ईश्वर - प्रार्थना केव्हा फळेल?
नलंगे सांगावे मागावे | जीवे भावे अनुसरावे।
अविनाश घ्यावे। फळ, धीर धरोनी।। -तुका
प्रगतिप्रिय पथिकापुढील प्रश्न!
आपल्या मनात परमेश्वराविषयीचे जे जे विचार येतात ते का व कशावरुन ? याचा आपण तपास केल्यावर आपल्या लक्षात येईल की, ईश्वराची ही अफाट सृष्टि व तिची चमत्कारपूर्ण रचना पाहून तसेच
प्रत्येक प्राणी व पदार्थ यातील विचित्रता नि विविधता पाहूनच तसे विचार येत असावेत. वास्तविक आजवर ज्यांना ज्यांना म्हणून ईश्वराचे प्रेम लागले, त्यांना सुद्धा ते याच कारणामुळे लागले आहे! ईश्वराचे सृष्टिवैभव पाहून, मी त्याच्या अफाटतेचे ज्ञान कसे प्राप्त करु? कारण मी अल्पज्ञ आहे, निदान आज तरी आपल्याला मी तसे समजत आहे: व ईश्वर सर्वज्ञ आहे-जगाचा नियंता आहे! तो सर्वसमर्थ आहे असे श्रेष्ठलोक सांगतात; अर्थात त्यांच्या कृपेनेच सर्व सुलभ होईल. परंतु त्यासाठी माझे विचार त्याच्या कानी टाकण्याचा मार्ग कसा असावा? असे मानवी मनाला केव्हातरी वाटणे साहजिक आहे. कारण आपण मोठे व्हावे असे जिव्हाळ्याने आपल्याला मागच्या जन्मापासून वाटत
आहे व म्हणूनच आपण आज मनुष्ययोनीत चमकत आहोत. अर्थात त्याचप्रमाणे पुढेहि उन्नत व्हावे असे निर्मळ मनाला वाटणे उचित व स्वाभाविक असते.
पण तसे वाटले तरी त्याला मार्ग काय, अशी शंका मोठमोठ्या लोकांना येते; मग आपल्याला यावी यात काय नवल आहे? आणि ही शंका आल्यावर जर जीवाला उत्तम सहवास भेटला तर फारच उत्तम;
नाहीपेक्षा तो जेवढा पुढे आला असेल तेवढाच मागे ढकलला जाण्याचाही धोका संभव असतो.कुसंगतीतच नव्हे तर उत्तममानलेल्या संगतीतहि अशी
वेळ येत असते. कारण उत्तम व कनिष्ट हे आपणच ठरवीत असतो किंवा आपल्यासारखेच लोक तसे ठरवीत असतात आणि ते ठरवणे यर्थार्थ चआहे असे आपल्या बद्धीच्या अपरिपक्वतेकडे लक्ष देता म्हणता येत नसल्याने त्यामुळे बहूधा धोका च होण्याचा संभव असतो .बरे सत्संगतीच्या ओळखीकरिता किंवा ईश्वरमार्गाच्या निश्चितीकारीता जर काही ग्रंथ वाचावेत तर, अनेकांची अनेक मते ऐकून मनुष्याचे मन काय करावे या विचाराने भांबावून जाते. म्हणून अशावेळी, परमेश्वर जरी असला तरी त्याला कसे स्मरावे हा प्रश्न मानवी मनात दत्त म्हणून उभा राहतो. अर्थात यासंबंधी थोडे दिशादर्शन व्हावे म्हणून, त्या प्रश्नाच समाधान माझ्या निर्मळ वृत्तीने जे केले ते मी आपल्यापुढे ठेवीत आहे.
प्रभूपुढे प्रार्थनेचे प्रदर्शन कशाला?
