचि वरि येत । जैसीच्या तैसी ॥३०॥ 


कोणी पृथ्वी घेवोनि पळाला । सागराइतुकी लघवी कुणाला । कुणाच्या नाकीं गर्दभ चरला । झोपीं जातां ॥३१॥ 


ऐसे ग्रंथीं चमत्कार । कान धरोनि सांगा अपार । परि मन न माने क्षणभर । काय करावें त्यालागी ? ॥३२॥ 


हे जरि ऐसेचि ठेविले । तरि अर्थ सांगणारे पाहिजेत भले । त्यांनी तर स्वर्गासहि नाचविलें । दोन बोटांवरि ॥३३॥ 


म्हणती जनहो ! ऐसेंचि आहे । येथे संशय धरूंचि नये । नाहीतरि पाप निरय । भोगणें पडे सर्वासि ॥३४॥ 


मानव करावया आदर्श । हाचि काढिला निष्कर्ष । सर्व चमत्कारांचा सारांश । तो ग्रंथराज ठरविला ॥३५॥ 


जो ऐकेल भावना धरोनि । तयास स्वर्गमुक्ति लाभे क्षणीं । ऐसें सांगोनि स्त्रीपुरुषजनीं । समाज केला पांगळा ॥३६॥ 


विचारें संशयासि जागा वाढली । समाधान-वृत्ति भंगली । नाही कोणी समजावोनि दिली । रोचक रूपक वाणी ती ॥३७॥ 


पुराणिक म्हणती उगेंचि ऐकावें । ’ होय ’ म्हणूनि नम्र व्हावें । तरीच जीवा उध्दार पावे । संशयात्मे विनाशती ॥३८॥ 


हें साधुसंतांनी जाणलें । म्हणोनि विवेकग्रंथ निर्माण केले । त्यांत हे संशयचि फेडले । बहुजन समाजाचे ॥३९॥ 


भाविक जनासि लावावया वळण । आकळावया सकळ ज्ञान । संतमहंतांनी उपकारऋण । केलें असे आम्हांवरि ॥४०॥ 


संस्कृतांतूनि काढूनि सार । सुलभ केलें प्राकृत ग्रंथभांडार । जनसाधारणासीहि कळावे सविस्तर । उध्दार मार्ग म्हणोनिया ॥४१॥ 


पुरातन संस्कृत ऋषि-बोली । त्यांतूनि बहुविध भाषा जन्मली । तैसीच मराठीहि वाढविली । संतकविराजें ॥४२॥ 


संत ज्ञानदेव मुकुंदराज । चक्रधर नाथादि हंसराज । यांनीच सुलभ केलें सहज । ज्ञान प्राकृत ग्रंथांतरीं ॥४३॥ 


समर्थ रामदासादि झाले । मुक्तेश्वर मोरोपंतादि भले । गीत अभंग गाथे लिहिले । महाराष्ट्र-ग्रंथकर्त्यांनी ॥४४॥ 


महाराष्ट्रीं संतकवि-परंपरा । तैसाचि चरित्रग्रंथांचा पसारा । वळणीं लावावया समाज सारा । ग्रंथ लिहिले बहुतांनी ॥४५॥ 


स्वामी विवेकानंदादि संतीं । जुन्यानव्यांची वाराया भ्रांति । ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथीं । नाना भाषांमधूनि ॥४६॥ 


त्या सर्वांतूनि शोधूनि घ्यावे । जे तात्त्विक बोधग्रंथ स्वभावें । कर्मठतेच्या भरीं न भरावें । अथवा शुष्क पांडित्याच्या ॥४७॥ 


आपली पात्रता ओळखोन । समाजाची पातळी लक्षून । आदर्शाचें सुलभ होय ज्ञान । ऐसेचि ग्रंथ वाचावे ॥४८॥ 


ग्रंथ वाचतांहि तारतम्य ठेवावें । कोणत्या ग्रंथांतून काय घ्यावें । काय सोडावें काय आचरावें । उन्नतीसाठी आपुल्या ॥४९॥ 


