९. सर्व देवाचं संमेलन
देवांत ऐक्य पण भक्तांत वैर
मित्रा! तू म्हणतोस-बरं पक्षोपपक्षांची भानगड तर समजली. पण या पंथापंथांच्या गोंधळाची आता काय गरज आहे. सांगा? अहो, जेवढ्या जाती या भारतात आहेत तेवढेच किंबहुना त्याहनहि अधिक पंथ जिकडे तिकडे वळवळत आहेत ना! शिवाय एकेक नवीन उत्पन्न होतच आहे. काय काम आहे आता या देवलंबी पंथाचं ? त्यांना जर एकत्रित आणलं तर त्यांच्या देवता खरोखरच एके ठिकाणी राहू शकणार नाहीत काय ? त्यांच्यात आपणासांत तंटे-बखेडे होऊन त्यामुळं भारतात संकट ओढवेल काय ? ठीक आहे, फार चांगला प्रश्न केलास तुवां गड्या! अरे, देव जर एकत्र बसू शकणार नाहीत, किलोड्यां करु राष्ट्राचा नाश करणं हा जर त्यांचा स्वभाव असेल, तर त्यांच्यात आणि सामान्य लोकांत फरक तो काय? कुत्र्यासारखं आपसांत भांडत राहण हा का दैवी स्वभाव म्हणतां येईल? आणि आपले देव असे एकलकोंडे व एकमेकांवर गुरगुरणारे आहेत असा समज जर त्यांच्या भक्तात असंल तर त्यांना भक्त तरी कोणी व कां म्हणावं? देवाविषयी विपरीत कल्पना रंगवून गोंधळ घालणारे तेच लोक पातकी, राष्ट्रघातकी व महान नास्तिक
समजले पाहिजेत.
मित्रा! हे सर्व पंथ देवादिकांचे नसून त्यांच्या नावांवर जगणाऱ्या पंड्यांचे, बुवांचे, बडव्याचे, त्यांच्या अंध शिष्यांचे अथवा परंपरा चालविणाऱ्या काही धूर्त लोकांचे आहेत, हे विसरु नकोस. अंधानुकरण करणारे भाविक, वर्चस्व चालविणारे पढिक नि देवांच्या
सर्व देवाचं समलन
नावांवर चालणारे व्यावहारिक असेच लोक बहुधा तुला या पंथाना उचलून धरणारे व चालविणारे आढतील. काही तत्वज्ञानी व नि:स्वार्थी लोक त्यांत असल्यास ते पंथभिन्नतेचा असला दुराग्रह अर्थातच ठेवणार नाहीत, भलताच पंथाभिमान धरणार नाहीत; पण असे लोक मिळणं फारच कठिण. ज्या देव-देवतांच्या नावांवर हे पंथ चालवतात ते देव देवसभेत एकत्रित होत असल्याचं तूं अनेक ग्रंथातून ऐकलं असशील, पण हे भिन्न पंथवाले एकत्र बसून कधीतरी सुखानं नांदले असल्याचं तू ऐकलं आहेस का? क्वचित् प्रसंगी तसं झालहि असलं तरी ते क्षणभरच. अरे, गंगेच्या स्नानाचा मान सांभाळण्यासाठी जिथं परस्परांचे खून पडतात तिथं बंधुभावनेनं ते एकत्र कसे नांदू शकतील? हरि आणि हर सीताराम नि राधेश्याम ही एकाच ईश्वराच्या विविध रुपांची नावं एकाच चित्तशुद्धीच्या उद्देशानं संतांनी जपायला सांगितली असली तरी,ती घेऊनच परस्परांची डोकी फोडण्याचं काम या सांप्रदायिकांनी असंख्य वेळां केलं आहे. दुसऱ्या पंथाचा माणूस तो माणूसच नव्हे, अशी वाईट बुद्धि त्यांच्यात घुसून बसली आहे; हे त्यांच्या संप्रदायांशी प्रत्यक्ष संबंध आला म्हणजे कोणालाहि तीव्रतेनं जाणवतं.
पंथांचा उगम झाला पण संगम कुठं आहे?
