आत्म-शक्तीचे अविष्करण

                         उपासनेचे महत्व

               प्रिय उपासकांनो! उपासना किंवा प्रार्थना हा  मनुष्यसमाजास उन्नत करणारा एक उत्कृष्ट साधनसोपान आहे. उपासना केवळ परमार्थदृष्टीनेच
प्रगत करणारी नसून, परमार्थ-मार्गावर जाण्याकरिता ज्या ज्या मार्गाची आवश्यकता आहे अथवा प्रचलित परिस्थितीतून परमार्थाकडे ज्यायोगे सर्वांगीण उन्नती करित जाता येणार आहे. त्या सर्व गोष्टींना उन्नत करण्याची शक्ति उपासनेत आहे. लोकात अशी खोटी कल्पना रुढ झालेली आहे की प्रपंचादिकांना किंवा उद्यमव्यवहारांना सोडविण्याकरिताच उपासना आहे
अथवा त्यांना सोडल्याशिवाय उपासना होऊच शकत नाही; परंतु ही समज चुकीची आहे. उपासना ही संसारास उध्वस्त किंवा उजाड करण्यासाठी नसून ती संसारात स्वर्गाची शोभा प्राप्त करुन देऊन त्यातूनच परमार्थाचे उच्च शिखर गाठावयास लावणारी एक किमया आहे.

               आम्हा लोकात काही उपदेशकांनी प्रापंचिक उदासीनता तर काहीनी सकामव्रतादिकांच्या रुपाने केवळ प्रपंचाची आसक्ति फैलविली आहे. वास्तविक ईश्वराने यासाठीच आपणास उत्पन्न केलेले नाही; तर
या अल्पशा जीवनातून अमरबूटी कशी मिळवावी, औट हात देहाच्या या छोट्याशा नकाशात साऱ्या विश्वाचा अनुभव कसा घ्यावा आणि या विश्वातील प्रत्येक मूर्तीत-प्रत्येक कणांत-ईश्वराचे सत्य स्वरुप कसे पहावे, हे ज्ञान करून घेण्यासाठीच हा मनुष्यदेह मिळालेला आहे; केवळ घरदार सोडून जंगलात बसण्याकरिता नव्हे.
                 बंध आणि मोक्ष मनाधीन आहेत. ज्याचे प्रेम चित्ती। तुका म्हणे तो त्या गती।। जिकडे ज्याचे प्रेम असेल तिकडेच त्याचा विनियोग! याच दृष्टीने, प्रपंचात राहून परमार्थप्रेम दृढ झाल्यास त्यास परमार्थलाभ होणे अगदी स्वाभाविक आहे.


                       प्रार्थनेचा प्रभाव

                   सामान्य मनुष्यांचे प्रेम हजारो ठिकाणी विभागलेले असते त्यामुळे त्याची मानसिक शक्ति अगदी छिन्नविच्छिन्न झालेली असते. परंतु या वृत्ति-गंगेचे हे सर्व ओघ एकत्रित व एकमुखी केले तर अभूतपूर्व ताकद प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही, हे अगदी सत्य आहे. याच दृष्टीने प्रतिसृष्टि सुद्धा निर्माण करणारे लोक जगात झाले आहेत. मृत्यूला देखील भीष्माने आपल्या प्रभावाने रोकून ठेवलेले प्रसिद्ध आहे. हा शक्तीचा ओघ एकत्रित करण्यास उपासना-मुख्यतः प्रार्थना-हे अगदी उत्तम साधन आहे.

                  मेस्मोरिझमसारख्या प्रयोगांनी मनुष्यास मूर्च्छित करुन अधर उचलल्या जाते. परंतु ती जादू नव्हे, तो इच्छाशक्तीचाच प्रभाव आहे. मग काय उपासनेने तितकी सुद्धा शक्ति प्राप्त होणार नाही? अवश्य होईल! तीहून शतपटीने शक्तीचा विकास उपासनेने होणारच हे निश्चित आहे. ती शक्ति साधक अथवा बाधक होणे हे आपल्या चित्ताच्याशुद्धाशुद्धतेवर व बुद्धीच्या विकासावरच अवलंबून राहणार आहे.
आपल्याजवळ असलेल्या पैशाचा अथवा बलाचा उपयोग बरावाईट दोन्ही प्रकारचा होऊ शकेल. त्यानेच स्वत:चे व समाजाचे रक्षण किंवा नाशहि करता येईल. धनानेच स्वर्ग आणि धनानेच नर्क प्राप्त होणेहि
शक्य आहे. त्याचप्रमाणे प्रार्थनेने अविष्कृत झालेल्या आत्मशक्तीचा जसा उपयोग करावा तसे फळ मिळणार आहे. परंतु हे विनियोग करण्यावर निर्भर आहे, त्याला प्रार्थना जबाबदार असू शकत नाही. ज्यात प्रार्थनेच्या
योगाने ही ताकद निर्माण झाली तो परमार्थदृष्टि न सोडता व्यवहारात सुद्धा पाहिजे तसे करु शकतो. अर्थात शुद्ध दृष्टीमुळे तयाच्या लीलेमाजी नीति। जियाली दिसे असेच होणार हे उघड आहे. 

