सामुदायिक प्रार्थनेचे हृदय आणि उपांगे
(उत्तरार्ध)
सेवामंडळाचा सर्वांगीण विकास
देवश्रये खेळ मांडियेला ऐसा। नाही कोणी दिशा वर्जियेली।। - संत तुकाराम
ग्रामीण संस्कृतीची मंगल प्रभात
भारतातील बहुसंख्य जनता खेड्या-खेड्यातून राहत असून शिक्षण, स्वच्छता, शिस्त इत्यादि बाबीत ती अत्यंत मागासलेली आहे आणि संघटनेच्या दृष्टीने सर्वत्र गोंधळ माजलेला दिसत आहे. आमच्या
राष्ट्राची उन्नति किंवा धर्माचे पुनरूज्जीवन करावयाचे तर जनतेच्या आचारविचारांत सुधारणा केल्याशिवाय गत्यंतर नाही. सेवामंडळा ने या धोरणाने सुरु केलेल्या कार्याची दिशा पुढे देण्यात येत आहे.
आरोग्याच्या दृष्टिने शरीर, कपडेलत्ते व घरेदारे ही स्वच्छ ठेवण्याची जेवढी आवश्यकता आहे, तेवढीच ती संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्याचीहि आहे. केवळ आपल्या घरादारापुरताच विचार करणे हे अस्वच्छ मनाचेच लक्षण आहे. गाव हेहि एक शरीर असून त्याला मधुनमधुन स्वच्छ करीत गेले पाहिजे याची जाणीव सर्वांना होणे अगत्याचे आहे. परमार्थदृष्याहि अंतर्बाह्य शुचित्वाचे अत्यंत महत्व आहे. हे सर्व लक्षात घेऊन गावांची स्वच्छता करण्याचे कार्यहि मंडळाने अंगीकारले आहे. वास्तविक आपले गाव स्वच्छ राहावे व लोकात उल्हास आणि प्रसन्नता नांदावी म्हणून, तसेच सर्वांत परस्पर-बंधुभाव निर्माण व्हावा, राहणीत टापटीप कळावी, कोणतेहि कार्य सर्वांनी मिळून-मिसळून कल म्हणजे त्यास किती महत्व व सौंदर्य प्राप्त होते याची जाणीव सर्वांना व्हावी, परस्परांच्या उत्तेजनाने हाने व अहमभूमिकेने सर्वांनी
आपापली घरे सुंदर ठेवावी आणि त्यांचे दश्य सामुदायिकरीत्या आपल्या.गावच्या लोकांच्या नजरेस आणावे-अर्थात हे सौंदर्य आम्ही.अगमेहनतीनेच कसे निर्माण करु शकतो याचा सक्रीय आत्मविश्वास
त्याच्यात जागृत रहावा म्हणून आपल्या पूर्वजांनी नगर-प्रदक्षिणे चा नियम लावलेला होता व तो अजूनहि क्षेत्राचे ठिकाणी गावी नैमित्तिक प्रसंगी चालू असल्याचे दिसून येत.पण त्यातील तत्वयोजना लोक विसरून गेल्यामुळे ते आवश्यक कार्य दिसत आहे आणि म्हणूनच सेवामंडळा ने रामधुन हे नाव त्याचा पुनरुद्वार करण्याचे कार्य सुरु केले आहे.
सर्व रस्ते स्वच्छ, समार्जित आणि रांगोळ्यानी युक्त झाले असून त्यावरुन भजने गात गात शिस्तीने चालणारे ते उत्साही सेवक पाहताच गावात एकप्रकारे नवचैतन्य संचरू लागते आणि लोकांना आपल्या सामुदायिक कर्तव्याची व ग्रामसेवेची जाणीव होते. असे अनेक लोक आपला अनुभव सांगतात की शेकडो रुपये खर्चुनहि आमची गावगल्ली जेवढी दुरूस्त झाली नसती तेवढी या रामधून च्या उत्साह निर्मितीने झाली असून गावास नंदनवनाची शोभा येऊ लागली आहे!
त्यांचे हे आनंदोद्वार लोकात उल्हास निर्माण करीत असून हजारो गावे त्या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि हिंदुजनतेप्रमाणेच मुसलमानबंधु देखील त्यात सहमत होत आहेत.