ईश्वर हा अल्पज्ञ म्हटला तर, आपले कार्य उजेडात ठेवून त्याच्या निदर्शनास आणले पाहिजे; आणि जर तो सर्वज्ञ आहे, सर्वातर्यामी आहे असे आपल्या मनाने घेतले असेल तर, तो निर्गुण की सगुण, राम की कृष्ण, दत्त की महादेव इत्यादि नामभेद किंवा भेदभाव आंधळ्याच्या कल्पनेप्रमाणेच ठरणार; अर्थात ते सोडले पाहिजेत.कारण तो कोणी असला तरी आमचे भाव ओळखण्याची तयारी आहे. हे त्यांच्या सर्वज्ञपणावरुनच समजण्यासारखे आहे. (सेवा ते आवडी उच्चारावेनाम। भेदाभेद काम निवारोनी।। कोण होईल जो ब्रम्हांडचालक। आपणचिहाक घेईल हाके।।- तुका.) अर्थात मग प्रश्न एवढाच शिल्लक राहतोकी, आपण त्याची भक्ति कशी करावी किंवा आपली करुणहाक त्याच्या कानी कशी व कोणत्या साधनाने किंवा विधीने टाकावी?
या प्रश्नाचा विचार करीत असता पुन्हा आपणच आपल्याला अशा कल्पनेने फसवुन घेतो की. त्याच्या हाकेला एक मर्यादित कक्षा ठरविली पाहिजे, म्हणजेच तो आपली हाक ऐकेल! याचा अर्थ असा की, तो बाकीच्या तहांनी हाक ऐकावयाला असमर्थ किंवा सर्वस्वी
आंधळा आहे! परंतु यात तर आमचा मुळातच अविश्वास दिसतो वास्तविक तो जर सर्वांतर्यामी आहे तर, आमच्या रडण्याचा टाहो नि हृदयाचाहि आक्रोश त्याने का ऐकू नये? खरे म्हणजे, तो बेशक आमची
कुठेहि व कशीहि हाक ऐकण्यास तयार नि समर्थ असला पाहिजे आणि तो तसा असतोच अशी त्याच्या आवडत्या भक्ताची विश्वासनीय ओरड आहे, तेव्हा आम्ही त्याला हाक का मारावी व कशाकरिता
मारावी? हाच काय तो प्रश्न शिल्लक राहतो.
उद्देशाच्या उच्च तत्वात प्रार्थनेचे सर्वस्व !
हाक कशी मारावी हा प्रश्न महत्वाचा नाही, तर ती कशाकरिता मारावी यातच खरे मर्म आहे. कारण हाक मारण्यातच भक्तलोकात वा आपल्यात काही फरक असतो असे मला वाटत नाही, फक्त उद्देशातच काय तो भेद असतो. एकाचा उद्देश आपल्या क्षुद्र स्वार्थाचा असतो तर एकाचा उद्देश आपल्या निर्मळ उन्नतीच्या लाभाचा असतो. क्षुद्र स्वार्थाचे
लोक, दुसऱ्याचे वाईट करुन आपले भले करावे हया लोभाच्याअविष्काराने,ईश्वराला मदत मागून त्याचे वाटोळे कसे करता येईल म्हणून हात जोड़त असतात .
व निर्मळ भावनेचे सज्जन, ईश्वरा! माझ्या उन्नतीने कुणाची मन दुखवले न जाता व कुणाच्याहि मार्गात अडथळा न येता सर्वाच्च कल्याणास मदत व्हावी. माझ्या जीवाच्या विकासाकरिता नवी स्फुर्ति मिळावी नि माझ्या इंद्रियनिग्रहापासून तो तुझ्या व्यापक परमार्थापर्यंत तसेच अत्यल्प व्यक्तित्वापासून तो विशाल देशापर्यंत किंबहूना विश्वापर्यंत सर्वात प्रगतिकारक तेज आणि शांती पसरावी या उत्तम भावनेने त्यातभक्ति म्हणजे चिंतना व चिंतना म्हणजे प्रार्थना करीत असतात, .प्रार्थनेचे सदैव स्मरण ठेवण्याचा अभ्यासहि करीत असतात.
निष्क्रिय प्रार्थना म्हणजे आत्मदेवाशी प्रतारणा!
मनाच्या संस्कारांना जो विपरीत अभ्यास लागलेला आहे. तो
नष्ट कण्याकरिता तरी उत्तम वृत्तीच्या अभ्यासाची अत्यंत जरुर आहे. प्रार्थनेत आपण देवाला काय म्हटले ते आपण केव्हाहि विसरु पण तो अतर्यामीअसल्यामुळे आपले बोलणे एक व करणे एक पाहून म्हणेल की, गधा प्रार्थनेत काही वेगळेच म्हणतो आणि स्वाद
तर भलताच घेतो अर्थात असे करणे म्हणजे ईश्वरास फसवण्या सारखेच होईल. म्हणून प्रार्थनेच्या शब्दांना नेहमी जपत गेले पाहिजे . आणि त्याच चितनात योग्य व्यवहार केला पाहिजे, तरच प्रार्थना परीणामकारक होईल!
