१२. शास्त्रांचा समन्वय
तू म्हणतोस - काय हो! शास्त्रा-शास्त्रांत एवढे मतभेद का व्हावेत ? एक शास्त्र सांगत की सौंदर्य हे मायेचे लक्षण आहे. तर दुसरे म्हणते की ते ईश्वराचीच एक विभूति आहे. एक शास्त्र लोकसेवा शिकविते तर दुसरे लोकांपासून दूर राहायला सांगते. एक ग्रंथ म्हणतो एकादशी करा तर दुसरा म्हणतो तिची गरज नाही. एक प्रयत्न करण्याचा आदेश देतो आणि दुसरा म्हणतो व्हायचे आपोआपच होते.
हा गोंधळ आहे तरी काय?
मतभिन्नतेचे मौलिक कारण
मित्रा! हे प्रत्यक्ष शास्त्र म्हणजे एकेकाच्या बुद्धीने लावलेल्या शोधांचा व घेतलेल्या अनुभवांचा संग्रह आहे. सर्वांचा अनुभव सारखाच असता तर सर्वांमिळून हा गोंधळ कां केला असे म्हणता आले असते, पण तसे मुळीच नाही. एका वस्तूबद्दल सर्वांच एकसारखे मत सुद्धा क्वचितच दिसते. इंद्रधनुष्यात रंग किती तर कुणी म्हणेल सात, कुणी म्हणेल तीन नि कुणी म्हणेल मुळांत एकाचाच हा विस्तार आहे; आणि सूक्ष्म विचार करणारा पुरुष म्हणेल की या सर्वांचंच , म्हणणे बरोबर आहे. हत्तीच्या तोंडी द्यावयाचा रोडगा हा एखाद्या लहान मुलाला देतांना फारच चुरगळून द्यावा लागतो, तसेच काही शास्त्रांनी अधिकारभेद लक्षात घेऊन एका तिळाचे अनेक तुकडे
पाडले तर त्यात नवल काय? आणखी हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे की प्रत्येक शास्त्रकाराची प्रवृत्ति, परिस्थिति, शक्ती आणि पोच काही सारखीच राहणे शक्य नाही; त्यामुळे भेद निर्माण होणे साहजिकच आहे. हे ग्रंथकार म्हणजे त्या त्या काळांतील पुढारी, त्या त्या
शास्त्रांचा समन्वय
परिस्थितीत वाढलेले विद्वान होत. आपल्या वेळची बहिरंग संस्कृति, बाहेरील चालचलन ज्या पद्धतीची होती, तिला अनुसरूनच त्यांनी नियम, योजना व साधन निश्चित केली आणि त्यांपासून त्या काळांत त्यांनी वैयक्तिक व सामाजिक लाभही मिळाला असेल. पण परिस्थिति जसजशी बदलते तसतसा या सर्व नियम व साधनादिकांत बदल करावाच लागतो; आणि त्याप्रमाणेच त्या त्या वेळच्या स्मृतिकारांनी, विद्वान पंडितांनी ग्रंथरचना करणे स्वाभाविक असते. पोषाख, साधने व शास्त्रहि अशा रीतीने वारंवार बदलत जातात.
सनातरी, सुधारक व संत
आजपर्यंत लाखो वेळा शास्त्र बदलली; मंदिर, पंथ वं देवदेवता यांत बदल होत गेला. अशा रीतीने अनेक प्रकारचे निर्माण झालेले ग्रंथ लोकांनी पूर्वजांची ठेव समजून संग्रहित करुन ठेवले व सांप्रदायिक लोकांनी त्यांचे महत्व राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाबरोबर ग्रंथ बदलले पण मागच्या ग्रंथाच महत्व मात्र अधिकच समजण्यात येऊ लागले आणि त्यामुळे सनातनी व सुधारणावादी लोकांत फार अंतर पडत गेले. जूने ग्रंथपंथ कायम ठेवून त्यांत नव्या पथमतांची भर टाकीत गेल्याने भेदाच साम्राज्य सर्वत्र वाढले. हे भेद समाजाच्या संघटितपणाला व उन्नतीला नाशक न होता पोषक व्हावेत म्हणून, संतानी सर्वांमधून सारतत्व उचलून वेळोवेळी त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला व त्यामुळंच समाज आजवर टिकून राहिला आहे.
काळ बदलला की साधनं बदललीच!
आज काळांत फारच बदल झाला आहे, राजसत्ताहि बदलली आहे आणि साऱ्या जगांतील राष्ट्र जवळ आली आहेत. जीवनाला अगदी निराळंच स्वरुप येण्याचा हा काळ आहे. अशा वेळी सर्व
युगप्रभात
ग्रंथातील शुद्ध तत्वं तेवढीच घेऊन काळानुरूप साधनसामुग्रीची व बाकीच्या सर्व नव्या योजनांची जोड सर्वांमिळून देणं आवश्यक आहे. आज जर कोणी देवपाट समोर ठेवून व त्यापुढे आरती उजळून देशा सुधारणेचा मार्ग सांगू लागेल किंवा अंगाला भस्मबिस्म फासून म्हणेल की - मित्रांनो ! लोकशाही हीच राष्ट्राला सुखी करण्याला समर्थ आहे. पण त्यासाठी लोकांत विचारशक्ति व राष्ट्राच्या जबाबदारीची जाणीव वाढविली पाहिजे. तर लोक त्याला हसू लागतील नि ओरडून सांगतील की - "अहो, हे काय चालवलं आहे तुम्ही? ही सांप्रदायिकता आता पुरे करा! ज्यांना कळतं ते असे तात्विक दृष्टिनं म्हणतील नि उथळ विचाराचे लोक टवाळीच्या दृष्टीनं ओरडतील. असे लोक फारच क्वचित् मिळतील की जे त्यांतूनहि सारतत्वच घेऊ लागतील नि म्हणतील की -अरे त्याचा तो पंथ असेल तर असू देत ; आपणाला तर लोकशाहिचं तत्वच सांगत आहे ना तो? पण असे विचार अर्थात् एखाद्याच्याच मनांत येतील; कारण हा काळच निराळ्या साधनांची अपेक्षा करणारा आहे. आरतीऐवजी चरखा घेऊन तोच मनुष्य जर व्याख्यान देऊ लागला तर त्याच्या बरोबर काही लोक झटू आपली टकळी काढून सूत कातू लागतील, हा सध्याचा काल महिमा आहे व असाच महिमा त्या त्या काळांत वेगवेगळ्या साधनांचा गाजत आला आहे.
