५. श्रीमंती व गरीबीचा वाद

                   प्राचीन भारतांत विषमता नव्हती काय?

                मित्रा! श्रीमंत व गरीब यांचेबद्दल तू जे विचारलंस तेही अगदी बरोबर आहे. श्रीमंती-गरीबीची भेद आजचा आहे असं नाही. तो पुरातन काळाचा आहे. बलवान नि बुद्धिमान लोकांनी स्वत:कडे जे व्यवसाय ठेवले होते त्यातून ते विशेष श्रीमंत झाले नि सेवावृत्तीचे इतर सामान्य लोक दरिद्रीच राहिले हे अगदी स्वाभाविक आहे. पण जोपर्यंत समाजात माझी श्रीमंती ही राष्ट्राची ठेवी आहे, लोकसेवेची पूजासामुग्री आहे ही जाणीव ठेवत होती, जोपर्यंत यज्ञ, अतिथिसत्कार. सत्पात्री दान, परोपकार इत्यादी गोष्टी शुद्ध स्वरुपात चालू होत्या, तोपर्यंत अनेक मार्गानी या धनाची समाजांत वाटणी होत होती नि त्यामुळं हा भेद जाणवत नव्हता. इच्छाभोजन देणारे, अलंकारानी सजलेल्या गायी वाटून देणारे, यज्ञादिकांच्या निमित्तानं सर्वांना इच्छादान करणारे श्रीमंत व राजे भारतात थोडेथोडके झालेले नाहीत. त्यावेळच्या शास्त्रांनी सुद्धा साक्षीविना भोजन करण्यास, इतरांना न देता एकटच भक्षण करण्यास पातक ठरविलं होतं. विद्वानांनी समाजाला शिक्षण द्यावं नि मोबदल्यात कोणी दानदक्षिणा न दिली तर *शीलोच्छ वृत्तीनं*-शेतातील उरलेला सर्वा वेचून खाऊन- जगावं असा दंडन होता. न मागता दान घेणारालाहि संग्रह करण्याची परवानगी नव्हती, तर त्यानसुद्धा ज्याला गरज असेल त्याला ते दान करून टाकाव असा नियम होता. राज्यांत कोणी उपाशी आहेत काय ही दौंडी पिटवून सर्व यथेच्छ जेवले असतील तरच सत्ताधीश जेवत, अशाहि त्यावेळच्या कथा आहेत. भारताच्या धार्मिक इतिहासात इथल्या राजकीय कार्यकर्त्यांचा इतिहास अगदी एकमय होऊन गेला, याचं


श्रीमती व गरीबीचा वाद

कारण तरी त्या राजांची, धनिकांची व कार्य-कर्त्याची प्रजावत्सलता नि कर्तव्यदक्षताच आहे.
                       
                   आर्थिक विषमतेचं भयंकर भूत

                 समाजात जोपर्यंत ते इमान व ती पद्धति कायम होती तोपर्यंत आर्थिक विषमता आजच्याप्रमाणं उग्र रुप धरूं शकत नव्हती; साचलेला निधि हा निरनिराळ्या नावांनी समाजात खेळता राहात होता. परंतु पुढंपुढं सत्ताधीशांची दृष्टि स्वत:च्याच चैनीकडे लागली, विद्वानांनीहि फक्त दानदक्षिणा घेऊन संग्रह करण्याकडेच लक्ष ठेवलं नि त्या सर्वाच्या विलासादिकांमुळं काही ठराविक बुवापंडित व कलावंतापलिकडे इतरांना त्याचेकडून देणगीच नव्हे तर योग्य मोबदलाहि मिळेनासा झाला; किंबहुना बिगारीत फुकट काम करण्याचे प्रसंग जनतेवर आले. व्यापारकुशल लोकांनी भरमसाठ पैसा लुटला, इतकंच नव्हे तर कस्तूरीच्या भावात माती विकली; किंबहुना चक्रवाढव्याजानं व खोट्या दस्तऐवजानं सामान्य समाजाच्या दारांवरुन नांगर फिरवायलाहि कमी केलं नाही. एकेकाळी व्याजान पैसा देनं हे पाप समजलं गेलं होतं पण आता त्या दिशेनंच नव्हे तर कपटकारस्थानांनी हजारो लोक खूप श्रीमंत झाले
आणि तीर्थस्थानं, देवळं, धर्मशाळा, सदावर्त व अशाच कित्येक गोष्टीत काही पैसा खर्चन स्वत:च धार्मिक समाधान करुन घेत आले. आता तर समाजांत इतकी कमालीची विषमता, अमानुषता व अनैतिकता वाढली आहे की त्यांच्यामुळं सामान्य जनतेचं जीवन हे अगदी असह्य होऊन गेलं आहे, उपवासानं तडफडून रस्त्यारस्त्यावर लाखो माणसं मेल्याचंहि आपण पाहात आलो आहोत नि खेड्याखेड्यांतील गरीब जनता तर अगदी पिळून निघाली आहे. ही विषमता देवानं किंवा दैवानं निर्माण केली नसून ती सामान्य लोकांच्या अज्ञानानं व स्वार्थपटूंच्या राक्षसी महात्वाकांक्षेनं-धूर्तपणानं निर्माण केली आहे. सध्याची समाजरचनास त्याला कारणीभूत झाली आहे.


युगप्रभात

                  मालक व नोकरांतील तेढ अपेक्षू नका!