सामुदायिक प्रार्थनेची विशालता व उपयोगिता
बंधूनो! या रामधून च्या अत्यंत गोड व उपयुक्त कार्यक्रमा प्रमाणेच कितीतरी जीवनोपयोगी असे महत्वाचे कार्यक्रम सेवामंडळात योजिले गेले आहेत. त्यातील सामुदायिक प्रार्थने चे सामान्यस्वरूप
पुढीलप्रमाणे आहे.
आजच्या कालमानाचा विचार करिता आपणाला भिन्नभिन्न संप्रदाय व स्पृश्यास्पृश्यता ठेवून भागणार नाही हे लक्षात घेऊन, आज आपण या गोष्टीला समन्वयाच्या साचात आणलेच पाहिजे या हेतून, तसेच सर्वांच्या थोरपणाला मान देऊन त्या सर्वांचे आदर्श आपल्यासमोर ठेवण्याकरिता म्हणून, सर्वांनी एकत्र होऊन सर्व थोरांना व देवांना प्रार्थनेच्या अधिष्ठानी बसवून त्यांची प्रार्थना करणे अगत्याचे. आहे. आणि अशा
तत्त्वावच सामुदायिक प्रार्थना आधारलेली आहे.
या प्रार्थनेत अनेक संप्रदायाचा समावेश-त्यातील महापुरुषांच्या वचनांच्या रुपाने-करुन घेतलेला आहे. भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे श्लोक, आरती, प्रार्थनाष्टक स्तुति, समर्थ रामदासांचे करुणापर श्लोक, श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान आणि वेळोवेळी
निरनिराळ्या देवतांचे नामस्मरण यांचा व स्वतःच्या नि विश्वाच्या हितार्थ करण्यात येणाऱ्या ध्यानाचाहि अन्तर्भाव प्रार्थनेत होतो. प्रार्थनेच्या शेवटी प्रार्थनेचे तत्वज्ञान व प्रार्थनेची आवश्यकता या विषयावर सेवामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून अथवा त्याच्या मर्यादा ओळखून असणाऱ्या तज्ज्ञांकडून गोड नि गंभीर भावनेत चार शब्द सांगितले जातात व वैदिक शांतिपाठानंतर सूचक सेवक सर्वांकडून उत्साहवर्धक जयघोष करवून घेतो. या सामुदायिक प्रार्थनेचा परिणाम इतका व्यापक, गंभीर आणि उत्कृष्ट होतो की, लोकांना सामाजिक शांति कशी असते याचे ज्ञान होऊ लागते. चार लोकात बसतांना व उपासना करतांना किती गंभीरतेची नि शिस्तीची आवश्यकता आहे याचा सक्रियपाठ मिळतो आणि जीवनाच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्याचा प्रार्थनेशी काय संबंध आहे हे अनुभवयास येते. सामदायिक वृत्ति, शिस्त, परस्पर-प्रेम, शांतता एकतानता, उत्साह आणि ज्ञानविकास या दृष्टीने सामुदायिक प्रार्थना हे सक्रिय शिक्षणाचे केंद्र म्हणणे अधिक समर्पक होईल!
सामुदायिक प्रार्थनेचे विराट दर्शन
सामुदायिक प्रार्थना कशी असते आणि ती मोठ्या समुदायात तेवढ्याच गंभीरतेने कशी होऊ शकते हे बघण्याच्या हेतूने, बुलढाणा (वऱ्हाड) जिल्ह्यातील युरोपियन जिल्हाधिकारी (डी.सी.) व मुसलमान धर्मीय कप्तान (डी.सी.पी.) हे एकदा मजकडे आले. ते नुसते भेटीला आल असावेत या भावनेने मी त्यांना म्हणालो- ही माझी प्रार्थनेची वेळ
आहे. तेव्हा ते म्हणाले महाराज ! क्या हम भी प्रार्थना देख सकते म्हणालो-अवश्य ! परंतु नंतर आपणास भजनासहि यावयाचे है? मी म्हणालो- अवश्य !परंतु नंतर आपणास भाजनासही यावयाचे
आहे तेव्हा आपण पाच - दहा मिनिटे बाजूला थांबून निघून जाऊ शकता ; अर्थात तेव्हा मात्र मी आपणास भेटू शकणार नाही .त्यांनी कबूल केले व त्याप्रमाणे त्यांना बाजूला बसविण्यात आले . सरासरी २० हजार लोकांची अत्यंत गंभीरतेने व शिस्तीने चाललेली प्रार्थना नि भोवताल संरक्षक स्वयंसेवकांची ती सुंदर योजना बघून त्यांचे मनावर असा गंभीर परिणाम झाला की ते सर्व आपोआपच प्रार्थनेला उभे राहिले आणि प्रार्थना संपेपर्यंत ( अर्थात सव्वा तास ) तेथून जाऊच शकले नाहीत .
