उपासकाची साधने वं सत्पुरुषाची लक्षणे
उचित जाणावे मुख्य धर्म आधी। चित्त शुद्ध, बुद्धि ठायी स्थिर।। (संत तुकाराम)
स्मरण, ध्यान आणि कीर्तन
स्मरण, ध्यान आणि कीर्तन यात स्थूल वा सूक्ष्म फरक काय? असा प्रश्न एका उपासकाने केला आहे. त्या बाबतीत थोडक्यात मला हे सांगावयाचे आहे की, स्मरण ध्यानाने (लक्षपूर्वक) चिंतिलेले असले व त्याचे भाव कीर्तनाने प्रगट करता आले तर, त्याचा अंत:करणावर परिणाम होऊन त्यायोगे जी विरही वृत्ति निर्माण होते तीतच चिंतनीय वस्तूचे स्वरुप दिसू लागत असते. आणि असे होत गेले की त्याच वस्तूचा संसर्ग मनास बोधप्रद होऊन मुमुक्षु त्या धारणेने प्रगत होत होत अखेर ज्याचे चिंतन करितो त्याचे कार्यहि अंगी बाणवून घेतो. निसर्गानेच त्याचे ते साहसहि वाढत असते. मनुष्याच्या जीवशक्तीची योजना ईश्वराने अशीच करुन ठेवली आहे की ज्यांची ज्याला चिंता त्याचे त्याला साहस व सामर्थ्य मिळते. जसा क्रम किंवा जसे कर्म तसा भोग हा जीवाला प्राप्त होत जातो. पण निव्वळ चिंत्य विषय निराळे आणि कार्य त्याहून निराळेच, असं जर असेल तर मात्र जन्मचे जन्म जरी त्या चिंतनाने व्यापले तरी समाधान प्राप्त होणे असंभव असते. उदाहरणार्थ बहरूपी कोणतेही सोंग त्या त्या गणवेषसहित घेऊ लागला तरी तो त्याचा व्यापार आहे आणि त्याद्वारे द्रव्य मिळविणे हे त्याचे चिंतनआहे. त्या द्रव्याच्या चिंतनातच त्याचे सर्व आवर्तन किंवा परिवर्तन होत असते. तो बादशहा बनला काय किंवा फकीर बनला काय त्याचे चिंतन एकच, ते म्हणजे हेच की पैसा उपटणे आणि आपले उदर भरणे!त्याचेप्रमाणे दुसरे उदाहरण अत्यंत आसक्त पुरुषाचे घेता येईल. इंद्रियलोलप माणसाने आपल्या विषयी उद्देशाच्या पूर्तीकरिता देव-धर्म, पोथी-पारायण
किंवा भजन-कीर्तन कितीहि केले तरी त्याचे चिंतन तमाशा पेक्षा काय अधिक किंमतीचे होऊ शकेल? एवढेच की भोळेभाबडे लोक त्याच्या त्या कोल्हाळा स कीर्तन समजून भाळतील; परंतु सतसंगी। लोक
त्यास गाढवाचा गोंधळ समजून दूरच राहतील.
या गोष्टीचा विचार करिता असा निष्कर्ष निघतो की स्मरन आणि कीर्तन यात खरे महत्व ध्यानास म्हणजे आतील चिंतनास आहे स्मरण किंवा कीर्ति गाणे याहून, हृदयापासून ध्यान करणे-सर्व भावे चिंतन करणे हे श्रेष्ठ आहे. या सर्व गोष्टीत जर काही सूक्ष्म भेद पाहावयाच असेल तर तो हाच की त्याचे चिंतन कोणते ध्यान करिते आणि ध्यानाचा परिणाम कीर्तनप्रसंगी त्याच्या वृत्तीवर काय असतो. वसुता कृत्रिमपणे केले जाणारे स्मरण, ध्यान किंवा कीर्तन यांना खरे महत्व नसून ते मनाच्या बनलेल्या वृत्तीला व हेतूला आहे नि हाच फरक स्थुल व सूक्ष्मदृष्ट्या पाहावयाचा असतो. आपल्या मनावर काहीकाळ भाव तयार करणे निराळे आणि उपजतच तसे दिसणे निराळे! कधीकाळी अभ्यासू असलेल्याचेहि भाव बदलत असतात, पण त्याला त्याचे स्मरण झाल्याबरोबर तो जागृत होतो; आणि बहिरंगी जागृत असतांहि ज्याच्यावर अंतरंगी परिणाम नसतो, असा पुरुष साधनांनीहि काही मिळवित नसतो.
