नवे युग कशाने निर्माण होईल?
आजच्या जगाचे रौद्र स्वरुप
मित्रांनो! वेळोवेळी सहायक म्हणून साथ देण्यासाठी आलेल्या अत्यंत जुनाट रुढ्यांनी आपलेच घोडे पुढे दामटल्याने खऱ्या धर्माचे स्वरुप मागे पडून, मानवता ही काळोखलेल्या बिळातील किड्यांच्या बुजबुजाटाने पोखरलेल्या पुरातन वृक्षाप्रमाणे रुक्ष बनली आहे. तात्विक धर्माला काल्पनिक जातीयतेचे विकृत रुप प्राप्त होऊन त्याचा पुरेपूर परिणाम पवित्र धर्माच्या व प्रशांत ईश्वराच्या नावावर भयानक युद्धाचा
वणवा भडकेपर्यंत झाला आहे. भौतिक व मानसिक शक्तियुक्तीचे पुरुष व्यक्तिमत्वाच्या महत्वासाठी राजकारण व समाजकारणाचेच नव्हे तर सापडेल ते साधन हाताशी धरुन मतमतांतराचा वितंडवाद व काहीहि करुन पुढे येण्याचा अंदाधुंद इंदुभीनाद गाजवीत आहेत. माणुसकी ही सहज फिरतांना तर मिळणेच दुरापास्त पण तिचे रोपटे महान प्रयासाने
आजच्या तापलेल्या भूमीवर तयार करणेहि अत्यंत कठिण झाले आहे शोध आणि सुधारणा मानवसमाजाला कुणी तरी दिलेला भयंकर शाप
ठरत आहे आणि मानवी विकासाची साधनेच सर्वांच्या अहिताची बंधने बनून जगात हलकल्लोळ माजवीत आहेत. या सर्व भानगडीचा परिणाम जगाच्या विशेषत: भारताच्या कोनाकोपऱ्यातील गोरगरीबापर्यंत इतक्या उग्रतेने व्यापला आहे की दे माय धरणी ठाय अशी त्यांची स्थिती झाली आहे. दलित समाज वर्षानुवर्ष व पिढ्यानपिढ्या आपल्या गोट्यामातीचे काम हाडांची काडे करुन करीत आला असताहि त्याला तसूभर देखील कोणी पढे ढकलीत नाही; उलट त्याला चेंगरुन काढण्याच्या नवनव्या युक्त्या उपयोगात आणल्या जात आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असता अंत:करणात अशी भावना पेट घेते की, याचा कोणीच वाली नाही का?
तमसो मा ज्योतिर्गमयम
जगाचे हे भिषण स्वरुप पाहून मनाला वाटते अशा जगात आता जगणेच बरे नाही! जगाचा चालक ईश्वर आहे.व तो न्यायी आहे असे म्हणतात, मग त्याला हा अन्याय नि ही विषमता का पाहवते ? तो याची व्यवस्था का लावीत नाही? मित्रानो! डोके या विचारात सन्न होऊ लागताच आतून एक ध्वनि येतो. निबिड अंधारात एक आशेचा प्रकाश-किरण प्रकट होऊ लागतो की व्यवस्था लावण्यासाठी जे पाहिजे तेच चालवलेले आहे ! समोर दिसणाऱ्या नाटकाच्या पडद्यामागेच पुढच्या प्रवेशाची योजना आखलेली आहे. आजचे भयंकर स्वरुप धारण करुन त्याद्वारे विश्व आता नव्या युगाच्या व्यवस्थेलाच कळत न कळत लागले आहे व आकुंचित वृत्ति आपसातील युद्धाने, दुर्भित्वाने, मानहानीने, दुर्बलतेच्या पराकाष्टेने निघन जाऊन त्यांच्यात स्वत:हून सुंदरता फुलणार आहे. ते नवे जग आपण पाह या आशेने आपल्या लोकांना आता उत्तेजित केले पाहिजे व त्याकरिता जी जी साधने आवश्यक असतील त्याचा उपयोग करुन नवयुगनिर्मितीस जीवाभावाने मदत केली पाहिजे ते नवे जग आमच्या सर्वांच्या वर्तनातूनच आकारास येणारे असल्यामुळे आमच्या सर्वांच्या पावलापावलातून त्याचे पडसाद उठू लागले पाहिजेत.
नवे जग तुमच्या हृदयात आहे!