प्रार्थना संपल्यावर मी जेव्हा त्यांना घेऊन जाऊ लागलो तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले - हमको तो यहाँ चर्चकी याद हो आयी और मालूम होने लगा कि हमारीही प्रार्थना है ! कप्तान म्हणाले महाराज ! बडी ताज्जुबकी बात है ! यहाँ तो बिलकुल नमाजकाही रंग छाया हआ नजर आया । एक हिंदु ऑफीसर म्हणाले - नही जी ! सभी पाठ तो हमारे हिन्दुधर्मकाही था । तेव्हा मी म्हणालो - बंधूनो ! ईश्वराच्या प्रेमाला का कुठे धर्म आणि देशाच्या मर्यादा असतात ? ईश्वर - प्रेमाची हाक वास्तविक एकाच स्वरुपाची आहे . मग तिच्यावर कोणत्याहि धर्माचा शिक्का मारा अथवा कोणत्याहि शब्दांचे अलंकार चढवा . हिंदुस्थानातच नव्हे तर अखिल विश्वात देखील या एकाच भूमिकेवर ऐक्य घडविण्यात आले तर मतामतांचा गलबला आणि परस्परद्वेष नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही . ही प्रार्थनापद्धति काढण्यात तरी माझा दसरा हेतु काय आहे ? यापासून मला एकच गोष्ट साधावयाची आहे की भारतवर्षांतील सर्व संप्रदायांच्या लोकांनी एके ठिकाणी येऊन प्रार्थना करावी व आपणामध्ये बंधुभाव निर्माण करुन घ्यावा ; तसेच जगातील हे सर्वांच्या उन्नतिकरिताच असून ते देशकालाच्या भिन्न भिन्न रिवाजांमळे वेगवेगळ्या नियमानी सपन्न केलेले दिसत आहेत . वस्तुतः त्यांचा पाया सत्यतत्वावरच आधारलेला आहे , हे सर्वांना कळून यावे जगात हि वृत्ती नांदू लागेल तो दिवस कलियुगाचा अंत करुन सत्ययुगाचा आरंभ करणारा ठरेल आणि त्याच्या उदयाचा प्रयत्न करण्याचेच कार्य मी आपल्या लोकांच्या प्रेमाच्या आधारे स्वीकारलेले आहे . माझा हा
उद्देश आपणहि लक्षात ठेवावा आणि आपल्या अधिकारी लोकांनाहि कळवावा हीच माझी अपेक्षा आहे .
चिरंतन तत्वांचा समयोचित अविष्कार
प्रिय सज्जनांनो ! वरील विवेचनावरुन आपल्याला प्रार्थनेच्या महत्वपर्ण योजनेची व ती आजच्या समाजाकरिता किती आवश्यक आहे याची काहीशी कल्पना आलीच असे. वेदांतील सामूहिक प्रार्थना किंवा ऋषिकालीन सामुदायिकं मंत्रानुष्ठान व संतकालीन सामुदायिक भजन - संकीर्तन यापासून ही योजना अगदीच वेगळी किंवा नवीन आहे असे काही आपणाला दिसुन येणार नाही ; परंतु पूर्वी चालत आलेला पण मधल्या काळाने लोपवून टाकलेला हा योग फिरुन देशकालविचारास दृष्टीसमोर ठेवून चालू करण्यात आला आहे हे मात्र आपणास लक्षात घ्यावे लागेल . आमच्या साप्रदायिक लोकांनी या आवश्यक अशा महत्वाच्या गोष्टीची तत्वदृष्ट्या व कार्यदृष्ट्या हेळसांड केली असून सर्वांगीण उन्नतीवर त्याचा महान विपरीत परिणाम घडून आला आहे , हे जाणूनच मूळच्या उच्च प्रथेस उचलून धरण्याचा प्रयत्न मी सुरु केला आहे . यातील देव आणि धर्म काही नवा आहे असे नाही ; संतमहंतांनी निश्चित करुन ठेवलेली जुनीच तत्वे यात गोवलेली आहेत . एवढेच की प्रसंगमान पाहून आणि त्यांची पूर्वप्रमाणे शोधीत न बसता आत्मविश्वासाने निर्धारित करुनच ती उपयोजिली आहेत तथापि तज्ज्ञाकडून त्यावर - भरपूर प्रमाणे मिळू लागली आहेत .
