१४. जागतिक युद्ध व गांधीवादी

      मित्रा! जगांत शांतता नांदावी आणि सर्वांनी परस्पराशी आपुलकीने वागून आपली व आपल्या राष्ट्राची प्रगति करण्याचा प्रयत्न करावा, हे रम्य सुखस्वप्नच आजपर्यंत सर्व महात्म्यांनी आपल्या दृष्टीपुढे ठेवले आणि त्याला प्रत्यक्षात आणण्याचा सतत प्रयत्न केला, ही गोष्ट तुला साऱ्या संतमहापुरुषांचा इतिहास ओरडून सांगेल. हे उघड उघड सर्वांना कळत असतां देखील लोक त्याच महापुरुषांच्या नांवावर दुही माजवीत आहेत, आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळे गट पाडीत आहेत व त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून इतरांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत ही केवढी आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट आहे ! मुखमे रामनाम और बगलमें छुरी या प्रमाण मुखांत शांतिपाठ व हातांत अॅटंबॉम्ब अशी सध्या जगाची प्रवृत्ती बनली आहे, त्यामुळेच त्या महापुरुषाचे सुखस्वप्न प्रत्यक्षात उतरतांना दिसत नाही; सारे जग वारंवार अंतर्बाह्य युद्धाच्या आगीत होरपळत आहे. 
    
                      युद्धाचा सिद्धांत अटल आहे काय?

    तू म्हणतोस- काय हो! सर्व काही बदलू शकतं, मग जगांतील युद्धाचा सिद्धांतच कां बदलत नाही? देशादेशांतील ही युद्ध बंद होत नाहीत? अरे बाबा! त्याला देखील उपाय आहेत. देशांतील ही युद्ध बंद व्हावीत असं जितक्या अधिक लोकांना मनापासून वाटू लागेल तितक्या अधिक प्रमाणांत युद्धाची प्रवृत्ति मंदावत जाईल हे लक्षात ठेव. सध्या तर सर्वच राष्ट्र युद्ध टाळण्याची भाषा वापरताहेत. पण दुसरीकडे पाहावे तर सर्वांचीच युद्धसामुग्री, सैन्य व नवनवे शोध वाढविण्याची तयारीचालू आहे. विधायक दृष्टीने राष्ट्र सुसंस्कृत व बळकट


युगप्रभात 

करण्याऐवजी या अमानुषतेच्या मार्गावर राष्ट्रांची जास्तीत जास्त संपत्ति  सतत खर्ची पडत आहे . याचाच अर्थ असा आहे की युद्धाचा वीट अजून या लोकांना आलेला नाही सामान्य जनता या प्रवृत्तीला कंटाळली आहे पण थोरामोठ्यांना जगाच्या या ओघांतून फुटून निघवत नाही. महात्मा गांधी हाच एक महापुरुष अलिकडच्या काळांत या युद्धप्रवाहांतून कसे बाहेर पडावे याचा यशस्वी मार्ग दाखवून देणारा झाला आहे. अक्रोधेन  जयेत्क्रोधः या सिद्धांतानुसार अहिंसात्मक मार्गानी मोठ्यांत मोठी हिंसक शक्ति कशी जिंकावी, याचा त्यांनी आपल्या जीवनांत प्रयोग करुन दाखवून जगाला एक सुरक्षित दिशा दर्शविली आहे आणि आपल्या अहिंसाशस्त्रानं महान साम्राज्य शक्तिस थरारून सोडून इतिहासालाहि कलाटणी दिली आहे. पूज्य महात्माजींच्या या ध्येयधोरणानुसार आजच्या जगातील मोठमोठ्या नेत्यांनी जर पाऊल टाकल तर सारे जग सुखशांतीचा अनुभव घेऊ लागेल हे लक्षात ठेव ! 

                  विश्वशांतीचे सुखस्वप्न अमूर्त का ? 

