सैन्याला प्रार्थनेची काय गरज?
मामनुस्मर युद्धयच
रणमैदानात की प्रार्थनामंदिरात?
माझे काही मित्र विचारतात की- प्रार्थनेशिवाय सैनिक विजयी होऊ शकणार नाहीत काय? सैनिकांना आघाडीवर लढण्यास नण्यापेक्षा त्याना प्रार्थनामंदिरात प्रार्थनेस बसविल्यास राष्ट्र सुरक्षित राहू शकेल
काय? केवळ प्रार्थनेने लोक विजयी व उन्नत होऊ शकतील काय? या प्रश्नातील खोच ध्यानी घेऊन मी उलट असे विचारू इच्छितो की सैनिकाऐवजी गधेघोडे वा बैलरेडे रणांगणावर सोडले तर रणांगणाची
शोभा वाढून विजय मिळणे शक्य नाही काय? आणि नसल्यास त्याचे कारण त्यांच्यातील विशिष्ट ज्ञानाचा अभाव हेच नव्हे का? यापुढे जाऊन असेहि म्हणता येईल की फक्त लढण्याचेच ज्ञान असणारे सैनिक
तुम्हाला चालतील की लढावयाचे का या विषयीचे ज्ञान असणारे सैनिक तुम्हाला हवे आहेत? तसेच पोटाकरिता काही केल तरी चालेल अशा मताचे सैनिक तुम्ही पसंत कराल की मरणाचे वेळी सुद्धा कर्तव्यनिष्ठा
कायम ठेवून स्वदेशावर अन्याय करुन कुरघोडी करणारास सुधारण्याची खटपट करण्यात प्राण गेले तरी आनंदच मानून लढणारे सैनिक तुम्हाला पाहिजे आहेत? तुमच्या देशाकरिता लढणारे पण दुसऱ्या ईमानदार देशालाहि लुबाडून त्राहि भगवान करुन सोडणारे अर्थात सर्व जगास पिळून खाऊन आम्हीच मोठे होऊ या क्रुर महत्वाकांक्षेने भरलेले सैनिक तुम्ही आघाडीवर पाठवणार काय, की आमची लढाई देश
जिंकण्यासाठी नसून मी अन्यायाने मानव्यावर आघात करणाऱ्या स्वकीयपरकीयाच्या जुलमी सत्तेला हाणून पाडण्याकरिता आहे या भावनेन भारलेल्या सैनिकांची तम्हाला गरज आहे? तुमची लढाई ही स्वत:च्य सुखाकरिता की विश्वाच्या शांतिसाम्राज्याकरिता? ती देश-विदेशासाठी,
विशिष्ट जातिसंस्था व आकुंचित धर्मपंथासाठी की जगात सत्य न्यायाला उच्चपदी स्थापण्यासाठी? ती जर सत्य न्यायासाठी असेल तर तुम्ही सैनिकांना चारित्र्यवान बनवून लढविणार की स्वतः अन्यायी असूनहि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आघाडीवर पाठविणार? तुम्हाला जर उच्च ध्येयाने प्रेरित होऊन युद्ध हाताळावयाचे असेल तर सैनिकांनाहि ते ज्ञान
द्यावे लागणार नाही काय? आम्ही लढाई का करावयाची व ती आम्ही करणार की ईश्वरच करवून घेणार? आम्ही निमित्तमात्र आहोत की जबाबदार मालक? हे कार्य आमचे की देवाचे देशाचे? याचे ज्ञान
सैनिकात भरल्याशिवाय ते कृतीत कसे येईल? अर्थात ही शक्ति सैनिकात भरावयाची तर त्यांना हेहि सांगावे लागेल की जग हे कशासाठी देवाने निर्मिले आहे? त्यात त्याचा उद्देश सर्व लोकांनी सुखी व्हावे हा
आहे की काहीनी बरे व काहीनी वाईट रहावे असा आहे? देव जर ते इच्छित नाही तर जगात अशी विषमता निर्माण करणारा कोण आहे व तो तसे कोणत्या आधारावर अधिष्ठानावर करतो? हे सर्व जर सैनिकांना सांगावयाचे तर त्यासाठी त्यांना एका प्रशांत मैदानावर बसवून सात्विक वातावरणात स्थिर करायला नको का? त्यांच्यातील आकुंचितवृत्ती घालवण्यासाठी त्यांच्यात सामुदायिकत्व आणायला नको का?त्यांच्यातील लोभ अहंकारादि विकारांना काबूत घेऊन त्यांच्यात गुणसंवर्धन व चरित्र्यगठण करावयास नको का? दिशाभूल करणारा मद न येवो तसेच निसर्गशक्तीचा पाठिंबा प्राप्त होवो म्हणून एकाग्र मनाने व एकोप्याने, उद्देशपूर्वक सृष्टि रचणाऱ्या महाप्रभूला मदत मागणे अर्थात नित्यनियमपूर्वक सामुदायिक प्रार्थना करणे ही गोष्ट वरील सर्व कारणासाठी
अत्यंत आवश्यक नाही असे कोण व कसे म्हणू शकेल?
