१५ . आदर्श जीवन व समाजशिक्षण 

                      आदर्शाविषयी दांभिक आदर 

        मित्रा ! तुझी ही शंका बरोबरच आहे की - आदर्शाची ही कल्पना सर्वांपुढे असूनहि खरे आदर्श पुरुष बोटावर मोजण्या इतके सुद्धा कां दिसून येत नाहीत ? मला वाटते याचे कारण हेच आहे की, लोक दुसऱ्याची चर्चा करतांना जेवढे शहाणे दिसतात तेवढे स्वत : चे दोष मात्र ते पाहू शकत नाहीत. प्रत्येकाच्या दृष्टीसमोर अशी एक अंधारी पडलेली असते की जिच्यामुळे आपणाला सोडूनच सर्व त-हेच्या बरेवाईटपणाची छाननी त्यांना करावीशी वाटते आणि असे केल्यानेच आपला मोठेपणा सिद्ध होतो व हीच आपली आदर्शता आहे अशी बऱ्याच लोकांची समज असल्यांचहि मी पाहिले आहे. बोलतांना मात्र सर्वजण अशीच उत्तम शिकवण देतात की असे असावे नि तसे असावे, असे बोलावे नि तसे वागवे ; पण हे सर्व स्वत:ला वगळून जगासाठी आहे असेच ते समजतात. आणि लोक मात्र त्यांचे हे बोलणे ऐकतांना ऐकण्यांत गुंगण्याऐवजी तो वागतो कसा हेच प्रामुख्याने पाहतात, परंतु नवल हे की हे बघणारे सुद्धा आपणाला विसरुनच बघत असतात व त्यांतील आवडता उत्तम गुण घेण्याऐवजी वाईट तेवढे उचलून त्याला आपला विषय करून घेतात. त्यांतहि जो जास्त स्पष्टवक्ता तोंडफोड उर्फ उद्धटपणाने समाजांत बोलणारा असतो तो पुढारी ठरतो आणि जे खाजगी गुणगुणतात ते प्रचारक शिपायीगडी ठरतात. आता यांच्या शिवाय जे शिल्लक राहिले आहेत, की जे बोलतात तसेच वागतात, या सर्वांच्या मते पागल, भेळसट व समाजाला मागे ओढणारे ठरतात. 


युगप्रभात

फार तर साधु म्हणून त्यांना हात जोडून टाकून द्यावे किंवा प्रातःस्मरणीय म्हणून सोडावे यापेक्षा काहीच किंमत त्यांना नसते. कदाचित् अशांना ते अवतार ही म्हणतील पण त्यांचे गुण त्यांना घेण्याइतकी किंमत मात्र ते त्यांना कधीच देणार नाहीत. 

               खरे समाजशिक्षक कोण व शिक्षण कोणाला ? 

           पूज्य संत तुकाराम, भगवान गौतम बुद्ध, धर्मात्मा कबीर साहेब, महात्मा गांधी, प्रेममूर्ति येशुख्रिस्त, स्वामी दयानंद इत्यादी महापुरुषांनी हाडांची काडं करुन या मानवी समाजाला खऱ्या आदर्शतेची जाणीव करून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले; पण त्यांचे लोण अजून देखील खेड्यापाड्यांत व प्रत्येक माणसाच्या हृदयांत पोहोचूं शकले नाही. आणि ते कसे पोहोचणार ? एखाद्या तापलेल्या वाळवंटात पावसाचे थेंब जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांची वाफ व्हावी किंवा किर्र जंगलांत खालच्या रोपांना पाणी मिळण्यापूर्वी वरच्या झाडांनीच ते झेलून नष्ट करावे तशीच इथे अवस्था आहे. खेड्यांत अगोदरच इतकी काटेरी उंच झाडे वाढली आहेत की त्यापुढे दुसऱ्याचे काहीच चालत नाही. येनकेन प्रकारेण आपले मोठेपण टिकावे, कुणाचेहि न ऐकता समाज दबून राहून आपला निर्वाह चालावा, या मनोवृत्तीचेच लोक लहानांत लहान अशा खेड्यांतहि आढळून येतात आणि कोणाहि थोर पुरुषांनी संदेश दिला तरी त्यांची योजना कशी बिघडवून टाकतां येईल याचाच विचार त्यांना सुचतो. 