माझ्या तरुण कार्यकर्त्या मित्रांनो! जगात कोणतीहि गोष्ट सूक्ष्मातूनच स्थूलात येत असते हे पूर्णपणे लक्षात असू द्या. तुमच्या अंत:करणात जे विचार आज तीव्र असतील तेच उद्या आचाराचे रुप घेऊन तसा परिणाम सृष्टीवर घडवून आणतील. तुमच्या हृदयातील प्रामाणिक आकांक्षा हेच उद्याच्या नव्या जगाचे पवित्र बीज ठरणार ह निश्चित ! परंतु तुमचे हृदय अर्धवट किंवा डावाडोल असेल, तुमच्या हृदयातील भावना व विचार प्रतिगामी किंवा स्वार्थलोलप असतील, तर उद्याचे विश्वहि तसेच निर्माण होईल याची खात्री अस द्या. नव्या जगाचे
स्वप्न तुम्ही आपल्या मनात जसे रंगवाल तसेच ते तुमच्याद्वारे जगात पूर्त होऊ लागेल: हा ईश्वरी कायदा आहे! सामुदायिक प्रार्थना हा अशा नव्या जगाच्या पवित्र स्वप्नावर दररोज अभ्यासाचे अमृतसिंचन करण्याचा प्रभावी प्रयोग आहे! नव्या जगाचे सुखस्वप्न पवित्र अधिष्ठानाच्या आधारावर निरपेक्ष मनाने सर्वांनी रेखाटून त्यात संकल्पशक्ति ओतीत गेल्यास ते प्रत्यक्षात येण्यास कितीसा वेळ लागणार? तुम्ही
ईश्वराचे अस्तित्व न मानणारे असाल तरी हरकत नाही. तुमची ध्येयमूर्तिच ईश्वर आहे असे मी म्हणेन! जगात सत्य, न्याय, समता, शांति इत्यादि ज्या गोष्टी नांदाव्यात असे तुमच्या प्रामाणिक सदसद्विवेकबुद्धिस वाटते त्या गोष्टी म्हणजे संतांनी अनुभवलेल्या ईश्वरस्वरुपाच्या खुणा त्याची किरणेच आहेत हे केव्हाहि विसरु नका. ईश्वराच्या या सद्गुणशाली स्वरुपाचे दर्शन घेण्याची उत्कंठा आज साऱ्या जगाला लागली आहे. आणि या एका उत्कंठेच्याच दृष्टीने विचार केला किंवा ईश्वराची ही व्याख्याच नजरेसमोर ठेवली तर मतभेद होण्याचे हजारो प्रसंग टळून विश्वात शांति व सर्वाचे ऐक्य होणे स्वाभाविक आहे. तसेच सर्वाच्या ऐक्यातच नव्या युगाची व नव्या जगाची सुरवात करण्याचे यशस्वी सामर्थ्य साठवलेले आहे.
नव्या युगाचे केंद्रबिंद तुम्हीच!
मित्रांनो! तुमच्या आचार, विचार, उच्चार व प्रचाराने जगाची घडी नवी होऊ द्या. मनुष्य तेवढा एकजाति, विश्व तेवढे एकमती, धर्म तेवढे एकपंथी अशा विचारांची व व्यवहारांची लाट उसळून युद्धाचे
वारे कायमचे बंद करा. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना समानतेच्या न्यायाने सुखी होऊ द्या आणि आपल्या या नव्या जगाच्या प्रकाशकिरणांनी मागासलेल्या जनमनातील हजारो वर्षाचा अंधार नाहीसा करुन सारे विश्व प्रेमसुखाच्या रंगानालवीत पुन्हा सरळ वैभवाने नटू द्या. तुम्ही प्रत्येकजण नव्या युगाचे शिलेदार-नव्या जगाचे शांतिदूत आहात;
तुमच्यापैकी प्रत्येकजण हा नव्या सृष्टीचा खांब आहे! तुमच्यातून नवे जग निर्माण होणार आहे! तेव्हा यापुढे तुमचे प्रत्येक पाऊल त्याच दिशेने पडले पाहिजे; तुम्ही स्वत:च त्या नव्या युगातील सर्वांगीण विकासयुक्त आदर्श मानव बनले पाहिजे ही एकच गोष्ट पुन:पुन्हा मला आपल्या कानावर घालावयाची आहे!
--------समाप्त----------
किति द्वेषबुद्धी वाढली, अति स्वार्थ व्यक्तित्वामुळे।
ही अल्पशी मति लोभ धरुनी बैसली नच का कळे ।।
मम धर्म, मी सर्वत्रही हे स्मरनी चढू दे भावना।
घे विश्वबंधुयोग हा, कर सामुदायिक प्रार्थना।।
(आदेश रचना श्लोक क्र.६९)
* * *