धर्मयुद्धाचे स्वरुप व प्रार्थना
ही गोष्ट मी निश्चयाने सांगतो की, सृष्टीचा अंतिम उद्देश व इश्वरी शक्तीचा पाठिंबा याचे मर्म ध्यानी आल्यावरच युद्धाच्या उद्देशाने
खरे ज्ञान होईल आणि प्रलोभनांनी किवा भयभ्रांतीने वृत्ति विचलीत न होता सेवा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचे भान सैनिकांना धैर्याने पुढे नेत राहील. अशा प्रकारचे सविचारी, सत्यनिष्ठ व सेवापरायण सैनिक पुढारी निर्माण करुन मग त्यांना तुम्ही युद्धावर पाठवाल तर ते खरे धर्मयद होईल, ज्यामळे जगात शांति व प्रगतिच नांदू लागेल. वास्तविक वर्तमानकाळातील युद्धांना धर्मयुद्ध म्हणता येणार नाही. ती राष्ट्रयुद्धे, देशयुद्धे, जातियुद्धे आहेत. अर्थात स्वार्थ, अभिमान व द्वेष यांची ती प्रगट रुपे आहे. त्यांचे चालक केव्हाहि अपूर्ण बुद्धीचेच समजले जात असतात व त्यामुळेच जगात वैरभाव वाढता राहून शांति व नीति नष्ट होते. तुम्हाला आपल्या सैनिकाकडून त्यांचाच कित्ता गिरवून घ्यायचा आहे काय? हे पक्के लक्षात असू द्या की धर्मयुद्धाशिवाय जगाचे संकट टळत नाही व कोणाचाहि धोका मिटत नाही. धर्मयुद्धअर्थात नैतिक युद्धे हे सर्वात मोठे विश्वहिताचे पवित्र युद्ध समजले जाते. कौरवपांडव हे परधर्मी किंवा विदेशी नसून एकाच जातीचे व देशाचे होते; पण त्यांची लढाई जागतिक व धार्मिक का ठरली? त्याचे कारणती लढाई सत्यासाठी जगाच्या धारणेसाठी होती हे आहे.
