प्रकरण चौथे

                             पंचमुद्रा-साधन

बहुत ग्रंथ जरी करिशी पठण। तरी चंचल होय मन जाण।आता संख्या! निवांतपण। करी येथे ॥१॥

नाना साधने नाना सुविद्या। नाना पंथ, नाना कुविद्या ।
ही सर्वही जगद्वंद्या- I साठी करिजेत॥२॥

जोवरी न होय एकाग्र मन । तोवरी करिशी यांत भ्रमणI 
जेथे सद्गुरुचे चरण। न आढळती॥३॥

बोलणे तुला सत्य खास । होई स्वदेहावरी उदास
लागे त्वरित सद्गुरुपदास। यापरता मार्ग नाही ॥४॥

सेवा करी रे लक्ष लावूनि। तेणे होशील आत्मज्ञानी I
मुक्ति लाभेल तुजलागूनि। तत्त्वविचारे वागता॥५॥


आनंदमृत       

पुढे जरी करिशी श्रवण। तरी अल्प सांगेन साधन ।।
पंचमुद्रा त्या कवण। परियेसी गड्या। तूं ।।६।।

भूवरी चाचरी अगोचरी। खेचरी घेऊनि अलक्ष्य अवधारी।
सांगेन परोपरी। उकलोनिया ।।७।।

ठेवोनि दृष्टि नासिकाग्री। लक्ष देइजे पृथ्वीभीतरी ।
तंव ती झाली भूचरी। मुद्रा पहा ।।८।।

दृष्टि असता सम। होईल अगोचरीचे काम ।
तीक्ष्णपणे पाहता प्रेम। देईल चाचरी ।।९।।

जरी पाहशी ऊर्ध्वीकडे । खेचरी मुद्रा सहज घडे ।
आता अलक्ष्याचे पवाडे । सांगतो ऐक ॥१०॥

दृष्टि ठेवोनि ऊर्ध्व जाण । नेत्र दुखावती क्षणोक्षण ।
वामभागी लक्ष पुरवून । अलक्ष्य मुद्रा साधीरे ।।११।।

जंव दष्टि फिरविशी आप। तंव चक्राकार दिसे कंप।
पढे नीलवर्ण दिसे चाप। तीच खूण तूर्येची ॥१२ ।।

श्रवण मनन निजध्यास । एकाग्र करिशी सावकाश ।
तंव तूर्येचा आभास । दिसो लागे ॥१३ ।।

रंग तूर्येचा श्यामता। वारंवार पाहो जाता।
पीत रंग दिसे त्राता। अद्वैतपणे ॥१४॥

पाहणे दिसणे एक होता । लागे उन्मनि अवस्था ।
नाभी-कुंडलिनी निगुता। चढे ब्रह्मरंध्री ॥१५ ।।


आनंदामृत    

 
ऐक राया! सांगू वचन । मुद्रेमध्ये रे खंडणI
समाधीचे उत्थान । पावोनि हळू चालावे ॥१६॥

प्रथम करोनि पद्मासन । नासिकाग्री नेत्र फिरवून I
दोन्ही अंगुष्ठे श्रवण। बंद करी तत्काळ ॥१७॥

नेत्री ठेवोनि तर्जनी। मध्यमा ती नासिक स्थानी
मुख अनामिके रोधोनी। श्वास बंद करी तो ॥१८॥

ऐसे कीजे दोन्ही करे। लक्ष देइजे सामोरे ।
गुरु घेवोनि हाते रे। तदनंतरे पाहावे ॥१९॥ 

शंख मृदंग आवाज। स्पष्ट ओळखो ये सहज।
प्रभा फाके गगन-शेज। दंग वृत्ति राहतसे ॥२०॥

वृत्तिसाठी ही साधने । रंगरूप सकळ मिथ्या ज्ञानेI
ध्वनि मुद्रांची मायिक भूषणे । ब्रह्मरूपी न उरती ॥२१॥ 

झालिया एकाग्र साधन । अलक्ष्य लक्षावे विंदाण ।
लक्ष ठेविता अलक्ष्य जाण । होशील पूर्ण गुरुकृपे ॥२२॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । चतुर्थ प्रकरणम् ॥४॥
    
       --------------------