बुद्धिवाद आणि प्रार्थना
प्रिय वाचकांनो! कोणत्याहि विषयाचा किंवा योजनेचा पूर्ण अभ्यास न करता यात काय आहे त्यात काय आहे असे भरमसाटपणे बोलणारे शब्दांच्या वाहत्या ओघात किती लोकांची गळचेपी करीत असतात याची कल्पना त्यांना येणे कठीण असते. माझ्या प्रवासात मला तर नेहमी असे कितीतरी लोक आढळतात की जे प्रार्थनेचा केवळ एकांगी दृष्टीने विचार करीतात आणि त्यामुळे साशंक होऊन म्हणतात - प्रार्थनेत काय ठेवल आहे? काय होत त्या प्रार्थनेने? आमच्या हिंदस्थानात काय प्रार्थना करणारे लोक कमी आहेत! मग का आली अशी दु:खाची वेळ ? का
मरतात त्या गावची माणसं, जेथे प्रार्थना नेहमी होते? का होतात ते भिकारी, ज्यांच्या घरी प्रार्थना अखंड चालते? का होते त्यांना दुष्टबुद्धि, ज्यांचा मुलगा नियमितपणे प्रार्थनेस जातो!
जे म्हणत असतात की-अहो! एवढ कशाला, आम्ही तर एके ठिकाणी अस पाहिल की प्रार्थना चालूच आहे तरी त्या गावातील एका प्रार्थना करणाराच्या घराला आगहि लागली; मग काय सांगे तुमची प्रार्थना? तिने जर काही गुणच दिसत नाही तर न केलेलीच काय वाईट? आम्ही पहात आहोत की भारतवर्षात कितीतरी देवळे, मशीदी, चर्च वगैरे आहेत : शिवाय प्रार्थनावादी कितीतरी महाराज लोक अवलिया, महात्मे व ख्रिश्चनांचे धर्मगुरु आहेत. मग सांगा हिंदस्थानात काय फायदा झालेला दिसतो त्या प्रार्थनामुळे? काय बंगालमध्ये अन्नाचा तुटवडा पडला नाही की लोक मेले नाहीत? काय काय नुकसान होण्याच वाचलं तुमच्या प्रार्थनेने? बर, जे लोक प्रार्थना करीत नाहीत त्यांच तरी काय वाटोळ झालं आहे? प्रार्थनाच काय पण ईश्वराचं अस्तित्व देखील मानायला जे तयार नाहीत त्यांना काय मूलबाळ नाही की नोकऱ्या मिळाल्या नाहीत की जगात मान नाही त्याचा? सांगा तर तुमच्या प्रार्थनेचा काय परिणाम आहे तो? आणि ज्यात काहीच तथ्य नाही
असा उगीच खेळखंडोबा करण्यात आपल्या व्यवहारकार्याची महत्वाची वेळ व्यर्थ का घालवावी?"
निदान तुमच्या प्रार्थनेत एवढी तरी शक्ती असावयास पाहिजे होती की, प्रार्थना करीत असता जर कोणी काठी मारली तर ती अधर न जावी, बंदुकीची गोळी लागूच नये किंवा प्रार्थना जेवणापूर्वी केल्यास जेवायचे कामच उरु नये. परंतु असं कुठं दिसल आहे का? आणि यापैकी जर आम्हाला काहीहि दिसत नाही तर प्रार्थनेमुळे लोक केवळ भिकार नि बेकार बनून आपले विकार पुष्ट करण्याकरता दुसऱ्यावर भार टाकण्यासाठीच हा अविर्भाव आणतात असे म्हणायला काय हरकत आहे? असे म्हणताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत. सुशिक्षित बुद्धिवादी किंवा अशिक्षित तर्कशील लोक अशाच प्रकारची चिकित्सा करतांना आढळतात. त्यांच्या मांडणीत थोडाफार फरक दिसला तरी भावार्थ साधारणत: तोच असतो. अर्थात ही एक मनोवत्ति झाली.