              अंत:करणात प्रकट झालेला प्रार्थना-प्रभाव त्याच्या इंद्रीयवृत्यांना बदलून टाकतो, त्याच्या दृष्टीस दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्यामुळे, 


विषयी पुरुषास त्याप्रमाणे सर्वत्र विषयच दिसायचे तद्वत सारे जग त्यास अगदी वेगळ्याच स्वरुपात दिसू लागते; सर्वत्र तत्वानुभव येवू लागतो . काचेचा ग्लोब ज्या रंगाचा असेल तीच किरणे बाहेर पडून बाहय पदार्थाना हिआपल्या रंगाने रंगवून टाकतात त्याप्रमाणेच हेहि आहे.प्रार्थना मय पुरुष संसारात स्वर्ग बनवितो व स्वत:च ईश्वर बनू शकतो.
   
                 शक्तिसंचयार्थ प्रार्थना-पद्धति
 
               प्रत्येकाच्या अंतर्यामी ही शक्ति आहे आणि जिज्ञासु मुमुक्ष‌ अथवा साधकदृष्टीने प्रयत्न करुन तिला प्रत्येकाने अवश्य जागृत केले पाहिजे. ही गोष्ट केवळ पारमार्थिक समजून व्यावहारिकांनी आणि तज्जन्य
शक्ति बाधक समजून पारमार्थिकांनी या बाबतीत हेळसांड करण्यात अर्थ नाही. निदान जेव्हा काम नसेल तेव्हा तरी प्रार्थनासाधन करीत राहणे जरूरीचे आहे. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी-पशुपक्षीसुद्धा 
कोणाची तरी प्रार्थना सदैव करीतच असतात. आत्यंतिक चिंतन म्हणजेच प्रार्थना परंतु उच्चत्तर ध्येय-भावना आणि मानसशक्ति-संग्रहाची दृष्टि यांच्या अभावी ती व्यर्थ जाते किंबहुना बाधक होते. त्याच प्रमाणे तशी दृष्टि नसल्यास ईश्वरप्रार्थनचा सुद्धा हवा तसा परिणाम होत नाही हे लक्षात ठेविले पाहिजे.

           प्रार्थनेचा अर्थ डोळे मिटून पुटपुटत बसणे एवढाच नाही; तर प्रत्येक व्यवहारात सत्यता, प्रेम, विश्वहितदृष्टि, घरदार-शेतवाडी-उद्योगधंदै या सर्वात उपयुक्ततेची व उपकारिकतेची वृत्ति ठेवून वागणूक, इत्यादि गोष्टीहि प्रार्थनेच्या क्षेत्रातीलच आहेत. तसेच ज्याचे नाव घ्यावयाचे त्याचा आदर्श समोर ठेवून सद्गुणांचे व कार्याचेयोग्य अनुकर करण्याचीहि आवश्यकता आहे. नावाशी गुण संयुक्तच असतात;
नावाबरोबरच गुणांचेहि स्मरण होत असते. वाईट मनुष्याचे नाव घेत असता सजन माणसे त्या दृष्टाचे नाव घेण्यास मनाई करितात. का नावातच गुणदर्शन होत असते व ज्याचे स्मरण अधिक होईल त्याचे


गुण दृष्टीस समोर खेळू लागून हळूच आपल्या हृदयात घर करू लागतात.उपासनेत ज्याच्या मूर्तीचे किंवा स्वरुपाचे स्मरण करावयाचे त्यांचे गुणसमोर ठेविले पाहिजेत. मूर्ती बरोबरच किर्ती आणि चित्राबरोबरच आदर्शचरित्राचेहि मनन, चिंतन व अनुकरण घडले पाहिजे.
 
        वृत्तिवर परिणाम करुन न घेता. ईश्वरप्रेमभावाच्या रंगांत मस्त न होता, केवळ शाद्विक प्रार्थना करण्याने काही होणार नाही. प्रेमात तीव्रता पाहिजे. ज्याच्या हृदयात प्रेमाचा तीव्र संचार झाला त्यात त्यागवैराग्याची वृत्तिहि अगदी प्रज्वलित व जागरुक असते. शरीर अन्य
मार्गावर चालू लागत आहे हे पाहताच त्या जाळण्यास सिद्ध झालेले महात्मेहि प्रसिद्धच आहेत. सूरदासाने प्रसंगी नेत्र सद्धा फोडले. परंतु त्याच्या असल्या स्वभाविक कृतीचे अनुकरण करुन भागणार नाही व ते
योग्यहि होणार नाही; त्यांच्या मनोवृत्तीचा आदर्श अंगी विचारपूर्वक भिनवला पाहिजे. जो ईश्वराविषयी इतका प्रेमळ आणि मोहाविषयी तीव्रउदासीन असतो. तो जगातून अलग न होता यासच उत्तम  बनविण्याच्या कार्यातच आपल्या शक्तीचा उपयोग करुन सर्वत्रआपले शुद्ध प्रेम फैलवितो!
 
              प्रिय वाचकांनो! थोडा थोडा तरी उपासनेचा-प्रार्थनेचा अभ्यास करा. रुढि म्हणन नव्हे तर मनाच्या विकासाकरिता तरी अवश्य हा प्रयोग करुन पहा. थोडथोडे आत्मनिरीक्षण करुन दुष्प्रवृत्तीचा नाश व
सद्गुणांचा विकास करीत सदाचाराने व प्रार्थनेने उन्नत होत होत ईश्वरस्वरुपाशी समरस होऊन जा. हीच माझी कळकळीची सूचना आहे.

(श्रीगुरुदेव-ऑक्टोंबर १९४३)
   
                               ***