क्षुद स्वार्थासाठी नव्हे तर उच्च स्वार्थासाठी-परमार्थासाठी आणी विश्वहितासाठी ईश्वरी मदत मिळावी म्हणून सक्रिय अशा निर्मळ वृत्तीने व सद्भ भावनेने मारलेली जी हाक, तीच त्याच्या कानी पडण्याचे कारण असे की, त्यात खरोखरच काही तथ्य असते. परंतु आपण आपल्या इंद्रियांच्या सुखाकरिता, कुटुंबाच्या सोयीकरिता जी अन्याय्य वृत्तीची जी हाक मारतो ती सर्वेश्वराला दुःख देणारी असल्यामुळे त्यात काही ( सुखपर्यवसायी) यश येणे शक्य नसते. कदाचित आपल्या क्षुद्र बुद्धी च्या लोभामुळे व वरच्या प्रभावी देखाव्यामुळे, काही काळ पर्यंत आपल्यात मोठेपणा किंवा माननीयपणा जरी आलेला दिसत असला, तरी तो ईश्वराशी विश्वासघातच असतो. आणि आपल्याच करणीने तो आपलीहि वृत्ति जिरविण्याच्या मागे असतो; नव्हे तशी ती वेळच येत असते . उलट जे लोक आपल्या खऱ्या उन्नतीची आठवण ठेवून याद. ( स्मरण )करतात, त्यांना काही दिवस नव्हे काही वर्षे कष्ट भोगावे लागते तरी ते आपल्या मनाच्या खंबीरवत्तीने सर्व सहन करितात त्यांना आपल्या ईशचिंतनात त्या द:खाचे स्मरणहि उरत नाही.
श्रीसंत तुकारामाला त्यांचेवर पडलेल्या सांसरिक आघाता बद्दल खेद आणी क्लेश वाटून, त्यांनी श्रीशिवाजी महाराजासारख्याचे आपणाहून आनलेले नजराणे झिडकारुन माघार पाठविलेच नसते! ही जी निर्भयता सहनशीलता .उदारता, निर्मळता, निरिच्छता नि संतुष्टता त्यांचा हदयात
अधिकाधिक वाढते, त्याला एकच कारण असून ते म्हणजे शुद्ध वृत्तीची प्रार्थना व प्रार्थनेची सक्रिय आठवण हेच होय!
वैशिष्ट्य-चिंतनात अभ्यासाचे दृढीकरण
आपण म्हणाल-प्रार्थनेची आठवण टिकून कशी राहील? परंतु हा प्रश्न आपल्या दुर्बलतेचा द्योतक आहे. देवाने मला तू हाक मार असे तुम्हाला आग्रहाने सांगितलेले नाही; ती आपण आपल्याच हिताकरिता मारीत असतो. तेव्हा ईश्वराला हाक मारावी असे तुम्हाला ज्या कारणाने वाटले असेल, ते कारण तम्ही सदैव लक्षात ठेवले की तुमची आठवण टिकलीच म्हणून समजा!
मी नेहमी म्हणत असतो, बाबांनो! वकीलाकडे जाल तर कायद्याचे ज्ञान शिकाल, डॉक्टरकडे जाल तर औषधियोजना किंवा चिरफाड शिकाल,पहिलवानाकडे जाल तर मल्लविद्येतील डावपेच शिकाल, पण जर तुम्ही आपल्याला ईश्वरी निसर्गाशी समरस करु
ईच्छित असाल किंवा तुम्हाला ईश्वराच्या विशालतेशी परिचित किंबहूना एकमय व्हावयाचे असेल तर, मानवाकडून मिळणाऱ्या या भिकांनी ती भीक पुरी होऊच शकणार नाही. तुम्हाला, सर्व जगाला आपल्या सामर्थ्याने खेळवणाऱ्या त्या जगन्नियंत्याची- त्या सर्व शक्तिमान प्रभूची प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचे जे अबाधित सिद्धांत आहेत त्यांना हृदयाशी धरुन आचरणातच आणले पाहिजे; हाच त्याचा मार्ग आहे! आणिम्हणूनच मी आपल्याला सांगितले आहे की, ज्या कारणाने तुम्ही त्याला आठवू इच्छिता, ते कारण खरोखरच ईश्वराला मंजूर आहे असे असेल तर, तुम्ही त्याच्याच मागे लागले पाहिजे व आपली वृत्ति टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ईश्वराकडून मिळविण्याच्या वस्तूची आपणास जितकी तळमळ, ती दुसऱ्या कुणाकडून मिळणे शक्यच नाहि याची जितकी खात्री आणि ईश्वर ती देणारच याविषयी जितका दृढविश्वास असेल तितका अभ्यास आपोआप दृढ होत राहील.
