भजनी संस्थेचे पुनरुज्जीवन!

      झाडू संताचे मारग। आडराने भरले जग।।-संत                                                                 तुकाराम
         
                   कालप्रवाहात सद्भावदीपिका
 
                      भजनाच्या उज्ज्वल परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर येताच ज्ञानाच्या अत्युच्च शिखराचे व त्याच्या उन्नत पथाचे पावन दर्शन करुन देणारा जो प्रभावी परिणाम मनुष्याच्या अंत:करणावर होतो तो सर्व जाणत्या माणसांच्या भावनेवरुन अजूनहि निघून गेलेला नाही. या भजनाच्या परंपरेचा प्रवाह महान ऋषिमहर्षि लोकांनी सृष्टीच्या विकासाच्या ओघाने वेदापासून तो पुराणापर्यंत आणि पुराणापासून तो अनेक भिन्नभिन्न सांप्रदायिक ग्रंथापर्यंत आणून पोचविलेला दिसतो. कालाच्या वाहत्या ओघाबरोबर परिस्थितीस अनुरूप असा जरी त्याचा रागरंग बाहेरच्या शब्दप्रणालीत किंवा काव्याच्या विविध पद्धतीत निराळ्या तर्हेने मांडलेला दिसला तरी, बुद्धीला विकसित करणारा आणि जीवाला ब्रहौक्य प्राप्त
करुन देणारा एकच मुख्य भाव त्या सर्व सद्ग्रथांत किंवा त्यांच्या प्रत्येक उपदेशात उतरलेला आपणास आढळून येईल. जसा मनुष्याच्या राहणीत फरक होत गेला तसाच भजनाच्याहि पद्धतीमध्ये कालांतराने पुन:पुन्हा बदल होत गेलेला आहे. पण भजनाच्या व्याख्येत व प्रेमभावनेत मात्र फरक झालेला-सुक्ष्म निरीक्षणानंतर तुम्हाला मुळीच दिसणार नाही.
             
                    भजनाची ही अनादि परंपरा भगवान शंकरापासून तो संत तकाराम महाराजापर्यंत जशी तत्वमय व त्यांच्या आचार-विचाराने यक्त अशी दिसून येते तशी त्यांच्या संप्रदायात किंवा त्यांचे दुरुन (वर वर) भजन म्हणणारात कदाचित आढळूनहि येणार नाही; पण यांच्या या वागणुकीकडे वा यांच्या बहिरंग भजनाच्या पद्धतीकडे पाहून भजनाची परंपरा मुळातच उज्ज्वल नव्हती किंवा तसे प्रभावी भजन होऊच शकत नाही असे मात्र कुणालाहि म्हणता येणार नाही, असे तोच म्हणेल की


ज्याला भजनाचा यथार्थ प्रणाली किंवा तत्वटष्या ओळखणारी व्याख्याच कळली नसेल. मी तर असे निश्चयाने म्हणतो की, जे कोणी लोक ज्या कोण्या मार्गानी आजपर्यंत उन्नत व आदर्शरुप झालेले दिसतात ते सर्व या भजनाच्याच मार्गाने झालेले आहेत.
       
                    हरिभजनाचा ओनामा
  
                    एका लहान मार्गावरून मोठ्या मार्गावर सत्याच्या भावनेने आरुढ होणे यालाच भजन असे आजवर समजत आलो आणि तीच तत्वप्रणाली थोरपुरुषहि आपल्या शब्दाप्रमाणे दाखवू शकतात. तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भम्रअमंगळ।। हे अगदी यथार्थ आहे. परंतु थोडे मुळाकडे जाऊन मी म्हणेन, जगाविषयी विष्णुमय भावना होण्याच्या पूर्वपीठिकेत आमचे
घर म्हणजे जग व आमच्या देवपाटातील देव म्हणजे विष्ण या कल्पनेतूनच बहुधा सर्वांना पुढे जावे लागत असते व ती कल्पना ईश्वरविषयक भावना ज्या बोधाने, ज्या गाण्याने, ज्या सतचर्चेने आणि ज्या आचार-विचाराने मनुष्यास लाभते. दृढ होते किंवा विकसित होते त्या साहित्यासच भजन असे म्हणत असतात.परंतु हा मार्ग सोडून जे लोक भजनाचा विपरीत अर्थ करीत गेले व फक्त भजन गायन करण्यानेच भजनाचे कार्य झाले असे समजत गेले, त्या कुणाचीही उन्नती झालेली आजवर मला आढळली नाही.

