भगवान श्रीकृष्ण
४. राष्ट्राची चैतन्यज्योती!
भगवान श्रीकृष्णाचे गीतेच्या रूपाने प्रगट असलेले तत्त्वज्ञान व त्यांचे जीवन हे मानवसमाजाला मिळालेले महान वरदान आहे. सर्व महात्म्यांचे प्रतिनिधी म्हणून या महापुरुषाचा आदर्श जर राष्ट्राने स्वत:पुढे ठेवला तर त्याला सुखशांती, प्रगती व विजय यांची प्राप्ती कशाही स्थितीत होणे सहज शक्य आहे असे म्हणता येईल. सुदैवाने भारत वर्षातील आबालवृद्ध स्त्री-पुरुषांना दंढारीतील खेडवळ मुलापासून तो वेदाभ्यासी पंडितापर्यंत आणि तमाशात गौळण गाणारापासून तो कीर्तनात रासलीला आळवणारापर्यंत सर्वांनाच कृष्णचरित्राची गोडी आहे; परंतु दुर्दैव असे की, त्या महामानवाचे जीवन आज एक थट्टेचा व मनोरंजनाचा विषय बनला आहे. निष्काम सेवेचा आणि तेजस्वी स्फूर्तीचा जळजळीत आदेश । मिळण्याऐवजी आळशी व विलासी जीवनाचा उपदेश आज त्यातून समाजाला मिळत आहे. राष्ट्राच्या सर्वांगात चैतन्य पसरविण्याचे सामर्थ्य |
असणाऱ्या या अमृतसागरातून आमचे उपदेशक व कीर्तनकार जहाल विषय समाजाचे अंगी भिनवीत आले आहेत. परंतु आज फिरून ही बिघडलेली घडी दुरुस्त करून त्यांचे उज्ज्वल चरित्र जर भाविक भारताच्या । अंत:करणात विशुद्धतेने जागृत केले तर राष्ट्रात नवचैतन्य व नवसामर्थ्य
पसरल्याशिवाय राहणार नाही.
परिस्थितीची पार्श्वभूम
मित्रांनो ! भगवान श्रीकृष्ण हा तुमच्यामधलाच एक गोपाल होता. त्याने गोपाल ही भूमिका आपणा सर्वांच्या उद्धारासाठीच धारण केली होती. त्याकाळी कंसाच्या आसुरी सत्तेने सारे राष्ट्र निकस व निर्बल बनवून
-------------------------------
हितबोध
टाकले होते. आपले हित कशात आहे व कोठून आपला नाश होत आहे. आपले हक्क व आपले सामर्थ्य काय आहे, हे ओळखण्याची बुद्धी कोणात उरलेली नव्हती. जे काही जाणत होते त्याच्यात मार्ग काढण्याची हिंमत नव्हती व ज्यांच्यात हिंमत होती त्यांची आपणात एकी होत नव्हती.
कोणी धडपड केलीच तर त्याच्या पायात बेडी किंवा मस्तकावर गदा पडत होती, त्यामुळे राष्ट्रातले बहुतेक बुद्धिमान लोक स्वत:पुरते पाहुन कंसाच्या राज्ययंत्राचे घटक-अधिकारी बनून जीवन जगत होते. सर्वसामान्य समाजाला कोणीच वाली उरला नव्हता. गावातले दहीदूध
व लोणी गावच्या मुलांना न देता ते साचवून कंसाच्या राजधानीत नेऊन विकावे व कसेतरी जीवन जगावे अशी खेड्यांची स्थिती झाल्याने त्यातील नवी पिढी अगदी दुबळी बनली होती. कोणीही विद्वान त्या खेड्तांना शिक्षण देत नसल्याने त्यांच्यात अनेक अनिष्ट चालीरीती शिरल्या होत्या.