            मित्रा! युद्ध हा स्वार्थी व विकारी भावनांचा स्फोट आहे   मनुष्याच्या क्रोधाच्या मुळाशी जसा अतृप्त लोभ असतो तसाच राष्ट्राच्या पुढाऱ्यांच्या मनांतील महालोभ या युद्धाच्या पाठीशी आहे दुसऱ्या देशांतील लोकांच्या मानवतेने  सुखदुःखाचा विचार न करण्याच्या, प्रवृत्तीचा क्षोभ झाला की स्वार्थबुद्धि अन्याय्य मार्गांनी बोकाळू लागते आणि तिचे दुष्परिणाम माणुसकीसहित स्वत:ला व दुसऱ्यालाहि नष्ट करण्याकडे होत असतात. राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रांच्या चालकांचा स्वार्थ व गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला हाय हाय करीत भोगावे लागतात. ही प्रवृत्ति बदलण्याचे मुख्य साधन मानवतेची संस्कृति वाढवणे हेच असू शकते व त्याप्रमाणे मानवता, बंधुता, समता आदि


जागतिक युद्ध व गांधीवादी 

भावनांचा विकास करणारे महापुरुषहि जगाच्या पाठीवर वेळोवेळी येतच असतात. पण साऱ्या विश्वात वजन मिळवून त्याला सरळा मार्गावर आणण्यासाठी त्यांना मिळणारा वेळ हा अपुरा असतो. सामान्य जनतेची बुद्धिमत्ता ही आपले परंपरागत संस्कार बाजूस सारुन त्यांची विचारप्रणाली ग्रहण करण्यास तितकी समर्थ नसते आणि स्वार्थी धेंडांना त्यांची ही विचारसरणी स्वत:च्या अहिताची वाटल्यामुळे हे त्यांचा छळ व विरोध आणि जनतेची दिशाभूल करण्यांत वेळ घालवीत असतात; असंच म्हणावे लागते. महापुरुषांच्या या अपूर्ण प्रयत्नाला त्याच दिशेने चालना देऊन जर त्यापुढच्या पुढाऱ्यांनी कार्य केले तर जगाचे रुप पालटायला मुळीच वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव. 

                      जगाला स्वर्गतुल्य करता येईल ! 

               मित्रा ! सदभावनांची वाढ, स्वार्थबुद्धीची योग्य मर्यादा व विचारश्तीचा विकास याशिवाय जगांतील युद्ध बंद करण्याचा दुसरा मार्गच असू शकत नाही. अनपढ लोकांत उठल्यासुटल्या निकराची भांडणे होतात; त्या मानाने सुशिक्षित लोकांत भांडणाचे प्रमाण कमी असते. हेच सुशिक्षित जर आपल्या बुद्धीला मानव्यतेची दीक्षा देतील तर देशांत सहसा झगडेच होणार नाहीत. प्रत्येक राष्ट्र जर याप्रमाणे मानवता आणि सहकारवृत्ति, बंधुत्व आणि सेवाबुद्धि यांनी रंगून जाईल तर जगांत युद्ध होण्याचे कारणच उरणार नाही. जगाला सहृदय आणि समजूतदार करणे हाच जागतिक युद्ध नष्ट करण्याचा यशस्वी मार्ग आहे व त्या दृष्टीनेच सगळी राष्ट्रे प्रामाणिकपणाने लोकांना शिक्षण देण्यात जर योग्य खर्च करु लागतील तर युद्धांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाहून अधिक खर्च येईल असे मला वाटत नाही. उलट मानवसमाजाची सारखी प्रगति होऊ लागेल आणि सर्वांगीण विकासाच्या अनेक योजना यशस्वी करुन दाखविता येतील; सर्वत्र 


युगप्रभात 

आबादी नांदू लागेल . 