            काही ठिकाणी असा भावनावाद वाढविण्यात आलेला दिसतो की दुसरे काय करावयाचे आहे फक्त हरिहरि जरी करीत बसले तरी मोक्षठेवा घरबसल्या लाभलाच समजा या त्यांच्या हरिहरि म्हणण्यास
फक्त या शब्दाने जे मर्यादित स्वरुप दिलेले आहे त्या फक्त या शब्दाचा दयार्थ एवढा मोठा आहे की, फक्त हरि हरि म्हणणे म्हणे बोलणेचि। आता देवावीण काही।।- (संत तुकाराम) असे अखंड हरि सात रंगून जाणेच होय. परंतु असे फक्त (निर्भेळ) हरिस्मरण बहुधा कोणीच करु शकत नाही. अनेक लोकाचे हरि म्हणणे स्वार्थाला 


अभिमानाला व देहादिकांच्या आसक्तीलाच धरुन असते; त्यामुळे तो हरि  फक्त हरि राहात नाही तर अरी च्याहि मार्गाला लवकरच मिळून जाण्याचा संभव असतो. यासाठी हरि-भजनाला जे अरित्वनाशक
विचाराचारांची जोड देतात नि त्यांचे माहात्म्य अवलोकन करुन पाय पुढे घेतात तेच हरि-भजनाच्या गाव चे होऊन संत वा साधु बनत असतात.
      
                     भजन आणि व्यवहार
  
                         ज्यांच्या भजनाचे रागरंग आपल्या अध्यात्मशक्तीच्या शिखरावर पोहोचून शरीरावर अनेक आपत्ति येणे म्हणजे माझ्या हरिभजनात बाधा येणे नव्हे, किंबहुना शरीर मरणे म्हणजे माझे ईश्वरप्रेम मरणे नव्हे, तसेच सत्यतेने व चतुरतेने व्यवहार करणे म्हणजे हरि-भजनाला मुकणे नव्हेआणि त्याचबरोबर समाजाची यथोचित सेवा करणे म्हणजे भजनात अंतर पडणे नव्हे-अशा प्रभावी विचारांनी सतेज झालेले असतील तेच भजनाच्या मार्गाचे धनी वा आदर्श भक्त आहेत असे मी म्हणेन.
  
                 मागच्या पौराण किंवा ऐतिहासिक कालात सुद्धा जे अनेक साधुसंत साधुत्वाने झळकून गेले ते फक्त नामजपानेच साधुत्व मिळविणारे नव्हते, तर त्याला योग्य आचारविचाराचींहि त्यांनी जोड दिलेली होती,हे कोणासहि दिसून येईलच, गोराकुंभाराने आपले मडकी घडवणे,जनाबाईने गोवऱ्या (शेणी) वेचणे, नामदेवाने शिप्यांचे काम करणे,चोखोबाने ढोरे ओढणे, कबीरांनी आपले शेले विणणे व संत तुकारामाने शेते राखणे, असली हलकी वाटणारी कामे देखील संतानी केल्याचे त्यांच्या चरित्रावरुन आपणास दिसून येते. हा इतिहास विसरुन भजनाची परंपरा फक्त भजनकरुनआपलादिवसआळसीमाणसासारखा
घालवण्यात व आपल्या समाजातील उद्योगधंदे बंद पाडून लोकांना बेकार बनवण्यातच जर ठरवली गेली तर मात्र ती भजनाला काळिमा लावणारी गोष्ट आहे असे मी म्हणेन.


                     एक प्रभावी प्रणाली
       
               प्रिय वाचकानो! मनुष्यास उन्नति शिखरावर नेणाऱ्या ज्या अनेक विचारसरण्या आहेत त्यातील एक महत्वाची विचारसरणी-भजन करुन आपल्यावर उत्तम परिणाम करुन घेणे ही आहे, असे अनेक श्रेष्ठांनी कबुल केलेले आहे. लोकमान्य श्री बाल गंगाधर टिळक म्हणतात मला जर, सर्वात अधिक परिणामकारक व प्रचार करणारी श्रेष्ठ प्रणाली कोणती असे कुणी विचारले तर मी म्हणेन की, भजनासारखी प्रभावी प्रणाली दुसरी नाही! आणि हीच गोष्ट भारतवर्षातील मोठमोठ्या श्रेष्ठ महात्म्यांनी ठरवून आजपर्यंत भजनाची दैदिप्यमान प्रथा अव्याहत चालू ठेवली आहे. मला वाटते, बहुजनसमाज जर यातील महत्वाकडे वळेल तर, त्याची पुनित व सत्यमय कल्पना भजनाच्या स्थानाशिवाय कोणत्याहि मार्गाने तशी टिकून राहू शकत नाही, असेच त्याच्या अनुभवास येईल.
   