एकूण, हे पंथ म्हणजे अज्ञान व मत्सर यांनी लिडबिडलेल्या अंधपरंपरा व अनिष्ट रुढ्याच आहेत असं म्हणायला हरकत नाही, तत्व सर्वांचीच उच्च आहेत-व्यापक आहेत, पण व्यवहारांत साध्या माणुसकीलाहि स्थान नाही. वास्तविक या पंथाचे मूळ अत्यंत उच्च, पवित्र व आदर्श विचार नि आचारप्रणालीत असणार यात शंका नाही, पण सध्याचं स्वरुप हे अगदी त्याच्या उलट बनलेले आहे. त्यांचेवर काहीच नियंत्रण नसल्यामुळं हवी ती पापं त्यात राजरोस चालू आहेत. एखाद्या दिव्य पुरुषानं सर्वांना सुख व्हावे म्हणून लोकांची
युगप्रभात
सेवा करुन त्यांना त्या काळी उन्नतीचा योग्य मार्ग दाखवावा व त्यांच्या मागे राहिलेल्या लोकांनी त्यांच्या मोठेपणाचा, तत्वज्ञानाचा व धनद्रव्याचा फायदा वैयक्तिक स्वार्थबुद्धीन घेऊन शिष्यपरंपरा चालवावी, समयोचित मार्गाला सनातन पंथाचं स्वरुप द्यावं आणि शुद्ध तत्वज्ञानाची झाकली मूठ न उघडता भोळ्याभाळ्या लोकांना मागं लावून घेऊन, मूळ पुरुषाचा उपदेश घेण्याऐवजी त्यांच्या वैयक्तिक बहिरंग वागणुकीचाच गौरव वाढवावा. असाच प्रकार या सर्व पंथाबाबत झालेला आहे व त्यांनी राष्ट्राचा सत्यनाश केला आहे.
मित्रा! यापैकी एका पंथाच्या प्रवर्तकानं एकेकाळी लोकांवर महान उपकार केले आहेत तर दुसऱ्या पंथंप्रमुखानं दुसऱ्याकाळी तसेच उपकार करुन जगाला ऋणी केलेलं आहे. प्रत्येक पंथ हा एकेका काळचा जगाचं कल्याण करणारा मार्ग आहे ; अर्थात् तो दुसऱ्या वेळी निरुपयोगी ठरल्यामुळंच दुसरा पंथ उदयास आला हे उघड आहे. यावरुन हेच सिद्ध होतं की उपकार सर्वांचे आहेत पण ते सर्वकाळ मात्र नव्हते! एकेका काळी झालेले थोर थोर अनुभवी लोकनेते व सिद्धपुरुष यांच्या बहिरंग परंपरांना चालविणारे व तीच गोष्ट जगाच्या अंतापर्यंत असावी असं सांगणारे हे कर्मठ पंथभक्त उगीच लोकांची दिशाभूल व चवचिंधी निर्माण करीत आहेत. समयोचित असा दुसरा पंथ उदयास आला तेव्हाच पूर्वीच्या पंथवाद्यांनी त्यांत आपला पंथ मिळवून टाकायला हवा होता व तस झाल असत तर आज योग्य तो एकच उज्ज्वल पंथ कायम राहिला असता आणि राष्ट्राचा विनाशहि होऊ शकला नसता; परंतु या पंथाभिमान्याच्या समोर आपल्या स्वार्थसन्मानापुढं राष्ट्राची काय दशा आहे व काय
होणार हे लक्षात घेण्याची बुद्धि व इच्छाच जन्माला आलेली नसते आणि असली तरी ती आपल्या दैवताचा व पंथाचा गौरव त्या त्या परिस्थितीत कुशलतेनं वाढविण्यातच खर्ची पडत असते.
सर्व देवाचं संमेलन
राष्ट्रावरील संकट निवडणारा देव कोण?
येणाऱ्या प्रसंगाचा उपयोग अशा रीतीनं आपल्या पंथाचं वैभव वाढवण्याकडे करुन घेण चतुरपणाच लक्षण असल आणि त्यांत आपल्या आकुंचित वृत्तीच समाधान झाल तरी पर्यायानं हा आत्मनाशाचाच मार्ग असतो. प्रत्येक पंथ असा अलग अलग होऊन वेगवेगळ्या दिशेनं वाढत जाऊ लागला की जनता शतश: विभागली जाते, लोकांमधील बंधुत्व व सामुदायिकत्व लयास जातं आणि त्या बरोबरच राष्ट्र कमजोर बनून हीनदीन व पराधीन बनूं लागतं. यापासून परिणामी होणारे अनर्थ व कष्ट राष्ट्रांतील सर्व पंथाच्या लोकांनाहि अर्थात भोगावेच लागतात. मग हा एककल्लीपणा आत्मघातकी आहे असं या पंथवाद्यांना अजूनहि कळूच नये का ? हा पंथवाद बाजूस सारुन राष्ट्रधर्म जागविला पाहिजे, हे काळानं अनेकदा सिद्ध करून दाखविलं नाही का? ज्या ज्या वेळी असा राष्ट्रधर्म जागवणं आवश्यक असतं त्या त्या वेळी सर्व देव गुंडाळून सर्वांचा देव जो गुरुदेव त्याच्याच बोधान चालावं लागतं आणि त्या मूळ देवतत्वांत हे सर्व देव समर्पित होऊन जात असतात. अर्थात् तो गुरुदेव म्हणजे काही एखाद्या पंथाचा बुवा नसून त्या त्या काळी आपल्या देशाला शांति, निति व सत्याचा योग्य मार्ग दाखविणारा महान लोकसंग्राहक, जनसेवक व मार्गदर्शक गुरु नि त्याचा विश्वव्यापी देव मिळून तो गुरुदेव समजला जात असतो. उच्च तत्व व समयोचित व्यवहार यांची सांगड गुरुदेवात झालेली असल्यामुळेच तो त्या काळातील सर्वाचा एकच एक राष्ट्रदेव ठरत असतो व त्याच्या ध्वजाखाली सर्वांच कल्याण असतं.
