१६. नव्या युगाचा उदयाचल

                उपदेशकांनी केलेला समाज विनाश

         माझ्या प्रिय मित्रांनो ! सेवक-सेवाधिकाऱ्यांनो व उपासकांनो नव्या युगाच्या अरुणोदयाबद्दल आज मला आपल्याजवळ हृदय मोकळे करुन निर्वाणीचे बोलावयाचे आहे. वास्तविक ते मी नेहमीच सांगत आलो आहे; परंतु प्रामुख्याने विशिष्ट गोष्टीवरच आज आपली दृष्टि केंद्रीभूत व्हावी अशी माझी इच्छा आहे. साऱ्या जगाच्या घडामोडी आजवर बऱ्यावाईट प्रचाराद्वारेच होत आल्या आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. निष्काम वृत्तीने लोकहिताच्या कार्याचा प्रचार करणारा वर्ग ज्या ज्या वेळी जागरुक होता त्या त्या वेळी जग उन्नतीच्या शिखराकडे जात होते आणि स्वार्थप्रेरित किंवा अविचारी वृत्तीचे प्रचारक जेव्हा जगांत वावरत होते त्यावेळी जग मरणाच्या खाईकडे ओढले जात होते, ही गोष्ट इतिहासाच्या सूक्ष्म अभ्यासाने
आपल्या लक्षात येऊ शकेल. जाणत्या लोकांवर, जे जे आपणास ठावे। ते ते हळूहळू शिकवावे। शहाणे करुनि सोडावे। सकळ जन ।। याची फार मोठी जबाबदारी असते व ते जर ती इमानेइतबारे पार पाडीत राहिलो तर जगांत सुखसमृद्धीचे सत्ययुग नांदायला काही अडचण राहात नाही. परंतु त्यांनी जर आपले हे कर्तव्य सोडले आणि उलट आपल्या विद्वत्तेपासून धनोपार्जन करण्याचा सपाटा चालविला तर जगाचा सत्यनाश व्हावयालाहि वेळ लागत नाही. जगातला, विशेषत: भारतात आज जी भीषण स्थिति अनेक वर्षांपासून अनुभवास येत आहे तिचे कारण, जाणत्यांनी आपल्या कर्तव्यास तिलांजलि


नव्या युगाचा उदयाचल

देऊन आपल्या बुद्धिमत्तेला स्वार्थाचे एक अमोघ साधन बनविले, हेच होय.जाणत्यांनी मनुष्यत्वाच्या व्यापक प्रेमाने व निष्काम बुद्धीने आपल्या ज्ञानाचा प्रचार जगात केला असता तर भारताची अशी दुर्दशा केव्हाही झाली नसती. आमचे पंडित, पुराणिक, भिक्षुक, शिक्षक, कीर्तनकार व बुवा इत्यादी लोक आतापर्यंत प्रयत्न करीत आले नाहीत असे नाही; पण आशाबद्ध वक्ता जगाला खरे ज्ञान काय देणार? बहुजनसमाजाला काय सांगावयाचे हे सर्व त्यांच्याच हाती होते. अशा स्थितीत, आपली पकड कायम राहून परंपरेने आपला फायदा होत राहील, असेच विचार समाजाच्या डोक्यांत घुसवणे त्यांच्यापैकी बहुतेकांना पसंत पडले व तशाच वाङ्मयाची आणि कथाकिर्तनांची रेलचेल त्यांनी समाजांत उडवून दिली. धनवंताकडून वर्षासने चालू राहावीत म्हणून त्यांनी मने न दुखवतां समाजास त्यांचे गुलाम करून सोडले आणि उपदेशाचे नावांखाली उथळ व भ्रामक मनोरंजन करुन लोकांचा बुद्धिभ्रंश केला. शस्त्राने प्रत्यक्ष वध करण्यापेक्षा बुद्धिभेद करणे हे अधिक भयावह व विनाशकारक असते, याचे प्रत्यंतर आजवर भारतास आलेच आहे ! उपदेशकवर्गांपैकी काही लोकांनी प्रामाणिकतेने समाजशिक्षणाचे पवित्र कार्य केले ही गोष्ट विसरतां येत नाही; तथापि असे लोक फारच थोडे! शिवाय, ते निघून जातांच त्यांच्या उपदेशाचे स्वरुप पालटून टाकण्याइतके दक्ष बाकीचे लोक होतेच.