                      पद्धति आणि परंपरा

       भजन म्हणजे आपल्या विचारणीय वस्तूच्या रंगात मस्त होण्याचा मार्ग होय. ही धुंदी अधिकात अधिक वृत्तीवर परिणामकारी होईल अशा प्रकारे लक्ष्यार्थाने चिंतणे, गाणे, वाजवणे किंवा नाचणे इत्यादि सर्व प्रकार भजनातच येत असतात. या अनेक प्रकारांनी युक्त अशी भजनाची पद्धति म्हणजे तालस्वराने भावपूर्ण भजने (कवित्व) गाणे व सामुदायिक वत्तीने तसे संकीर्तन करणे, यालाच भजन म्हणण्याचा प्रघात आहे. ही मालिका ज्ञानेश्वर महाराजांपासून नव्हे तर नारदाच्याभजन-गायनापासून व भक्तिसत्रापासून चालत आलेली आहे.
             
                भजनाचे अनेक प्रकार प्रांतभेदामुळे व भाषाभिन्नतेच्या योगाने झालेले आहेत. वारकरी संप्रदायातील लोक विशेषत: मराठीत टाळ-तंबुरा मृदंग यावर भजन गातांना आपण पाहतो. कबीर,तुलसीदास, निश्चीलदास इत्यादि अनेक हिंदी भाषेच्या प्रांतातील साधूंनी कोणी एकतारीवर तर कोणी सारंगीवर वगैरे भजन-गायन केल्याचे दिसून येते.


मच्छिद्रनाथापासून किनरी व खंजरी (डफळी अर्थात डफाचे लघुरुप) यावर भजन गाण्याची प्रथा अमलात आलेली दिसते अशा रीतीने भजनाचा सामानसमूह व भाषाविलास निरनिराळा जरी असला तरी प्रेम मात्र सर्व भजनात एकच ओसंडत असलेले प्रत्ययास येते. परंतु त्या प्रेमाच्या भावनेला जे लोक विसरतात ते भजन करुनहि काहीच प्राप्त करु शकत नाहीत.

           भजनाचे सामर्थ्य व प्रस्तुतची दुर्दशा
 
             भजनाच्या सामर्थ्याने असमर्थ लोकहि समर्थ होऊन आपल्या सहित अखिल विश्वाचे खरे कल्याण करुन गेले आहेत व पुढेहि जातीलच! ,ज्या प्रमाणे अंधारात प्रकाश प्रकट झाल्यावर आपली आवश्यक (इष्ट)वस्तु वेळ न लागता मनुष्य ओळखू शकतो त्याचप्रमाणे भजनाचे प्रेममय व भक्तिमय तेज प्राप्त होताच ज्ञानासारखी अमूल्य वस्तु लाभते व ज्ञान लाभल्यानंतर परमात्मस्वरुप ओळखण्याला तिळमात्रहि वेळ लागत नाही. तसेच ते परमात्मस्वरुप ओळखण्याच्या अवधीतच जग हे विष्णुमय कसे आहे हे भजनाच्या व ज्ञानाच्या तेजाने अनुभवास येते.

                 प्रिय सज्जनांनो! हे सर्व खरे आहे; तथापि भजनाचा खरा अर्थ जाणूनच लोकांनी अवश्य भजन करावे असे सांगणे आवश्यक झाले आहे. कारण, आजकालचे भजन हे खरे भजन नसून ते शुद्ध आपल्या पोटाकरिता रडणे किंवा आपले नाव गवयात गाजवण्याचा प्रयत्न करणे अशाच स्थितीला प्राप्त झालेले दिसत आहे. हे एक कारण स्पष्ट आहे की,भजनाची आवश्यकता वाटणारास भजन गाता येणे कठीण आणि ज्यांना भजन सुंदर गाता येते त्यांना त्याची आवश्यकता वाटणे कठीण! असा याभजनाच्या बाबतीत तीनतिरपट क्रम चालू असल्यामुळे आताच्या घडीला भजन म्हणजे एक करमणूकीची चीज होऊन बसली आहे.
   