असत्याने मात करुन जगावर जुलमी साम्राज्य गाजविणारा हर प्रयत्नांनी विश्वकल्याणाच्या उद्देशाने हाणून पाडणे हे ईश्वराच्या संकेताला अनुसरून ते दैवियुद्ध समजले जाते. तसेच आमच्यात ताकदआहे म्हणून आम्ही तुमचा नाश करु या धोरणाचे युद्ध राक्षसी युद्ध ठरते. यापैकी तुम्हाला कोणते युद्ध लढवायचे आहे? कारण आजचा काळ हा सर्व त-हेच्या युद्धांना उपलब्ध करणारा असून त्यांची निवडकरणे दरापास्त झाले आहे. तथापि आपल्या विचारानुसार मी इतके म्हणू शकेन की. भारतवर्षातील युद्ध हे धर्मयुद्ध होते व राहील.स्वातंत्र्यासाठी,स्वसंरक्षणासाठी व सत्य स्थापनेसाठी लढणे हेच धर्मयुद्ध! धर्माची व्याख्या हिंदुधर्म, ख्रिश्चनधर्म, मुसलमानधर्म इत्यादी भेदकल्पनेवर आधारलेली नाही. वास्तविक जगात एकच धर्म असून बाकी सर्व
त्याचे पोटभेद आहेत. सत्याने जगणे विश्वबंधुत्वाने नांदणे हाच एकमेवधर्म असून, गटबाजी निर्मुन मूठभर लोकासाठी जगाची धुळधाणी करणेव असत्याने शिरजोरी दाखवणे हाच अधर्म आहे. भारताच्या मानवी जीवनविकासाच्या सर्व गोष्टी परकीयांनी ताब्यात घ्याव्यात, त्यांचे मार्ग उधळून लावावेत, मातीसारख्या वस्तूचेहि संशोधन करुन आपले बरे त्यास करता येऊ नये, घराघरातील उपयोगाचे साधे सामानहि परेदशातून कर लादून पाठवले जावे आणि इतरत्र पर्वतमय नापिक प्रदेशातील मजुरास जेथे सरासरी १० रुपयाच्या वर मजुरी पडते तेथे भारतवर्षाच्या सुपीक जमीन हक्काची असणाऱ्या शेतमजूरास सात पैसे मुश्किलीने मिळून मेल्या मानसाप्रमाणे जगण्याची किंबहूना उपासाने तडफडून मरण्याची पाळी यावी, अशा प्रकारचा अन्याय व जुलूम ज्यांनी केला .त्यांच्याशी लढून आपले मानवी हक्क सत्याने प्रस्थापित करणारे लोकचखरे धर्मयुद्ध करणारे नव्हेत का? निरपराधी आबालवृद्धाचे अमानुषपणे बळी घेणे, पतिव्रतांची अब्रू घेऊन धिंड काढणे व आगी लावणे अशी आसुरी कृत्ये करणारापासून सर्वांचे संरक्षण करीत त्यांना शासन करून सन्मार्गावर आणणे व प्रसंगी नष्ट करुन समाजधारणा टिकवणे हेहि धर्मयुद्धच होय. पण असल्या धर्मयुद्धकरिता समतोल बुद्धीचे व
तारतम्यदृष्टीचे ज्ञान प्राप्त झालेले सैनिक जर तुम्हाला पाहिजे असतीलतर त्यांना ईश्वराच्या प्रार्थनास्थानी बसवून प्रथम हे ज्ञान व वळण देणे अगत्याचे आहे की आपला धर्म, जगाचे उद्दिष्ट व ईश्वराचा आदेश काय
आहे! आपण कशाकरिता जन्मलो.आपली जबाबदारी कोणती, दूसऱ्याशी झगडण्याचा प्रसंग का आला व बद्धिहीन व बलहिन बनलेल्या समाजाला व चक्रव्युहातून पार पाडण्याचा मार्ग कोणता? प्रार्थनाही आपल्या इशद्रयसुखाकरिता की परस्परांतील द्वेष नष्ट करुन विश्वबंधुत्वाने विश्वशांति स्थापण्याकरिता? इत्यादि सर्व गोष्टिची जाणीव अखिल मानव समाजाला करुन देण्यासाठी व स्वत:च्या मार्गाने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सैनिकासहि प्रार्थना करणे जरूर आहे.
