१३. संतवचनांतील सुसंगति

       मित्रा! तू विचारलेस की- विद्वानांच्या शास्त्राचे एक असू द्या; पण संतांची भूमिका तर सत्यस्थापनेची अन् समन्वयाचीच असते ना? परंतु त्यांच्या वचनांत तरी परस्पर ताळमेळ कुठे दिसतो? काळानुसार बदल होतो हे ठीक आहे; एकाच संतांच्या दोन संताच्या विचारसणीतहि परिस्थिति व अनुभवभेदामुळे फरक राहूं शकेल हेहि मान्य आहे; पण एकाच संतांच्या दोन वचनांत आकाशपातळाचे अंतर असावे याला कारण काय? संत तुकारामाचेच उदाहरण घ्या. एकदा ते म्हणतात- सद्गुरुवाचूनि सापडेना सोय। धरावे ते पाय आधी आधी आणि दुसऱ्या अभंगात तेच म्हणतात की नलगे साधूचा शेजार । फुटे प्रेमाचा पाझर।। संतांच्या संगती न करावा वास।। एकदा प्रपंचात परमार्थ साधत नाही म्हणून जो संत निर्वाळा देतो तोच दुसरे वेळी दोन्ही एकसाथ साधण्याचा मार्ग सुचवितो; अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मग असा हा
 
                विषमता नको पण विविधता हवी!

     मित्रा! शास्त्र आणि संत यांच्या शब्दाभेदांचे कारण सारखेच आहे. वरपंग शास्त्र ज्याप्रमाणे काळाबरोबर बदलते त्याप्रमाणेच संतांचे बोलहि अधिकारानुसार बदलत असतात. अवस्थापरत्वे ज्याला संतसंगतीची जरुरी असेल त्याला त्या मार्गाने जायला ते सांगतात नि ज्याला तत्वबोध झाला असेल त्याला संतसंगतीपेक्षा आत्मसंगतीचाच ते उपदेश करतात. संसारात सार साधण्याची कला सुद्धा ते असेच अधिकार भेदानुसार सांगत असतात. असं तर होणारच आहे की. शाळा म्हटली की वेगवेगळे वर्ग पडणार नि वर्ग पडले की अभ्यासात


युगप्रभात

वर्गवारी करावीच लागणार! गोंधळ वाटतो तो दोन भूमिकांवरील उपदेश एकाच मापानं मतांना. पायरी-पायरीने जिथले वचन तिथे जुळवले की मग या सर्वं वचनात एकसूत्रता आहे ही गोष्टच अनुभवास येते. प्रकृतिभेद लक्षात न घेता सर्वांना एकच औषध देतो म्हटल तर कसे चालेल ? संताच्या उपदेशाचे व राष्ट्राच्या जबाबदारीचंहि असेच आहे. ज्यांना हृदयांतील कळकळ व बुद्धीची कर्तबगारी त्याच्या सामर्थ्याबरोबर वाढली असेल त्याला सेनानायक व्हावे लागेल. एकाला सेवक होऊन राहावे लागेल तर दुसऱ्याला अधिकारवृद्धीबरोबरच राष्ट्राध्यक्षाचाहि सन्मान मिळेल.      
       मित्रा! तुझ्या म्हणण्याचा अर्थ जर संत, सैनिक, बुद्धिमान व बुद्धिहीन सर्व एकाच दर्जाचे समजले जावेत नि त्यांना सारखाच उपदेश करण्यात यावा असा असेल, तर तो बरोबर होणार नाही. सर्वांची सर्वतोपरी एकता-साम्यता, ही एक तर प्रलयकाळीच शक्य आहे अथवा दुसरे म्हणजे सृष्टि ज्याला देवरूप दिसली त्यालाच तसा प्रत्यय येणार आहे. तो देखील आत्मदृष्टीनेच तसा पाहू शकेल पण व्यवहारात तर त्याला सुद्धा प्रत्येकाच्या अधिकारवृत्तीप्रमाणेच प्रत्येकाचे महत्व समजावे लागेल; कारण सृष्टीचा उपजत सर्वाचे सुखदुःख समजावे व प्रत्येक मनुष्यास सारख्या किंमतीचे लेखावे, उंचनीचपणाचा भेदभाव हा अमंगळ आहे, हा संताचा उपदेश सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे. पण त्याचा अर्थ मोठ्या माणसाचे ओझे लहान मुलाच्या मानेवर द्यावे असा नाही. व्यवहारातून विषमता घालवायची असली तरी विविधता घालवतां येत नाही; उंचनीचपणाचा भाव नाहीसा करावयाचा असला तरी अधिकारभेद नष्ट होऊ शकत नाही. आलं लक्षात ?
                  ही नैसर्गिक भेदाची गोष्ट ध्यानात घेऊनच संतांनी म्हटले आहे की-"भेद ईश्वर करुनि गेला। तो यांच्या वाचेनि न वचे