दुसरी मनोवृत्ति अशी दिसते की तेथे विचाराला वावच नसतो. कपाळाला मनमाने भस्मचंदन फासून निव्वळ देव देव करीत असलेले नि दिवसभर प्रार्थनेचा पोथा वाचीत बसलेले; माझे सर्व देवच करील म्हणून उदासपणे प्रयत्न न करता पडलेले; मुलाबाळापासून तो नोकरीपर्यंत, फोडफुनसीपासून तो महारोगापर्यंत आपला सर्व भार साधुसंताच्या कृपेवरच घालून बसलेले; असे हे लोक असतात. त्यात त्यांना जेव्हा जेव्हा अपयश येईल तेव्हा तेव्हा ते देवाचा आमच्यावर कोप आहे म्हणून शनिमहाराजाचा शांतिपाठ करुन पुन्हा निष्क्रियतेचे भांडार बनलेले दिसून येतात. ज्यांना माणुसकीहि कळत नाही व कळून घेण्याची इच्छाहि नाही अशांना देव सर्व पुरवणार नि ते एकदम स्वर्गाला जाणार, असल्या वड्या समजुतीचे कितीतरी लोक आढळून येतात.
अशा या गोंधळलेल्या परिस्थितीत सत्य काय असावे याचा भ्रम निर्माण होऊन साधारण लोक संशयात पडलेले दिसतात. कित्येक परंपरेच्या ओघाने कसा तरी कित्ता गिरवीत जातात तर कित्येक
सब झूट म्हणून वेगळाच मार्ग काढू पाहतात. परंतु मला हे कळत नाही की यांचीअशी अवस्था का होते? ती लोकांच्याकडे पाहून होते की मूळचे तत्वज्ञान ऐकून मला तर वाटते की प्रार्थनेचे तत्वज्ञान जर बुद्धिवादी लोकांच्या निदर्शनास येईल तर त्यांना प्रार्थना करणेच योग्य आहे वाटावयास काही हरकत नाही. परंतु जर आंधळा हट्ट धरून ते देवाच्या व धर्माच्या बाबतीत आम्ही काहीहि ऐकावयास तयार नाही असे म्हणत असतील तर त्यांच्यापूढे असल्या लिखाणाया अर्थही
काहीच होऊ शकणार नाही; हे उघडच आहे.
वास्तविक प्रार्थनेचे तत्वज्ञान तत्वज्ञ लोकानी बुद्धिच्या व कर्तव्याच्या चिकित्सक कसोटीवर घासूनच लोकापुढे माडल आहे ; पण त्याची यथासांग व यथोचित मांडणी करणारे लोकच कमी प्रमाणात असल्यामुळे लोकांना ते कळणे कठिण झाले आहे. माझे मत तर प्रार्थनेविषयी असे व्यवस्थित बनले आहे की या प्रार्थनकडे कोणत्याहि दृष्टीनी पाहिले असता मला या मार्गात मुळीच उणीव दिसून येत नाही; परंतु ती प्रार्थना केवळ लोकात चालू असलेली नव्हे तर प्रार्थनेच्या खऱ्या भूमिकेवरुन केलेली प्रार्थनाच खरी धारणा वाढविणारी आहे असे मला वाटते.
मला सांगा की, कोण मनुष्य उन्नत कार्याचा दृढ विचार केल्याशिवाय आपला पाय पुढे टाकून यशस्वी होऊ शकतो? जगात असा उन्नत होणारा एकहि मनुष्य नसेल की ज्याने आपली धारणामूर्ति पुढे ठेवून तिचे चिंतन केल्याशिवायच आपली उन्नति करुन घेतली
असेल. त्या धारणाशक्तीला मदत म्हणून, या जगात जे जे आदर्श पुरुष झाले आहेत त्यांची आठवण डोळ्यासमोर ठेवल्याने मनाची वृत्ति त्या उच्चतम कार्याकडे अधिक वळू लागते; आणि आपण जीवापाड परिश्रम घेऊन करीत असलेल्या प्रयत्नाला सुलभपणा प्राप्त होऊन जीव निर्भयपणे त्या मार्गाने चालू लागतो. अशाप्रकारे, आपणास ज्या सत्कार्याची जरुरी आहे त्या कार्याच्या मननालाच आम्ही प्रार्थना समजतो. एवढेच
की आपल्या आदर्श पुरुषाचे स्मरण करुन आम्ही ती कार्यदिशा दृढ करतो व देव न मानणारे आपल्या उत्तम मित्राच्या विचारसरणीवर अवलंबित असतात असे मला वाटते परंतु असे असले तरी प्रार्थनेची विशेष आवश्यकता का आहे या विषयीचा अधिक खुलासा सामुदायिक प्रार्थनेचे व्यापक उद्देश या शीर्षकाखाली केलेलाच आहे.