बोलकें ज्ञान सांगण्यासाठी । ग्रंथ वाचले उठाउठी । तेणें आत्मघात होतो शेवटीं । शांति तिळभरि लाभेना ॥५०॥ 


सखोल अध्यात्माचे ग्रंथ । त्यासाठी बुध्दीहि पाहिजे समर्थ । आणि उमगला पाहिजे कर्तव्यपथ । अर्जुनापरी ॥५१॥ 


एरव्ही हजारो ग्रंथ वाचले । त्यांतील मर्मचि नाही कळले । तरि तें वाचणें वाउगेंचि गेलें । वेडयापरी ॥५२॥ 


वेडा बोलूनि फार गेला । परि त्याचा अर्थचि नाही उमगला । म्हणोनीच तो वेडा ठरला । लोकांमाजीं  ॥५३॥ 


बोलेल जें कांही वाचेने । तारतम्य ठेवोनि विवेकाने । वर्तेल तैसाचि जीवेंप्राणें । त्यासचि म्हणती मानव ॥५४॥ 


जो फार बोलूनि जातो । परि एकावरि न निश्चित राहतो । त्यासचि वेडा आम्ही म्हणतों । आपुल्या विचारें ॥५५॥ 


लोकीं हाचि घुसला वेडेपणा । त्याने धर्माचा केला धिंगाणा । माणूस दिसला भाविक शहाणा । तरी तो पाहतां वेडाचि ॥५६॥ 


मज भेटला ऐसा एक सज्जन । म्हणे ऐकाल काय माझें कथन ? मीं केलें ग्रंथवाचन । बारा वर्षे ज्ञानात्मक ॥५७॥ 


ब्रह्मसूत्रें उपनिषदें पुराण । वाचलें भागवत अध्यात्मरामायण । तरीहि ब्रह्मज्योतीसि अजून । देखिलें नाही ॥५८॥ 


आता किती पारायणें करावीं । जेणें कळेल ब्रह्मचवी ? सांगाल काय खूण बरवी । विशद करोनिया ? ॥५९॥ 


मीं तयाशीं विनोद केला । म्हणालों, कसे पावाल परमार्थाला ! त्यासाठी पाहिजे खल केला । सदग्रंथांचा ॥६०॥ 


ग्रंथ टाकावे बारीक खलून । चूर्ण सकाळीं घ्यावें दुधांतून । अथवा पाण्याचेंहि अनुपान । चालेल शिळया ॥६१॥ 


त्या गृहस्थाने घरीं जाऊन । ग्रंथ फाडले दणादण । खल घातला चूर्णप्रमाण । बाह्यबुध्दि तयाची ॥६२॥ 


सकाळीं येवोनि विचारी । किती दिवस प्यावें तरी ? सांगाल काय कैशापरी । घेत जावें घोळूनि हें ? ॥६३॥ 


मी म्हणालों, वारे बुध्दि ! अंधानुकरणा धावे आधी । तारतम्य नसतां सांगा कधी । अनुभव येईल वाचका ? ॥६४॥ 


अरे ! तुज हेंहि नाही कळलें । ग्रंथ फाडोनि चूर्ण केलें । याने का ज्ञान अनुभवलें । जाईल बाबा ? ॥६५॥ 


तो म्हणाला, आम्हांसि काय ? कोणी सांगेल तैसा करावा उपाय । ऐसींच पारायणें केलीं, संवय । रोज रोज लावूनिया ॥६६॥ 


कळलें नाही ब्रह्मसूत्र । उपनिषद पंचीकरण विचारसागर । 

वाचले मुखें भराभर । सविस्तर टीकाग्रंथ ॥६७॥ 


आता कुठवरि पाठ करावें ? मनें धरिलें आपणांस विचारावें । शंका धरोनि आलों जीवें । आपणापाशी ॥६८॥ 


आपण सांगितलें चूर्ण करा । तैसेंचि केलें जाऊनि घरां । आलों पुढलिया विचारा । घेण्यासाठी ॥६९॥ 


कुणीकडे तोंड करावें पिण्यांत ? सांगाल तैसें घेऊं सतत । मी म्हणालों, वारे श्रध्दावंत ! अंधानुकरणी लोक हे ! ॥७०॥ 