प्रयत्न व प्रार्थनेचा अविच्छेद्य संबंध
प्रिय मित्रांनो। प्रयत्नाला प्रार्थनेची व प्रार्थनेला प्रयत्नाची जोड हवी. प्रार्थना हा एक उच्च प्रकारचा प्रयत्नच आहे आणि प्रयत्न ही देखील प्रार्थनेची सक्रियताच आहे. प्रार्थनेच्या तात्विकतेशिवाय आमचा
प्रयत्न आंधळा ठरेल व प्रयत्नशीलतेखेरीज प्रार्थना पांगळी बनेल.प्रार्थनेची ही सर्वांगिणता ज्याला कळली नसेल त्याला विश्वाचे ज्ञान होणार नाही- जीवनाचे कोडे उलगडणार नाही; व ज्याला विश्वाचे यथार्थ ज्ञान नाही तो देवाच्या दरबारचा अधिकारी होऊ शकत नाही. त्याला जन्मता व मरता अजून बराच काळ लागेल. आपण प्रार्थनेला प्रयत्नहीन बनविणारी का समजता? प्रार्थना का फक्त आयुष्याचा वेळ स्वस्थपणे घालविण्यासाठी आहे? नव्हे, ती तर अधिक चपलतेने आणि आम्ही देवाचे आहोत व त्याचे कार्य ते आमचे आहे या निश्चयीभावनेने कार्यतत्पर बनविणारी संजीवनी आहे! प्रार्थना करणारा पुरुष जर धर्मयुद्धाच्या प्रसंगी माघार घेईल आणि म्हणेल की-मला त्याचेकाय? करीना कुणी बेबंदशाही; मरेनात का अन्नावाचून अथवा गुंडाच्या हातून लोक ; फोडीनात का आमची मठमंदिरे मसजिदी नि चर्चगिर्जाघरे सैनिकाकडून होईना का अबलांवर अत्याचार; आम्ही आपल्या ध्यानातमस्त आहोत आणि आत्मा तर नेहमीच अमर आहे. त्याला पाप लागतच नाही! तर असल्या भित्र्या भागुबाईला मग तो महात्म्याचाबाप का असेना तेव्हाच निषेधून त्याचे हे दर्वर्तन जाहीर केले पाहिजे.त्याला शहाणे केले पाहिजे आणि त्याची वृत्ति बदलतच नसेल तर तो
धर्मगुरु असला तरी पदच्युत करुन त्याची जबान बंद केली पाहिजे,त्याचे जगणे पाप ठरवले पाहिजे व त्याला प्रार्थनामंदिरातून अंधाऱ्यावनात नेऊन सोडले पाहिजे. असा हा प्रार्थनेचा कायदा आहे आणि तदनुसार विचार केल्यास प्रार्थना ही राष्ट्रास सुरक्षित व उन्नत करण्यासवास्तविक समर्थ आहे असेच कोणासहि कबूल करावे लागेल अर्थाती प्रार्थना केवळ प्रार्थना मंदिरात बसून केल्यानेच पूर्ण फलद्रुप होणार
नाही तर तिची आराधना रणमैदानात किंबहूना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात न्याय कर्तव्य पालनाच्या दृष्टीने करावी लागेल; असे हे आमचे प्रार्थनेचे
तत्व आहे.
नैतिक व बौद्धिक उन्नतीची गरज
प्रार्थना ही, आपले राष्ट्रधारणेचे व जीवनन्नोतीचे कर्तव्य निर्लोभी निरहकारी वृत्तीने व निर्भयपणे करण्याची शक्तिसाधना आहे. नैतिकतेने विश्वाची घडी व्यवस्थित करण्याचीच ती संदेश देते. या धोरणाशिवायच कोणी लढू लागेल तर तो कोणत्या खड्ड्यात जाऊन पडेल, कोणत्या मार्गाकडे वळेल आणि आपल्या बेछूट सैनिकी सामर्थ्याने केव्हा समाजास धोक्यात आणील याचा भरवसा देता येणार नाही. सद्भावना, योग्य बुद्धिमत्ता आणि सत्चरित्रता यांच्या शिवाय नुसती लढाई करण्याची ताकद व ज्ञान असले की झाले, असे समजणे अगदी मूर्खपणाचे आहे.अर्जुनासारख्या महान योद्धयांची ताकद सुद्धा प्रसंगी कुचकामी ठरली व गीतेच्या संजीवनीनेच ती परत यशस्वी कार्य करू शकली ही गोष्टविसरता येत नाही. नीतिज्ञानाशिवाय शूरता म्हणजे क्रूरता आहे. सैनिकताम्हणजे पशुता आहे! आपण म्हणाल की, प्रार्थनेशिवाय युद्धाच्याआघाडीवर कोणी लढूच शकणार नाही काय? मी म्हणेन, जर कोणी