मित्रा! श्रीकृष्णाच्या काळांत सारे देवदैवंत नि धर्मकर्म बाजुस सारुन *इद्रपूजा नि यज्ञदीक्षा गौण ठरवून, सर्व धार्मिकांना श्रीकृष्ण काय सांगतो ते ऐकावं लागलं व तेव्हाच सत्याची प्रस्थापना होऊ शकली, असं आपण ऐकतो ना? त्यावेळी पंथापंथाचा असा
युगप्रभात
थयथयाट नि देवदेवतांचा सुळसुळाट कायमच ठेवला गेला असता, बुवाबुवांत जूतीपैजार सुरुच राहिली असती, तर सर्वांच्या आधी श्रीकृष्णाचं चक्र *विनाशायच दुष्कृताम्म् * म्हणून यांच्यावरच चाललं असतं हे निर्विवाद आहे. वेष, भाषा, पांडित्य, वर्ण, पंथ असल्या गोष्टीऐवजी श्रीकृष्ण केवळ सत्य, नीति, सर्वभूतहितैषी वृत्ति यानांच महत्व देत होते व याविरुद्ध वागणारा कोणताहि आप्त, गुरु किंवा देवद्विज असला तरी त्याला शत्रु समजत होता, हे त्याचं चरित्रच आपणांस गीतावरवानं सांगत आहे.
देवता अनेक पण कार्योद्देश एकच !
मित्रा! आपणाला आवडणारी देवता श्रेष्ठ समजू नये असं माझं म्हणण नाही; पण इतर देवता ह्या त्या उपास्य देवाहून वेगळ्या आहेत असं समजणं मात्र चुकीचं आहे. एकाच ईश्वराची वेगवेगळ्या कामासाठी प्रगट झालेली अनेक रुपं आहेत, ही गोष्ट लक्षांत वेतली म्हणजे नसता गोंधळ उत्पन्नच होत नाही. दुसरं असं की नुसतं इष्ट देवतांच्या नामरुपाचं चिंतन-जपध्यान करुनच भागणार नाही तर त्यांच्या लोकसेवेच्या कार्याचा व उपदेशाचा आजच्या परिस्थितीत योग्य असा उपयोगहि आपणांस करुन घेता आला पाहिजे. *परित्राणाय साधूंना विनाशायच दुष्कृताम् * प्रमाणं सज्जनपालन, दुर्जनदंडण, सत्याची संस्थापना व सर्व जीवाचं हित हा सर्वच देवांच्या अवताराचा उद्देश आहे व तो लक्षात घेऊन आपण सर्वच जर वागू लागलो तर कोणत्याहि पंथाची दिशा वेगळी होण्याचं कारणच उरत नाही. मनुष्यसमाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणूनच सर्व सद्गुणांची भावमूर्ति बनवून आदर्श दाखल ती मनुष्यसमाजासमोर ठेवली जाते व यालाच आपण उपास्य देव म्हणतो. त्याचा बोध राष्ट्रधर्माला पोषक, मानवतेला उत्तेजक, स्वातंत्र्यरक्षणासाठी बलसंवर्धक असाच असला पाहिजे, तरच
त्याचं महत्व! या खेरीज नुसत्या परंपरा चालवायच्या म्हणून चालवीत राहणं, हा आत्मघातकी वेडेपणाच ठरणार हे निश्चित!
पंथांचे अंधभक्त हे देवांचे शत्रु!