            स्वप्राण देउनीया दुर्जन करितात विघ्न दुसऱ्यासी । 
           जैसे भोजन करितां भोजनकर्त्यासि ओकवी माशी । । 

       या माशीसारखीच त्यांची गति असते. वासरांत लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे त्यांची स्थिति असल्यामुळे, यापुढे जी सुधारणा करावयाची असेल त्यासाठी व्यापारी, पुढारी, भिकारी, 


कथेकरी, बुवा-महंत, विद्वान-पंडित, शाळामास्तर, सरकारी नोकर व गावांतील काही बोलके लोक हे ज्या ज्या मार्गांनी एकत्रित होतील त्यांचाच अवलंब केला पाहिजे आणि आपला देश कसा असावा हे त्यांना बौद्धिकतेने समजावून वा राजसत्तेने पटवून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न समाजाची दिशाभूल व पिळवणूक न होईल अशा त-हेने सोडवला पाहिजे. अशा रितीने हे सत्कार्य आम्ही सर्वांकडूनच घडवून आणले पाहिजे. असे जर आम्ही करणार नसलो तर आजची दुनिया कुणाच्यानंहि ताळ्यावर येणे शक्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. 
           वरील कार्यालाच मी खरे समाजशिक्षण समजतो; अर्थात्  यांतील विद्यार्थी मी वर दर्शविलेले लोकच आहेत. आधी त्यांनाच खऱ्या समाजशिक्षणाची गरज आहे, त्यानंतर मग माझ्या भोळ्या समाजाला शिक्षण देण्यात यावे नि तेच त्यांच्या पदरांत पडेल असे मला वाटते. नाहीपेक्षा निवळ हंगामी सुधारणा केल्याने पैसा पाण्यात उधळण्यापलिकडे त्याला कवडीइतकीहि किंमत राहणार नाही व लोकांत आदर्शतेची चर्चा भरमसाठ चालूनहि ती वस्तु कुणाला देखील दिसणार नाही. याचा परिणाम हाच की मग माणूसच माणसाचा शत्रु बनेल व जिसकी लाठी उसकी भैंस अशा अनवस्थेतून युगप्रलय ताबडतोब पुढे येईल, हे विसरूं नये. यांतील प्रत्येक गोष्ट लक्षांत ठेवून तिचा अनुभव घ्या म्हणजे कळेल. 

                   सार्वत्रिक क्रांतीची आवश्यकता 
        मित्रा ! जी दिखाऊ आदर्शप्रियता आज समाजांत आम्ही प्रामुख्याने पाहात आहोत, वास्तविक आदर्शप्रीति नसून थोरांच्या शब्दांवर जगण्याचा तो किफायतशीर धंदा आहे; आणि जे या धंद्याला दूर सारून आपला देश सर्वतोपरी सुखी व्हावा म्हणून त्यागाने खरी आदर्शता निर्माण करतील ते मारले जातील अथवा त्यांना मागे पाडण्याचे 


आदर्श जीवन व समाजशिक्षण

अन्योन्य प्रयत्न केले जातील, असा या जगाचा सध्या तरी गरमागरम बाजारभाव आहे. आपण तत्वज्ञानाने उच्च पण व्यवहारात पशुतुल्य गणले गेलो आहोत यांत मला तरी शंका नाही. या कठिण साखळीतून बाहेर पडण्याकरिता आपणाला आजचा रूढ धर्म, सध्याची दिखाऊ देशभक्ति, चालू राजकारणशैली व प्रचलित व वर्णाश्रमयोजना यांत नुसती वरवर डागडुजी न करता, या गोंधळास मूठमाती देऊन यांतून एक नवीन धारणा व नवं युगच निर्माण केले पाहिजे; तरच माणसाला आदर्श मानवतेचे दर्शन व ज्ञान होईल.