योग्य दिशेने लढत असेल तर त्याने आपल्या सुज्ञ वस्तादाकडून हे समाजशास्त्र समजावून तरी घेतले असावे किंवा त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार तरी तसे असावेत अथवा तो ज्याच्या आज्ञेने वागतो त्यांनी न कळत त्याला तसे वळण तरी दिले असावे. पण ज्यांना विश्वाच्या नैतिकतेची कल्पनाच नसेल अशी माणसे कधी बदलतील याचा नियम नसतो. युद्धाच्या आघाडीवर पाठवलेल्या लाखो लोकांना एका प्रभावी देशभक्ताने देशकर्तव्याची जाणीव देऊन काही मिनिटातच पाठवणारांचाच विरोध करणारे वीर बनवले, हे अगदी ताजे उदाहरण भारतासमोर आहे ना?मग काय अर्थ नुसते कोरडे सैनिक आघाडीवर पाठवण्यात? अहो,
तोपर्यंत त्यांच्या लढण्यात खरा जोश व जिव्हाळा कुठून असणार? म्हणतात ना- मोले घातले रडाया। तेथे नाही आसू माया।। अशाने का कार्य होऊ शकते? त्यासाठी उदात्त भूमिकाच तयार करावी लागते आणि आमची प्रार्थना तरी याशिवाय दुसऱ्या कशाकरिता आमच्या ऋषिमहर्षीनी योजिली आहे?
सैनिकाची भूमिका व विश्वधर्माचे मर्म
भगवान रामचंद्रासारख्या दिव्य पुरुषालाहि शस्त्राबरोबर शास्त्रदृष्टि ऋषि वसिष्ठाकडून प्राप्त करुन घ्यावी लागली तसेच रावणाशी लढण्या करिता चारित्र्यवान वानराचीच योजना करावी लागली. भगवान श्रीकृष्णालाहि बलाला बुद्धीची जोड देऊन, युद्धाचे कारण व उद्देश समजावून सांगून अर्जुनाला तयार करावे लागले आणि छत्रपति शिवाजीला सज्जन मावळ्याकडूनच आपला हेतु सफल करिता आला. वास्तविक युद्ध हे कामक्रोधादि विकारांना बळी पडून करावयाचे नसून, मानव्याची विशालता प्रस्थापित करीत असता जे त्याला आड येत असतील, ते मानवसमाजाचेच गुन्हेगार नव्हेत तर देवाच्या मनातूनहि उतरलेले असतात, म्हणून त्यांच्याशी विचारपूर्वक लढावयाचे असते. ती शुद्ध विचारदृष्टी प्रार्थनेच्या तात्विकतेतून प्राप्त होऊ शकते. प्रार्थना ही, एका विशिष्ट समाजासाठी युद्ध करायला सागत नसून ती विश्वधर्माच्या न्यायाने तुम्हाला आपले जीवन उन्नत करायला सांगते, जगायला व मरायला सांगते. आणि तोच खरा मानवधर्म मी समजतो. ईश्वराची याचना करुन आम्हाला हेच ज्ञान मागावयाचे असते. आम्हाला, एकाच राष्ट्राला स्वर्ग मिळालेला आवडणार नाही, कारण तो निसगोचा नियम नव्हे! जगात जर न्याय नांदावयाचा असेल तर प्रत्येक देशातील बहमान्य श्रेष्ठजन निवडन, सर्व विश्वाचे सूत्र त्याच्या हाती देऊन आम्ही विश्वबंधुत्वाने का नांदू नय! यापेक्षा कोणते तत्वज्ञान मोठे आहे, जे यावरहि ताण करु शकेल! आमची आध्यात्मिकता ही या अधिष्ठानावर आ माधष्ठानावर आपली इमारत उभारणारी
आहे आणि हे जोवर होत नाही तोवर जगात कायमची शांति नांदवणारा बहाद्दर कोणीच होऊ शकत नाही.