शांततेच्या रिकाम्या काळांत लोकांच्या या उठाठेवीकडे लक्षच कोण देतो! पण त्याचे दुष्परिणाम भोगतांना मात्र ही गोष्ट जाणवल्याशिवाय राहात नाही. पंथापंथाचे तट पडत गेल्यामुळं राष्ट्राचं किती भयंकर अनहित होतं हे भारताच्या इतिहासाचं सूक्ष्मावलोकन केल्यास कोणालाहि सहज कळून येईल. लोकांत तेजस्विता, तत्वज्ञान आणि संघटितपणा कायम राहावा म्हणून निर्माण केलेल्या या पंथांना माणसाची माणुसकी, बुद्धिमत्ता व बंधुताच खाऊन टाकलेली आहे. यांचा व्यवहार व राष्ट्रध्येयाला सोडून लहरी बनला आणि परमार्थ हा सक्रियतेला पारखा होऊन शब्दातच राहिला. याचे सर्व देव व संत जातिपाती सोडून मानवतेनं सर्वांच्या घरी खात आले पण यांचा धर्म मात्र यांना आपल्या देवदेवतांप्रमाणं वागायला सांगत नाही. यांचे अवतार व नेते सत्यरक्षणासाठी लढत आले पण याचं अध्यात्मज्ञान व कर्म आडवं येतं. यांच्या महात्म्यांनी सर्वांकडे समदृष्टीनं पाहिलं व समाजातले दोष झाडून त्याला उन्नत करण्याची खटपट केली पण यांची जातीची उन्नति व पंथाची थोरवी यांना तसं करण्यात पाप आहे असा निर्वाळा देते. सत्याच्या व समाजाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या जागी देवदूतांप्रमाणं वागण्याऐवजी त्यांच्या नांमाच्या माळा फिरवण्यातच यांना धन्यता वाटते आणि ईश्वरानं निर्माण केलेल्या जीवमात्राची सेवा करण्याऐवजी सर्वांच्या भावना घडवून माणसाला माणसाचे शत्रु बनविण्यांतच ते पंथरक्षणाचं पुण्य अनुभवतात. हा भयानक देखावा असाच चालू ठेवणं म्हणजे राष्ट्राच्या पोटातलं हलाहल कायम ठेवण्यासारखं आहे...
मित्रा! देवांत भाडणं नाहीत पण त्यांच्या ढोंगी भक्तांत
मात्र त्यांचा पूर आला आहे. राम आणि शंकर हे एक एकाच्या हृदयी असले तरी त्यांची वानरसेना व भूतसेना एक व्हायला तयार नाही. ते आपापल वैशिष्ट्य गमावायला भीत आहेत; देवाचं तत्वज्ञान मातीमोल करण्याची मात्र त्यांना दिक्कत वाटत नाही. यांत सुद्धा उत्तम लोक नसतीलच असं मी कसं म्हणेन ? पण त्याचं ऐकतो कोण! अरे *जिसका ढोल बड़ा उसकी देवी सामने और जिसकी ताकत बडी उसका महन्त सामने* असं हे चाललं आहे. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या प्रमाणंच रामकृष्ण परमहंस, ज्योतिबा, दयानंद व महात्मा गांधी यासारखे महात्मे जर यांना लाभले नसते तर, मी म्हणतो, हिंदुस्थानात जेवढी मानसं तेवढेच जातिपंथ वाढून मानवतेची झुळूकहि शिल्लक राहिली नसती त्या महात्म्यांच्या मंगल कार्याला अजून पूर्ण यश आलं नाही, याचं कारण देखील या पंथाचा स्वार्थप्रेरित गोंधळच आहे. नाहीतर भारत आज उन्नतीच्या उंच शिखरावर राहिला असता. पण दुर्दैवाने या एका ध्येयाच्या महापुरुषांना तरी त्यांचे भक्त एका आसनावर बसू देतात काय ? शक्यच नाही.
देव सुज्ञ व सामर्थ्यवान आहेत काय?
वास्तविक ही भीति मानण्याचं अज्ञान व स्वार्थ याशिवाय दुसर कोणतहि कारण नाही की, देव किंवा संत-महात्मे एकत्रित आले म्हणजे त्यांच्यात झगडे होतील. *गद्धेसे गद्धा मिले तो होवे दो-दो लात* हे ठीक आहे, पण चार सज्जन एकत्र जमले तर त्यांत सुद्धा चिंतानुवाद व सुखसंवादच होईल-झगडा केव्हाहि होणार नाही, मग देवांचा झगडा कसा शक्य आहे ? आणि आपल्या भक्तांनी आपसांत झगडून राष्ट्राचं अकल्याण कराव, अस ते थोर नेते, संत व देव कस चिंतितील? त्यांच्या भक्तांनी आपल्या देवांच्याबाबत जर अस
सर्व देवाचं संमेलन
कुठ लिहिलं असल की *अमुक देवानं दुसऱ्या देवाला किंवा त्यांच्या भक्ताला शाप दिला* तर ते अगदी खोटं आहे व आपल्या पंथाची महिमा वाढविण्यासाठी नि आपल्या वैरविरोधाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी ते लिहिलं आहे, असं तू खात्रीनं समज.
