मंदिराचे मूळ तत्वज्ञान व सध्याचे विकृत स्वरुप
                            (उत्तरार्ध)
    
           हरिजनांकरिता हरिमंदिरे खुली करा!
       
          भक्तीच्या क्षेत्रात जातीचे अकांडतांडव
 
             प्रिय मित्रांनो! मला असे पुष्कळ दिवसापासून वाटत असे की समाजातून हा अस्पृश्यतेचा रोग निघून जावा, धर्मावरील हा अन्याय विषमतेचा कलंक धुतला जावा; आणि चर्चेतून त्या गोष्टीला चालना देखील मी देत असे पण कुणाच्या मनावर एकदम आघात तरी का
करावा या विचाराने माझ्या कृतीत तीव्रता मात्र येत नव्हती. परंतु दिवसेंदिवस समाजाचा संबंध जसजसा अधिक प्रमाणात माझ्याशी येत गेला, तसतशी वस्तुस्थितीची कटुता अधिकाधिक प्रत्ययास येऊ लागली.माझ्याने स्वस्थ राहवेना तुमचा हिंदुसमाज असा कसा असे कुणी म्हटल्यास मी लज्जायमान होत असे. नंतरच्या काही घटनांनी लज्जेचे है कारणच नष्ट करण्यासाठी मी लौकर काही तरी केले पाहिजे याची तीव्र जाणीव मला करुन दिली. त्या घटनापैकी मंदिरप्रवेशासंबंधीची घटना मी पुढे देत आहे.
 
       एकदा पंढरपुरास विठ्ठलमंदिराच्या महाद्वाराजवळ मी उभा असता, तेथे अत्यंत शुद्ध भावाने व शुचिर्भूत पणे गंधमुद्रा धारण करुन नामघोष करीत आलेले काही भाविक लोक मला दिसले. त्याचा मोरक्या एका पोक्त माणसाला केविलवाण्या स्वरात विचारित होता की - काय हो, आम्ही देवाचे दर्शन लांबनहि घेऊ शकत नाही काय? आम्ही चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने स्नान करुन आलो आहोत. कपडे वगैरे ओलेच आहेत आमचे. फार फार लांबचे राहणारे आहोत आम्ही! 
तो गृहस्थ म्हणाला- वेड्या! कुणी अडवला आहे तुला? जा की


धस ना वर! हे शब्द कानी पडताच आनंदाने गहिवरुन ते त्वरेने नामदेवाच्या पायरी वर चढले इतक्यात त्या गृहस्थाला एकदम स्फूर्ति । आली नि तो म्हणाला-अरे पण जातीने कोण आहात तुम्ही? ते केविलवाणीन म्हणाले-आम्ही हरीजन आहोत साहेब! हे ऐकताच 
त्या माणसाला अनावर संताप चढला. त्याने ओरडून त्याची पताका. हिसकली आणि त्या काठीनेच दोन सपाटे मारुन त्याला खाली ओढले. ते दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटले मला. त्या बाबतीत काही लोकात
मी चर्चाहि केली आणि स्थिति सुधारण्याचा मार्ग शोधू लागलो; पण अन्य कार्यक्रमामुळे त्यात काही व्यत्यय येत गेला.
     
