४. जातीयतेची उत्पत्ति

                  ऐकावं जनाचं नि करावं मनाचं

      मित्रा ! तू म्हणतोस- देवभक्तीसाठी व देशकार्यासाठी जातीपाती नष्टच झाल्या पाहिजेत, नाहीतर नाही का देशसेवा होत? पूर्वीचे लोक नाहीत का भक्ति अन् कार्य करीत आले? मग ते कसे सोवळं-आवळं, महार-ब्राह्मण नि गरीब-श्रीमंत हा भेद ठेवीत असत ? त्यांनीहि तर राज्य केलंच ना? की तुमच्या स्वराज्याची कल्पनाच काही और आहे ? अन् असलीहि कदाचित् तशी तरी ती लोकांना हे देशभक्त समजावून कां नाहीत सांगत ? अहो ! जबरीनं का माणसांची मनं वळत असतात? त्याला तर बुद्धीची पातळी न भावनाच वाढवली पाहिजे ना?
     मित्रा ! ऐक तुझे प्रश्न मला आवडणारे आहेत; पण समजून घेणारे सज्जन जर तुझ्याच मताप्रमाणे असते तर देश हाँ-हाँ म्हणतां उन्नत झाला असता. परंतु दुर्दैवाने तशी स्थितिच नाही. असे विचित्र लोक आहेत आमचे की गोष्टी ऐकणं नि व्याख्यानं देणं हा एक करमणुकीचा विषयच झाला आहे त्यांचा. त्यांना वाटतं की ह्या गोष्टी सांगायच्या आहेत, कर्तव्य करण्यासाठी नव्हते. त्यांच्यात अशी एक म्हण आहे की ऐकावं जनाचं नि करावं मनाचं!  या म्हणीला ते वेदवचनापेक्षाहि महत्व देतात नि तिचा असा विचित्र उपयोग करून घेतात की कुणी काहीहि सांगितलं तरी आपली चाल मात्र सोडायची नाही. जे चालत आलं अन् अंगवळणी पडलं तेच धर्माचं कार्य समजून पक्क धरून ठेवायचं आणि कोणी त्यावर टीका केलीच तर किती प्रमाणं देऊन व तर्काची कसोटी लावून बोलता हे 


जातीयतेची उत्पत्ति

पाहून त्या प्रमाणांत त्यांच कौतुक करायचं; पण *येरे माझ्या मागल्या* हा पहिला धडा मात्र केव्हाहि विसरायचा नाही. मित्रा! यालाच म्हणतात गाढ अज्ञान. 
            अरे! ज्याचं मन विचारी असेल, विकारांच्या कबजांत न जाणारं असेल नि जो सत्यासत्य समजू शकणारा असेल त्यानं मनोदेवतेला स्मरून तसं वर्तन केलं तर बरं; पण एखाद्या चोराचं मन असावं चोरी करण्याकडे व त्यांनहि *मन:पूतं समारचेत्* हीच म्हण उपयोगात आणावी, अशानं जगाचं व अखेर त्याचं तरी कल्याण होईल कां? बापदादांचा धंदा हाच धर्म समजून तो वागला तर ते बरोबर ठरेल का? उगाच आपटी खाईल बिचारा! 
                      
              सत्ययुग म्हणजेच समतेचं युग

           मित्रा! ऐक, आपल्या समाजांत अगदी प्रथमपासूनच ही जातपात व हा श्रीमंती-गरीबाचा भेद अशा स्वरुपांत मानला जात होता असं तुला वाटतं काय आमचे वाडवडिल मानीत आले म्हणून आम्ही मानतो असं म्हणणाऱ्यांना अगदी पुरातन काळचा इतिहास तरी माहीत आहे का ? अरे! अशी कितीतरी प्रमाणं तुला देता येतील की पूर्वीचा काळ हा अनेक धर्म, अनेक जाती व अनेक प्रकारची ही सामाजिक नि आर्थिक विषमता यांच्या वेगळा होता. *एक वर्णमिदं सर्व* हे त्या काळाचं ऋषींनी केलेलं वर्णन आहे आणि त्याच काळाला त्यांनी कृतयुग किंवा सत्ययुग हे नांव दिलेलं आहे. सर्व एकवर्णाचे एका धर्माचे सर्वच सत्याचे उपासक नि आत्मज्ञानाकडे झुकलेले. *मानवमात्र समान आहे इतकंच नव्हे तर आपलं आत्मतत्व सर्वात व्याप्त आहे.* हेच त्यांच्या धर्माचं, ज्ञानाचं नि भक्तीचं मुख्य सूत्र! आता उपलब्ध असणारे धर्म, पंथादिकाच्या नावांनी ओळखले जाणारे हे मानवा-मानवांमधील भेद नि प्रचलित रीतिरिवाज त्या


युगप्रभात

काळी कुठं होते? आजच्या प्रमाणं बंधुभावानेचा लोप होऊन लोक ऐकमेकास पेचांत पकडून व खोटेनाटे धंदे करून पिळून घेत, असं त्या काळाच वर्णन कुठंतरी केलेलं वाचलं आहेस का तूं?
                  
