१०. सेवामंडळ कशासाठी?
सेवामंडळहि एक संप्रदायच नव्हे का?
तू म्हणतोस-*मग काय हो! तुम्ही देखील एक नवीन संप्रदाय का जमविला? *सेवामंडळ* हे तरी काय आहे?* मित्रा! सेवामंडळ ही लोकसेवेची एक संस्था आहे म्हणण्यापेक्षा सर्व संप्रदायांना एक करण्याची ती योजना आहे; धार्मिकतेतून खेड्यांची सर्वांगीण सुधारणा करण्याची ती एक साधना आहे. असं म्हणणंच अधिक सयुक्तिक होईल. ध्येयशून्यतेमुळं बिघडत जाणाऱ्या खेड्यातील तरुण पिढीला सात्विक शिस्तीत रंगविणं ; विविध संप्रदायांना व जातींना प्रार्थनेच्या एकासनावर संघटित करणं; स्वावलंबी जीवनाचा आदर्श पुढं ठेवून उद्योग, व्यायाम व आयुर्वेदादिकांच ज्ञान सर्वांना देणं; धार्मिकतेच्या नावांवर वाढलेल्या बलिदान, स्पर्शास्पर्श, विवाहखर्चादि अनेक अनिष्ट रुढ्यांना हाकलुन लावणं ; साक्षरता, गोरक्षण, ग्रामसफाई आदि आवश्यक गोष्टीना उत्तेजन देणं ; शुष्क ज्ञानाच्या नांवावर
प्रपंचाची व राष्ट्रसेवेची वाढलेली अनास्था घालवून सक्रिय ज्ञानाची *नि राष्ट्रीयता व मानवता यांची समाजात पेरणी करणं; अशा प्रकारची *कामं हीच आजची राष्ट्रसेवा, धर्मसेवा व देवसेवा आहे आणि अशा सेवेसाठी एकत्र आलेले लोक यालाच सेवामंडळ म्हटलं जातं विशिष्ट व्यक्ति, विशिष्ट देवता किंवा न बदलणारी अशी ठराविक आचारपद्धति यावर या मंडळाची उभारणी नाही आणि म्हणूनच याला संप्रदाय
युगप्रभात
म्हणण बरोबर होणार नाही. सर्व पंथांना एक करणारा तोहि एक पंथच या दृष्टिनं तसं कोणी म्हटलच तर उपाय नाही; परंतु यापेक्षा एखाद्या विशाल योजनेत उच्च ध्येयानं जर सर्व पंथ एकत्रित करता येतील तर त्यांत हे मंडळ सर्व प्रथम संमिलित होऊन स्वतः त्याचा पुरस्कार व प्रचार करु लागेल, समजलास ?
मानवसमाजाच्या सर्वोन्नतीच्या विशाल ध्येयास पोषक व भारतदेशाला मानवणारा असा जो मार्ग आम्हाला वाटला तोच सेवामंडळाच्या रुपानं विश्वासपूर्वक आम्ही चालविला आहे. पूज्य महात्माजीसारख्या थोरांची सुखस्वप्न व त्यांना प्रिय अशी सात्विक साधनच यांत उपयोगात आणली आहेत. हे मंडळ कोणत्याहि दृष्टिन कुणाहि कार्यकर्त्यांच्या आड न येता सत्यतेनं सेवा करुन समाजात मानवता जागृत करणार आहे व यांतील नियम मनुष्याला मनुष्यत्व देणारे, प्रसंगावधान व समयात्मक दृष्टि यासंह सेवेची दीक्षा देणारे आहेत. ही गोष्ट तुला त्याचं साहित्य व सेवावृत्त वाचतांच कळून येईल व तसं सर्वांना मोकळ्या मनानं सांगायलाहि तूं तयार होशील असा मला विश्वास वाटतो.
सेवामंडळाची इतिश्री केव्हा?
सेवामंडळामुळं राष्ट्राच्या उन्नतीत पर्यायानं किंवा प्रत्यक्षतः अडथळे निर्माण होतात, असं जर मला कुणी समजावून सांगेल तर मी हे मंडळ व याचा व्याप तेव्हाच बंद करुन टाकीन. मंडळात कोणाकडून वैयक्तिक दोष घडत असतील तर ते दुरूस्त करणारे त्यांत आहेतच; मंडळाचा उद्देश किंवा त्याची दिशाच चुकू लागली
सेवामंडळ कशासाठी?
तर ती मी स्वत:च दुरूस्त करणार आहे. मित्रा! असं असता मंडळापासून कोणाला काही अडचण उत्पन्न होणं शक्य तरी आहे काय? तथापि ज्यांना अलग काम करुन अडथळे वाटतात त्यात यात मिसळून काम करण्यांत तर केवढं आभाळ वाटेल, याचा विचारहि पण त्यांच्या मनांत येतच असेल ना? पण हे लक्षात असू दे की, विशाल ध्येयानं व सात्विक मार्गानं काम करणाऱ्या शेकडो संस्था असल्या तरी त्यांच्यापासून कोणालाच अडथळे उत्पन्न होण्याचं कारण नसतं; आणि या धारणेनच सर्व संप्रदाय संस्थानां मानवसमाजाच्या उन्नतीचं कार्य करण्यासाठी एकत्रित करणं मंडळाला आवडतं. हे पूर्ण ध्यानात ठेव की, जातीयता किंवा सांप्रदायिकता वाढवणारी ही संस्था नसून, सर्व पंथीयांना योग्य मार्गदर्शन करणारी व देशाला आवश्यक असलेल्या योजनाचं ओझं उचलून धरणारी ही संस्था आहे. जनतेलाजीवनदृष्टि देऊन सुसंस्कारी बनविणारं हे विद्यापीठ आहे. घराघरांत जीवनाला आवश्यक कार्यक्रमांची पेरणी केली की हे मंडळ आपोआपच विलीन होणार आहे अर्थात् ते सर्वव्यापी- जीवनव्यापी होण्यासाठीच जन्मास आलेलं आहे हे लक्षात असू दे!