           श्रीसंत गाडगे महाराजांची तळमळ
 
          सुमारे दोन वर्षापूर्वीची गोष्ट संत गाडगे महाराज एकदा मला म्हणाले-काय हो, सर्वाकरिता देऊळ उघडे करण्याच्या बाबतीत आपणाला काय वाटते? मी म्हणालो- महाराज ! देव सर्वांचा आहे आणि सर्वांनी त्या देवाचे दर्शन हक्काने घ्यावे असे मला वाटते
ते म्हणाले- मग तुम्ही त्याचा प्रयत्न का करीत नाही? मी उत्तर दिले-मतपरिवर्तनाच्या दृष्टीने माझ्या परीने माझा प्रयत्न चालू आहे. वेळ येईल तेव्हा जाहिरहि करता येईल. या उत्तरास पुरता एक वर्षाचा अवधि लोटण्यापूर्वीच, पंढरपूरास मजकडे काही जनसेवाप्रेमी लोक आले व देवदर्शनाबद्दल आपण काही लिहून द्या असे म्हणू लागले. मी त्यांना लिहून दिले की- देवाचे द्वार हे मानवमात्राला खुले असाव असा देवाचा पवित्र संदेश आम्ही गीतेसारख्या उज्ज्वल ग्रंथातून व संताच्या वेदतुल्य वाणीतून ऐकतो.अर्थात त्याचीच मी आपणास मोकळ्या मनाने आठवण करुन देऊ इच्छितो. माझे ते विचार वाचून त्यांनी म्हटले- आपण जनतेसाठी असे फर्मानच का काढीत नाही? मी म्हणालो-फर्मान नाही. पण तशी विनंती करण्यास मी तयार आहे.कराना माझे नावावर आपणच हे जाहिर!


        सनातनी ब्रम्हवंदाच्या न्यायासनासमोर
 
            ठरल्याप्रमाणे त्यांनी तसे जाहिर केले. ते वृत्त काही सनातनी पंडितांना कळताच त्यांनी मजकडेअशा आशयाचे एक पत्र पाठविले की- मंदिरप्रवेशाबद्दल जर तुमचे असे विचार खरेच असतील तर, सनातनी ब्रम्हसमाजाच्या न्यायसिंहासनासमोर तुम्हाला उभे करण्यात येईल आणि त्याविषयी चर्चा करतांना शास्त्रार्थाने ती गोष्ट तुम्हास सिद्ध करावी लागेल. उत्तर काय ते जरुर व लौकर द्यावे. यावर मी असे उत्तर लिहिले की- पंढरपूर येथील न्यायप्रिय व सनातनी ब्रम्हसमाज म्हणवणाच्या समितीला माझा सप्रेम जयगुरु! आपण ज्या बाबतीत मला विचारीत आहात, हे विचार माझे स्वत:चे असून वैयक्तिकरित्या पूर्ण विचारांती घेतलेले ते निर्णय आहेत. डोळे लावून ग्रंथांचा हवाला देण्याची मला आदत नाही. मी धर्मगुरु म्हणून आचार्य नाही किंवा सत्ताधीश म्हणून ऑफिसर ही नाही; त्यामुळे लोकांना हट्टाने द्वार उघडे करुन मंदिरात नेता येणे मला शक्य नाही. पण आपले स्वतंत्र
विचार स्पष्टपणे समाजापुढे मांडण्याचा जगातील प्रत्येक मानवाला हक्क आहे; त्या दृष्टीने मी आपले विचार आपणास कळवीत आहे की सद्भावाने आलेल्या कोणत्याहि आर्त मानवप्राण्याला देवदर्शनाचा निबंध असणे उचित नाही. तो संतांच्या इच्छेचा. ईश्वराच्या न्यायाचा व मानवतेच्या धर्माचा अपमान आहे असे मला वाटते. हे विचार प्रगट केल्याशिवाय माझ्या मनाला राहवत नाही; यावर आपण आपल्या विचारानुसार पाहिजे ते जाहिर करण्यास स्वतंत्र आहात. गडेहो! देव सर्वाचा आहे असे मी स्वप्नात देखील निश्चयाने सांगेन.
    