                       कार्यकर्त्यास इशारा
 
             समाजोन्नतीचे काही कार्य करावयाचे ज्याच्या मनात अनावरतेने 


येते त्यांना हे तालसूर कशाला? यांनी काय उन्नति होणार? असे वाटून, जेथे भजन चालू असेल तेथे त्याविषयी तिरस्कार निर्माण करून देणे एवढेच महत्वाचे वाटते. अर्थात भजनाची पद्धति या (आपणास इष्ट अशा उन्नतिपोषक) त-हेने चालू ठेवा असे सांगण्यासाठी त्यांना फुरसत नसते किंवा तशी सहनशीलता (उदारमतवादीत्व) नसते म्हणा!
त्यामुळे बहुधा जो उठतो तो म्हणतो काय हो! या भजनाने तुम्हा काय करणार? फक्त लोक जमतात, माना डोलवितात नि फार झाल तर म्हणतात- उत्तम भजन म्हणणारा आहे बुवा हा बुवा! यापेक्षा यात काय कार्य होतं तं सांगा पाहू! असे म्हणून चालत असलेल्या कार्यात उत्तमपणाची जुळवाजुळव करण्यापेक्षा आपल्या नावाचा गोटा टाकणेच बिचारे उत्तम समजतात! 
        
                 मी म्हणतो- अरे होय बाबा! निदान तुझ्या सत्कर्माचे त्याला डमरू तर समज, की ज्यायोगेहरिनाम ऐकण्याच्या उद्देशाने लोक एकत्र जमून येतात. तू त्यांना त्याच रूपाने व त्यांच्याच पद्धतीतून तुझा उन्नतीचा मार्ग कोणता आहे तो का सांगत नाहीस तेथे? तुझ्या व्याख्यानात तरी किती लोक जमतात? येऊनजाऊन पंचवीस ना पन्नास, हद झाली बहुमतांची! आणि त्यातहि तुझे कार्य म्हणजे विधायक सत्यचर्चेपेक्षा टाकाचाच बाजार फार!! परंतु या अशा अनेक अडचणीतूनहि जे लोक काही का होईना- निदान भजन करतात त्यांची धन्यताच होय म्हणावयाची !
      
               हे भजन की मूर्तिमंत विडंबन?
     
         पण त्यांना धन्यता देऊन त्यांच्याकडून भजनाचे कार्य उत्तम घण्याची मात्र आवश्यकता आहे; नाहीतर       आज त्या भजन चाव ऐकणारांची स्थिति पाहन कुणालाही हसू आल्याशिवाय नाही. काय तो मंदिराचा गादलेला गाभारा! किती दिवसापासून,अचान केरसुणी पाहिली नसे। खालीवर जाळी (कोळीष्टके) धरलेली,



त्यातच एका जुन्या समाधिस्थ महात्म्याची झोपण्याची जीर्ण गादी पडलेली, जिला कधीहि स्वच्छ चादर दिसली नाही व जी किड्याकिटकुल्यादिकांनी बुजबुजलेली आहे अशी! त्यासमोरचे दिवठाण अत्यंत काळे व गंदे (घाणेरडे) झालेले आणि भूमि तैलाभ्यंग करून बसलेली तेलकट झालेली! अशा स्थळी असे भजनवाले उभे राहणार की ज्यांनी शिस्तीचे नावच कधी ऐकलेले नाही. त्यात तो फुटक्या टाळांचा आवाज आणि पखवाज म्हणजे जणु काय कुंभाराच्या घरचे मडकेच!

       अशा स्थितीत स्नान न करिता-किंवा काकस्नान करुन आलेले व भजनापेक्षा भोजनाच्याच फिकिरीत असलेले लोक तेथे भजनासाठी तत्पर असलेले पाहन ऐकणारांची चिकार गर्दी व्हावयाची! अर्थात गावातील बेकार व मरणाच्या मार्गाला लागलेले आणि ज्यांना समाजाची व स्वत:च्या उन्नतीची मुळीच पर्वा नाही असे पाचचार म्हातारे बसावयाचे! आणि त्यात दोनचार तरुण असलेच तर त्यांचे भजन म्हणजे इकडे तिकडे पाहणे व प्रत्येकाची हसीमजाक (हास्यविनोद किंवा थट्टामस्करी)। उडवणे आणि फारच अवधान किंवा रसीकत्व दाखवावयाचे झाल्यास कोणा भजनवाल्याने एखादी तान मारली की यांनी ओहो! म्हणून आनंद व्यक्त करणे! एरवी कोणालाच भजनवाले काय रडतात याचे भानहि नसते. कित्येक बाया भजन ऐकण्यास येतात. त्यांचे भजन म्हणजे वाता करीत बसणे, आपल्या घरच्या गप्पा मारणे व याची त्याची उगीदगी काढणे, यापूढे त्यांच्या भजनश्रवणाचा मार्ग संपला! अशा प्रकारच्या कळवळ्याचे भजन घंटा दिड घंटा झाले की भजनवाल्यांना चहाची आठवण झालीच समजा!