                गांधीविचारशाळा व विश्वशांतीसाधना 

            या शिक्षणाची शाळा म्हणजे पूज्य महात्मा गांधीजींच्या विचारसरणीची शाळा होय. पण दुर्दैवाने त्यांनी चालविलेल्या संस्थान देखील असेच अनेक लोक दिसून येतात की सगळा जन्म त्यांच्या सहवासांत घालवूनहि त्यांची बुद्धि मात्र त्यांत रंगलेली नाही. त्यामुळे त्यांच्या संस्थांतहि त्याच भानगडी दिसतील, ज्या अन्य संस्थांत व राष्ट्रांत दिसून येतात. याचा अर्थ असा मात्र होत नाही की गांधीजींची विचारधाराच याला जबाबदार आहे म्हणून. हा तर ज्यांच्या त्यांच्या कमकुवत विचारांचा व असंस्कारी स्वभावांचा तमाशा आहे आणि त्यावरून एवढाच बोध घेता येण्यासारखा आहे की जगाच्या चालू विचारप्रवाहातून सुरक्षितपणे बाजूस घेऊन जगाचा विचारप्रवाहच शांतिपथाकडे वळविण्याची खटपट करणे हे सोपे काम नाही. थोडेसे लोक त्या दिशेने प्रयत्न करु लागले तर उलट जगाच्या संस्कारप्रवाहाचा पगडा त्यांच्यावर बसणेहि काही अशक्य नाही. त्यासाठी संघटितपणानेच ही लाट उठवून द्यायला पाहिजे . 
      दोन प्रतिस्पर्धी जेव्हा परस्पराचे ध्येयधोरण व सुखदुःख लक्षात घेऊन मानव्यदर्शन करतात तेव्हा त्यांचा झगडा सहजतेनं व समाधानाने मिटतो. हाच नियम राष्ट्रांनाहि लागू आहे. विश्वव्यापी बुद्धीचे व आत्मवत् प्रेमाचे शिक्षण दिले तरच राष्ट्रांचे तीव्र मतभेद नाहीसे होतील आणि युद्ध खरोखर बंद पडतील. सध्या युध्दबंदीचा जो प्रयत्न चालू आहे तो म्हणजे, एकाने शिरजोर होऊन बळी तो कान पिळी या न्यायाने दुसऱ्याला दाबून टाकण्याचा क्षण भंगुर प्रयोग होय. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आजचे राष्ट्र दलित उद्या वर येणारच आणि युद्ध बंद होण्याऐवजी त्याला रंग चढत जाणारच हे उघडत आहे. 


जागतिक युद्ध व गांधीवादी 

कायमच्या युद्धबंदीऐवजी युद्धाच्या तयारीला पुन:पुन: आव्हान देण्याचा व आपल्याच शोधांनी आपला नाश करुन घेण्याचा हा प्रकार आहे. जंग मालवतेचे शिक्षण घेऊन व आपल्या महत्वाकांक्षेला मर्यादा घालून मानवी शोधांनी मानवसमाजाला नवनवी सुखे मिळवून देण्याच्या बुद्धीचा जर विकास करील तरच युद्ध बंद पडून सर्वांना सुखाने नांदता येईल. जगाची मर्यादित सुखे आपणांसच मिळावीत या महत्वाकांक्षेने सर्वांना व स्वत:लाहि त्राहि त्राहि करुन सोडणे हा मूर्खपणा आहे. त्याऐवजी त्याच आपल्या शोधांनी अधिक सुखे निर्माण करून सर्वांबरोबर गुण्यागोविंदाने त्यांचा उपभोग घेणे हेच खरे शहाणपण होय आणि याच्या वाढीमुळेच युद्धबंदी यशस्वी होणार आहे ; समजलास ? 
 
                       गांधीवादच श्रेष्ठ कां ? 

       मित्रा ! तुझा हा प्रश्न रास्तच आहे की- काय हो ! तुम्ही म्हणता याला गांधीजीचीच शाळा पाहिजे. गांधीजीपूर्वी याची शाळा नव्हती असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? रामाने, कृष्णाने, गौतमबुद्धाने, येशूख्रिस्ताने, भगवान महावीराने किंवा मोठमोठ्या संतांनी असे विचार जगापुढे मांडले नव्हते की काय ? केवढाले प्रभावी देव न् ऋषी जगाच्या पाठीवर प्रेमशांतीच्या गंगा वाहवून गेले; काय त्यांनी असे सांगितलेच नसेल म्हणता ? मग जेव्हातेव्हा गांधीजीच्या शाळेचेच नाव तुम्ही कां काढतां ? काशिविश्व विद्यालया सारख्या मोठमोठ्या शाळाचे अन् संस्कृत वेदशाळाचे नाव तुम्ही का घेत नाही ? 
      मित्रा ! गांधीजींची शाळा म्हणत असतांना इतर शाळांचा निषेध मला त्यांत करावयाचा आहे असा अर्थ चुकूनहि काढूं नकोस. माझ्या वरील विचारसरणीला पोषक असणाऱ्या जितक्या शाळा, जितके ग्रंथ आणि ज्या विचारप्रणाली तुला आढळतील त्या सर्वांचा 


