स्वप्न, दृष्टान्त आणि साक्षात्कार
जागृती विठ्ठल पाषाणाची मूर्ति।
तोचि स्वप्नी स्थिति बोलू लागे।(बालांध संत गुलाबराव महाराज)
करोनि स्वस्वरुपाचा निर्धार।
ब्रम्हीच राहणे तदाकार!
साक्षात्कार तोचि होये।। (रंगनाथस्वामी)
स्वप्न व दृष्टांत यातील भेद
एका उपासकाने विचारले आहे की,- स्वप्न व दृष्टांत यात काय फरक आहे? या बाबतीत माझ्या विचाराने असे ठरविले आहे की, ज्या विचारांचा मनुष्याच्या जीवनावर उत्तम परिणाम होतो असे वाटत नसेल ते सर्वच विचार स्वप्नवत होत. तसेच जे विचार आपल्या कार्याला, ध्येयाला आणि धोरणाला पोषक असतात किंबहुना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करितात त्यांना मी दृष्टांत समजतो. या विचाराचे
एक वैशिष्ट्य असे आहे की ते विचार सत्यसंकल्पयुक्त असल्यामुळे त्याचे ताबडतोब रुपान्तर प्रत्यक्षरुपात प्रत्यन्तर दिसून येते. तुम्हाला हे माहित असेल की मनुष्याच्या चिंतनाप्रमाणेच कित्येक गोष्टी एकदम समोर घडून येतांना दिसतात. त्याचे कारण असे की, मनुष्याची बुद्धि जेव्हा निष्पाप, निर्लोभी व अविष्कृत असते तेव्हा त्याच्या मनातील संकल्पहि प्रभावी व सत्य होत असतात आणि जेव्हा लोभाने, अविचाराने वा अनावरतेने मनुष्य स्वार्थाच्या विचारात गंतलेला असतो तेव्हा त्याचे विचार त्याला मदत देत नसुन धोका देत असतात. तसेच स्वप्नाचेहि नव दृष्टान्त यात फरक हाच आहे की, जे सत्यसंकल्पाचे नसत त्याला मी दृर्ष्टांत म्हणतो व जे अविचारी वृत्तीचे असते त्याला मी स्वप्न समजतो. दोन्हीहि प्रकार चिंतनाचेच! प्रश्नकत्याची कदाचित अशीही शंका असेल की देवतालोक स्वप्नात येऊन दृष्टांत
देतात हे खरे आहे काय? मी म्हणेन. हा सर्व आमच्याच शुद्ध भावनेचा व सदविचारांचा परिणाम आहे, जो सूचक स्वरुपाने आपल्या प्रिय देवतेच्या रुपाने समोर उभा राहतो. एरव्ही त्या कल्पनेच्या मागे लागण्यात तथ्य नाही. देवताच जर स्वप्नात येऊन सुचवतात म्हणावे तर, मी आपल्याला अशीहि काही उदाहरणे देऊ शकेन की कित्येक दृष्टान्तामुळे लोक आपले घरदार देखील गमावून बसले आहेत; मग असे का व्हावे?
भाबड्या समाजात दृष्टांता चा गोंधळ
एक घरचा सुखी माणूस होता, तरी त्याला धनाची फार हाव होती. त्याने धनाकरिता ज्यांना त्यांना आपल्या घरी आणून, पूजा करून विचारावे की, मला द्रव्य कसे मिळेल? एकदा त्याला स्वप्न पडले की - तुमच्या घरातच लक्ष्मीचा निवास आहे नि काही बलि
देऊन तिला तुम्ही बाहेर काढावे. बिचारा त्या स्वप्नासच दृष्टान्त समजून आपले घर मजूराकडून खणून घेऊ लागला व बलिदान पण देऊ लागला. सर्व घर खणून काढले पण धन काही मिळेना. संशयाने भांबावलेल्या स्थितीत मग तो माझ्याकडे विचारण्याकरिता म्हणून आला आणि म्हणू लागला-कायहो! दृष्टान्त तर खरे असतात ना? मग, माझ्या स्वप्नात देवीने चार-पाचदा येऊन मला प्रत्यक्ष उठवून सांगितले की- तुझ्या घरात द्रव्य आहे व मी प्रसन्न होऊन तुला हे सांगते पण तसे
तर झाले नाहीच, उलट तर खोदण्याचे पैसेहि जवळूनच द्यावे लागले; याला काय म्हणावे? तेव्हा मी त्याला हेच उत्तर दिले की- काय हो असली वेडी समज घेऊन बसलात! त्या देवीने काहीहि सांगितले तरी तुम्ही तिला असे म्हणत राहा की हरामाचे धन नको आहे. मी
व्यापार करीन, त्यातच मला खुप यश लाभू दे एवढे झाले तरी पुरे नाही का? त्याने ते ऐकून व्यापार केला व तो सुखी झाला; पण आयते धन काही मिळाले नाही त्याला
दृष्टांता चे यथार्थ स्वरुप
यातून मला हेच सांगावयाचे आहे की, दृष्टांत म्हणजे उन्नत कर्माची प्रतिमा आपल्यासमोर आपल्याच भावनेमुळे उभी राहणे! या व्यतिरिक्त, दृष्टात म्हणजे खरोखरच देव स्वप्नात येऊन सांगतो व मग को निधन जातो आणि जागृतीत पाहाल तर काहीच उरत नाही; हे मत गला अजून पटलल नाही. कदाचित तसे होतहि नसेल, पण माझ्या ध्यानीमनी नसतांना व माझा संबंध नसताना एकदम दृष्टांत झाल्याचे मला आठवतहि नाही व आवडतहि (पटतहि) नाही. मी असे म्हणतो की. तो माझ्याच निश्चयात्मक वृत्तीचा उन्नत भाव आहे, जो फोटोप्रमाणे समोर उभा राहून मलाच आश्चर्यचकित करुन सोडतो. यालाच भाविक लोक माझ्या देवाने मला प्रेरणा केली असे समजतात; आणि तसे समजणे युक्त आहे ही भूमिका पण मला आवडते. पण त्याचे तत्वज्ञान मात्र मी सांगितले तसेच आहे, असा माझा विश्वास आहे. यातून मी हे स्पष्ट करु इच्छितो की, आपल्या उच्चतर कल्पनेत एवढी शक्ती आहे की ती मनुष्याला ईश्वर करुन सोडते; नव्हे त्याचे यथार्थ स्वरुप प्रगटवू शकते. त्याच शुद्ध संकल्पाला जेव्हा स्वप्नाचे स्वरुप येते तेव्हा तशा स्वप्नाला मी दृष्टांत असे समजतो.