बापाला बंदिगृहात टाकून राज्य बळकावून बसलेल्या त्या कंसाची आसुरी राजवट ज्याना पसंत नव्हती अशांना बेमुर्वतखोरपणे जेलमध्ये डांबून टाकण्यात येत होते व त्यांची मुले मारून टाकण्यासही तो कमी करीत नव्हता. अशा भयानक परिस्थितीत बंदीगृहातील वसुदेव-देवकीच्या
पोटी श्रावण वद्य अष्टमी अर्थात् गोकळ अष्टमीच्या दिवशी भगवान गोपालकृण्णाचा जन्म झाला आणि त्याच दिवसापासून कंसाच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी त्याला गोकुळात नंद-यशोदेच्या सहवासात वाढावे
लागेल. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांतूनही लोकोद्वाराची दिशाच दिसून येत होती.
--------------------------------
हितबोध
चरित्र ते विचारावे, केले देवे गोकुळी
दैवी शक्तीचे पुरुष झाले तरी तेही काही जादुटोणा करून परिस्थिती पालटून टाकीत नाहीत. ते लोकांच्याच हातून कार्य करून घेतात आणि । तेही विशेषतः अशा लोकांच्या हातून की जे मनाने शुद्ध आहेत; जे कोणत्याही पक्ष किंवा पंथाच्या अभिमानाने किंवा स्वार्थ व सत्तालोलुपतेने भारलेले नाहीत. ज्यांच्या हृदयकागदावर कोणताही लेख लिहिला गेला
नाही अशांनाच ते विशेषकरून हाताशी धरतात. सुशिक्षितात बहुधा झब्बूचे राजे होण्याची इच्छा करणारेच फार, सेवेची निष्ठा असणारे अगदी थोडे ते आज एकाचे आहेत तर उद्या दुसऱ्याचे! ही गोष्ट जाणूनच शिवाजीन मावळे हाताशी धरले. यात आणखीही एक उद्देश हा असतो की ज्यांची उन्नती करावयाची आहे त्यांच्याचकडून ती करून घेतली
म्हणजे ती दृढमूल होते; त्या कार्यातच त्या जनतेचा योग्य तसा विकास होत जातो. जनतेला आपल्या कर्तव्याची व सामर्थ्यांची जाणीव झाल्याने राष्ट्र बलवान बनत जाते. याच दृष्टीने भगवान श्रीकृष्णाने समाजाच्या खालच्या थरात प्रवेश करून, त्या काळच्या गोपालन करणाऱ्या बहजन
समाजात घुसून, पेद्या-सुदाम्याशी प्रेम संपादन केले. त्यांच्याप्रमाणेच राहणी व खाणेपिणे ठेवून आणि स्वतः गायी वळवून त्यांनी जनतेत प्रेमसंघटन निर्माण केले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाणे, प्रेमाने दहीलोणी विकणाऱ्या बायांकडून लोणी घेवून मुलांना वाटून देणे, रानातील हिंसक घोडे-सर्प निर्भयपणे मारून दाखवून मुलांना धैर्य देणे,
निरनिराळे शिस्तीचे व टिपन्यांचे खेळ करून मुलामुलींचा शक्तिविकास करणे, इंद्रपूजेची प्रथा, नग्न होऊन गंगेत स्नान करण्याची चाल इत्यादी अनेक अनिष्ट बनलेल्या रिवाजात बदल घडवून आणणे, ह्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाने बालपणीच केल्या. समाजाच्या जीवनाशी कसे समरस व्हावे
------------------------------
व त्यात कसे कुशलतेने परिवर्तन घडवून आणावे याची शिकवण देणारे श्रीकृष्णाचे हे बालजीवन मोठमोठ्या पुढाऱ्यांनीही अवश्य अभ्यासक इतक्या मोलाचे आहे.
काला म्हणजे समाजोन्नतिचे माध्यम!