अंत:शुद्धि व बहिःशुद्धि
प्रस्तुत उपासक विचारतो की त्याची अंत:शुद्धि व बाह्यशद्धि कशी? या प्रश्नाला एवढेच उत्तर देता येईल की, खऱ्या नामस्मरणाला वस्तुतः निराळी अंतःशुद्धि व बाह्यशुद्धि लागत नाही. फक्त एवढेच म्हणता येईल की, बाह्यशुद्धि म्हणजे स्थान व शरीराची स्थिती पवित्रमनन करण्याला पोषक अशी असावी लागते; आणि अंत:शद्धि म्हणजे आहार परिमित व सत्वगुणी आणि विचाराचे धोरण प्रशांत व ध्येयाच्या चिंतनाकडे नेणारे असावे लागते; हीच त्याच्या अंतबाह्यशद्धिची कारणे (साधने) होत, वृत्तीचा स्वभाव असा सूक्ष्मग्राही आहे की हिरव्यागर्द पानाकडे
दृष्टी टाकल्यास त्यांचे संस्कार तिजवर काही निराळेच होतात आणिजळत्या झाडाकडे पाहिल्याने त्याच वत्तीवर काही वेगळाच परिणाम होत असतो. आणि ते ते चिंतन वाढू लागले की तशीच धारणा बनते व धारणेने संस्कार बनले की जीव स्वत: त्याचेच रुप धारण करुन उत्तम किंवा कनिष्ट असा दर्जा मिळवित जातो. म्हणूनच संतलोक स्थानमान आणि खानपान इत्यादि गोष्टीकडेहि पाहत असतात; आणि ही गोष्ट
साधकाला तर जरुरच पाहावयास पाहिजे. पण जो आपल्या ध्येयाशी संलग्न झाला आहे-ज्याच्या बनलेल्या विचारावर कुणाचाहि ताबा चालू शकत नाही-त्याला अंत:शुद्धि नि बाह्यशुद्धि याची आवश्यकताच उरत नाही. कारण तो पारा बनलेला असतो आणि याच बनलेल्या वृत्तीच्या पुरुषाला संत किंवा भक्त म्हणतात असे भक्त इतरांनाहि सन्मार्ग लागावा म्हणून स्मरण, ध्यान व संकीर्तनादि साधने समाजासमोर मांडीत असतात .
व्यक्तिगत उपासना की सामुदायिक प्रार्थना?
यावर उपासक प्रश्न करितो की- संकीर्तनात संसर्गदोष निर्माण होतात, म्हणून वैयक्तिक प्रार्थनाच करणे बरे नव्हे काय? याचे उत्तर मी असे देऊ शकेन की, संसर्गदोषापेक्षा उलट एका प्रवृत्तीने व उत्साहाने जमलेल्या समुदायात भजन केल्याने उत्साह द्विगुणित होण्याचाच संभव जास्त! शिवाय वैयक्तिक प्रार्थनेत मनाच्या चाचल्यामुळे क्लेश वा आळस निर्माण होण्याची शक्यता अधिक! अशा स्थितीत वैयक्तिक प्रार्थनेत जर आळस वाढत असेल किंवाविषयवासना बळावत असेल तर, त्या ऐवजी समूदायात असतांना असल्या वृत्याविषयी लाज तरी वाटावयास लागेल नि आळस निघून जाऊन सर्वाबरोबर सहजच प्रार्थना होऊ लागेल; याकरिता सामुदायिक प्रार्थनाच अधिक उपयोगी दिसते. घरी शिक्षण घेण्यापेक्षा, शाळेतील सर्वच वातावरणाचा परिणाम मुलाला विद्याप्रवृत्त करणारा असतो म्हणून शाळा अधिक बरी; पण शाळेत जर का विद्येशिवाय निराळा विषय निष्पन्न होत असेल तर तेथून निघून जाणे
हेच श्रेयस्कर! याप्रमाणेच कीर्तन जर छचोरबाजीचे असेल तर तेथे न थांबलेलेच बर, असे मी म्हणेन. पण सामदायिक प्रार्थनेची योजना तर तत्वाला धरुन आखलेली असली तर मात्र तिचा परिणाम वैयाक्तिक
प्राथनपेक्षा अधिक होतो असे जर नसते तर तीर्थाचा महिमा श्रेष्ठ गणलाच गेला नसता.