आपणाला जर या काळांत राहावयाचं आहे तर आजच्या पुढाऱ्यांनी व लोकनेत्यांनी जी साधनं आपणांस दिली असतील तीच घेउन आपणांस आपलं व राष्ट्राचं जीवन उन्नत केलं पाहिजे. तेच शस्त्र घेतले पाहिजे आज आपण की जे महान विरोधी शक्तिसमोर श्रेष्ठांनी यशस्वी करुन दाखविले असेल; तेच उपास्य ठरविले पार की ज्याच्या सेवेसाठी प्रामाणिक पुढाऱ्यांची अंत:करण तिळतिळ तुटत असतील नि तेच वस्त्र वापरलं पाहिजे की राष्ट्राध्यक्ष ज्याचा
शास्त्रांचा समन्वय
आदेश देतील. असेच जर सर्व लोक वागू लागतील तर मतभेद होण्याला वावच राहणार नाही आणि मागच्या काळांतील शास्त्र आज अडथळाहि करणार नाही.
अतरेको बहिर्नाना
मित्रा! शास्त्रांचे मतभेद तत्वत: बाधक होण्यास काहीच कारण नाही, हे आता तुला कळलंच असेल. शास्त्रापेक्षा स्वार्थ नि अहंकार हेच मतभेद बळकट करुन गोंधळ माजवायला कारणीभूत होतात ही गोष्ट ध्यानांत असूं दे. एरव्ही, मागच्या किंवा आजच्या शास्त्रांत तूं असं कुठं वाचले आहे काय की - असत्य बोलणे हाच आमचा नियम आहे, विश्वासघात करणेच आमचा कायदा आहे नि मनुष्यमात्राशी सरळ व वागणेच आमचा पंथ आहे म्हणून ? मला तरी तसे कुठे आढले नाही आणि तसे असणे शक्यहि नाही. काही स्वार्थी लोकांनी ऐश्वर्यशाली भारतात आपला स्वार्थ साधण्यासाठी तंत्रादिकांच्या व व्रतादिकांच्या नावांनी तशा प्रकारचा गोंधळ घातला असला तर तो कोणाच्याहि विवेक बुद्धीला पटेल असं मला वाटत नाही आणि अशा गोष्टी तारतम्य दृष्टीनेच जाणून घेण्याची जरुरी आहे, समजलास? .
मित्रा! सर्वसामान्य व सर्व शास्त्रग्रंथानां प्रिय असं तत्व हेच आहे की मनुष्याने मनुष्यमात्राला किंबहुना जीवनमात्राला सुख दिले पाहिजे, सेवाभाव वाढविला पाहिजे, राष्ट्रहिताला पोषक अशीच कृत्ये केली पाहिजेत आणि नेहमी सत्यतेच्या नियमांनीच वागले पाहिजे. याप्रमाणे सर्वांत अशीच मुख्य तत्वे आढळतील नि देश कालपात्त्रभेदामुळे व अनुभवाच्या वेगवेगळ्या साधनांमुळे त्यांचे बाह्यवेष बदललेले दिसून येतील. तत्वं केव्हाच जुनी व टाकावू होत नसतात, परंतु बहिरंगात मात्र सारखा बदल होत असतो व कारणंहि आवश्यकच असते. आज तर सर्वच ग्रंथापंथामधील बहिरंग भाग मागे पडत आहे
युगप्रभात
व त्यांच्या ढिगाऱ्यातून तात्विक मानवधर्माचा सूर्य नव्या समाजरचनेची दिशा उजळीत हळूहळू वर येत आहे. आजचा धर्म म्हणजे मानवधर्म आहे, ज्यांचे स्वरुप गांधीधर्माच्या नावाने प्रगट झालेले आहे. जनसेवा हीच खरी देवसेवा व देशांत जी उणीव असेल ती भरून काढणारी साधनसमुग्री उपलब्ध करणे हीच आजची देवपूजा! हेच पूर्वीच्या लोकांनी देखील केले आहे. त्यांना त्यावेळच्या राष्ट्रांत या गोष्टीची जरुरी होती त्या गोष्टी त्यांनी उपासनेच्या पद्धतीत गोवून टाकून साध्य केल्या; त्याप्रमाणंच आजची साधने स्वीकारुन आपणांस राष्ट्रांची सेवा केली पाहिजे व त्याच मध्यबिंदुत ग्रंथाचे मतभेद विलीन केले पाहिजेत.