८. पुढारी, संत व टीकाकार
आम्ही प्रगत होत आहोत की पतित?
मित्रा! तुं म्हणतोस-काय हो ! समाज तर उन्नतीच्या मार्गावर लागला म्हणतां, मग हे आपसांतील द्वेषमत्सर, ही पक्षांधता नि गटबाजी कां? ही तर इतकी वाढली की त्यामुळं सामान्य जनतेला *दे माय धरणी ठाय* झालं आहे. जवळ-जवळ प्रत्येक पुढाऱ्याची *दुसरा वर जाऊं नये व मलाच ती जागा मिळावी * म्हणून धडपड चालली आहे ; इतकंच नव्हे तर त्यासाठी वाटेल ती पापं करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली दिसते. बिचारे काही असे मोजकेच पुढारी यांतून सुटलेले असतील की ज्यांच्याबद्दल सर्वांच्या मनांत पूज्य भावना आहे. बाकी पाहिलं तर प्रत्येक जातिजातींशी, पंथपथांशी व पक्षपक्षांशी आतून-बाहेरून झगडत असलेलेच दिसून येतात. मग यांच्यामुळं देशाला शांतता कशी मिळणार नि त्याची प्रगति तरी कशी होणार?
मित्रा! एक कोणत्याहि राज्यक्रांतीची। नवी घडी बसविण्याच्या काळांत हे होतच आलं आहे. अरे! आपल्या भारताचं भाग्य समज की या पक्षभेदांचा व चढाओढींचा परिणाम आपापसांत खुनाखुनी करण्यापर्यंत गेलेला नाही. हा सर्व संताच्या पुण्याईचा व म.गांधीजींच्या संतमार्गानुरुप अहिंसात्मक शिकवणुकीचाच परिणाम आहे. पण गड्या! यापुढचं मात्र मी सांगू शकत नाही की या स्वार्थी गटबाजीची कमान जर अधिकच वाढली तर जनतेचं पाऊल कुणीकडे पडेल. त्रस्त झालेल्याचं मन कुणी ओळखावं? पण आमची ईश्वराला एवढीच प्रार्थना आहे की असे प्रकार घरच्या घरी त्यांना आम्हाला दाखवू नयेत व तशी पाळी आणणारी आडवाड आमच्या पक्षांनीहि धरु नये.
युगप्रभात
संघर्षाच्या शेवटी यशस्वी लोकशाहीचं अमृत
मित्रा! संताचा दृष्टिकोन आशावादी असतो व सृष्टीचा बागवान हा केव्हाहि झोपेत नसतो. खूप उन्हाळा तापूं लागला म्हणजे सर्वजण अशा चिंतेत असतात की आता पुढे काय होणार? पण दूरदृष्टीचा माणूस म्हणतो - *वेड्यांनो ! अरे, प्रखर उन्हाळा हा उद्याच्या भरपूर पावसाळ्याचा दूत आहे. आज चांगली तापलेली जमीन उद्या फळाफुलांनी सजणार आहे. अंधाराला कंटाळलेल्या जीवानां जागृत लोक आश्वासन देतात की - घाबरु नका. हा घनदाट अंधार मंगल अरुणोदयाची सुंदर जाहिरात आहे. त्याप्रमाणंच महापुरुष दुःखित जीवांना निर्भयपणानं सांगतात की- आजच्या आत्यंतिक दुःखदैन्याच्या पडद्यामागं पुढच्या सुखवैभवाच्या प्रवेशाची जुलवाजुळ तितक्याच वेगानं होत आहे; या पक्षापक्षांच्या भांडणांतून सेवाभावनेच्या माणुसकीचं खरं अमृत आपोआपच वर येत आहे. रवी लावणं चालू असतांना दूध, दही किंबहुना ताकहि तिथं व्यवस्थित रुपांत सापडणार
नाही; पण त्या संघर्षाच्या शेवटी लोणीसुद्धा हातात येईल हेहि तितकंच खर आहे. म्हणूनच मी म्हणतो की निराश होण्याचं काही कारण नाही.