        पतितपादन नव्हसी म्हणुनी जातो माधारा
  
          वरील आशयाचे पत्र मी पाठवले. शब्दात बदल असेल पण अर्थ हाच होतो असे मला आठवते. सदई पत्राचे उत्तर आलेच नाही त्यानंतर यंदा यात्रेस जाण्यापूर्वी मी ठरवले की, जेथून सर्व लोक दर्शन


घेऊ शकतील तेथूनच आपणहि देवाचे दर्शन घ्यावे. त्यापुढे पाऊला  टाकण्याचाआम्हाला तरी काय अधिकार आहे? आणि जोवर तेथील विशिष्ट जातीत जन्मणे हा गुन्हा ठरवून देवाच्या भाविक लेकरांची देवाशी ताटातूट करण्याचा अघोर अन्याय करीत आहेत, तोवर यांच्याबरोबर आत जाण्यात तरी कोणते महत्कार्य साधणार आहे? या उपेक्षित लेकराबरोबर दूर उभे राहणेच आपले कर्तव्य असून, तेथूनच त्या दिनवत्सल पतितपावनाला प्रार्थावे की- हे परम जगदीशा
विठ्ठला। लुझ्या दरबारात हा अमंगल अन्याय-ही अमानुष विषमता का? हे तुला पाहवते तरी कसे? काय तू आमच्या भक्तीची कसोटी पाहत आहेस? भेदाभेदभ्रम अमंगळ म्हणणाऱ्या तुकारामाचा,
जातिअप्रमाण ठरवणाऱ्या ज्ञानेश्वरांचा, कुत्र्यासहि विठ्ठलस्वरुप समजून संतुंष्ठ करणाऱ्या नामदेवाचा आणि गाढवाच्या मुखात गंगा ओतून पवित्र अपुश्याचा नैवेद्य स्वीकारणाऱ्या एकनाथाचा मोठ्या भावाढ्यतेने नामोच्चार करणाऱ्या आम्हा वैष्णव म्हणवणारात विष्णुमय जग पाहण्याची दृष्टि कितपत शिल्लक आहे या अन्यायाचा प्रतिकार किंवा तिरस्कार करायला आम्ही कितपत तयार आहोत-याचा अंदाज तू पाहत आहेस का? भगवंता! सर्वाच्या हृदयात विवेक निर्भून तूच आता हा अन्याय दूर कर! सर्वांना आपल्या दर्शनाचा लाभ घेऊ दे व आमच्या भूषणभूत धर्माचा प्रकाश अशाप्रकारे उज्ज्वल कर!!
    
          ठरवल्याप्रमाणे, मंदिरात न जाता हरिजनबांधवां बरोबर मी बाहेरच थांबलो, बडवेमहाराज मला नेण्याकरिता आले. तेव्हा मी विचारले अशी एखादी जागा आहे काय की जेथून प्रत्येकजण लांबून का होईना देवाचे दर्शन घेऊ शकेल?  ते म्हणाले-नाही महाराज! फक्त आफिसर (सरकारी अधिकारी) मात्र वरुन एका छिद्रातून दर्शन घेऊ शकतात, मग ते कोणत्याहि जातीचे वा धर्माचे असोत. त्यावर मी म्हणालो-मी काही ऑफिसर नाही, तेव्हा प्रदक्षिणेच्या जागेवरुनच मी देवाला नमस्कार करीन. कळसाचे दर्शन सुद्धा देवदर्शनासारखेच श्रेष्ठ


समजले जाते. अखेर माझ्या निश्चयाप्रमाणेच यावर्षी मी केले व लोकात त्यामुळे विचारचक्र सुरु होऊन या बाबतीत अनुकूल प्रवाह निर्माण होण्याची आशा घेऊनच पंढरपुराहून परतलो (आषाढी यात्रा शके १८६८,जुलै सन् १९४६)
     