सत्संगति, सदाचरण व सामुदायिक प्रार्थना
अहो, व्यवहारातलीहि एखादी गोष्ट जर आपल्याला कळली नसली तर आपण जवळच्या सद्गृहस्थाची सल्ला घेतोच ना! त्याचप्रमाणे जे ईश्वराच्या भक्तीला लागले असतील त्यांची अधून मधून सल्ला घेतला पाहिजे व जीवापाड मेहनत करुन कार्याला लागले पाहिजे. मार्गदर्शन,अभ्यासाचे दृढीकरण व जागृति या साठी संतसंगतीची अत्यंत जरुरी आहे. परंतु मित्रांनो! मी काही असे दुर्बल नि ऐदी लोक पाहिले आहेत की, त्यांच्याशी प्रयत्नाचा मुळीच संबंध नसतो. काय जे करतील ते बुवाच व त्यांच्याकडेच आपण आपला हवाला दिला आहे असे बेजबाबदारपणाने ते बोलतात नि मग आपणहि फसतात आणि बुवालाहि गडदेत घालतात; असे आपण मुळीच करु नये. थोरांची सल्ला आपण आपल्या मनःप्रवृत्तीप्रमाणे सदसद्विवेकाच्या दृष्टीने अवश्य घ्यावी व आपली हाक ईश्वराकडे पोचवीत उत्तम त-हेने दिनचर्या पाळावी.
आपला वेळ उगीच निरनिराळ्या अवास्तव (अनुचित) कार्यात किंवा अनावश्यक चर्चेत न घालविण्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला, विष्णु श्रेष्ठ की शंकर किंवा निर्गुण श्रेष्ठ की सगुण,असे म्हणण्याचे कारणच नाही. तो कोणी का असेना आणि कसाहि काअसेना ! आपण नेहमीच्या ठरलेल्या जागी सामुदायिक प्रार्थनेला जावे,निर्मळ भावनेने - शुद्ध वर्तनाने जावे व तेथे मनावर स्वार होऊन तेथील प्रार्थनेच्या नियमाप्रमाणे प्रार्थना करावी. तसेच त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या प्रार्थनेपर्यंत टिकविण्याचा प्रयत्न करावा आणि व्यवहारात वागताना स्पष्ट, स्वावलंबी, कष्टिक वृत्तीने व दुसऱ्याचे आणि आपले सुख दुःख सारखे समजून वागावे; म्हणजे आपली हाक त्याने ऐकलीच म्हणून समजा! आणि अशा अभ्यासात आपणास मृत्यु जरी आला तरी आपले कार्य झाले नाही असे समजण्याचे काही कारण नाही.
मित्रांनो! या, आपण या श्रीगुरुदेव सेवामंडळात प्रार्थना
करु, ती नियमित आणि तत्वपूर्ण करु; आणि बाकीचा वाद सोडून त्या जगन्नियंत्या प्रभूस एकाग्र मनाने आळवू म्हणजे तो आपणास सामर्थ्य देऊन, आपल्या अफाट सृष्टीच्या उत्तम स्थानात आपणाकडून योग्य
सेवा करुन घेईल आणि आपण कृतार्थ होत्साते अखंड सुखाचे धनी होऊ ! एक दृढ करी पंढरीचा राव। मग तुज उपाव पुढीलसुचे।। (तुका.) या प्रमाणे पावलापुरता प्रकाश दाखविणारा हा सामुदायिक प्रार्थनेचा नंदादीपच आपण शेवटच्याध्येयापर्यंत परमेश्वराच्या परमधामापर्यंत पोहचविण्यास पुरेसा सहायक होईल व जगांतहि शांतता प्रस्थापित करील, यात सन्देह नको!
(श्रीगुरुदेव-जून १९४५)
***