मित्रा! जे पुढारी आज आपसात भांडतील ते आपोआपच एकमेकांची उखाळीपाखाळी काढून स्वतः खतम होतील नि जनतेला खरंखोट निवडण्याची दृष्टि देतील.या गोंधळात जनतेला कष्ट आणि धोकाहि मिळेल पण ठेचा खाऊन तरी ती शहाणपण शिकल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीचा यशस्वी आरंभ हा या क्रमाशिवाय होणंच शक्य नाही. क्षीरसागराचं मंथन करताना एकदमच अमृत हाती आलं असं थोडंच आहे ? त्यांत शंखशिंपलेच नव्हेत तर हलाहल सुद्धा हाती येणार हे स्वाभाविकच आहे. समाधानासाठी हा विचार
आवश्यक आहे; पण याचा अर्थ असा मात्र नव्हे की आपण मंथन करण्याचं सोडून दिल्यानं-प्रयत्न न केल्यानंच-अमृत मिळणार! आपणाला तर राष्ट्राची ही विशाल नौका त्याच्या ध्येयमार्गाकडेच वळवली पाहिजे. आज प्रत्येक पक्ष व प्रत्येक पुढारी आपापल्या मनोवांच्छित दिशेनं वल्हा मारतो, एक पश्चिमेकडे नेऊ पाहतो तर दुसरा पूर्वेकडे जोर लावतो, त्यामुळं ती जागच्या जागीच खिळखिळी होत आहे व या सर्व नावाड्यांची शक्तिही फुकट जात आहे. ही गोष्ट सर्वात वाईट आहे यात शंका नाही आणि म्हणूनच या सर्व पंथपक्षांना एकमुखी बनविण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
पंथ हवेत, पंथाभिमान नको!
मित्रा! पंथपक्षांची ही कुतरओढ पाहिल्यावर मात्र अनेकांना असं वाटतं की हे सर्व पक्ष मोडून टाकले पाहिजेत; पण हे मात्र खास की, हेच पक्ष किंवा हेच कार्यकर्ते पुढारी याच्यांत जातीयता व पंथाभिमानाऐवजी सत्यतेची व देशाची कळकळ जर वाढली ना, तर देशाचं भाग्य उघडलंच म्हणून समज. पुष्कळदा या पक्षोपपक्षामुळं देशाची शक्ति अधिक सुगठित होऊ शकते तसंच साधारण लोकांच्या व अन्य कार्यकर्त्यांच्या लक्षात न येणाऱ्या बाबीहि लक्षात येऊ लागतात. संत तुकाराम म्हणतच होते ना की, आमच्या मागं निदंक लोक नसते तर आमच्या चुकाहि कुणी समोर आणल्या नसत्या; अर्थात् मग त्या नाहीशा करण्याची बुद्धि तरी कशी उत्पन्न झाली असती?
संतांकडून दोष घडतात काय?
कदाचित् तूं म्हणशील की- काय हो, संताकडूनहि चुका होतात काय? मित्रा! जगांत असा प्राणी क्वचितच सापडेल की सृष्टिनियमाच्या काटेकोर न्यायाप्रमाण ज्याच्या हातून दोषच घडले
युगप्रभात
नसतील ,*निर्दोषो केवलो हरिः* हेच बरोबर आहे. प्रत्येकाच्या ठरविण्याची कसोटी ही ज्याच्या त्याच्या भूमिकेनुसार वेगळी असंणार हे खरं, तथापि सर्वसाधारणरित्या समाजदृष्टीनं पाहता थोरामोठ्या वागणुकीतहि उणीवा आढळून येतच असतात. पण असं बारीक पाहण्याचं काम सर्वांचच नसतं; खल प्रामुख्यानं तेच हुडकून काढुन लोकांपुढं मांडीत असतात आणि थोर पुरुष त्यातूनहि शिक्षणच घेतात चुका दिसुनहि न सुधारणं हा मात्र महान दोष आहे आणि वाईट काम करण्याची प्रवृत्ति ज्यानं मागं सारली व जो दोष असले तरी त्यांपासून परावृत्त होण्यासाठी धडपडत आला त्याला ईश्वराच्या दरबारांत जागा आहेच.