          वर्णव्यवस्था ही एकेकाळची समाज-रचनाच!

                    अरे ! जेव्हा मानवांत प्रकृतीच्या कृतीनं विकृति वाढली, जाणिवेची अहंता व विकारवशता थैमान घालू लागली आणि *ऐहिक सुखभोग हे मलाच जास्तीत जास्त व उत्तमांत उत्तम मिळावेत नि तेहि कमीत कमी कष्टांत*  ही प्रवृत्ति बळकट होत गेली, तेव्हाच परस्परांत संघर्ष वाढून ओढताण, कारस्थान नि उच्चनीचतादि गोष्टी फोफावू लागल्या; विशिष्ट प्रवृत्तींच्या लोकांचे गट पडत गेले नि त्यामुळं माजलेल्या अंदाधुंदीतून जगांत दुःख वाढती राहू नयेत म्हणून वेगवेगळ्या गुणकर्मस्वभावांच्या लोकांकडे वेगवेगळी कामं व त्यांचे नियम सोपविण्यात आले. प्रत्येकाच्या कर्तबगारीप्रमाणे समाजाचे मार्गदर्शक, संरक्षक, उत्पादक व सेवक असा कार्याधिकार त्यांच्याकडे थोर लोकांनी दिला आणि जो त्या कामांत उत्तम, त्यानं आपल्या संततीलाहि तेच शिक्षण देऊन एक प्रकारे परंपराच निर्माण केल्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या परंपरेला जातीचं रुप स्वाभाविकपणेच येत गेल. जातीयता, उच्चनीचता व विषमता याचं मूळ धंद्याधंद्यावरून जाति ठरत गेल्या आणि ठराविक व्यवसायांच्या घराण्यांतील मुलंमुली त्यांत सहजच प्रवीण होतात म्हणून त्या ठराविक व्यवसायांच्या लोकांतच विवाहसंबंध करण्यात येऊ लागले. अर्थात् हळूहळू प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीपासून अगदी अलग पडली, इतकंच नव्हे तर *इतरांपेक्षा आम्ही थोर* असं अहंकारानं म्हणू लागली आणि कोणी दुसऱ्या जातीशी विवाहादि संबंध केल्यास


जातीयतेची उत्पत्ति

निषेध म्हणून बहिष्कार घालण्याच्या निमित्ताने त्यांचे घरीखाणांपिणंहि बंद करूं लागली; व अशा रीतीनं ही उच्चनीचता बोकाळत गेली. ती इतकी बोकाळली की समाजनियमांचा भंग करणाराचीच नव्हे तर त्याच्या नातूपणतूची सावलीसुद्धा वर्ण्य आहे अशा प्रकारची विचारधरा लोकांत रूढ झली. समाजाची सर्व प्रकारची घाण साफ करण्याची अत्यंत कठिण अशी सेवा ज्यांचेकडे सोपवली, त्यांचे उपकार मानण्याऐवजी त्यांना स्पर्श करण्याचं व शिक्षणादिकांनी त्यांची प्रगति करण्याचं सुद्धा लोकांनी पूर्णपणे टाळलं. वास्तविक अगदी पुरातन काळाकडे जर आपण पाहू लागलो तर आपल्याला मिश्रविवाहाचे, मिश्रभोजनाचे व समाज अधिकारासंबंधीचे शेकडो दाखले ग्रंथांतरी मिळतील. चार वर्णामधून धंद्यांमुळं हजारो जाति व आपआपल्या मोठेपणाच्या घमेंडीमुळं त्यांत अनेक उपजाति निर्माण झाल्या. परंतु ह्या सर्व जोवर कर्तव्यदक्ष होत्या व आपलं परस्परासंबंधीचं प्रेम- बंधुत्वाचं कर्तव्य-जाणून प्रसंगी तरी एक होत होत्या, तोवर भारतांत दुःख दैन्याच्या महाकाळाची सुद्धा मेख गडली जात नव्हती. जाती-जातींच्या पाठीशी असणारं तत्वज्ञान लोकांच्या स्मरणांतून लोपलं, *कुणाला जसं काही आवडेल तसं त्यानं करावं* असाहि काळ निर्माण झाला, तथापि जाति मात्र मोडल्या गेल्या नाहीत व तिकडे कटाक्षानं लक्ष देण्याचं थोरांना सुद्धा काही कारण पडलं नाही. कारण सर्व जाति परस्पराशी मोकळेपणानं, बंधुभावनेनं, श्रीमंत-गरीब भेद न मानतां आत्मीयतेनं, निदान शेजारधर्म म्हणून देऊन-घेऊन चालविण्याच्या दृष्टीनं तरी वागत होत्या. परंतु जेव्हा सर्वातच स्वार्थी भावना बळावली, महात्वाकाक्षेनं राक्षसी रुप धारण केलं परस्परांकडे तुच्छतेनं पाहण्यास आरंभ झाला, तेव्हा अनेकांनी आपापल्या जाति व आपापले धर्म, संप्रदाय व पंथ अलग काढून आपलाच मोठेपणा गाजविण्यास सुरुवात केली. याचा इतका सुळसुळाट झाला की अखेर


युगप्रभात

एकराष्ट्रीयताहि लोपून गेली; व्यक्तिगत स्वार्थानी हवे तसे घोटाळे केले व त्यामुळे देशाची शक्ति नष्ट होऊन त्याला दीनहीन व गुलाम होऊन रखडावे लागले.