            एक म्हणतो- अहो! आवाज बसला आता. काही होऊ द्या चहाबिहा! दसरा म्हणतो - अहो! चहाने किती वेळ दम धरणार? एखादी शंकरजीची बूटी उडवू म्हणजे ठिक होईल. सांगा जरा यजमानाला?


          तिसरा म्हणतो- कशाला इतका वेळ भजन? आता   करा ना आरती ऐकणारे म्हणतात-काय हो प्रसादबिसाद नाही का भजनात? आळस आला बुवा ऐकता ऐकता! यजमानहि मोठ्या आस्थेने म्हणतो अहो, मला तरी काय गरज आहे भजनाची? आमच्या गुरुने उगीच लावलेली परंपरा चालवावी म्हणून चालवतो, दसरे काय? फोडाना झोप घेत घेत तंबुरा, मला काय त्याचे? परंतु मी नाही तुमची वरवर(अजीजी) करणार!

                अशा प्रसंगात एखादा सुशिक्षित येतो व तो थाट आणि त्या स्थळाची स्वच्छता पाहून मनास आली तशी टिका त्या भजनावर, देवावर व त्या यजमानावर करु लागतो. तो म्हणतो-छट्! भजन म्हणजे गाढवांचा गोंधळ आहे हा! पण तो त्यात सुधारणेचा मंत्र मात्र सांगत नाही.म्हणतो-आपल्याला काय करावयाचे आहे याचे? भोंदू आहेत ही सर्व भजने नि भजनवाले! अशा दोन हिताच्या गोष्टी सांगून तो निघून जातो.
  
             बरे, काही स्थानी उत्तम भजनहि होते ते सुद्धा मान्य केरु; पण त्या ठिकाणी भजन गाणाऱ्यासहित सर्व काही विकत आणावे लागते, कारण ज्याचा धंदाच भजन करुन आपला निर्वाह चालविण्याचा आहे त्यांना भजनाची कळकळ काय? अशी विचित्र परिस्थिती भजनाच्या बाबतीत झालेली आहे. त्यामुळे समाजातून भजनाचा अर्थ कळणे मुष्किल व त्यातहि त्याला लागणारी व्यवस्था तर फारच मुष्कील असे होऊन बसले आहे .                                                             
                    कीर्तन नव्हे-हृदयकर्तन!
            
              एखाद्याप्रसंगी कोठे उत्सव किंवा काला होत असता तेथील भजनात येत असतात किर्तनकार! त्याचा पेटंट विषय म्हणजे श्री कृष्णचरीत्र ! बस बस. त्याचे निरुपण तर विचारुच नका! जगातील सर्वात एक नंबरचा चोर आणि जार जर कोणी असेल तर तो श्रीकृष्ण या भावार्थानेच किर्तनात चिकार गर्दी लोटलेली व बुवाहि त्यातच बेधुंद


रंगलेले! काय ती मजा किर्तनाची!! वाहवारे रंग! कन्हैया, मत मारो पिचकारी! मोरी लाल भई सब सारी॥ वगैरे पदांनी कीर्तनात अगदी बहार उडायची! वाहवारे कीर्तनकार!! ज्यांना गौळणीतील एका
अक्षराचा अर्थ कळत नाही त्यांनी इतके रंगुन कीर्तन करावे की ज्यामुळे ऐकणारे लोक भराभर बायांच्याकडे पाहून हसतानाच दिसावयाचे.लोक हसले की कीर्तनात मजा आलीच म्हणून समजा! अशी वेडी समजूतच बहुदा अनेक कीर्तनकारात सापडते. त्यांना श्रीकृष्णाच्या वीरकृत्याचा धडाच जणु काय पाठ नसतो अशा त्या उत्सवात सत्परिणामाऐवजी वाईट परिणामच जनमनावर अधिक व्हावयाचा, मग काय सांगे तो उत्सव!असे उत्सव न केलेले काय वाईट?असली घातक परंपरा लोकांच्या भावनेतून अवश्य निघून जावयास पाहिजे आणि खरे भजन म्हणजे काय याची जाणीव ज्यायोगे होईल अशा परिणामकारक आदर्श भजनांची व कीर्तनाची उन्नत प्रथा भजनी लोकात पुन्हा सुरु व्हावयास पाहिजे.
     