प्रार्थनेचे रहस्य व वृत्तीचा अभ्यास
यापुढे प्रश्न असा करण्यात आला आहे की- ती प्रार्थना सकाम असलेली चालेल काय? वास्तविक कोणतीहि प्रार्थना ही सकामच असते. प्रार्थना याचा अर्थच याचना असा आहे; पण त्या याचनेचे भिन्नभिन्न असे दर्जे आपल्या बद्धीने ठरविलेले असतात.जसजशी बुद्धीच्या विकासाची मर्यादा वाढत जाते तसतसे उद्देशाचे उच्चत्वहि वाढत असते. पण प्रार्थनेपासून नेहमी मुख्यत: साहस म्हणजे आत्यधैर्य वाढविण्याची
अपेक्षा केली जाते आणि तेच टिकाऊ असते. प्रार्थनाच धनसंपदा देते असे जर असते तर, साधुसंत हे फकीर बनून उपवास काढीत राहिलेच नसते. एवढे मात्र खरे की, त्यांचे साहस इतके मोठे बनलेले असते की
मरणालाहि ते साधारण गोष्टच समजत असतात. एकूण सकाम भावनेने प्रार्थना करणेहि काही अयोग्य नाही पण भावनेचे सूत्र एकदा देवाजवळ पोचवून उत्तम कर्तव्यासाठी जीवापाड मेहनत केल्यावरहि जर यश आले नसते तर, अजून मला सद्भक्ताची योग्यता प्राप्त करणे आहेच असे मात्र समजले पाहिजे व पुन्हा आपली कर्तव्यशक्ती साहसाने वाढविली पाहिजे. काम अयशस्वी झाले म्हणून आपले देवच खोटे आहेत असे
समजण्याची चूक कदापि होऊ नये; परंतु बहुतेक सकामिकांची तशी चूक होते आणि म्हणूनच सकाम भावनेने प्राथू नये असे थोर लोकांनी म्हटले आहे. खरी तात्विकता तर अशी आहे की, देवाचे भजन व आपली ऐहिक लाभाची आशा याचा संबंध फक्त अधूऱ्या नि
अधीऱ्या मनाचा खेळच असतो. वस्तुतः प्रार्थना ही कोणतीहि वस्तु
देण्यासाठी नसून आपली शक्ति वाढविण्यासाठी व तिच्या आधारे कार्य करून ती वस्तु प्राप्त करुन घेण्यासाठी आहे; आणि हे यथार्थ कळणे म्हणजेच वृत्ति निष्काम होणे होय.
उपासकाची विचारणा आहे की-वृत्तीचा अभ्यास कसा करावा? माझ्या मते, वृत्ति प्रकृतीनेच प्रवत्त होऊ देण्याची किंवा निसर्गानेच वाहू देण्याची नि स्वतः स्थिर राहण्याची सावधानता ह्यालाच वृत्तीचा अभ्यास म्हणत असतात मग ती स्थिति योगाने प्राप्त करा किंवा कीर्तन भजनाने मिळवा, पण त्याला मुख्य जोड विवेकाची व सावधगिरीची लागत असते. त्याला काळ-वेळाचे नि आसन स्थळाचे काहीहि बंधन नाही; आपण साधू तो काळ नि ठरवू ते स्थळ!