            जोपर्यंत मालकलोक नोकरांच्या सर्व सुखदुःखाचा विचार आपुलकीनं करीत असत तोपर्यंत नोकरहि श्रीमंताकरिता प्राण देण्याला सिद्ध होत असत. मालकासाठी स्वत:चा किंवा स्वत:च्या मुलांचा जीव अर्पण करणाऱ्या शेकडो स्वामिनिष्ठ नोकरांच्या सत्यकथा आपल्या देशांत घडलेल्या आहेत. परंतु जेव्हापासून श्रीमंतामध्ये आपल्या मालकीचा अहंकार निर्माण झाला, गरीबांना पिळून घेण्याचा आपणाला देवानंच परवाना दिला असं त्यांना वाटूं लागलं, तेव्हापासून गरीबांतहि हे श्रीमंत कोण याविषयी शंका येऊ लागली. आता तर ही तेढ इतकी विकोपास जाऊ लागली की या विषमतेची व्यवस्था त्वरित लागेल तरच उत्तम, नाहीतर हा भेद भयानक रुप धारण करुन दोघांचाहि नाश करील नि तिसऱ्याला मालकी करण्याची संधि देईल, अशी सार्थ भीती वाटत आहे. जाणकार पुढाऱ्यांनी हा वाद लवकर मिटविला नाही अथवा राष्ट्रीय सरकारनं कडे तीव्रतेनं लक्ष पुरविलं नाही तर, याचा विपर्यास मर्यादेबाहेर पाऊल टाकल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.

                  या वादाच्या निर्णयांतच राष्ट्राचं भवितव्य!

                मित्रा! मुलगा लहान असला तर बापाला वाटेल तसे प्रयत्न करून त्याची समजूत घालता येते, पण तो जर जाणता झाला तर पित्यानं बरोबरीच्या नात्यानच त्याला वागविलं पाहिजे! *प्राप्ते तु शोडषे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्* सोळावर्षानंतर मुलाकडे मित्रत्वाच्या भावनेनंच पाहिले पाहिजे. तसंच, प्रजा जर समजदार-आपले हक्क व कर्तव्य जाणणारी-होऊ लागल्याचं दिसेल तर त्या प्रजापक्षाला राजानं सुद्धा आपल्या बरोबरीचा मान द्यायलाच पाहिजे. धनाढ्य श्रीमंत हे राष्ट्रधनाने विश्वस्त आहेत- अज्ञान प्रजेचे पालनकर्ते आहेत; त्यांनी


श्रीमंती व गरीबीचा वाद

स्वत:च्या मालकी हक्काच्या खुळ्या कल्पनेनं प्रजेचा आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न करणं हा सर्वाच्याच विनाशाचा मार्ग ठरणार हे निश्चित! सर्वाना लुबाडून चक्रवर्ती होऊ पाहणाऱ्या रावण, जरासंध व कंसासारख्यांचाहि चिंधड्या उडाल्या, मग साधारण मनुष्याची काय किंमत आहे ? असा अनर्थ होण्याला वेळ नसतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे व हा जो गरीबी-श्रीमंतीचा वाद आहे तो आता सर्वांनी मिळून मिसळूनच मिटवला पाहिजे. हा वाद न मिटवणं म्हणजे राष्ट्रांतील फार मोठ्या समाजाच्या शक्तीचा रात्रंदिवस झपाट्यानं ऱ्हास होऊ देणं आहे आणि बहुजन समाजाचा -हास म्हणजेच राष्ट्राचा नाश आहे. राष्ट्राला जर अधिक बलवान, अधिक कलावान, अधिक समृद्ध व अधिक सुखी करावयाचं असेल आणि पुढील भयंकर अपघातपासून वाचवावयाचं असेल तर, आज सरकार व पुढारी याचं सर्वात महत्वाचं हेच कर्तव्य ठरतं की त्यांनी समाजाची घडी बदलून सर्वाना सुखानं जगतां येण्याची व उल्हासानं श्रम करण्याची परिस्थिती उत्पन्न करून दिली पाहिजे.यातच सर्वांची भलाई आहे ; आलं लक्षात?
      मित्रा! केवळ शब्दांनी आता जनतेच्या जीवनाचे बिकट प्रश्न सुटायचे नाहीत आणि चाळवाचाळव करुनहि लोकाचं समाधान कायम ठेवता येणार नाही. जठराग्नीच्या ज्वाला या गरीब जनतेची आहुति घेताघेता सर्वांच्या जीवनांत आग पसरवू लागतील; आजच त्याची पूर्वचिन्हं दिसू लागली आहेत. खेडोपाडी फिरुन पाहात असतां त्यात किती उदासीनता व किती हीनदीनता पसरली आहे, परस्परांबद्दल अनास्थाच नव्हे तर कशी चीड धुमसत आहे, ही गोष्ट मला दररोज दिसून येते. लोक दडपले गेले आहेत हे खरं, पण आता त्यांना सुखी न करतां असं दाबून ठेवून श्रीमतांनी शोषण करण्याचं धोरण जर चालू ठेवलं तर ते राष्ट्राच्या विनाशाला खात्रीनं कारणीभूत होईल. कारण नव्या लोकयुगाच्या प्रभातकाळी पूर्वीच्या काळोख आता अधिक वेळ टिकणं शक्यच नाही, आलं लक्षात?