संतवचनांतील सुसंगति

मोडिला। मुखी जो घास घातला। तो अपानद्वारी घालावा। - (समर्थ रामदास)

                       समता रक्षून पात्रतेची पूजा

             तू म्हणतोस - असं जर आहे तर मग ब्राह्मण व हरिजन आणि गरीब व श्रीमंत एक कसे होऊ शकतील?  मित्रा! अरे जन्मतांच का कोणी उंचनीचपणाचा शिक्का मारुन येत असतो? अमुक घराण्यांत वाईट लोक निपजतच नाहीत व अमुक घराण्यांत चांगले लोक जन्मास येतच नाहीत असा काही निसर्ग चालू आहे काय ? ज्याच्या हातांत ग्रंथ अन् पंथ आहेत त्यांनी आम्ही काही केले तरी उच्च व तुम्ही कितीहि चांगले वागले तरी नीच असाच जर कायदा सुरु केला, तर तो ईश्वरी नियम म्हणता येईल का? ब्रह्मबंस रावण तो लिखो गयो राक्षसोमें, क्षत्रीबंस कौशिक कहायो ब्रह्मजाति है। याचा अर्थ हाच आहे ना की, जो ज्या अधिकाराचा असेल त्याला ती ती किंमत मिळाली पाहिजे ? जन्मजात उच्चनीचता किंवा धनवैभवाची थोरवी हे निसर्गाने दिलेले सर्टिफिकेट नसून, मानवांनी आपल्या काही हेतूंनी समाजाला लावलेल्या वळणाचा हा परिणाम आहे. अत्यंत गरीब नि श्रीमंत होणे हा सुद्धा ईश्वरी नियम नाही; ही समाजरचनेची विकृती आहे. ही घटना समाज बदलूँहि शकतो व वाढवूहि शकतो; पण निसर्गाचे नियम हे निसर्गालाच बदलतां येतील. केवळ एखादी व्यक्ति त्यांत बदल करु शकणार नाही, युगायुगाने केव्हातरी लोक संघटित भावनेने त्यात बदल घडवून आणूं शकतील व त्याला दैवी शक्तीचीच जरुर लागेल. पण गरीबी-श्रीमंती किंवा जन्मत:च उच्चनीच समजण्याची प्रवृत्ति यांत समाज स्वत:च बदल करु शकतो व नैसर्गिक समतेचा आणि योग्यताभेदाचा नियम अंमलात आणूं शकतो; साधुसंतांनी हा नियम


युगप्रभात

समाजांत रुढ करण्याचाच त्या त्या वेळी प्रयत्न केला; कारण या नियमाशिवाय समाजांत शांतता प्रस्थापित होऊच शकत नसते, समजलास? 
         संतांनी समतेची दृष्टि ठेवूनच विविध अधिकारांच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश केला आणि त्यांना एकाच मानवतेच्या धर्माने प्राप्त करण्याची खटपट केली. त्यांच्या उपदेशांत पात्रभेदानुसार बदल दिसत असला तरी आतील अभेदाचे सूत्र सर्वत्र कायम आहे आणि ते लक्षात घेऊन त्यांच्या वचनांचा अर्थ लावला म्हणजे सर्वांचा समन्वय साधला जाऊन गोंधळ अजिबात नाहीसा होतो. संताच्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ या अभेद-सुत्रावर जर विचार पूर्वक आजच्या व्यवहाराची रचना केली तर सर्वत्र सुखशांतीचे साम्राज्य नांदल्याशिवाय राहणार नाही; हे पूर्ण लक्षात ठेव.