सामुदायिक प्रार्थने ची गोड कार्यप्रणाली आज हजारो खेड्यातून सुरु आहे . अर्थात ती प्रार्थना केवळ आठवड्यातून एक दिवसच घेण्यात येत नसुन बहतेक गावी दररोज नियमितपणे तो कार्यक्रम करण्यात येतो आणि गुरुवारी सायंकाळी प्रशस्त मैदानात त्याची योजना कली जाते . या सामुदायिक प्रार्थनेचा सर्वत्र प्रचार व क्षेत्रविस्तार होण्यात संस्कृतीचे पुनरुज्जीवन व भारताचा भाग्योदय यांची बीजे साठविली आहेत असा आत्मविश्वास अनेकांना वाटू लागला आहे.
श्रीगुरुदेव उद्योग - मंदिर
बंधनो ! येथवर आपण रामधुन व सामुदायिक प्रार्थना या दोनच गोष्टीचे ओझरते दर्शन घेतलेले आहे , परंतु सेवामंडळ म्हणजे दोनच गोष्टीचे कार्यकेंद्र नसून संस्कृती व संघटितपणाबरोबर जीवनोपयोगी इतर गोष्टीचाहि समावेश त्यात पूर्णपणे केलेला आढळेल . प्रार्थना हि कार्यनिवृत्ती बनविणारी नसून आपल्या कर्तव्यात सौंदर्य , पावित्र जोम आणणारी आहेआणि जीवनाच्या दृष्टीने प्रार्थनेला उद्योगाची जोड देणे आवश्यकच आहे हे जाणून , प्रार्थनाप्रेमी लोकांना जीवनोपयोगी उद्योगधंदे शिकविण्याची व्यवस्थाहि त्यात केलेली आहे . ग्रामीण सुखी करावयाचे तर तेथील उद्योगांची वाढ करून लोकांना स्वावलंबी आणि उद्योगशील बनवणे अगत्याचे आहे . म्हणूनच ज्या गावी रामधून किंवा सामुदायिक प्रार्थना पद्धतशीरपणे घेतली जाते त्या गावी उपक्रम सुरु करण्यात येतो की , तेथील लोकांनी फावल्यावेळी आपल्या घरी सूत कातून तेथे उघडण्यात आलेल्या श्रीगुरुदेव उद्योगमंत्र या विभागातून आपले कपडे विणून घ्यावेत .
श्रीगुरुदेव उद्योग - मंदिरा मध्ये कापड विणून देणे , लोकांचे सूत विकत घेणे , तसेच घोंगडी , नेवार , गुंड्या चटया , स्वेटर मफ्लर , कानटोप्या , सतरंज्या , ब्लँकेट्स व खेळणी वगैरे वस्तु तयार करून आणि इतरांना तसे शिकवून सर्व लोकांना उद्योगतत्पर बनविने इत्यादि गोष्टी केल्या जातात . त्या गावातील सामान्य मजूर सुद्धा उत्तम सूत कातून विकू लागतो अथवा आपले कपडे तयार करुन घेतो कित्येक ठिकाणी तेलघाण्याहि चालविल्या जातात .
धर्मार्थ औषधालयाची योजना
उद्योग व्यवस्थितपणे सुरु झाले आहेत अशा गांवी श्रीगुरुदेव धर्मार्थ औषधालय उघडले जाऊन आयुर्वेदाची व त्याद्वारे गरीब जनतेची सेवा केली जाते . अर्थात तेथील स्थानिक सेवामंडळातील काहि सेवकांनाच आरोग्य व वैद्यकविषयक शिक्षण देण्यात येऊन ग्रामसेवेस
तत्पर बनविले जातेआणि त्या गावच्या मानाने आवश्यक तेवढी आयुवैदिक औषधे तयार करून दिली जातात . फार मोठ्या आजाराची सोय जरी करता आली नाही तरी सामान्य आजार , साथीचे रोग वगैरेवर पारीणा मकारक ठरतील अशी बहुगुणी पण अल्पमोली औषधे देण्यात येवून ठरलेल्या वेळी त्या सेवकांकडून औषधालयात जे कोणी गरीब व श्रीमंत येतील त्यांची निर्वेतन सेवा केली जाते . प्रमुख श्रीगुरुदेव औषधालय ( गुरुकुज ) मोझरी या ठिकाणाहन त्या त्या संपूर्ण गावातर्फे आवश्यक औषधे बनविण्यात येतात आणि त्यात पुष्कळशा नामांकित वैघांनी पाठविलेल्या औषधांचा विशेष भरणा केला जातो .