आमच्या परब्रम्हाची सत्ता ही याच न्यायाने विश्व चालविणारी आहे परंतु दुर्देव भारतवर्षाचे की त्यात एवढे उदात्त तत्वज्ञान असूनहि व्यक्तिगणिक पंथमतांनी त्याची शकले-शकले पडली आहेत. कारण
त्याचा यथार्थ भाव लोकांसमोर मांडणारे महात्मा गांधीसारखे लोक बोटावर मोजण्याइतकेहि आज आम्हास दिसत नाहीत व असलेच तर ते तुमच्यावर कुरघोडी करुन आपला स्वार्थ साधण्याच्या मागे लागलेले आहेत. पण हे देवाचे ज्ञान नसून मनुष्यकत आहे व त्यात नेहमी फरक होणे साहजिक आहे; अनेक पंथ पडले ते यामुळेच! मी असे म्हणतो की लोकांच्या कमी बुद्धीमुळे व कमताकतीमुळे त्यांच्यावर आघात झाल्यास होऊ देत पण त्यांची दृष्टि तरी योग्य मार्गाकडे असली पाहिजे. परंतु विश्वाच्या तत्वज्ञानाचा योग्य धडा तरी लोकात समजावला जातो काय? त्यांना आपल्या जीवनाचे तत्वज्ञान तरी शिकवले जाते काय? धर्म आमचा, आम्ही शक्तिवान व शक्ति म्हणजे अशक्तावर राज्य करण्याचा परवाना, अशा बुद्धीचा विकास करणारे ज्ञान कोणाला आवडत असले तरी ते देवाच्या उद्देशाचे ज्ञान खास नव्हे! खऱ्या विशाल दृष्टीचे समतेचे व बंधुत्वाचे ज्ञानच सदैव लोकात रुजवले गेले पाहिजे आणि त्यावरच सैनिकी शिक्षणहि आधारले पाहिजे. असे झाल्यास युद्ध सुद्धा विश्वशांतीसाठी उपकारच होईल.
प्रिय मित्रांनो! प्रार्थना हे तत्वज्ञान बाणवण्यासाठीच केली जाते व हे तत्वज्ञानच जगात अमर राहणारे आहे. आपापली बुद्धि याच्यापर्यंत पोहोचवणे व अनासक्त बुद्धीने कार्य करणे याचीच शिकवण प्रार्थना देत असते जगातील सामुदायिक प्रार्थना आपल्या विशिष्ट समुदायाच्या समाजाच्या हिताकरिता, गटबाजी व जातीयतेकरिता केली जात असेल; परंतु सेवामंडळाची सामुदायिक प्रार्थना ही अखिल विश्वाला मानव्य, सुख न्याय याचा लाभ होऊन सत्याचा अखंड विजय व्हावा
याकरिताच केली जाते. असेल हरि तर देईल खाटेवरी असा पंगु प्रार्थनाभाव आमच्यात नसून ईश्वराने आमच्या सत्प्रयत्नाला यश द्यावे आणि त्याला जगात समाधान द्यावयाचे असेल तर याच न्यायमार्गाने देऊन चिरस्थायी शांति प्रस्थापित करावी अशी प्रयत्नशीलतेची प्रार्थनादृष्टि आमच्यात आहे. मित्रांनो! मग सांगा, युद्धाच्या आघाडीवर पाठवण्यापूर्वी ह्या प्रार्थनेची दैवी शक्ति सैनिकात निर्माण होण्याची तुम्हाला जरुरी वाटत नाही काय? प्रार्थना ही मंदिरातच नव्हे तर रणमैदानातहि सहारा देत क्रीडत असते व तिच्या आधाराने सैन्याने मिळवलेला विजयच खरा विजय ठरतो, ही गोष्ट तुम्हाला पटत नाही काय? जर हे सर्व तम्हास मान्य होत असेल तर आधी सर्वांना सामुदायिक प्रार्थना तात्विकतेसह करु द्या व मग कर्म करण्यास तयार होऊ द्या असे मी आग्रहाने म्हणतो. मामनुस्मर युद्धच अर्थात मला स्मर व युद्ध कर या भगवान श्रीकृष्णाच्या गीतावचनातहि हाच ध्वनि दिसन येत नाही का?
(श्रीगुरुदेव-नोव्हेंबर १९४७)
* * *