बाबा ! मीच खरा चुकलों । तुझ्याशीं विनोद करोनि ठकलों । पाहावयासि होतों लागलों । बुध्दि तुझी ॥७१॥ 


एवढे ग्रंथराज वाचोन । किती आलें तारतम्यज्ञान । याचें समजलें मज धोरण । तुझ्या कृतीवरोनि ॥७२॥ 


कर्मठ अंधानुकरणी बुध्दि । त्यासि ब्रह्मज्ञान नको आधी । शुध्दता अंतर्मुखता साधी । लागेना अवधि तया मग ॥७३॥ 


म्हणोनि सांगतों खरें ऐक । ग्रंथीं वाचावें चारित्र्य सम्यक । राहणी कळेल ज्यांत उदबोधक । रोजच्या व्यवहाराची ॥७४॥ 


कधी उठावें कधी झोपावें । कैसें स्नान, ध्यान करावें । कोणतें कर्म आचरावें । पुण्यश्लोक व्हावया ॥७५॥ 


कोणत्या भावें उद्योग करावा । कोणाचा उपदेश ऐकावा । किती घ्यावा किती सोडावा । विचार-बळें ॥७६॥ 


हेंचि पठन आधी करावें । मग कर्तव्य-तत्पर व्हावें । पुढे पुढे अनुभवीत जावें । ज्ञान-पुढील मार्गाचें ॥७७॥ 


ऐसे अनुक्रमें ग्रंथ वाचावे । तरीच ज्ञान संपादावें । एरव्ही पारायणें करीत मरावें । काय होतें तयाने ? ॥७८॥ 


शास्त्रप्रचीति गुरुप्रचीति । मगचि होते आत्मप्रचीति । या म्हणण्यासीच आहे निश्चिती । अनुभवाअंतीं ॥७९॥ 


संतीं कथिलें शास्त्रपठन । तें सदग्रंथांसि उद्देशून । परि अधिकारपरत्वेंचि वाचन । सफल जीवन करीतसे ॥८०॥ 


एरव्ही ग्रंथभांडार बहुत । नाना विध्दानांचें बहु मत । कोणतें निवडावें समजोनि त्यांत । आपणासाठी ? ॥८१॥ 


नाना अधिकारांचे नाना ग्रंथ । अधिकारपरत्वें असती संमत । आपला कोणता मार्ग त्यांत । निवडोनि घ्यावा ? ॥८२॥ 


हें तों समजणें आपल्या आधीन । कळावी अधिकारपात्रता पूर्ण । हेंहि समजण्याचें ज्ञान । ग्रंथींच आहे दाविलें ॥८३॥ 


मूर्ख पढतमूर्ख विवेकी शुध्द । बध्द मुमुक्षू साधक सिध्द । ग्रंथींच दाविला पात्रता-भेद । उन्नतिमार्गासहित ॥८४॥ 


आपणासि कोण रोग जडला । निश्चित कळावा ज्याचा त्याला । त्याचि रोगाचा उपाय केला । पाहिजे आधी ॥८५॥ 


परि जो आपणासि ओळखूं नेणे । त्यासि सहाय्य लागे देणें । त्यासाठी पाहिजे साक्ष घेणें । संतसज्जनांची ॥८६॥ 


नाहीतरि ग्रंथीं सर्वचि विषय । कोणी उपाय कोणी अपाय । अवस्थाभेदें हें सर्व होय । साधक-बाधक ॥८७॥ 


यासाठी हवी सत-संगति । ज्यासि नाही सूक्ष्म मति । कुणी आपुल्याच विचारें चढती । आत्मानुभूति पावावया  ॥८८॥ 


कोणी संस्कारचि घेवोनि आला । कोणी येथे शिकोनि रंगला। कोणास कांहीच न कळे बोध भला । संतानुभवाचा ॥८९॥ 


म्हणोनि ग्रंथ वाचावे त्याने । मन लावोनि अर्थ समजणें । हें अनुभवियांकडोनि निवडणें । आपुल्यासाठी ॥९०॥ 