          धर्मविषयक भ्रम आणि सत्तेचे गुलाम
 
              मित्रांनो! मजजवळ अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, देवळात वाटेल तसा अमंगळपणा व अनाचार-तीर्थाच्या ठिकाणी देखील चालत असलेला राजरोस खपून जातो; पण अट असेल तर एवढीच की देऊळ त्यांना खुले व भाविक हरिजनांना बंद! सरकारी ऑफिसर म्हटला की अट ढिली झाली आणि अन्य धर्मात पाऊल टाकले की सवलत मिळाली, हा न्याय आहे कि न्यायाची विटंबना!! स्पृश्यापृश्यतेच्या बाबतीतील अशीच एक विचित्र घटना मला माहीत आहे. एका गावच्या बाजारचौकातील विहिरीजवळ एक परधान पाणी मागायला म्हणून आला. गावची नदी आटलेली होती आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नव्हती. प्रत्येक विहिरीवर पाण्याची भीक मागत ते लोक तासनतास उभे राहायचे. स्पृश्य लोक पाणी पिऊन अथवा घेऊन भराभर जात होते पण त्याच्या केविलवाणीच्या मागणीकडे लक्ष देण्याची जरुरी कोणालाच वाटत नव्हती. तो तहानेने व्याकुळ झाला होता. इतक्यात एक मियासाहेब जवळन जातांना त्यास दिसले व त्यांनी काही रदबदली करावी म्हणून तो आपली हकीकत त्यांना सांगू लागला. मिया म्हणाले तूभी बडा बेवकुब है। अरे चल मेरे मसजीदमे, मै अभी तुझे एक कलमेसे मुसलमान बना देता हैं, फिर कुआ तेरा है! मियाने त्याला नेले, पंधरा मिनिटात एक लाल तुका टोपी डोक्यावर चढवून परत आणले आणि स्वत:समक्ष विहिरीवर चढून पाणी ओढावयास लावले. आमचे स्पृश्य बंधू हे स्थित्यंतर मुकाट्याने पाहात होते.


केवढी ही आमची धार्मिक उदारता की आमचा धर्मबंधू तो आमचा म्हणवतो तोपर्यंत-पाण्याजवळ बसूनहि तहानेने खुशाल तडफडावा त्या धर्मात पाऊल टाकताच तो कायमचा पाणी ओढणारा ठरायला उशिर
लागू नये! एका क्षणात त्या अस्पृश्यतेच्या नि विटाळाच्या आमच्या थोर कल्पना कोणत्या महत्वाच्या फरकामुळे इतक्या बदलून जातात? या हास्यास्पद वागणुकीत खरोखरच काही तत्वांची निष्ठा लपलेली आहे काय? वास्तविक या सर्व गोष्टीत आमचा शुद्ध अभिमान, आमचे याविषयीचे अज्ञान, आमची मानव्यहीनता आणि मनोदौर्बल्यच दिसून येत नाही काय? मग, अंधपणाने या चालू ओघात वाहणे हा धर्म की आमचे हे दुर्वर्तन नाहीसे करणे हा धर्म?-याचा विचार आपणच करा!
    
      सगुणोपासना हवी, पण जातीय स्तोम नको!
 
           प्रिय मित्रांनो! पंढरपुरास जाऊनहि मी मंदिरात विठ्ठलदर्शनार्थ न गेल्यामुळे, मला माझ्या मित्रांनी अशी विचारणा केली की- तुम्हाला सगुणोपासना बंद करावयाची आहे असे यावरुन समजावयाचे काय?
त्यांना मी एवढेच उत्तर देऊ इच्छितो की, मला तसे काहीहि करावयाचे नाही. स्थानपावित्र्याची मला जाणीव आहे व सगुणोपासनेचा हेतूहि माझ्या लक्षात आहे. तीर्थभावना वा सगुणोपासना ही भोळ्या श्रद्धावानांच्या व आर्त साधननिष्ठांच्या वृत्तीला वर नेणारी नि मदत देणारी असते; तेव्हा ती वर्गवारीची पायरी मी का तोडू? माझ्या न जाण्याचे कारण याहून निराळे आहे आणि ते दर्दैवी कारण मी प्रस्तुत लेखात व मुंबईच्या (दि.१६ जुलै१९४६) भाषणात देखील स्पष्ट केलेच आहे.
 