तू म्हणशील की त्या देवतांचे अंगी सामर्थ्य असू शकत नाही काय? असू शकते पण ते सामर्थ्य तशा तमासगिरीकरिता खर्च होत नाही, तर त्यागी-तपस्वी देशप्रेमियांना देण्याकरिताच त्याचा उपयोग केला जातो आणि पुष्कळशा देवताचं सामर्थ्य तर केवळ पोथीतच राहिलेलं असतं नि ते प्रसादापुरतचं अनुभवास येतं. मग पुढ पाहिजे असल्यास कर्तव्यच करावयाला लावते ती देवता, समजलास? धर्मपंथ सोडायचे नाहीत, जोडायचे आहेत!
तू म्हणतोस-*मग तुमचं म्हणणं सर्वच धर्मपंथ सोडून द्यावेत असं आहे काय?* छे; माझं म्हणणं तस मुळीच नाही. उलट त्या त्या धर्मपंथाचं मूळ स्वरूप व मूळ तत्वज्ञान लक्षात घेऊन समयानुसार त्याचा उपयोग करावा असंच मला म्हणावयाचे आहे व असं झाल्यास या भिन्न पंथांच्या भिन्न दिशा राहूंच शकत नाहीत याची मला खात्री आहे. मानवसमाजाचं सर्वांगीण हित हेच तुमच्या सर्व पंथाचं ध्येय आहे, मग मानवसमाजापासून अलग राहण्यात भूषण का मानावं? आकुंचित अभिमान व जातियता हे विकार दृढ करण्यासाठी हे धर्मपंथ सुरु करण्यात आले होते की समता व बंधुता वाढविण्यासाठी? तुम्हांला आवडेल त्या पंथाचे तुम्ही असा, मला ते चालेल; पण *माणसं मारावी नि पापं करावी असं धर्मानच सांगितलं* अस खोटं-खोटं सांगू नका. तुम्ही तुमचा व इतरांनी आपापला धर्म पर सत्यतेनं पाळला तर तुम्ही तुमच्या धर्माचे असला तरी आमच्याच धर्माचे आहांत असं होईल.
युगप्रभात
मित्रा! तत्वावर आरुढ होऊन कर्तव्याच्या मैदानांत इमानान उतरल्यास सर्व पंथ एकाच भूमिकेवर येतील यात शंका नाही. एका दृष्टीनं आजहि ते सर्व समानच आहेत. रुढिग्रस्ततेनं तुमचा धर्म जसा तुम्हांला कळेनासा झाला तशाच प्रत्येकाचा धर्म त्यांना समजेनासा झाला आहे; तेव्हा *आम्ही थोर* म्हणण्यात काहीच अर्थ नाही. हे सर्वजण जर आता मूळ मुद्यावर येणार नाहीत तर या सर्वांना निसर्ग स्वत:च ठीक करणार आहे. जळत्या होमकुंडात नाना धातूंचे हे देव आपापले आकार विसरुन आपोआपच एकरस होऊन जाणार आहेत हे विसरु नकोस. सामुदायिक प्रार्थनेच्या अधिष्ठानावर भासनेनं सर्वांना एकत्र आणूनन त्यांचा कर्तव्यबोध घेण्याची आपली तयारी नसल्यास, निसर्गाच्या भट्टीत पडून तरी त्यांना एक व्हावचं लागेल. त्यालाहि आता फारसा वेळ उरलेला नाही, हे लक्षात असू दे!
नव्या युगाची उज्ज्वल किरण
मित्रा! कोणतहि नवं युग जेव्हा सुरु होतं, तेव्हा ते अकस्मात आकाशांतून पडत नाही. पूर्वीच्या परिस्थितीतून क्रमाक्रमानंच त्याचा हृदय होत असतो. आजच्या चालू युगाकडे बारीक नजरेनं पाहिलं तर आज सुद्धा उद्याच्या युगाची कोमल किरण लोकांच्या विचारांवर तरी झळकत असलेलीच दिसतील. सेवा, समता, सामुदायिकता, मानवता, लोकसत्ता इत्यादि शब्द जे आज अनेक लोकांच्या मनांत घोळतात ती नवयुगाची छायाच होय.