                 महत्वाच्या विधायक सूचना

                 प्रिय सज्जनांनो! भजनाचे अनेक संप्रदाय असलेले चालतील, पण भजनाची शिस्त व वागणूक याची हेळसांड करणारे मात्र संप्रदाय नकोत. भजन कोणत्याहि संताचे चालेल, पण तत्वात मात्र फरक असू
नये, पोथी कोणतीहि असल्यास हरकत नाही, मात्र त्यातील अर्थभाव समाजाच्या सुव्यवस्थेचा व व्यक्तीच्या उन्नतीचाच असावयास पाहिजे. भजनी मंडळी कोणतीहि असल्यास चालेल, परंतु भजनातील अर्थ व भक्तिभाव जाणून अंत:करणावर परिणाम करुन घेणारीच असावी. कथाकीर्तन कितीहि चालली तरी मान्य करु, पण कोणत्याहि कथाकीर्तनात आजच्या प्रसंगाच्या आपत्तीच्या व अधर्माच्या अडचणीतून निघणाऱ्या मार्गाशिवाय, वीरवृत्ति व सत्कर्माचरणाशिवाय, उगीच मत पकरो मोरी लाल चुनरिया अशा रंगाचे (शृंगार रसाचे) व सदर्थबोध न होणारे किंवा अर्थ न समजता म्हटलेले गाणे मात्र नको.


              मला त्या संतांच्या काव्याबद्दल जरी काहीच बोलवयाचे नसले तरी, आजच्या समाजाला त्याचे अनर्थाच्या पलिकडचे भाव मात्र लवकर कळत नाहीत व अर्थ ध्यानात न आल्याने अक्षरश: अनर्थ झाल्याशिवाय रहात नाही. त्याकरिता मी भजनी मंडळीला प्रेमाची सूचना करु चाहतो की, आपणास जर खरोखरच भजन म्हणावयाचे असेल तर लोकात कर्तव्यतत्परता आणि ईश्वरभक्ति वाढवणारी संतांची उज्ज्वल चरित्रे नि शूर पुरुषाची व पतिव्रतांची आख्याने यांना अनुलक्षुन असणारी वसर्वस्वी उन्नत करणारी अशी भजनेच आज म्हणावयास पाहिजेत. तेवढे धाडस नसेल तर करुणापर आणि बोधप्रद अशी भजनेच प्रस्तुत केली पाहिजेत.
    
              प्रिय सज्जनांनो! भजनासारखी आदरणीय वस्तु जगात कोणतीही नाही. अर्थात अशा भजनाचे स्थानहि आदरणीय असे म्हणजे आदर्शच असावयास पाहिजे की ज्यात पान-सुपारी, बिडी, चहा इत्यादि व्यसनांना मुळीच वाव असू नये. भजन ऐकणारानेसुद्धा आपले बसण्याचे व ऐकण्याचे आसन स्थिर, शिस्तीत व रांगेत असणारे आणि संयमी असे करावयास पाहिजे. भजनाचा कार्यक्रम आळस येईल इतका दीर्घ (फार वेळ)कधीहि होऊ नये. भजनाची जागा-देऊळ असो, मंडप असो वा नदीकिनारा असो परंतु अत्यंत स्वच्छ नि आल्हाददायक तशीच उच्च भावना हद्दीपित करणारी अशी पवित्र असावयास पाहिजे आणि येथे जमलेला समाज कवायत-पद्धतीनुसार अत्यंत विनम्र नि व्यवस्थेशीर बसलेला असावयास पाहिजे. भजनाच्या स्थळी निघणारा आवाज जणू त्या सर्व लोकांच्या उत्कट भावनातून निघालेला प्रेमातुर स्वरच आहे की काय असे वाटावयास लागले पाहिजे. अशा पद्धतीने केले जाईल तरच ते आदर्श सामुदायिक भजन किंवा नामसंकीर्तन म्हणता येईल.
           