                    सत्ता, सेवा व शिक्षण
         सज्जनांनो! प्रचारतंत्र बिघडल्यामुळेच सर्व बाजूंनी भारताच्या शक्तिबुद्धीचा व पावित्र्याचा नाश झाला; भारतांतील तेहतीस कोटी देव केवळ दगड होऊन पडले आज त्या दगडांना देवत्व देण्याचे आपले सर्वांचे काम आहे व ते आपण धडाडीने आणि निर्लोभ वृत्तीने केले तरच भारताचा उद्धार होणार आहे! सत्तेच्या जोरावर समाजांतील अनेक


युगप्रभात

रुढ्या मोडून काढता येतील, अनेक योजना आखून बहुजनसमाजास जागृत करता येईल; परंतु सत्तेबरोबरच किंबहुना त्याहुनहि अधिक प्रमाणांत सेवा परिणामकारक होऊ शकेल! सत्तेने समाजाची घडी बदलतां येईल आणि प्रचाराने समाजाची मनच पालटून टाकतां येतील. धार्मिक भावनेने भारल्या गेलेल्या खेड्यांत कायद्याच्या बडग्यापेक्षा सेवाभावनेचा प्रेमळ प्रचारक सखोल कार्य करु शकेल. हे काम आज प्रत्येक जाणत्या माणसाने केले पाहिजे. आपल्या सारखे शेकडो देशसेवक हजार जन्म घेतील तरी भारतांत कामांची उणीव नाही, इतके मोठे कार्यक्षेत्र इथे आहे! भारतांतील शेकडो ऐंशी टक्के प्रजा अशिक्षित, अडाणी आहे! माणसाचे हक्क, त्याची कर्तव्ये, जीवनाचा हेतु, वागणुकीचे शास्त्र व आपली सुप्त शक्ति यांची त्यांना कल्पना देखील नाही. त्यांच्या पैकी जे कोणी शिकून विद्वान होतात ते लागलीच एखाद्या नोकरीच्या किंवा अधिकाराच्या शोधात लागतात व आपल्या बुद्धिमत्तेने अज्ञ समाजावर जगण्याचा प्रयत्न करतात.
     मुलाचे शिक्षण नोकरीसाठी व मुलीचे शिक्षण लग्नासाठी असा आजकाल जणुं शिरस्ताच पडल्यासारखा झाला आहे! मोठमोठे विद्वान आपल्या बुद्धिमत्तेने एखाद्या विशिष्ट तुकडीचे नेतृत्व स्विकारुन पुढारी होतात व अशा स्थितीत त्यांनी शेकडो व्याख्याने दिली किंवा वाङ्मय निर्माण केले तरी त्यांत निर्भेळ समाजहित क्वचितच साधले जाते. कारण, समाजहितापेक्षा स्वत:चा सन्मान, सत्ता किवा अन्य स्वार्थ त्यांच्या बुद्धीस विमोहित करीत असतात. शिक्षण हे इतरांस ज्ञानदान करुन सुधारणा घडवण्यासाठी आहे असे समजण्याऐवजी, ते इतरांस तुच्छ किंवा भक्ष्य समजण्यासाठी आहे असेच समजणारे सुशिक्षित लोक समाजांत प्रकर्षाने आढळून येतात. शिकलेल्या विद्वानांना खेड्याच्या जीवनाची एकप्रकारे घृणा वाटत असते. देहाती खेडुतांना गावंढळ म्हणून ते उपहासाच्या दृष्टीने पाहतात. क्षीरसागराने