कार्य होते ते केव्हाही त्याचा कैफ चढल्याशिवाय होत नाही. श्रीकृष्णाने गोपी-गोपाळात एक नशा निर्माण केली होती; त्यांना श्रीकृष्णाच्या शब्दापुढे सारे जग तुच्छ वाटत होते; आणि म्हणूनच एकही ग्रंथ न पढता त्याना अस कार्य करून दाखविले की पुराणे भाट होऊन आजवर त्यांची कीर्ती गात आहेत. रामाने वानरहाती लंका घेतली आणि श्रीकृष्णाने कंसाच्या क्रूर राजवटीला अनपढ मुलामुलींच्या हाताने खिळखिळे केले. अडाण्यातल्या अडाणी लोकांकडून पाहिजे ते कार्य करून देण्यात त्या महापुरुषांची महान दैवीशक्ती, विचित्र मोहिनी विद्या कारणीभूत होती असे म्हणावे लागते. त्यांनी त्यावेळच्या धर्मगुरु म्हणवणान्या विद्वानांची भूमिका तपासून पाहिली. त्यांना दिसून आले की अग्नीत अन्नाचे ढीग जाळण्यातच त्यांना धर्म वाटतो. उपवासाने तडफणाऱ्या गोपालांना एक शीत द्यायला देखील ते तयार नाही आणि
ज्या स्त्रियांना उध्दाराचा एकही मार्ग किंवा समाजात काहीच अधिकार ठेवलेला नव्हता अशा स्त्रिया मात्र सहदयतेने उपवासी मुलांसाठी ताटे सजवून आणीत आहेत; प्रेमाचे दोन शब्द ऐकताच गरीब- गौळणी मुलांना दही, दूध, लोणी वाटीत आहेत. खरी मानवता त्यांना या दलित समाजातच दिसून आली व त्या ओलाव्याचा आधार घेऊन त्यावरच
भगवान श्रीकृष्णाने नव्या राष्ट्राची निर्मिती केली.
श्रीकृष्णाने काल्याच्या निमित्ताने त्यावेळच्या समाजास एकसूत्रातओवले, त्यांच्यात बंधुत्व निर्माण केले. जातिभेदाला महत्व न देता
--------------------------------
हितबोध
गुणकर्माचा उत्कर्ष करून सर्वांना कर्तव्याची दीक्षा दिली आणि जे कोणत्याच कामाचे नाहीत असे दिसले त्यांनाच अस्पृश्य ठरविले. श्रीकृष्णाचा काला म्हणजे खरेखुरे समाजदर्शन व प्रेम-संघटन होते. आज वेदांती त्याला आत्मा व वृत्त्यांचे मीलन म्हणतील, भक्त केवळ देवाचा प्रसाद मानतील आणि सुशिक्षित साधे सहभोजन समजतील.
परंतु कृष्णाने सर्वांच्या शिदोऱ्यामधून प्रत्येकांच्या घरची परिस्थिती लक्षात आणली, त्यांच्या दूर दूर गलल्या मनांची मिळवणी केली आणि सर्वानी । सारखे खावे-प्यावे, पुढान्यांनीही जनतेच्या जीवनात मिसळून जावे ही
शिकवणही त्यातून दिली. स्टेजवर व्याख्यान देतांना गरिबांची स्थिती वर्णन डोळ्यात अश्रू आणावेत आणि तेथून उतरताच मिष्टान्नाची पार्टी झोडावी, असल पुढारीपण श्रीकृष्णाचे नव्हते. त्यामुळेच त्याला अपूर्व कार्य करता आले.
ही चोरी की विकेंद्रीकरण
आपण ऐकतो की श्रीकृष्णाने चोरी केली. ज्याच्या घरी नऊ लाख गायी होत्या असे सांगण्यात येते, कमीत कमी नऊशे तरी असतीलच, कारण तो काळ गायीगुरावरून धन अजमावण्याचा होता व नंद राजा तेथील सर्वांत अधिक धनाढ्य होता; अशा श्रीमंताच्या लाडक्या पुत्रावर चोरीची पाळी का यावी? काय त्या सर्व गायी वांझोट्या होत्या? कृष्णाला प्रेमाने लोणी देणारे गावच्या मुलांच्या जीवनाची हेळसांड करीत व त्यांना घोटभर दूध द्यायलाही तयार नसत. अशावेळी त्यांना प्रेमाने आव्हान देवून त्यांचे मथुरेस नेण्यासाठी साचवलेले दहीलोणी चोरून मुलांना वाटून देणे भाग पडते होते. उद्याच्या राष्ट्राची ही मुले निर्जीव होऊ देऊ
नका. मुलांची जर हाडे दिसू द्याल, त्यांना जर सटवी लागू द्याल तर लक्षात ठेवा, जबरीने तुमची हांडकी-मडकी फोडून टाकीन असा
--------------------------------
हितबोध
कृष्णाचा त्यांना रोकडा सवाल होता. त्या माखनचोराच्या अशा कृतीत जे पावित्र्य होते त्यावर गोपीगोपाळ लुब्ध होते, ही गोष्ट त्यांनी यशोदाजवळ केलेल्या गर्हान्या तूनही दिसून येते. तसेच दुसऱ्याच्या घरचे लोणी कृष्णाने वाटले नाही तर स्वत:चे लोणीही लुटून दिले होते, हे लक्षात
ठेवा!