साक्षात्कारी पुरुषाचे पवित्र दर्शन
यापुढे प्रश्न असा करण्यात आला आहे की-साक्षात्कारी मनुष्याची लक्षणे कोणती? त्याची एवढीच लक्षणे दिसतात की त्याचा विषय (ध्येय) आणि व्यवहार, बोलणे आणि चालणे, धारणा आणि वागणे, समाधान आणि उद्वेग ही सारी त्याला सारखीच वाटत असतात; सर्वात एकसूत्रता कायम असते. परिणामी त्याच्यावर विपरीत परिणाम मुळीच दिसत नसतो. जो कोणी जे काही जाणतो तो जर तसे वर्तत असेल तर त्याचेच नाव साक्षात्कार; आणि असे झाल्यावर त्याजकडून जे काही होईल ते सर्व त्याच्या समाधानालाच कारण व्हायचे! एवढे मात्र निश्चित की त्याची विचारसरणी स्वत:लाच वेठून न राहता सत्याच्या मार्गाने आक्रमण करीत समाजाला, धर्माला नि देशाला आपलेसे करीत पुढे चालत असते व ती अगदीच निर्भय मृत्यूलाहि न भिणारी तद्वतच अत्यंत कपाळू नि न्यायनिष्ठुरहि असते. तेच साक्षात्कारी पुरुषाचे लक्षण मी समजत आहे.
साक्षात्काराचे प्रकार अनेक आहेत. जो जी गोष्ट समजून तीविषयी अनुभव कमावू शकला तो त्या गोष्टीचा साक्षात्कारी झालाच!
याच न्यायाने ईश्वराच्या अत्युच्च शिखराकडे नजर ठेवून व त्याच व्यापक स्वरुप जाणून त्यात रममाण होऊन तो समभावनेने वागू लागला तो श्रेष्ठ,साक्षात्कारी होय! असे पुरुष जगाचे पाठीवर पुष्कळ असतील; पण जे आहे ते बहुधा साधु म्हणून जाहीर नाहीत व जे साधु म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना बहुधा त्यांचे काही कळलेले नाही, असेच दिसून येते. काय असेल ते असो, पण साधूच्या लक्षणांनी पूर्ण असे पुरुष मला तरी
आढळले नाहीत. याचे हे एक कारण सांगता येईल की, मी त्याना पाहण्याकरिता फिरलो नाही व मला तशी इच्छाहि पण उरली नाही!
मागे पाहण्यापेक्षा पुढे चालू लागा!
शेवटचा प्रश्न असा आहे की, पूर्वजन्मी साधने केली असे कसे समजावे? या प्रश्नावर अगदी थोडक्यात माझे उत्तर असे पूर्वसंचिताची दोरी। म्हणूनी ज्ञान देतो हरि , आला असेल करीत। तरीच होय अधिकारी तो किंवा बहुता सुकृतांची जोडी। म्हणूनी
विठ्ठली आवडी इत्यादी संतवचनांचा विचार करिता असे म्हणता येईल की, कार्य उत्तम होऊ लागले तर उत्तम कारण हे पूर्वी घडले असलेच पाहिजे. आमची आजची वृत्ति किंवा प्रवृत्ति हे आमच्या पूर्वसाधनाचेच फळ होय. आपणास आपल्या व्यक्तिप्रेमापेक्षा समाज
किंवा ईश्वर याविषयी खरी प्रिति वाटणे हेच त्याचे खरे मर्म समजावे व त्या अंतरीच्या बीजा ची वाढ करुन सत्यवृत्तीने आपला उद्धार करुन घ्यावा. एकूण जे जे दिसेल ते सर्व ईश्वरी आहे असे समजून तारतम्याने
वागावे; यातच सर्व साधणार आहे!
( श्रीगुरूदेव- फेब्रुवारी १९४६)
* * *