अशी कितीतरी उदाहरणं सापडतील की ऋषीच्या, देवांच्या पुढाऱ्यांच्या व महात्म्यांच्या हातून देखील एके काळी तरी अशी दुष्कृत्ये घडली आहेत की जनसाधारणसुद्धा एवढं धुंद पाप करुच शकणार नाहीत. पण त्यांनी आपली बाजूहि पश्चातापानं व उच्च कर्तव्यतत्पतेनं अशी दुरूस्त करुन घेतली की त्यांच्या दुष्कृत्यांना लोक मागील प्रारब्धाचा भोग समजून बाजूस टाळू लागले व त्यांनाहि ते आठवेनासं झालं. सर्व पुढाऱ्यांना संतश्रेष्ठांची ही उदाहरणं सन्मार्गावर येण्याचं आव्हान देत आहेत. नि त्याबरोबरच त्यांना जनतेच्या हृदयांत स्थान मिळण्याचं आश्वासनहि देत आहेत. *जब तू जागे तभी सबेरा*. या सूत्राप्रमाणं प्रत्येकाला नव्या युगांचे शांतिदूत आजहि बनतां येईल व आपलं नाव जनतेच्या हृदयावर कोरुन ठेवता येईल.
निश्चयी भाव आणि टाकीचे घाव
मनुष्य कितीहि पापी किंवा व्यसनी असला तरी त्यानं जर मनावर घेतलं की, ईश्वरा! आजपासून मी या मार्गाला शिवणार नाही; मला माफ कर, तर त्याचा शेवट एखाद्या असाधारण
महात्म्याप्रमाणं लागून देवाचा व देशाचा तो आवडता होऊ शकतो हे; निश्चित. पण याचा अर्थ, मी नेहमीच पाप करीन व ईश्वराला माफी मागेन असा मात्र कोणी करु नये. कारण, तो बाचटपणा होईल आणि ईश्वराची व जनतेची ही फसवणक पहिल्यापेक्षाहि अधिक भयानक फळ देईल. अस होऊ नये यासाठी विवेक नेहमी जागृत पाहिजे व त्याला जागृत ठेवण्याच्या कामी टीकाकारांचा फार उपयोग होतो. असे योग्य टीकाकार पक्षोपक्ष नसतील तर *हम करे सो कायदा* व्हायला वेळ लागणार नाही; आलं लक्षांत?
तात्पर्य हे की, तात्विक चर्चेच्या विकासाकरिता, चुकून एखादी बाजू किंवा उणीव लपून राहिल्यास तिला उजेडांत आणण्याकरिता, एखाद्या वेगळ्या साधनप्रयोगामुळं कार्य सुंदर व सुलभ होतं हे पटवून देण्याकरिता किंवा मल्लांप्रमाणं झगडत बळकट विचारांना यशस्वी करण्याकरिता तसंच एकेक बाजू सांभाळून तिचा राष्ट्राच्या प्रगतीस पोषक असा विकास करण्याकरिता पक्ष नसावेत असं माझं म्हणणं मुळीच नाही. मी तर असं सुद्धा ऐकलं आहे की काही पाश्चात्य देशांत अशा विरोधी पक्षांना तेथील सरकार मुद्दाम पगार देऊन सुद्धा आपल्या दरबारांत ठेवतं व आपल्या प्रत्येक योजनेतील दोष दाखविण्याची त्यांना संधि देतं. *निंदक नियरे राखिये आँगन कुटी छवाय* किंवा *निदकाचं घर असावं शेजारी* या संतवचनांत सुद्धा तेच मर्म आहे.
सहृदय व विधायक मतभिन्नता हवी परंतु अशा प्रकारच्या अनेक भिन्नमतवादी पक्षांत विधायक दृष्टीकोन, प्रमाणिकपण, नीतिमत्ता, लोकसंग्रहवृत्ति, जिव्हाळ्यांची जनसेवा व त्यांच्या आवाजाला थोडी तरी लोकमान्यता ही असायलाच पाहिजेत. मतभेदाला व्यक्तिद्वेषाचं किंवा सात्विक स्पर्धेला कारस्थानी
ओढाताणीचं रुप मात्र मुळीच दिलं जाऊं नये आणि खेळाडूपणाला असं जळकट आचरणहि असूं नये की खासगी जागेत एकत्र बसले असता सुद्धा एकमेकांच्या तोंडाकडे बघायलाहि कोणी तयार नाहीत ज्यांच्या-त्यांच्या मार्फतीनं अन् होईल त्या त-हेनं प्रत्येकजन परस्परांची नालस्ती करुन आपला पक्ष बळकट करण्यांतच मग्न आहे, आडमार्गानी पक्षपातीपणा टिकवण्याची ही जी वृत्ति ती शत्रुवृत्ति आहे, अन् ती देखील वीरांना शोभणारी अशी शत्रुवृत्ति नसून अत्यंत क्षुद्रस्वरुपाची-कुत्र्यांच्या भांडखोरीची वृत्ति आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण शत्रुत्वाची सुद्धा अशी उज्ज्वज उदाहरणं आपल्या प्राचीन इतिहासांत मिळण्यासारखी आहेत की, शत्रूच्या सद्गुणांची तारीफ व त्याच्या उत्तम कलाकौशल्याची वाहवा प्रत्यक्ष लढाईत सुद्धा प्रतिपक्षीय वीरांनी केलेली आहे. कर्णाच युद्धकौशल्य पाहून श्रीकृष्ण शाबास म्हणून उत्तेजन देत असल्याचं उदाहरण आपण एकतो ना?
