आनंदामृत -११-
*प्रकरण पाचवे*
*हठयोग-साधन*
जरी साधू म्हणती हठयोग। तरी महाकठिण असे सोंग I प्रपंचाअंगी तैसा भोग। घडे केवि? ॥१॥
जो नर सोडी प्रपंचभान। तयाने करावा हठयोग जाण ।
ब्रह्मचर्य राहोन। मानापमान सांडावा ।।२।।
जयाने हठयोग घ्यावा। तयाने अहंभाव सोडावा ।
स्वदेहाची पर्वा । न करावी किमपिही ।। ३ ।।
विहंगम मार्ग हठयोग। तेथे भोग तितुका रोग ।
॥ इतर सोडोनिया उद्योग। होई सादर नेमेसी ।। ४ ।।
सर्वहि मार्ग एक होत। पाहता दिसती जरी अनेक पंथ ।
परंतु सर्वातहि एकांत। साधला पाहिजे ।।५।।
करोनिया पाया मजबूत । मग घ्यावा कुणीहि पंथ ।
पाहावा तयाचाहि अंत । सुलभ मार्ग अंगीकारूनि ।।६।।
असोनिया एका पंथे। मग पडताळी विभिन्न मते ।
इकडे तिकडे पाहोनि जाते। राहते वृत्ति अढळचि ।।७।।
बोलावयासी वाटे गोड। पंच उचलिता न पुरती कोड ।
तो बोलायाची चाड। व्यर्थचि करी ।।८।।
आनंदामृत
मागे सांगितले साधन । पंचमुगायोग पर्ण ।
आता हठ योग जाण। वर्णीतसे अल्पमती॥९॥
प्रथम पाहोनि एकांत स्थान । जेथे कोणी नसे वास्तव्य करोन।
आधी करोनि एकाग्र मन। तेथे जावोन राही तू ॥१०॥
ठेवोनिया दक्षिण चरणासी। जाई मणिपूर स्वाधिष्ठानासी।
ओढोनिया मूलाधारेसी। स्वस्थ उगा राही की ॥११॥
मग सोडी वर प्राण। दोन्ही मिळवी प्राण अपान ।
अनाहती विश्वघ्न । दैवत वसे असे जाणबा ।।१२।।
गुरु असावा सामोरी। मेरूची गाठ उठते वरी।
श्वास रोधी रे निर्धारी। हठयोग असा स्वानुभूत ।।१३।।
क्षणोक्षणी चक्रे दिसती। नित्यनियमे जप चालती।
षड्चक्रांचे भंवती। अनुभव ऐसा ॥१४॥
त्रिकुटी मिळती मुद्रा तीन । भ्रमरगुंफेसी जाती दोन ।
पश्चिमेसी तिसरा जाण। एक मार्ग जात असे ॥१५॥
पुढे दिसे वैकं ठनगर। अनंत रंगाचे माहेर।
उभी असे द्वारी नार। माया राणी ॥१६॥
पुढे तया नगरा आंत । कोटि सूर्यप्रकाश दिसत ।
गुरूदर्शनाचा एकांत । लाभे तया स्थळी ॥१७॥
पाहणे अधिक दिसणे। होती एक अद्वैतपणे।।
समाधी राही तयागुणे। अखंडित ॥१८॥
आनंदामृत
मार्गक्रमण कीजे हळूहळू । जैसे तीन महिन्याचे बाळू ।
जेवि पिपिलिकेचा खेळू । चालतसे ॥१९ ।।
जरी हठयोग केला। हट्टानेचि पुढे गेला।
तरी तो हट्ट पाहिजे मुरविला। प्रेमामध्ये ॥२०॥
ब्रह्मानंदी उठती लहरी। न चाले द्वैताची फेरी।
राहोनि निवांत जैसे तैशापरी। आनंद करी परिपूर्ण ।।२१।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । पंचम प्रकरण संपूर्णम् ।।५।।
------------------