ग्रंथांचें भरलें महाभांडार । त्यांतूनि निवडती निवडणार । सार तेवढें देती साधकांसमोर । संतसज्जन ॥९१॥ 


मुळांत सारचि संतांची वाणी । जनासि तारी मार्ग दावूनि । ग्रंथ ही शब्दमूर्तीच ज्ञान-खाणी । दिव्य संतांची ॥९२॥ 


परि तयांचा लावितां अर्थ । सामान्य बुध्दि पडे भ्रमांत । काल बदलोनि होतो अनर्थ । तारतम्य न कळतां ॥९३॥ 


यासाठी देशकालानुसार । ग्रंथांचें उकलोनि दावावें अंतर । ऐसा असतो अधिकार । पुढील संतांचा ॥९४॥ 


साधुसंत अनुभवाचे सागर । त्यांना कळतो पुढील व्यवहार । जीवांचा कैसा होय उध्दार । काय करावें त्यालागी ॥९५॥ 


कोणास काय साधन द्यावें । हें त्यांसीच कळे स्वभावें । म्हणोनि गुरुप्रचीतीस घ्यावें । बोललों आम्ही ॥९६॥ 


कोणते ग्रंथ कोणी वाचावे । संतीं कथियलें तें बरवें । सदाचार नित्यनेम घ्यावे । वाचोनि आधी ॥९७॥ 

झोपावें उठावें ठरल्या वेळीं । आपुलीं कामें करावीं सगळीं । कोणा दु:ख न व्हावें भूमंडळीं । आपणासाठी ॥९८॥ 


आपुलें कर्म संपवोनि सगळें । जो दुसर्‍याच्या सेवेसि वळे । तोचि चढे कार्य-बळें । लौकिकासि आणि उन्नतीसि ॥९९॥ 


ऐसे विचार जया ग्रंथीं । तेचि प्रथम वाचावी पोथी । ठेवोनि लक्ष मुख्य अर्थी । जीवा उन्नतिपदा न्याया ॥१००॥ 


जयास व्यवहार समजला पूर्ण । सक्रिय कळलें साधनाज्ञान । तेणेंच ब्रह्म कोण आत्मा कोण । समजावें हें ग्रंथपठनीं ॥१०१॥ 


समजोनि घ्यावें पंचीकरण । आत्मअनात्म ब्रह्मविवरण । कळल्यावरि नेघे मन । मिथ्याभ्रांतिविषयीं आशा ॥१०२॥ 


मगचि खरें श्रवण मनन । निदिध्यास वाढेल मनापासून । तेणें साक्षात्काराची खूण । कळेल ठायीं आपुल्या ॥१०३॥ 


साक्षात्कार ब्रम्हज्योति । होईल आत्मानंदाची प्राप्ति । आत्मरंगें विलीन वृत्ति । ब्रह्मामाजीं होतसे ॥१०४॥ 


जयाची दृष्टि ऊर्ध्व झाली । विषयांतूनि उन्मनींत गेली । त्याची समाधि सुखें डोलली । अखंडाकार ॥१०५॥ 


देवभक्त नाही दुजे । कळलें अनुभवाने सहजें । विश्वीं विश्वाकार होइजे । ऐसें झालें मग तेथे ॥१०६॥ 


ग्रंथवाक्याने  वृत्ति चढली । गुरुबोधाने अनुभवीं वळली । आत्मरुचीने तदाकार झाली । अखंड जैसी ॥१०७॥ 


मग कशाचें ग्रंथवाचन ? जें जें करील तेंचि समाधान । जें बोलेल तेंचि ग्रंथज्ञान । होईल स्वयें ॥१०८॥ 


हर्ष नाही जन्म घेतां । दु:ख नाही मृत्यु होतां । अंगीं बाणे स्थितप्रज्ञता । कैवल्यरूप तयाच्या ॥१०९॥ 


याचि पूर्ण सुखासाठी । ग्रंथ वाचणें उठाउठी । जीवनाची पूर्णता शेवटीं । यांतचि आहे ॥११०॥ 