नव्या युगाचा उदयाचल

स्वत:चे जीवन आटवून चंद्रास उन्नतिपथावर आणावे व स्वतः क्षार बनावे, परंतु चंद्राने आकाशात झेप घेतांच तारकांच्या नंदनवनांत व हिरामोत्यांच्या राशीत गुंग होऊन त्यांच्या धडपडत्या लाटांकडे तुच्छतेचा कटाक्ष फेकावा; अशीच स्थिति आजच्या बहुतांशी सुशिक्षितांची दिसून येते. जनतेला जागवणारे काही विद्वान बसल्या ठिकाणावरुन उच्च भाषेत कळकळीने काही लिहित असले तरी, त्यांच्या विचारांचा शिरकाव खालच्या थरांत होणे दुरापास्त होते व ते स्वत: समाजांत समरस होऊन त्यांना सुधारुं शकत नाहीत. अशा प्रकारे समाजजागृतीचे हे बहुमोल व सर्वश्रेष्ठ कार्य तसेच मागे पडून राहाते आणि खेड्याखेड्यांतून पसरलेले स्वार्थी उपदेशक त्याचा भरपूर फायदा घेतच राहतात. तेव्हा, वाचक कधी आचारवान होतील व श्रोते कधी वाचक बनतील याची आशा करतां येणेच कठिण! भारताची ही परंपरेने चालत आलेली बथ्थड परिस्थिति जर सुधारली नाही तर स्वराज्य मिळाले तरी गुलामगिरी कायमच आहे असे म्हणणे भाग आहे. सिंहासनावरील व्यक्तींच्या बदलाबरोबरच हृदयसिंहासनावर अधिष्ठित असलेल्या भावनांतहि परिवर्तन होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाच्या अंतरंगांत जर पालट घडवून न आणला तर भारताच्या उन्नतीचे सुखस्वप्न फोल ठरेल!

        बौद्धिक गुलामगिरीचे निवारण हेच खरे स्वातंत्र्य!
    
          प्रिय बंधुनो! भारताच्या सर्व रोगांचे मूळ प्रामुख्याने त्यांचे अज्ञान आहे! वर्षानुवर्ष त्याची बुद्धि मुर्दाड व भ्रमिष्ट बनवण्यात आली आहे. धर्म-पंथ-जाति-वर्ण-संप्रदाय-रुढ्या-चमत्कार-देवावतार-स्वर्ग-पुण्यकर्म इत्यादी अनेक नावांनी भलभलत्याच गोष्टीचे किटण त्याच्या बुद्धीवर चढवले गेले असून खऱ्या तात्त्विकतेपासून त्याला दूर ठेवण्यात आले आहे! उठणे, बसणे, बोलणे इत्यादि सामान्य व्यवहाराचे देखील यथार्थ स्वरुप बहुजनसमाजास कळेनासे झाले, इतका त्याचा