प्रार्थनेने मरण चुकते, दरिद्रता नष्ट होते किंवा जगात दुःखच येत नाही या अपेक्षेने किंवा भावनेने जे लोक प्रार्थना करितात, त्यांना वास्तविक प्रार्थनेचे मर्मच अजून कळावयाचे आहे असे मी म्हणतो. अज्ञानी लोकांना साखरेचा पडा दाखवून त्यांच्याकडून नकळत यथार्थ तत्वज्ञानाचा मार्ग अनुभवून घ्यावा या पवित्र उद्देशामुळे, थोर थोर पुरुषांनी या बाबतीत सडेतोड उत्तर लोकांना देऊन त्यांचा भ्रमनिरास मात्र केला नाही, हेहि खरे आहे. वास्तविक हा विषय प्रार्थनेच्या
क्षेत्रातीलच नव्हे की आम्हास फक्त प्रार्थनेनेच ऐहिक लाभ मिळावेत, त्याकरिता प्रयत्नांची आवश्यकताच नको प्रार्थना ही मानसिक भाववेश वाढवून आपल्या उच्चतर ध्येयाची निश्चिती शरीरात जागृत करते आणि
अभ्यासाने ती वृत्ति दृढ झाल्यावर ज्या देवतेची प्रार्थना केली जाते त्या देवतेच्या अदृश्य सहाय्याने अभ्यासूला समाधानकारक मदत मिळते व कर्तव्य आणि सहाय्य या दोन्हीचे मिश्रण यथायोग्य झाल्यावरच इच्छित
फलप्राप्ति होते, हीच मुख्य गोष्ट आहे.
जगाच्या घडामोडी तोडणे (बदलणे) ईश्वरालाहि एकदम करिता येणार नाही.कारण ज्या निसर्गशक्तीच्या तर्फे जे जे कार्य त्याने उभारले आहे त्या त्या शक्तीकडूनच ते कार्य तो करीत असतो.परंतु पाण्याच्या प्रवाहाला जसा एखादा पदार्थआपल्यापरीने अडवण्याचे काम करितो, तद्वत साधकाचे साहस हे आपल्या विरुद्ध शक्तीस प्रतिबंध करण्याचा प्रयत्न प्रार्थनेच्या आंतरिक शक्तीने करित असते. आपणास हे सांगायला नकोच की भावनेच्या एकतानतेमागे कोणत्याहि जीवाला
शक्ति मिळत असते. क्रोधाची भावना जागृत झाली की त्याचे मदतगार षड्विकार त्यास मदत करुन वृत्तीमध्ये महदंतर पाडीत असतात आणि विचाराची धारणा वाढली की कुणाकडून मारण्याएव जरी तयारी असली तरी तेथे समाधानच पहावयास मिळते!विकार व विचार या दोहोतहि शक्ति आहे, परंतु एक दु:खपरिणामी तर दुसरी सुखकारक !
प्रिय मित्रांनो ! ही गोष्ट तर आपणास माहित असेलच की जे लोक परमेश्वराचे स्मरण करीत होते त्यांनाही दुखभोग भोगावेच लागेल. परंतु त्याबरोबर एवढी गोष्ट मात्र खरी की, त्यांच्यातील समाधानिवृत्तीची धारणा काहीअपूर्व होती आणि कार्यातील उत्साहशक्ति व निर्भयता असामान्य होती, हे कोणासहि मानावेच लागेल. अर्थात हे सामर्थ्य, ज्याची भावना. सदैव कुविचारांच्याच चिंतनात खर्च होते अशा मामुली माणसाला कसे मिळणार? मला हे सांगावयाचे आहे की प्रार्थनमुळे देवाच्या अलभ्य शक्तीचा लाभ होऊन आपल्या अंगी सुखदुःख सहन करण्याचे सामर्थ्य त्यामुळे आघातहि आघातरुप न वाटता त्याचा योग्य त-हेने प्रतिकार करण्याची निर्भीड कर्तव्यशक्ती आपल्यात निर्माण होते.