मित्रा! शत्रुनाशाऐवजी शत्रुत्वबुद्धीचा विनाश करणं हीच ज्यांची आंतरिक इच्छा असते त्यांनाच मोकळेपणानं शत्रूमधील गुणहि पाहतां येतात; अर्थात् या उदारमतवादित्वासाठी मनुष्याला अध्यात्माची जोडच असावी लागते. पोपटाला भक्षण करण्यासाठी टपलेले मांजर त्याचा गोड आवाज व मोहक रंग पाहण्याइतक भानांवर असू शकत नाही. निष्कामपणानं मानवसमाजाचं कल्याण करु इच्छिणारा पुरुषच समतोल बुद्धीनं सर्वांकडे पाहू शकतो व जन्ममरणाचं मूळस्वरुप ओळखणारा महात्माच अपरिहार्य युद्ध हा एक खेळ समजून त्यांत सावधपणानं शत्रुपक्षाच्या गुणांचा गौरव करु शकतो. साधारण माणसांत साधी तक्रार झाली तरी ते जन्मभर परस्परांशी बोलायला, एका रस्त्यानं चचालायला किंबहुना विरोधी माणसांच्या मित्राशी सुद्धा आपुलकीनं वागायला तयार नसतात. त्यांनी एखादं चांगलं काम उभारलं असलं तरी हे जाणून बुजून त्यांत
व्यत्यच आणू पाहात असतात. अशा अल्पबुद्धि व अज्ञानी लोकांच्या विकारवशतेच्या लीलांनीच भारताचा चुथडा झाला आहे.
दुर्जनाशी कसं वागावं?
मित्रा! हे तुझं म्हणणं ठीक आहे की - काय हो! माणूसकीच्या व खिलाडू वृत्तीच्या नावाखाली आपण दुर्गुणी वाईट प्रतिस्पर्ध्याशी जर सरळ संपर्क ठेवला तर त्याला आपल्या दर्गुणाबद्दल वाईट कसं वाटेल? कदाचित् तो असंहि समजू लागेल की आपण त्याला भिऊन वागतो, अन् मग तो अधिकच शेफारुन जाईल. शास्त्रांनी तर सांगितलं आहे की दुर्जनांचा थोडा देखील सहवास माणसाला एका क्षणांत भ्रष्ठ करणारा असतो, त्यांशी संबंध जोडून ते सर्व जहर पचविण्यासाठी शंकरासारखा रामरंगी रंगलेला एखादा थोर पुरुषच असावा लागतो. हे सर्व खरं आहे बाबा! पण दुर्जन व दुर्गुणसंपन्न ही विशेषणं सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा देशसेवेचे पक्ष निर्माण करणारांना थोडीच लावतां येत असतात? अन् त्यांत जर कोणी तसे असतील तर ते जास्त दिवस थोडेच टिकू शकतात? त्यांच्यापासून अलग राहणं किंबहुना जनतेला जागृत करणं हे देखील अशा वेळी सात्विक कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं नि यासाठी अशा कार्यकर्त्यांचीहि संघटना असावीच लागते तेव्हा माझं म्हणणं असं की, पक्षोपपक्ष असायला हरकत नाही पण ते तात्विकतेवर आरुढ असावेत; द्वेषावर व स्वार्थवादावर उभारलेले नकोत. आलं लक्षात ?