आनंदामृत
प्रकरण तिसरे
मोक्ष-सुखाचा मार्ग
श्रोती व्हावे सावधान । लक्षी घ्यावे बोबडे वचन ।
सर्व तुम्ही साधुजन। म्हणोनि तुम्हां विनवीत ॥१॥
प्रथम करा सोपा उपाय । जेणे प्रपंचातचि मुक्त होय ।फिटे चौयांशीचे भय। ग्रहण करिता अर्थ याचा ॥२॥
नको नकोत काही साधने। नको नको पहाडी राहणे ।
नको संसार तोहि सोडणे । भक्तिरूप उपाय तो ।।३।।
असोनि खुळा पांगळा । जो का उपाधी वेगळा।
असेल प्रपंचहि आगळा। तरी चालतले यालागी ।।४।।
कित्येक बोलती ब्रह्मज्ञान । शास्त्रपुराणे पठन करून ।
म्हणती पाहू पाहू ब्रह्मखूण। दावू लोका सर्वहि ।।५।।
रश्मीची ज्योति लावा। मग तिकडे दृष्टि फिरवा।
बह्ममणि दिसतो रे हिरवा। पाहा पहले एक दृष्टी ।।६।
ज्यासी आहे स्पष्ट दृष्टि । तो पाही दीप्ति गोमटी।
बिचारा आंधळा अंधदृष्टी। काय जाणे? ||७||
तयाने काय साधने करावी? ब्रह्मज्योति कैसी पाहावी?
म्हणोनि सर्वचि खरी मानावी। करावे दृढ ते एकचि ॥८॥
आनंदामृत
ब्रह्म काय दृष्टीने दिसे? आणि दिसे तितुके नाशे ।
ब्रह्म काय अंधाजवळी नसे? चराचरी व्यापक जे ।।९।।
जंव शुद्ध ज्ञानमार्ग न जाणला। कि भक्तिपंथे न गेला।
तोंवरी तया प्राण्याला। मुक्ति मिळेल कैंची? ।।१०।।
*अहं ब्रह्मास्मि* शब्द एक । तेथे जया न लाभे ऐक्य ।।
तो प्राणी जन्ममरण-शोक । सोडील केवि? ||११ ।।
जंव *तत्पद* पाहोनि *त्वंपद* शोधील। *असि* पदाचा मार्ग साधील ।
तंवचि मोक्षमार्ग लाभेल । हे तू सत्य जाण पा ।।१२ ।।
नेम धर्म अनुष्ठान । यांनी होशील जरी पावन ।
तरी मोक्षास आत्मज्ञान। पाहिजे गड्या! ।।१३ ।।
जंव सोडूनिया प्रवृत्ति। धरिशी दृढ भावे निवृत्ति ।
जरी होशील लीन संती। तरी ज्ञानदृष्टि देई तो ॥१४ ।।
श्रवण मननाचेनि योगे। निजध्यास लागे वेगे।
मग साक्षात्कार भोगे । तंववरी मुक्ति मिळेना ।।१५।।
वैखरी मध्यमा पश्यंति पर। हे वेदांचे जाण घर ।
चार वाचा तीच नार। वरी प्रेमनिर्झर सत्रावी ।।१६।।
पडे शुद्ध प्रेमकिरण जयावरी। अमृत वाचा पाझरी।
प्रगट ती वेदशब्द सत्य अवधारी। न ढळती बापारे! ।।१७।।
तया शब्दे जीव-शिव होती एक। मुळीचे ठावे पडे देख।
गंगाजळी टाकिता मलीनोदक । गंगारूप होतसे ।।१८ ।।
आनंदामृत
जरी करिशी यज्ञ अन्नदान । तरी मिळती स्वर्गादि भोग पूर्ण। पुण्य सरलिया तेथून। उतरे भोगाया मृत्युलोकी ॥१९॥
म्हणू नि तूं ऐसे न करी। सांगती संत ते अवधारी।
लक्ष ठेवी पुरा-पुरी। माझिया बोला ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । तृतीय प्रकरण संपूर्णम् ॥३॥
------------------------