                       व्यवस्थेची आवश्यकता
     
               प्रत्येक जमावाच्या जागी सेवका ची जरुरी असतेच. तेव्हा भजन तेथे व्यवस्थापक दल असावयास पाहिजे. व्यवस्थेशिवाय


भजन करुन अव्यवस्था करणे हे भजन करुनहि भजनाचा अनादर करण्यासारखेच असते. ज्यांना भजनाची व्यवस्था करणे शक्य होत नसेल त्यांनी भजन करुन आपल्या भक्तिमार्गाचे हसे करुन घेऊ नये. भजनाच्या प्रेमाकरिता जरी व्यवस्थेची जरुरी नसली तरी, समाजसोयीकरिता त्या गोष्टीची अत्यंत जरुरी असतेच.ज्यांना व्यवस्थेशिवाय भजनकरावयाचे त्यांनी लोकांच्या जमावात भजन न करिता एखाद्या पहाडात किंवा खोलीत बसून (म्हणजे मनात, वनात
किंवा कोनात) भजन करणे बरे पण ज्यांना बाहेर (जनात) भजन करणे असेल त्यांनी व भजन ऐकणारांनी अत्यंत आदराने. शांततेने व शिस्तीनेच भजन करावयास पाहिजे.मनुष्यस्वभाव जेवढा तत्वाकडे न पाहणारा असतो तेवढाच तो बाह्यपरिस्थितीचा परिणाम करुन घेणाराहि असतो.या गोष्टीला दृष्टीसमोर ठेवून त्यासाठी, ज्या स्थानात जी भावना रममाण किंवा निर्माण करावयाची असेल त्या स्थानी, तशी व्यवस्था करणे हे त्या समाज जमविणाराकडेच येते. आमच्या येथे नामसप्ताह आहे,आपण सर्वजण अवश्य या असे म्हणण्यात काही विशेष नाही, परंतुआलेल्या समाजाला नामाचे यथार्थ महत्व सक्रियतेने कसे दाखविता येईल आणि त्यांच्या मनावर एकंदरीत सर्वच प्रकारांनी पावित्र्याचा परिणाम कसा करुन देता येईल हीच मोठी जबाबदारीची गोष्ट आहे.
         
                गोपालकाल्याची अमर माधुरी
 
  मी अनेक उत्सवात भजनाला गेलेला मनुष्य आहे. माझ्या पाहण्यात असे आले आहे की, लोक मेंढराप्रमाणे कसेतरी जमतात नि काला वाटणे म्हणजे तर गुरांच्या पुढे लांबून चारा फेकण्याप्रमाणेच असलेले आढळत येते. असतो काला पण भासतो शिमगा। ही स्थिति खरोखरच जर तत्वाने अशीच ठरविली असती तर तीत आतापर्यंत शिकत राहण्याची सोयच नव्हती. पण तो उपक्रम ज्या संतमहंतांनी सरु केला त्यांचा मुळात  एवढाच उद्देश होत की अनेक कार्यातील (व्यवसायातील)


लोक एका विचाराच्या किंवा भावनेच्या पातळीवर जेव्हा एकत्र होतात तेव्हाच खरा ऐक्यत्वाचा परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन, भगवान श्री कुष्णाच्या जीवनचरित्राच्या आधारे लोकात ऐक्य व प्रेमभाव, आपुलकी व संघटना ज्यायोगे वाढेल असा परिणामकारक पाठ दिला जावा, हाच मंतांचा उद्देश व यालाच खरोखर सामुदायिक काला म्हणतात, आणित्याचे प्रतीक किंवा निमित्त म्हणून हा दहिपोह्यांचा प्रसाद सर्वांचे तोंड गोड करावे या उद्देशाने समोर मांडलेला असतो. हा विचार जे लोक जाणत नाहीत त्यांनी कितीहि कालापोहे मडक्यात घालून केलेला असला तरी काहीहि होणार नाही, अशी माझी समज आहे. त्या व्यापक उद्देशाला मानवाईक व परिणामकार स्वरुप आल्याशिवाय त्यातील खऱ्या आनंदाला तो काला नि ते भजन कसे प्राप्त करुन देणार?
 
          हे सर्व उपक्रम लोकात नीतिधैर्य, वीरता आणि संघटना वाढविण्यासाठीच संतांनी सुरु केले आहेत. परंतु लोक त्याचा वेड्यासारखा विपरीत अर्थ घेऊन भजनाच्या सर्व परंपरेलाच कलंक लावणारे वर्तन करितात ही केवढी खेदाची गोष्ट आहे! मला विश्वास वाटतो की,अजुनहि ती परंपरा आपण आपल्यापरीने भक्तिभावाने व कार्यतत्परतेने सुधारली तर अनेक भक्तिभावाला आचवलेले लोकहि त्यात भाग घेतील नि अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत सर्वच आपल्या धर्मभावनेने चा भजनाच्या मार्गास लागतील किंबहुना आतुरतेने प्रार्थना करतील!
  