बाह्यांगाची ताकद अभ्यासाने व समाधानाची शक्ति प्रार्थनेने म्हणजे शुभचिंतनाने वाढत असते. केवळ प्रार्थनेनेच प्रयत्नाचेहि काम पूर्णतया झाले पाहिजे हे म्हणणे अयोग्य आहे. मी म्हणेन की देवाच्या
भक्तीने जर आघातच बंद करावयाचे असतील तर देवाने आघात निर्माण तरी का करावे? आणि हे जर खरे तर श्रीकृष्णाने अर्जुनास नसती फूस देऊन युद्धाला प्रोत्साहित तरी का केले? करावयाचा होता एखादा
व्यापार नि खाऊनपिऊन सुखी ठेवावयास पाहिजे होते! पण तसे न करता असे का सांगितले की-अर्जुना! असे भित्र्यासारखे गळून जाऊन काय होणार? तुला युद्ध हे केलेच पाहिजे. आणि हे कर्तव्य करीत असता महापर्वत जरी कोसळले तरी वाईट वाटण्याचे कारण काय?आम्हाला त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे व तसे करीत असतांनाहि आम्ही आनंदात आहोत असेच मरेपर्यंत म्हटले पाहिजे; किंबहुना
मरण आले तरी आमच्या कार्याला हे पोषकच आहे असेच समजले पाहिजे . हाच ज्ञानलाभ श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रार्थनेने त्याला करून दिला आहे. असे म्हटलले आम्ही ऐकले नाही की- बंधनो! प्रार्थना का म्हणजे काहाहि प्रयत्न न करता तुम्हास राज्य मिळेल. प्रतिकार न करा मणहजे तुमच्या घरात एकहि बाण पडणार नाही. काय तुमच्यापैकी कोणी असे ऐकले आहे काय? तसे जर आपण समजत नाही तर प्रार्थनेने मृत्यु टळतो, बाण लागत नाहीत, आग विझून जाते अशी भलती समज आपण का करुन घ्यावी?
प्रिय वाचकांनो! मला आपणास हेच सांगावयाचे आहे की, प्रार्थना म्हणजे अद्भुत किमया नसून, यथायोग्य कर्तव्य करण्याची यथार्थ प्रवृत्ति प्रार्थनेने निर्माण होते व त्यासाठीस प्रार्थना आवश्यक आहे. प्रार्थना म्हणजे भित्रेपणा नव्हे तर बाणेदारपणाने वागण्याकरिता अंगात ताकद आणणे आहे. मला योग्यमार्गाने जाण्याकरिता शक्ति दे व पुढे सरसावू दे. मागील अन्याय सोडवून, असत्यातून मला सत्याकडे
ने- अशी नम्रतेने आपल्या प्रिय देवतेजवळ याचना करणे, अर्थात भिकारवृत्तीने नव्हे तर मी तुझ्यापासून ही वृत्ति घेईन नि जिवापाड कष्टहि करीन असे अंत:करणापासून चिंतणे, यालाच प्रार्थना म्हणतात
व ही भावना ज्या शब्दांनी व्यक्त केली जाते तोच प्रार्थनेचा पाठ करतो. प्रार्थना ही मनुष्याला उदास व दीन बनवते असे म्हणण्याचे वास्तविक काहीच कारण नाही. त्या प्रार्थनेचा खरा अर्थ न जाणणारेच बहुधा गोते खात असतात; एरव्ही जगात जी लहान स्थाने मोठी होतात- व्यक्तीची जगात होत जाते- ती प्रार्थनेनेच होय. हा प्रार्थनेचा खरा भाव सर्वांच्या मनात सक्रियतेने भरो एवढीच मी त्या जगन्नियंत्याजवळ प्रार्थना करितो.
(श्रीगुरुदेव- मे १९४४)
***