युगप्रभात

अध:पात झाला आहे! अशा अंकारमय परिस्थितीत प्रकाशाची ज्योत घराघरांतून पेटवण्याचे कार्य प्रत्येक विचारी माणसाने आज केले पाहिजे. तरच जनतेचे अंतरंग बदलेल व तिला स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येईल. आपला कल्याणमार्ग व आपला कल्याणकर्ता कोण, हे जोवर जनतेला स्वत:च्या दृष्टीने पारखता येणार नाही तोपर्यंत तिला कोणतेहि स्वातंत्र्य व काहीहि अधिकार दिले तरी दुर्दशेच्या चक्रव्यूहांतून बाहेर पडतां येणं शक्य नाही. अशा स्थितीत ब्रह्मज्ञानाच्या जाड गोष्टी लोकांना शिकवीत बसावे हा शुद्ध वेडेपणा असून, लोकांपासून जाणत्याने आपल्या बुद्धिमत्तेने स्वार्थ साधावा यापेक्षा दुसरे पतन नाही ! पंडितांचा आदर्श व कलावंतांचे कर्तव्य समाजाशी समरस होऊन त्यास ज्ञान देईल तोच खरा पंडित व विद्वान, अशी व्याख्या रुढ करुन आज त्यांचीच प्रतिष्ठा वाढविली पाहिजे आणि इतरांच्या विद्वत्तेस अजागळ ठरविले पाहिजे! मोठमोठ्या पदव्यांचा मोह किंवा वजन आमच्या मनावर पडता कामा नये! व्यासपीठावरुन व्याख्यान झोडणारा किंवा पटावर पोथी वाचणारा तो विद्वान किंवा पंडित, ही कल्पना आता फेकून दिली पाहिजे! प्रसंगी प्रभावी भाषण करील, पोथी वाचील आणि योग्य वेळी समाजाच्या तुच्छ व घृणित वाटणाऱ्या सेवेसाठी झाडू घेऊनहि सज्ज राहील तोच खरा ज्ञानी ! भगवान् श्रीकृष्णाप्रमाणे विश्ववंद्य तत्वज्ञान सांगणाराच गोरक्षण व घोड्याचा खरारा करु शकतो, प्रसंगी उष्टावळी काढून अंगण साफ करु शकतो व अवश्य तेव्हा हातांत शस्त्र धरुन सत्यरक्षणासाठी लदहि शकतो; ही गोष्ट आदर्शभूत म्हणून आम्ही समोर ठेवली पाहिजे! प्रत्येक जाणत्या, सुशिक्षित, बुद्धिमान व विद्वान भारतपुत्रास माझी अशी कळकळीची विनंती आहे की, आपली विद्वता तुम्ही एका घरांत डांबून ठेवू नका किंवा तिचा उपभोग केवळ स्वत:च घेऊ नका किंवा


नव्या युगाचा उदयाचल

तर त्या ज्ञानगंगेच्या प्रवाहास जनतेत वाहू द्या! हा होरपळून निघालेला भारतवर्ष फिरुन फुलू द्या-फळू द्या! हजारो वर्षापासून मातीत रुतून बसलेल्या या पाषाणांत आपल्या कलाकृतींनी देवपण आणून या स्मशान झालेल्या जगाचे स्वरुप पालटून टाका! ज्ञानदानाइतके पवित्र दान कोणतेहि नाही; प्राणदानापेक्षा देखील याचे महत्व फार मोठे आहे. कथाकीर्तन करा, व्याख्यान -प्रवचन द्या की अन्य साधनांचा अवलंब करा; पण त्या सर्वांमधून भोळ्या भाबड्या समाजांत चैतन्य ओता ! त्याला जागृत करून जीवनाची खरी दृष्टि द्या!

                 युगप्रवर्तक तुम्हीच आहांत!

       तुमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या जीवनांत पांच-पन्नास लोकांनी जरी याप्रमाणे सुज्ञ नागरिक बनवू शकला, तरी ती गोष्ट दहा पदव्यापेक्षा अधिक भूषणावह आहे असे मी समजेन ! कुठेहि असा, कोणत्याहि संस्थेत असा, पण लोकजागृतीचे हे व्रत घेऊन आपले आदर्श जीवन जनतेसमोर ठेवा; एवढेच मला सांगावयाचे आहे ! नेणत्यांना जीवनदृष्टि देऊन स्वतंत्र बुद्धीचे बनवणे, हे कर्तव्य तर तुम्ही जाणते भारतपुत्र तातडीने बजावणार नसाल तर भारताच्या नशीबी अजून शेकडों वर्षेपर्यंत या-ना-त्या स्वरुपांत गुलामगिरी व दुःखदुर्दशा यांचा वनवास कायमच राहील आणि त्याला या सुखशांतीसमतेच्या नव्या लोकयुगाचा आनंद चाखतांच येणार नाही; हे कटु सत्य विसरुन चालणार नाही! श्रीगुरुदेव तुमच्या सद्बुद्धीला चालना देवो व सर्वोदयकारक अशा सत्ययुगाचा सूर्योदय तुमच्या द्वारे करुन घेवो, एवढीच त्याचे चरणी माझी कळकळीची प्रार्थना आहे!