                  नव्या प्रथेची हेतु-मीमांसा                                                      
   प्रिय मित्रांनो! मला कोणत्याहि भजनाची कोणतीहि परंपरा मोडावयाची नाही परंतु प्रत्येकाने त्यात महत्वाने (जबाबदारीने) भाग घेऊन ती तात्विकता त्या संप्रदायात अवश्य दाखवावयास पाहिजे, एवढेच मला सांगावयाचे आहे. कारण, मला दु:खाने म्हणावे लागते
की आज भजनाला तमाशे, नाटके व सिनेमे याचे ढंग (रंगत किंवा सला) प्राप्त झालेले आहेत अर्थात ही गोष्ट (सिनेमाच्या भावनेने केलेले


भजन) भजनाला बिघडविणारी आहे.

                 यावर कदाचित कोणी म्हणतील-काय हो, तुमच्याच तो भजनात सिनेमाच्या चाली म्हटल्या जातात, मग याची सुधारणा का करीत नाही? मी म्हणेन-हा सर्व भाव परिस्थितीच्या परिवर्तनाचा आहे.
जुने लोक ज्या चालीवर भजने म्हणतात त्या चालीवर लावण्या-ठुमऱ्या नसतील काय? चाल जुनी झाली की ती देवभक्तीची आणि नवी निघाली की ती मात्र वाईटच, असे कसे म्हणता येईल ? आणि जुनी भजने देखील अनेक लोक कालानुरूप प्रवृत्तीमुळे मोडून तोडून नव्या चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करतातच की नाही? त्यापेक्षा सरळ तेच भाव नव्या चालीवर व्यक्त केल्याने काय बिघडते? हजारो मुले जमुनाजलि खेळू खेळ हे पद म्हणतांना जो भाव डोळ्यासमोर ठेवीत तो बदलण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला हे काय वाईट झाले? मी त्या पदास कलाटणी देऊन त्याच चालीवर दुसरे पद म्हणावयास सांगितले की 
         व्हा उभे धर्म-रक्षणा, धैर्य हे का सोडता?।
         गर्ज द्या वीर-गर्जना, मार्ग हा का मोडता?।।
                   चमकू द्या रक्त वीरांचे।
                    उघडु द्या कर्ण शुरांचे।
                     फोडु द्या भंड क्रूरांचे।
         द्या प्राण रणी खोवुनी, हात हे का जोडता?
                    (अनुभवसागर भजनावली, भ.नं.-३१२)

               केवळ चालीच्या मोहाने जरी कोणी ते पद्य म्हणत बसतील तरी त्यांच्या कानात मात्र शूरतेचीच हाक दुमदुमणार् आहे . ती नव्हे की- कन्हैया, का लाजता?
         
                   जुन्या पथा वर नवी पदे
  
             मी म्हणेन, चाली कितीहि नवीन असल्या तरी त्या बोजदार व मनाला उच्च लक्ष्यार्थाकडे नेणाऱ्याच असावयास पाहिजे मग त्या


सिनेमातील असोत वा  कोणत्याहि असोत, पण त्या भाव मात्र गौळणी च्या नावाने विषयमोहाकडे नेणारे मुळीच असता कामा नये. मी तर भजन म्हणणाऱ्या भाविकवृंदांना असे सांगू शकतो की, त्याकाळच्या भजनात संतांनी फुगड्या म्हणून देखील लोकांच्या कानावर परमार्थ धडा ज्याप्रमाणे घातला, त्याप्रमाणे आजहि नवीन चाली म्हणून सुद्धा आपण समाजात कार्यतत्परता व चेतनावत्ति निर्माण करून  तोच संतमहंताच्या उपदेशाचा मार्ग भजनानें, आचाराने व चिंतनाने आणि व्यवहाराचे परमार्थाशी ऐक्य घडविणाऱ्या विकासाच्या सर्व कार्यानी उज्वल करीत आपल्यासहित समाजाचे हित परमेश्वराला स्मरूण करु
शक. यासाठी तो जगच्चालक प्रभु या भजनाच्या व प्रार्थनेच्या रुपाने किंवा निमित्ताने आपली नवीन स्फूर्ति भाविकांना देऊन भजनाचीच नव्हे तर कर्तव्याची उज्ज्वल परंपरा जगात जागती ठेवो, एवढीच प्रार्थना
करुन माझे भजनाविषयीचे हे स्फूर्त विचार भजनी भाविकांच्या चरणी समर्पित करितो.

(श्रीगुरुदेव- डिसेंबर १९४३)

                             * * *