ही योजना लोकांना अत्यंत मानवली असल्याचे दिसून येत आहे . तुमच्या औषधानी आम्हाला उत्तम गुण आला आहे अशा आशयाची शेकडो पत्रे आमचेकडे आली आहेत आणि कित्येक लोकांनी आपल्या काही जमिनी सुद्धा तेथील स्थानिक श्रीगुरुदेव औषधालयास दिलेल्या आहेत . मागील कॉलऱ्याच्या साथीत अनेक ठिकाणी सेवामंडळाच्या मुलांनी धडाडीने केलेल्या कामाबद्दल तेथील अधिकारी व पुढारी यांनी आपापल्या कार्यालयामध्ये पाठविलेले रिपोर्टस महत्वाचे आहेत . शेकडो गावातून मंडळा ने प्रस्तृत केलेली औषधेच वापरण्यात आली असूनं . गावोगावी औषधालये उघडल्याबद्दल मागणी व प्रयत्न चालू आहेत . गावकरी सेवकांनी १०० रुपये दिल्यास त्याचे मोबदल्यात त्यांचेकडे २५० रुपयांची औषधे पाठविली जातात व हे सर्व कार्य सेवामंडळातील सेवकाकडूनच करण्यात येते ही गोष्ट विचारी जनांना महत्वाची वाटणे स्वाभाविक आहे .
श्रीगुरुदेव व्यायाम मंदिर
याबरोबरच श्रीगुरुदेव व्यायाम - मंदिराची निर्मितीहि त्या त्या खेड्यातून केली गेली आहे. शरीर मजबूत व निरोगी असणे हे प्रपंचाइतकेच परमार्थासाठी आणि घराइतकेच राष्ट्रासाठी देखील आवश्यक आहे . तेव्हा शारीरिक शिक्षण प्रत्येकास अवश्य मिळालेच पाहिजे हे
निर्विवाद आहे . म्हणूनच श्रीगुरुदेव व्यायाम मंदिर ची स्थापना व प्रचार करण्यात येऊन प्रत्येक व्यायामंदिरातून शरीराला आरोग्यदायक नि आत्मसंरक्षक लाठी - काठी , कवायत किवा व्यायाम , कुस्ती , मल्लखंब् सूर्यनमस्कार व आसने वगैरेचे शिक्षण दररोज दिले जाते . त्या विषयीचे ज्ञान , कला आणि सामर्थ्य वाढविले जाते . त्याकरिता वर्षातुन वर्ग भरविण्यात येतो , मधून मधून दंगल ठरविले जातात आणि कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बक्षिसे ठेवण्यात येऊन गुणांची वाढ करण्यात येते . ही सर्व कार्यकर्ती मुले मंडळाचीच असतात आणि ती सामर्थ्याचा उपयोग सत्कारणीच करितात .
श्रीगुरुदेव वाचनालय व साक्षरता - प्रचार
जेथे ह्या वरदर्शित योजनाअमलात आलेल्या आहेत , तेथे वाचनालयेहि उघडली गेली आहेत. खेड्याचे जीवन कसे सुधारेल , धर्म व भक्ति म्हणजे काय वस्तु आहे , सामुदायिकता कशी निर्माण होईल . सर्वांगीण उन्नतीचे मार्ग कोणते , जग काय आहे इत्यादि विषयावरील विचारांची व स्वावलंबी वृत्तीच्या नि विश्वबंधुत्व भावनेच्या थोर थोर लोकांनी दिलेल्या संदेशांची उत्तम परंतु सुगम अशी छोटीमोटी पुस्तके , वर्तमानपत्रे , मासिके वगैरे त्या वाचनालयात ठेवली गेली आहेत आणि त्या विभागाची योजना स्वतंत्ररुपाने करुन ठेवून श्रीगुरुदेव वाचनालय असे नाव त्यास देऊन ठेवले आहे .