             समाधिमंदिरातून कार्याचे लोण
 
           पंढरपूराच्या देवळात न जाण्याच्या घटनेपूर्वी सुमारे आठ महिन्या पासून (कार्तिक पौर्णिमा शके १८६७ पासून) मी स्वतः उभारलेल्या मंदिरात जाण्याचे देखील याचसाठी बंद केले होते की, जोपर्यंत गावचे लोक हरिजनांच्या मंदिर प्रवेशासाठी तयार होणार नाहीत तोपर्यंत


देवळात दर्शनासाठी जाणे मलाहि उचित नाही. अखेर तेथील लोकांचे मजवर असणारे प्रेम त्यांच्या रुढिनिष्ठेशी झगडून विजयी झाले आणि त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे स्वसंतोषाने हरिजनांना हाती धरुन मंदिरात दर्शनासाठी नेले व मार्ग मोकळा केला (दि.७ ऑगस्ट १९४६) त्यानंतर वरखेडचे हे लोण सेवामंडळाच्या शाखोपशाखातून अनेक गावी पोचले व लोकात विरोध निर्माण होईल असा दाब न टाकता, सर्वांना अनुकूल करुन घेऊन मंदिरे खुली करण्याचे कार्य झपाट्याने सुरु झाले .                                                                          
            विविध साधनाविषयी माझा दृष्टिकोन 

               मित्रांनो ! देवळे ही समाजात देवत्व निर्माण करण्यासाठी आहेत त्यात केवळ अंधश्रद्धा व जातीयतादि गोष्टींना महत्वाचे स्थान प्राप्त होणे यात ऋषिआदेशाचा व पतितपावन प्रभूच्या न्यायाचा अपमान आहे.आज आमच्या अनेक देवळाची अशी जी पडती परिस्थिती आहे ती दुरुस्त व्हावी, त्यांना तात्विक वळण लागावे, म्हणून मी श्रीगुरुदेव सेवामंडळा द्वारे हा प्रयत्न सुरु केला आहे. देवळाविषयीची यथार्थ भावना आपल्या अंगोपांगांसह लोकात निर्माण व्हावी आणि त्यांच्या व्यवहाराची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसावी या दृष्टीनेच सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम मी सुरु केला आहे. जगातील अनेक साधने, ज्यांचा त्यांचा प्रकृतिस्वभाव लक्षात घेऊन मला पाहिजेच आहेत; पण ती तत्वाशी विसंगत आणि परस्परविरोधक अशी असू नयेत व मुळात असणारहि नाहीत. आम्हाला, जगात येऊन गेलेल्या सर्व देव, संत,राष्ट्रवीर व परोपकारी थोर पुरुषांना त्यांच्या गुणवैभवानुसार पूज्यच मानावयाचे आहे; परंतु विशिष्ट महापुरुषांच्या नावाने परस्परविरोधी गट पाडून मात्र उपयोग नाही. ही सर्व साधने व स्मृतिचित्रे आम्हा सर्वास मानवतेच्या प्रेमसूत्राने बांधणारी वआपणा बरोबरच सर्वांची उन्नती करण्यास प्रवृत्त करणारी ठरली पाहिजेत, मी मोठा नि तू हीन ही दृष्ट विचारसरणी आमच्यात राहता कामा नये. पडल्यास लोटून देणे हा दृष्टपणा असून,पडलेल्यास उचलून हृदयाशी धरणे यातच खरे थोरपण आहे!


             दैवीशक्तीसाठी मंदिरोद्वार करा!
 