आज त्या श्रीकृष्णाच्या काल्याचे आणि त्याच्या चोरीचे रसाळ भाषेत गोडवे गाणारे व ऐकणारे भक्त समाजात कमी नाहीत; पण मुखे वाची ज्ञानेश्वरी । दारी भिकाऱ्यासी मारी अशी त्यांची स्थिती आहे.
समाजात सामुदायिकता, समता, बंधुता व मानवता निर्माण करण्याचे रहस्य त्यातून कोणीही घ्यायला तयार नाहीत. श्रीकृष्णाच्या या लीलातील या समाजसेवेचा वसमतेचा आदेश जर कृष्णभक्त म्हणवणाऱ्या आमच्या बुद्धिवंतांनी, बलवानांनी आणि धनाढ्यांनी घेतला तर आज भारतात आनंदवनभुवन नांदू लागेल हे निश्चित!
गोपालकृष्ण हृदयात प्रगटू द्या!
मित्रांनो ! राष्ट्राच्या उत्कर्षासाठी दीन बनलेल्या समाजात मिसळून त्यांच्यात नवे जीवन निर्माण करणे, हीच भक्ती भगवान श्रीकृष्णाने आपणास घेण्यास लायक बनवण्याबरोबरच त्याने जनतेला स्वराज्य मिळवून दिले आणि स्वत:च्या सामर्थ्याने प्राप्त केलेल्या राज्याचा स्वतः
उपभोग न घेता सज्जनांच्या हाती सोपवून आपले जीवन लोकसेवेत खर्चकेले. या मनमोहन श्रीकृष्णाच्या आदेशाप्रमाणेच पूज्य महात्मा मोहनदास गांधीजींनी आपले जीवन सेवामय करून आपल्याकडे आदर्श उजळून ठेवला. या महापुरुषाच्या आदर्शानुकूल आमचे सर्व पुढारी व जनता जर निरपेक्ष सेवाबुद्धीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतील तर रामराज्याची आणि सत्ययुगाची आजच सरुवात होईल यात शंका नाही.
--------------------------------
हितबोध
भगवान श्रीकृष्णाच्या नुसत्या कथा वाचून उपयोग नाही, श्रीकृष्णाला आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. पुराणे काय पाहता? सारे जगच एक महापुराण आहे. डोळे लावून भक्ती करू नका; उघड्या डोळ्याने हे विश्वरूप पाहून त्याच्या सेवेसाठी तयार व्हा; जगात मतामतांचा गलबला होऊन सामान्य समाज भांबावला आहे; स्वार्थांधांच्या लीलांनी
लोक विटून गेले आहेत, बोकोबा लाल पडले आहेत आणि सोन्यासारखी मुले मातीत मिळत आहेत. अशा स्थितीत जुने कागदांचे तुकडे पाहण्यात काय अर्थ? जगाची परिस्थिती पाहून व आपल्या राष्ट्रदेवतांना स्मरून आता सामान्य जनतेला जागृत व निर्भय करून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य
आहे.
त्रियोवैश्यस्तथा शूद्रास्तेऽपियान्ति परांगतिम् असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून स्त्रियाशूद्रादिकांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाच्या आदर्शानुसार, सर्व मागासलेल्यांना व दडपलेल्यांना उठवून आपल्या न्याय्य स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यास समर्थ करणे, या कार्याइतके
श्रेष्ठ पुण्यकार्य या वेळी दुसरे कोणतेच नाही. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयात संचरून आपला जमाना फिरून निर्माण करो व गो-पालकांना गोपाल होण्याची स्फूर्ती देऊन आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने संसार स्वर्गरूप करो, हीच माझी त्यांचे चरणी प्रार्थना आहे.
--------------------------------
हितबोध