*प्रकरण सहावे*
*अजपाजप*
श्रवण करी माझिया राया! तुज सांगेन सुगम उपाया।
जये श्रीकृष्णे व्यवसाया। लाविले उद्धवासी ॥१॥
तोचि शुकाने परीक्षितासी। आणिक नारदे वाल्मीकासी।
वशिष्ठे सांगितला रामासी। तोचि सांगेन उपाय आता ॥२॥
जैसा सांगेन तुज उपाय । श्रद्धा ठेवोनि करीतु जाय ।
जेवि मातेचे गोड गोड पेय। पीतसे तान्हुला ॥३॥
तुज फारचि आहे गोडी। तरि हा उपाय करी तातडीI चालता पायाचेनि जोडीI वाट लाघे साधनाची ।।४।।
आनंदामृत
उत्तम मार्ग हा सोडून । कासया फिरसी रानोरान?
या प्राणियांसी सांगे कवण? करिती मना आले ते ॥५॥
खरोखरी ज्या मानवाची। इच्छा असेल गा तरावयाची I
तेणे सावकाश हाचि । उपाय करावा ॥६॥
म्हणती देव पहाडी लपला। तो एका साधूने पाहिला |
कैसा मिळेल आम्हाला। ओरडती ऐसे ॥७॥
मागे तरले बहुत जन । तिथे उपाय केला कवण? ।
याच उपाये करून । सर्वहि तरले जाणपा ॥८॥
किती सांगू त्यांची नावे। नामा धृव प्रल्हाद बरवे।
संदीपने कृष्णासी सांगावे। आदिनाथे मच्छेंद्रा ।।९।
कोणी सांगती बाहा नाम। म्हणती म्हणा राम-राम।
त्या नामें चि कल्प-द्रुम। फळे म्हणती ॥१०॥
जेथे न उरे कल्पना। तोचि राम तुझिया नयना।
परंतु तू अज्ञाना?। भुललासी अंतरंग ।।११।
अज्ञानत्व ठेवोनिया अंगी। अहंकारे राहिले जगी। या
बुडाले याने कितीक जोगी। विचार करी रे । ॥१२॥
सत्य न अनुभविता मनी । बहु बोलले असत्य भाषणी।
सत्य-असत्य विचार जनी। पाहा पाहा बापा रे! ।।१३।
सत्य टाकोनि असत्य धरी। तो नर जाईल यमपुरी।
यांत काही कलाकुसरी। नलगे सांगावी ।।१४
आनंदामृत
अरे। ठेवी सत्यपण । असत्य सांडी सांडी जाण ।
सत्य ईश्वरा प्रमाण । संत वदती निश्चये ॥१५ ।।
तरी आता बा साधक! प्रथम सांगेन ते ऐक ।
सदगुरु-चरण धरोनि घोक । अजपा सदा अंतरी ।।१६ ।।
हिला अजपा का म्हणती। ते सांगो पुढत पुढती ।
जप हृदयांतरी चालती। आपोआप, न जपता ।।१७ ।।
म्हणती यास निरंजनमाळ। भजेल जो त्यास कांपे काळ ।
जरी प्रपंचाची हळहळ। तरी दूर होय ।।१८।।
ओहं-सोहं-नाम असे। ओहं (ॐ) नाभीपासोन प्रकाशे।
उमटती तयाचे ठसे। कंठावरी ॥१९।।
सोहं नासिकेशी वसत। श्वासरूपे उंच जात ।
हा दोन्हीचा एकांत। अंत विशुद्ध चक्री ॥२० ।।
जप चाले आपणाआपण । करोनि थोर एकाग्र मन ।
ओळखोनि परिपूर्ण । लक्ष ठेवी अधर कंठी ।।२१ ।।
यापुढे गड्या! काही। शुद्ध नाम दुजे नाही।
याचि नामे जाशील पाही। पैल पंथा अभ्यासे ।।२२ ।।
येणे होईल आत्मशोधन। पुढे षड्चक्रदर्शन ।
जप एकवीस हजार सहाशे जाण। अहोरात्री ।।२३ ।।
टाकोनिया मार्ग खरा। मारता उगाचि येरझारा ।
तेणे के वि चौयांशी-फेरा। चुकेल तुमचा? ॥२४ ।।
आनंदामृत
आता करी नामोच्चार । पाहोनिया एकांत सुंदर ।
तेथे बैसे सविस्तर। पद्मासन घालोनि ।।२५।।
जप चालतसे अपार। ओळखी, करोनिया मन एकाग्र ।
उन्मेष वृत्तीचा सार। लाभेल तेथे ॥२६॥
लागे तेथे सहज समाधी। स्मरता अजपा तुटे उपाधि ।प्रपंचातहि विघ्न न बाधी। ऐसे नाम सुंदर सोहं-हंसा ॥२७॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षष्ठम प्रकरण संपूर्णम् ॥६॥
---------------------