भावनावादावर अभिनव प्रकाश
मित्रांनो! जीव हा भावनेनेच जीव झाला आहे. त्याला त्याच्या मूळस्वरुप शुद्धबुद्ध आत्म्याची स्थिति स्थिरविण्याकरिताहि भावनाच घ्यावी लागणार आहे. भावना जरी आंधळी असली तथापि तिच्यात बुद्धीपेक्षा लाखपटीने जास्त वृत्ति बनविण्याचे सामर्थ्य आहे. परंतु ती दुसऱ्याच्या आधाराने चालणारी असल्यामुळे आंधळी मानली जाते.
भावना ज्याच्या हृदयात जन्माला आलीच नसेल तो माणूस जगातून कोणताच गुण घेऊन जाऊ शकत नाही. तो माणूस माणूसच नव्हे, ज्याच्यात भावना उदयासच आली नसेल. भावनाच प्रत्येक माणसास जीवनाचा मार्ग चालण्यास शक्ति देणारी आहे. भावनाहीन साधूहि परमेश्वराबद्दल जन्मभर साशंकच राहणार आहे. जगातील सारे व्यवहार भावनेवरच चालत असलेले दिसतात.
भावना जशी उच्च पदाला नेत असते, तशीच ती क्षण न लागता मनुष्याला जमीनदोस्तहि करुन टाकते. ती जशी देव दाखविण्यास समर्थ होते, तशीच भुतेखेतेहि त्याच डोळ्यांना दाखविण्यास तयार होते. प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूचा जशी स्थूलांगाने ती स्वाद घेऊ शकते, तशीच अप्रत्यक्ष वस्तूचाहि सूक्ष्मांगाने रसास्वाद घेण्यास समर्थ करते. ती जशी एकाला उन्नत पदावर चढविते तशीच दुसऱ्याला जीवंतपणी मारुन टाकण्यासहि कमी करीत नाही.
भावना ही प्रत्येक माणसाचे रुप आहे. जगातील ज्या सर्व वस्तू दिसतात ती सर्व भावनेचीच रुपे आहेत. भावनाच भावनेचा गुरु आहे आणि भावनाच भावनेचा शिष्य आहे. वस्तूची एकाच वेळी अनेक रुपे जी आपण पाहतो ती सर्व भावनेच्या डोळ्यांनीच पाहतो. भावनेचे मध्यप्रदान हे ज्ञान आहे, मुख्यप्रधान अनुभवात्मक समाधान आहे आणि कनिष्ठप्रधान बुद्धि आहे. भावनेचे महाद्वार मन हे आहे
आणि साधारण दरवाजे इंद्रिये आहेत. भावनेच्या महाद्वारातून दोन रस्ते फुटून एक प्रवृत्तीचे रुप धारण करतो आणि दुसरा निवृत्तीचे. या मार्गांनी भावना जात असतांना त्या त्या अधिकाराचे रुप धारण करीत ती
बदलत असते. जी भावना प्रवृत्तीच्या मार्गाने जाते शेवट पर्यंत मुख्याधिकारी होईपर्यंतहि प्रवृत्तीतच राहते; किंबहना ज्ञानहि प्रवृत्ती च्याच मार्गाने प्राप्त करीत असते आणि जी भावना निवृत्तीच्या मार्गाला लागतेती प्रथमपासून तो अधिकारसंपन्न अवस्थेपर्यंत समाधानाच्या प्रवाहानेच वाढून मुख्यप्रधान जो अनुभव तोहि त्यातच प्राप्त करुन घेते.
या दोनहि मार्गानी कार्ये तेवढीच करावी लागतात, वाट तेवढीच चालावी लागत असते, पण संगतीचा संसर्ग मुळात जसा मिळत गेला तसा मार्ग भावनेला मिळत जातो. भावनेला त्या त्या मार्गाने जाण्याकरिता काही पूर्वसंस्कार आणि बहुदा सतसमागमाचा परिणाम कारण होत असतो. पण तो भावना कोवळी असतांनाच मिळाला असला तर त्यामार्गाचा अवलंब लवकर केला जातो आणि भावना जर एखाद्या मार्गाचा कल घेत असली तर मात्र मोठ्या प्रयासानेच ती बदलली जाते; पण तिच्यापेक्षा लाखोपटीची प्रभावी भावना तिला बदलणाऱ्यांत असावी लागते. मनुष्य तेव्हाच आपली भावना बदलतो, जेव्हा त्यापेक्षा प्रबल भावनेची संगती त्याला मिळते. त्यांच्याच भावना बदलल्या जात नाहीत; ज्यांना भावनेचे मुख्यप्रधान अनुभवज्ञान मिळाले आहे. भावना ही नेहमी सर्वांच्या म्हणजे सवेंद्रियांच्या मागाहून चालणारी शक्ति आहे आणि तिचा दर्जा मन, बुद्धि, ज्ञान यांच्या सत्कार्यावरच वाढणारा आहे. ज्यांनी आपली भावना ज्या मार्गाने वाढवावयाची असेल त्यांनी
त्या मार्गाच्या भावनापूर्ण लोकांचीच संगती करावयास हवी आहे. कारण, विचारप्रणाली ही निराळी आणि भावनामग्नता ही निराळी असते विचारधारा हा खेळहि असू शकेल पण भावना ही त्याचा अधिकारच दाखविणारी असते. भक्ताला भगवान भावनेने दिसला आणि विचारान कळला आहे. भावना ही रुप दाखवू शकते आणि विचार हे तत्व शोधू
शकत असतात. भावनेला लय साधली असते आणि विचाराला दरवाजा दाखविण्याचे सामर्थ्य असते. भावना तटाकार होऊ शकते व विचार भावनेत ठाव घेत असतात. शेवटी भावना जीवत्व सोडून ईश्वर होऊ शकते आणि विचार लाजून मागे फिरतात नि त्या भावनेचा गौरव करीत भाट बनून लोकांना रंगवितात. तेव्हा भावना ही केव्हाहि थोर आहे; पण ती प्रवृत्तिमार्गाने जाऊन विषयाकार होऊन आपले जीवित-ध्येय विसरणार नाही अशी खबरदारी-विचाराची जोड देऊन-बाळगली म्हणजे भावनाच भगवंताचे रुप ओळखून भक्तिसुख अनुभवू शकते. तो भक्तिसुख सोहळा विषयसुखाच्या अज्ञानात नसून ज्ञानादिकांच्या अभेद मार्गातहि नाही. तो केवळ ज्ञानअज्ञानाच्या पलिकडील जे शुद्ध भावनास्वरुप त्यातच सदैव भक्तांना भोगावयास मिळतो. त्या अमर सुखाचे सदैव धनी साधक लोक राहावेत एवढीच प्रभु-चरणी प्रार्थना आहे!
(श्रीगुरुदेव-ऑगस्ट १९४३)
* * *