          सत्प्रवृत्ति किंवा दैवी शक्ति ही विशिष्ट धर्म, पंथ, जाति अथवा जांच्या अभिमानाने किंवा घोषणांनी प्राप्त होत नसते. विश्वबंधुत्व भावना. सत्य-न्याय-नीतीचा उत्कर्ष व महान पुरुषाचे ध्यान हाच शरीशक्ति प्रकट करण्याचा साधनमार्ग होय आणि या गोष्टीचा विकास व्हावा व तो परिणाम क्षणिक न ठरता टिकून राहावा म्हणूनच ही स्मारके मंदिरे, तीर्थक्षेत्रे व धर्माची अनेक स्थाने बांधली गेली आहेत. परंतु कालप्रवाहात मनुष्यसमाजाचा दृष्टीकोन बदलल्यामुळे, जी गोष्ट
तारक तीच आज मारक ठरु लागली आहे. याकरिता प्रत्येक खेड्यापाड्यातील, शहरातील व क्षेत्रातील मठमंदिरांना फिरुन मुळ विचारसरणीनुसार विद्याकेंद्रे, स्फूर्तिस्थाने व संघटनक्षेत्रे बनविण्याची आज अत्यंत आवश्यकता असून, सर्वाच्या मनाला आदर्शतेचा धडा
मिळण्याकरिता, सर्वात विश्वबंधुत्वभावना अधिक रुढ होण्याकरिता, तसेच आपल्याच घरातील लोकांनी आपले शत्रू न बनता मिळूनमिसळून सर्वांनी पूर्वजांच्या अध्यात्मतत्वावरअमलकरण्याकरिता व संतांची मनीषा पूर्ण करण्याकरिता, प्रत्येक देऊळ मानवमात्राला-त्यांच्या भावनांना आश्रयस्थान मिळावे म्हणून मोकळे करुन देणे अगत्याचे आहे. यामुळ पाप लागेल किंवा दोष घडेल ही वेडगळ समजूत कायम ठेवण्याइतका समाज अजून दुबळा राहील तर त्याचा अंत जवळ आला असेच म्हणावे लागेल!
 
           मंदिर-सुधारणेचे किंचित दिशा-दर्शन

          देवदर्शनाच्या बाबतीत सर्वच लोकांकरिता असा नियम करणे बरे की विशिष्ट अंतरावरुनच त्यांनी दर्शन करावे व फक्त पुजाऱ्यानेच मुर्तीजवळ जावे. मंदिरात स्वच्छता, शिस्त, गंभीरता व भावशुद्धतेचा नियम सर्वांनीच पाळावा. पुजाऱ्याच्या बाबतीत जातीऐवजी गुणकर्म शुद्धतेकडेच विशिष्ट कटाक्ष असावा. मंदिरांची संपत्ति ही रुढ पद्धतीची


सहस्त्र भोजने व व्रतोत्सव करण्यात भमरसाठ खर्च न करता, ज्या योगाने समाजाची बौद्धीक पातळी वाढेल, जीवन-निर्वाहाचा प्रश्न नेहमीकरिता सुटेल आणि सद्गुण, सामर्थ्य व आरोग्य यांची वाढ होईल अशाच कामी खर्च केली जावी. रंजल्या गांजल्याची सेवा, विविध पंथीयाचे एकत्रीकरण व गावात रामराज्य निर्माण करण्याची योजना अशा उपयुक्त कार्यात धार्मिक धनाचा विनियोग होणे हेच ईश्वराला मंजूर होणार आहे. मित्रांनो! देवळाप्रमाणेच अशा कितीतरी गोष्टीत आज परिवर्तन करण्याची आवश्यकता असून, आपल्या आसमंतातील मानवसमाज उन्नत करण्याच्या दृष्टीनेच मी मंदिराच्या बाबतीत माझे हे भावनायुक्त उद्गार प्रगट केले आहेत. त्यात कुणाच्या सगुणोपासनेवर, मठमंदिरावर किंवा क्षेत्रक्षेत्रस्थावर टीका करण्याचा माझा उद्देश नसून, सर्वांच्या हिताकरिताच प्रचलित पद्धतीत दुरुस्ती होणे आवश्यक जाणून मी हे लिहिले आहे.प्रभु सर्वांना सद्बुद्धि देवो व आपल्या स्मरणस्थानातील हा गोंधळ लयाला नेवो, हिच त्याचे चरणी प्रार्थना आहे.

(श्रीगुरुदेव-ऑक्टोंबर १९४६)

                            * * *