ही आत्मप्रचीति पावावयासि । हाचि मार्ग आहे साधकासि । प्रथम सदग्रंथ-अवलोकनासि । केलें पाहिजे ॥१११॥ 


एरव्ही जो पूर्वीच उमगला । त्यास नकोचि हा गलबला । तो सरळचि आत्मप्रचीतीसि गेला । समाधानें ॥११२॥ 


आत्मप्रचीति म्हणजे दिव्यदृष्टि । ज्यांत व्यष्टि, समष्टि आणि परमेष्टि । आपणचि अनुभवतो उठाउठी । अगणित रूपें एकपणें ॥११३॥ 


असो देव, संत, मानव । पापी, पुण्यवान सर्व । मूळरूपाचा घेतां अनुभव । चैतन्यघन विश्वचि ॥११४॥ 


ऐसा अनुभव ज्याने घेतला । तो विश्वाच्या उपयोगा आला । त्याचा व्यवहार व्यापक झाला । सकळासाठी ॥११५॥ 


याचि भावें जनसाधारणासि । ग्रंथ द्यावेत वाचावयासि । त्यानेच लागेल मार्ग त्यांसि । विश्वरूप-दर्शनाचा ॥११६॥ 


परंतु ज्यांसि व्यवहारपात्रता नाही । त्यांनी करावी अध्यात्म-घाई । हें तों होईल अनाठायी । ग्रंथपठन एकांगी ॥११७॥ 


शुध्दाचरण मागाहूनि वाचलें । पहिले वेदान्तपठन केलें । वळणीचें पाणी वरि चढविलें । होईल ऐसें ॥११८॥ 


शब्दें म्हणतील ’ सर्व ब्रह्म ’ । मना आलें तें करितील कर्म । नास्तिकतेहूनि महाभ्रम । माजेल लोकीं शब्दज्ञानें ॥११९॥ 


गांवीं दु:खांची पेटली आग । तो म्हणेल ’ सच्चिदानंद जग ’ । हें सर्व बहुरूप्याचें सोंग । वाटेल जना वेडयापरी ॥१२०॥ 


यास्तव गांव होईल शुध्द । प्रेम, ज्ञान, सत्य आनंद । सर्वांस लाभेल ऐसे सुबुध्द । ग्रंथ गांवीं लावावे ॥१२१॥ .


होईल जीवनाची उन्नति । ज्ञानविज्ञानाची प्रगति । ऐसीच असावी ग्रंथसंपत्ति । गांवोगांवीं ॥१२२॥ 


सर्वांस कळावें कर्तव्य आपुलें । कैसें होईल सर्वांचें भलें । तनमनधनें फळेफुले । विश्व हें कैसें, कळावें ॥१२३॥ 


आम्ही रहिवासी सर्वचि मुळचे । विश्वरचाना हें नाटक आमुचें । आपुल्या परीने रंगविणें साचें । आहे आम्हां ॥१२४॥ 


ऐसें जाणोनि स्वरूपासि । वर्ते तो जिंकी या खेळासि । तुकडया म्हणे हेंचि कळावयासि । कथिली असे ग्रामगीता ॥१२५॥ 


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रंथपठनाचा कथिला भावार्थ । चाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१२६॥ 


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*


" सर्वत्र समतेचें तत्त्व आपल्या ग्रंथांत आहे पण व्यवहारांत मात्र भेदांचें साम्राज्य पसरलें आहे; हें आता बदललेंच पाहिजे. आमच्या देशांत हजारो निष्ठावान व त्यागी साधु आहेत, हे गांवोगांवीं धर्मशिक्षण देत फिरत असतात. त्यांनी इकडे लक्ष पुरविलें व व्यवस्थितपणें ऐहिक विषयांचें-भूगोल गणितादि आवश्यक गोष्टींचेंहि-शिक्षण लोकांस दिलें तर अल्पावधींतच भारताचा उध्दार होईल ! त्यासाठी आपली जबाबदारी ओळखून सर्वांशीं मिळण्याची वृत्ति मात्र त्यांनी अंगीकारली पाहिजे. " 


---स्वामी विवेकानंद