युगप्रभात 

समावेश गांधीविचारशाळा या एका शब्दांतच मी सन्मानपूर्वक केला आहे. असे तु खात्रीने समज. अस असता मग मी गांधीविचारशाला हाच शब्द का वापरावा, असे तुझे म्हणणे आहे. हे म्हणणे असे आहे की, एखाद्याने फार पुरातन काळाचे टपोर बी जपून ठेवावे अन् म्हणावे की- काय हो ! जर बीजच पेरावयाचे आहे तर माझ्या जवळचे शंभर वर्षापूर्वीचे बी तुम्ही कां नाही पेरीत ? त्याला उत्तर हेच आहे की, अरे बाबा ! त्या बियाचेच तर हे आजच्या काळातले अगदी ताजे स्वरुप आहे ! त्या पुरातन बीजांतील सर्व आवश्यक द्रव्य यांत आली आहेत; उलट यांत जितकी अधिक शक्ती आज विद्यमान आहे तितकी त्यांत राहिलेली नाही. अनेक ऋतुंचे आघात सोसून ते निस्सत्व झाले असणेच अधिक संभवनीय आहे. आजच्या वातावरणाशी समरस होण्याची शक्ती ही आजच्या बीजातच अधिक असणार हे उघड आहे . 
        मित्रा मागील अवतारी महापुरुषांच्या व ऋषीच्या सर्वपूज्य विचाराचे जे स्वरुप तेच गांधीतत्वज्ञानाचे स्वरुप आहे, किंबहुना डाग लागलेले सोने गाळून शुद्ध करावे त्याप्रमाणे, मागील देवऋषीमुनींच्या शुद्ध मतांना लागलेल्या संप्रदायभिन्नता, जातीयता, त्या त्या काळची प्रासंगिक व्यवस्था यांच्या कलकाना दूर सारुन त्यांतील शुद्ध स्वरुपाचा समयास उचित असा अविष्कार गांधी तत्वज्ञानांत उतरला आहे. म्हणूनच मी म्हणतो की, पूज्य गांधीजींच्या विचारसरणीचेच शिक्षण भारताला नव्हे तर जगांतील सर्व राष्ट्रांना पाहिजे आहे आणि असे करण्यातच भारताचे ध्येयपूर्ति कल्याण व विश्वशांतीची आहे. 
                  गांधीविचारांचा संप्रदाय बनवू नका ! 
        कदाचित् आपल्या वाढत्या गरजा व धावता जागतिक व्यवहार यांचा त्यांच्या एखाद्या विचाराशी मेळ बसवीत असतां, कालगतीने ही स्थिती बदलून एखाद्या नवीन घटनेत व वेगळ्या युगपुरुषांतहि भारताला आपला प्रवाह मिळवून टाकून सहभागी व्हावे लागेल हे अशक्य नाही. 


जागतिक युद्ध व गांधीवादी 

गांधीविचारसरणी ही आकुंचित नसल्यामुळे निकटच्या भविष्यकाळांत तिची कास सोडण्याची वस्तुत : आवश्यकता नाही. परंतु आपली मते अज्ञानवश किंवा विकारवश भरमसाठपणे गांधीविचारांत गोवून गांधीबाजी निर्माण करणाऱ्या काही त्यांच्या भोवतालीन लोकांमुळे गांधीविचारांची एक ठराविक पोलादी चौकट झाल्यास, तिचा भेद करण्यांत येऊन नवा प्रवाह सुरु होणारच हे निसर्गसिद्ध आहे. मागे देखील वेळोवेळी असेच होत आले आहे. 
       मित्रा ! मानवसमाजाचा इतिहास तुला हेच सांगेल की, समाजाला वेळोवेळी आपले स्थान सोडून त्या त्या काळच्या जीवंत वृत्तीच्या व जागृत दृष्टीच्या पुरुषामागे जावे लागले आहे आणि जी जनता तशी गेली तिनच आपले कल्याण करुन घेतले आहे. असा आजच्या युगाचा अगदी जवळचा महापुरुष महात्मा गांधीच आहे ; अर्थात् मागील सर्व थोर थोर ऋषिसंतांचा व देवदेवतांचा अंतर्भाव या महात्म्याच्या  विचारमूर्तीत झालेला आहे आणि त्यांची विचारसरणी भारतातील घराघरांत पोहोचली व राष्ट्रांनी स्विकारली तरच नवे सुखशांतीचे नि उच्च प्रगतीचे युग सर्वत्र सुरु होणार आहे हे निश्चित !