वाचनालयाच्या या योजनेबरोबरच साक्षरता प्रसारा चे कार्य ही त्या त्या गावातून मंडळाचे सेवक , एक सोयीची वेळ ठरवून करीत आहेत . ज्यांना काहीच शिक्षण मिळालेले नाही अशा लोकांना व्यवहारात पदोपदी अडचणी येतात , प्रत्येक वेळी परावलंबी राहावे लागते आणि अनेकांकडून फसवले जाण्याचा विशेष संभव असतो त्याचप्रमाने सदग्रंथाचे अध्ययन किंवा जीवनोपयोगी विषयांचे जान करून घेण्याला त्यांना मार्गच उरेनासा होतो . ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निरक्षर जनतेला साक्षर करण्याचे कार्य मंडळाने हाती घेतले आहे आणि ते ग्रामीन
जनतेचे मानसशास्त्र जीवन व संस्कुती यांना धरून शक्य तेवढया सुगम पद्धतीने करण्याचे योजिले व आरंभले आहे
विविध सेवाकार्यातील एकविध भाव
याप्रमाणे पाहता सामुदायिक प्रार्थनेची अनेक उपांगे दिसून येतात जनतेला बौद्धिक, आध्यात्मिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक व शैक्षणिक इत्यादि सर्वांगीण दृष्टीनी विकास कसा करिता येईल या
चिंतनातून प्रगट झालेले हे प्रार्थनेच्या साम्राज्यातील विविध विभाग पाहिले म्हणजे सेवामंडळाच्या सर्वांगीण कार्याची थोडीफार कत्पना येऊ लागते. हे सर्व पोटविभाग आपापल्या वृत्तीनुसार त्या एकाच संस्थेच्या छत्राखाली काम करित असतात आणि आठवड्यांतून एक दिवस रामधुन व (गुरुवारची) सामुदायिक प्रार्थना या कार्यक्रमाकरिता मात्र एके ठिकाणी जमून गावास स्वर्गाप्रमाणे शोभवून दाखवित असतात.
वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त सेवे च्या अन्य कामांतहि असे संगमन व सहकार्य असतेच. प्रसंगी निराश्रीत आजारी व्यक्तिंची सेवाक्षुषा करणे, दीनदुर्बलास सहाय्य देणे, आपत्काली लोकांना धीर
देऊन धडाडीने पण विचारपूर्वक योग्य मदत करणे, सत्कार्यास हातभार लावणे आणि ज्या ज्या प्रकारे होईल त्या त्या प्रकारे मंडळाच्या उद्देशानुसार जनतेची सेवा करणे हे प्रत्येकाचेच काम असते. बलिदान बंदी, दुर्बलाचे संरक्षण, धर्मकार्यास प्रोत्साहन व अस्पृश्यता निवारण इत्यादि बाबीत कुशलतेने लोकांचा हृदयपालट घडवून आणून विचारपूर्वक कार्य करणे अथवा कार्यकर्त्यांना सहाय्य देणे ह्या गोष्टीहि सेवामंडळाला दूरच्या बिलकुल नाहीत. जनताजनार्दनाची सेवा आपल्या नियोजित मार्गाने मिळून-मिसळून करणे हे सेवामंडळाच्या सेवकांचे महत्वाचे कर्तव्य आहे!