                     राष्ट्राच्या भाग्यरेषेला मारक रेषा

                 विचारी माणूस जेव्हा आजच्या समाजातील जातिपंथापक्षांनी केलेली ही चवचिंधी पाहतो आणि धर्माधर्माच्या विपरीत व आकुंचित कल्पनांनी निर्माण केलेले घोटाळे नि विरोध त्याला उग्र स्वरूपात दिसून येतात, तेव्हा भयंकर काहूर त्याच्या डोक्यांत उत्पन्न होतं. परंतु ज्यांना ही व्यापक दृष्टि नाही त्यांना हे उत्तमच वाटतं व ते या खोट्या कल्पना हृदयाशी धरून ठेवण्यातच स्वत:ला कृतार्थ माणून घेतात. देशाच्या भाग्यरेषेला हे शेकडो फाटे फुटलेले आहेत ही गोष्ट जाणून ज्यांच्यात चीड निर्माण झाली त्यांनी हे तुकडे जोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अशा प्रयत्नकर्त्यांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीचं नांव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांनी स्पृश्यास्पृश्यता काढून फेकण्याची व जातीय भावना गाडून टाकण्याची जीवापाड मेहनत करुन मानवधर्माची जागृति केली; सर्वस्वी नाही तरी त्याचा परिणाम संघटित होऊन राज्यक्रांति करण्यापुरता तरी त्यांनी योजला व अनेक आपत्ति सहन करुन अहिंसात्मक मार्गाने हे स्वातंत्र्याचे दिवस भारताला दाखवले. पण अजूनहि हे स्वातंत्र्य जर काही काळ टिकवायचं असेल तर, मित्रा! मी सतत सांगत आलो आहे की, हा पोटांतला रोग आधी मुळांतून नाहीसा केला पाहिजे; हे जातीचे तुकडे जमवून ऐक्याकडे नेले पाहिजेत नि भारतांतील स्पृश्य-अस्पृश्य, गरीब श्रीमंत एकजीव करुन त्यांची शक्ति देशांतील अन्नधान्याच्या  उत्पत्तीकडे, कापडाच्या निर्मितीकडे व संपूर्ण प्रजेला बलबुद्धिसंपन्न करण्याच्या प्रवृत्तीकडे-होईल त्या त-हेनं-ताबडतोब लावली पाहिजे.


जातीयतेची उत्पत्ति

               
              सरकार व जनता याचं पहिलं कर्तव्य

               परस्पराविषयी आपुलकी वाटून जनतेत हृदयाच ऐक्य निर्माण झालं तर त्यातून जे महान सामर्थ्य प्रगट होईल ते भारताला जगाच्या गरुस्थानी सुशोभित करुन ठेवील यात शंका नाही. म्हणून हे ऐक्याला विघातक असे भेद नाहीसे कारण हे कार्य सर्वात महत्वाच व मुख्य आहे. त्यासाठी कायदे करुन, प्रचारक नेमून, मंडळ स्थापून, अधिवेशन घेऊन व स्थापन झालेल्या असतील अशा संस्थाना या कार्याकडे
वळवून नि त्यांना मदत देऊन सरकार नि पुढारी जर हे काम हाती घेतील तर भारतात अभूतपूर्व परिवर्तन होऊन पुन्हा आनंदी खेळू लागेल व सोन्याचा धूर निघेल. सरकार व प्रजा यात आता तिळमात्र फरक राहू नये. सरकारनं प्रजेच्या हाकेत काही तथ्य समजन ताबडतोब दाद घेतली पाहिजे व प्रजेनंहि सरकारी कायद्याबरहुकूम वर्तन केलं पाहिजे; हीच राज्य टिकविण्याची सुखशांति नांदविण्याची रीति आहे. रोग्याला अनेक रोग असतील, पण त्यांत जो प्रधान रोग असतो त्याला आधी थोपवून किंवा कमी करण्याचे प्रयत्न करून मग अवांतर रोगांच्या नाशाची व्यवस्था करावयाची असते. या प्रमाणाचं आज भारतदेशांत ज्या अनेक विनाशक बाबी आहेत. त्यांत मुख्य बाब कोणती हे आधी लक्षात घेऊन तिची व्यवस्था लावणं व जनतेत शांतिमार्ग रुळवीत मागच्या अनेक भानगडी मिटवीत जाणं हे अगदी आवश्यक आहे. नाही तर, पोटांत गेलेलं औषधहि विषच बनावं त्याप्रमाणं, ही जातीयता व उच्चनीचता सर्व लोकोपयोगी योजनांना विकृत स्वरुप देऊन सावळागोंधळ, चढाओढ नि घराघरांत शत्रुतत्वच वाढविण्यास कारणीभूत होणार हे विसरुन चालतां येत नाही.