साक्षात्कार म्हणजे काय?
दृष्टांतविषयक प्रश्नाबरोबरच तो उपासक विचारतो की साक्षात्कार म्हणजे काय? माझ्या मते त्या दृष्टान्ताचे व्यवस्थित स्वरुपच साक्षात्कार होय. निदिध्यासाने दृष्टांत होतो व तो दृष्टांत अनुभवास
आला की तोच साक्षात्कार समजला जातो. जी वृत्ति अभ्यासात असते ताच वृत्ति स्वप्नात दिसन येते नि निदिध्यासाची पूर्णावस्था झाली की तेच जागृतीत प्रत्ययाला येऊ लागते; किंबहुना तो ती वस्तु स्वतः
आपणच आहो असे अनभवाने अभ्यासी (पचनी) पाड लागत असतो.
माझ्याच स्थितीचा साक्षात्कार! कुणाला झाला साक्षात्कार? असाप्रश्न केला तर तो म्हणतो की मला स्वत:लाच झाला साक्षात्कार! तुमचा तुम्हालाच कसा झाला साक्षात्कार? यावर अनुभवी म्हणतो मलाच तर व्हावयाचा होता तो. म्हणजे ती गोष्ट माझ्या प्रियापासून
अंत:करणात पटवून घ्यावयाची होती. ती प्रत्यक्षपणाने पटली आणि यालाच साक्षात्कार म्हणतात. पण यासच भाविक लोक माझ्या देवतेमुळे तो झाला असे भावनावादाला धरुन म्हणत असतात; वास्तविक
त्याचेहि मर्म असेच आहे हे मी समजू शकतो.
काही लोक म्हणत असतील की मग काय आपण आपल्यामध्येच साक्षात्कार प्राप्त करु शकतो? होय, आपण आपल्यामध्येच सर्व काही मिळवू शकतो. आपल्याच वृत्तीने मुळचे आपण ही होऊ शकतो व
आपण स्वत:ला विसरुहि शकतो; आणि याचा खरा अनुभव येणे यालाच साक्षात्कार म्हणतात. किती सहज समजण्यासारखी गोष्ट आहे ही की, एकजण दुसऱ्याला म्हणतो- अहो! मी त्या दुष्ट माणसाचे भाव अजूनपर्यंत समजू शकलो नव्हतो. पण झाला आता साक्षात्कार मला! मी आता कधीहि विसरणे शक्य नाही. यातूनहि हेच निष्पन्न होते ना की, वस्तूचा अनुभव येणे, प्रत्यंतर पटणे, यालाच साक्षात्कार म्हणतात! याप्रमाणेच ईश्वराच्या यथार्थ तत्वाचा किंवा आपल्याच मूळ स्वरुपाचा प्रत्यक्ष प्रत्यय येणे, त्या बाबतीत द्वैताचा भ्रम दूर होणे, हाच खरा साक्षात्कार होय!!
शास्त्राभ्यास नव्हे, आत्मविश्वास!
उपासनामंडळातील प्रिय बंधूनो! आपल्या प्रश्नाची उत्तरे मी माझ्या अनुभवाने व बुद्धीनेहि मला रुचली व सुचली तीच दिली आहेत. शास्त्र काय सांगते याचा मी अभ्यास केला नाही. तथापि शास्त्राने आपल्या ठरवलेल्या भाषेत निराळ्या रुपाने काही जरी सांगितले तरी त्याचा अर्थ याशिवाय दुसरा होऊच शकत नाही, असा मला आत्मविश्वास
आहे. कदाचित भावनावादावर विसंबून असलेल्या कित्येक सांप्रदायिकांना हे काहीतरी नवीन आहे असे वाटावयास लागेल. पण हेहि खरेच की तसे फक्त ग्रंथाविषयीच्या भावनेवर (विचार न करता) निर्भर राहणाऱ्या लोकांनाच वाटेल: ज्यांनी त्याचा स्वत:शी संबंध लावला असेल किंवा ज्यांना योग्य मार्गदर्शक मिळाले असतील त्यांचा ह्या बाबतीत मतभेद
होऊ शकेल असे मला वाटत नाही.
* * *