सेवामंडळाचे सर्वस्पर्शी सत्कार्य
थोडक्यात बोलावयाचे तर, सेवामंडळ हे सर्व जीवनोपयोगी शिक्षणाचे माध्यम किंवा केंद्र असून सर्वांगीण उन्नतीचा राजरस्ता आहे.प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा सत्पुरुषांच्या उपदेशाचा तो
राज रस्ता आहे सक्रिय पाठ असून वेद, ऋषि आणि जगातील सर्व महापुरुष यांचेअंतरंग त्यांच्याद्वारे व्यक्त होऊ लागले आहे. व्यवहारातील साधी टापटीप व स्वच्छता यांपासून तो स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा, सर्व संप्रदायाच्या समन्वयाचा आणि अखिल विश्वाशी समरस करणाऱ्या विश्वबंधुत्वाचा किंवा शुद्ध मानवतेचा प्रत्यक्ष पाठ त्यात दिला जात आहे. धर्म आणि सुधारणा यांचा सुक्ष्म विचार करून संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याची व त्याद्वारे खेड्या-खेड्यांतून स्वर्गीय नंदनवन फुलविण्याचा हा एक सत्प्रयत्न आहे आणि म्हणूनच थोरांच्या आगमनाच्या वेळी त्यांचे स्वागत करण्याची पद्धति का असावी अशा लुप्तप्राय झालेल्या अनेक आवश्यक शिष्टाचारांची देखील माहिती त्यात दिली जाते. प्रार्थनेचे हृदय आणि .तिची ही उपांगे किंवाशाखोपशाखांचा विस्तार पाहिल्यावर, प्रार्थनाही डोळे मिटून बसणाऱ्यांची एकांगी निष्क्रिय विचार धारा आहे असे कोण म्हणू शकेल?
सेवामंडळाचा संजीवनी मंत्र
बंधुनो! सेवामंडळातील अशा कितीतरी कार्ययोजना अजून पुढे यावयाच्या आहेत की ज्यांची मनुष्याच्या जीवनाला अत्यंत आवश्यकता आहे. ह्या सर्व बाबीवर विचारच नव्हे तर सक्रियतेने अमलकरण्याकरिताच सेवामंडळाचा जन्म झालेला आहे. असे कितीतरी प्रचारक लोक आज या मंडळात आहेत की ज्यांनी आपले जीवन त्याच कामाकरिता वाहिलेले आहे आणि आश्चर्य हे की त्यातील शेकडा ९० लोक हे अगदीच कमी म्हणजे मराठी ३-४ वर्ग शिकलेलेब आढळून येत आहेत; यावरुन सामान्य लोकसमाजाच्या हृदयातील
ईश्वर जागृत होत असल्याचे प्रत्यंतर येत आहे व ते योग्य आहे. सेवा मंडळ हे संप्रदायाच्या संख्येत उगीच भर घालण्याकरिता किंवा प्रचलित संप्रदाय संस्था, जाती व धर्म या शी विरोध करण्याकरिता निर्माण झाले नसून, त्यांच्यातील गुणांचे संमिलन व चुकांचे निराकरण करण्याकरिता अर्थात परस्परांवर आज जे शितोडे उडविले जातात ती प्रवृत्ति नाहिशी करुन सर्वात बंधुभाव निर्माण करण्याकरिताच उत्पन्न झाले आहे. या दृष्टीने पाहता, आजच्या प्रत्येक भावनाशील व विचारी अशिक्षित व सुशिक्षित मनुष्याचे हे आवश्यक कर्तव्य आहे. की या नवयुगाच्या तत्वनिष्ठ परिवर्तनप्रेमी योजनेकडे आपले लक्षवेधवून त्यानेआपल्याबरोबर आपले गावहि उन्नत करण्याच्या हेतूने या श्रीगुरुदेव मेवामंडळा चे आत्मीयतेने स्वागत करावे आणि स्वतः त्यात भाग घेऊन त्याचे तत्वज्ञान दुसऱ्या ना हि अवश्य समजावून सांगावे असे आपण करु तरच आपली पुढे धडगत आहे, नाहीपेक्षा सध्याच भिकेला लागलेले राष्ट्र, लोळत असलेली माणुसकी, रसातळास गेलेला
धर्म आणि छिन्नभिन्न झालेले सामर्थ्य उद्या कोणत्या थराला जाईल हे कोणीही अंदाजे सांगु शकेल. परंतु तसे होऊ नये म्हनुनच आपणासमोर ही सेवामंडळा ची सर्वांगीण विकासाची योजना ठेवून मी आपणा सर्वांना त्यात भाग घेण्यासाठी आवाहन करीत आहे. तो जगच्चालक परमात्मा आपणा सर्वांना सदबुद्धि देवो आणि आपल्या पूर्वजांच्या ऋषिमहर्षीच्या यथार्थ उपदेशाने दर्शविलेल्या उन्नतीशिखरावरआपणास सक्रियतेने नेवो, एवढीच त्या विश्वव्यापकाला प्रार्थना करुन ही शब्दांची फुले त्याच्या सगुन विश्वरुपचरणी अर्पण करितो.
(श्रीगुरुदेव-जानेवारी १९४६)
* * *