आनंदामृत
*प्रकरण आठवे*
*सद्गुरु-कृपा*
श्रोती व्हावे सावधान । प्रेमे बोलेन काही खूण ।
जरी सद्गुरुकृपा जाण। पाहिजे तुम्हां ॥१।।
जरी जिज्ञासू शिष्य झाला। हदये इच्छी उद्धरण्याला ।
तयाने वैराग्यदृष्टी सद्गुरूला। शरण जावे ।। २ ।।
जाणावे सद्गुरुचे लक्षण । पुढे कळेल त्याची खूण।।
सद्गुरुपासोनि आत्मज्ञान। प्राप्त करावे ।।३।।
ज्ञान झालिया मागुती। बोधे बाणे सहजस्थिति ।
श्रद्धा ठेविता अपरोक्षप्राप्ति । ज्ञाने अद्वैती वृत्ति रमे ।। ४ ।।
प्रथम घ्यावं वैराग्यज्ञान । तेचि करावे शुद्ध वैराग्य जाण ।
गुरुपासोनि माहिती पूर्ण । घ्यावी अनासक्तीची ।। ५ ।।
जरी म्हणशी प्रपंची बुडतो। तरी परमार्थ न साधे तो।
दोन्ही मार्ग चालू म्हणतो। तो पार कैसा पावेल? ।।६।।
संती निर्णित केले होते। सहजासमाधी कवण्या पंथे।
पाणियांत असोनि कमळ ते । निर्लेप राही जयापरी ।।७।।
पाणी असे पुरुष दोन । पुष्प राही वरीचि जाण ।
प्रपंची वासनाक्षयाचे प्रमाण । सद्गुरुलागी पुसावे ।।८ ।।
त्या मार्गे शुद्ध वैराग्यी बनशी। मग निजगुह्याचा बोध घेशी।
तया बोधास्तव श्रवणेसी। सादर होई आवडी ।।९।।
आनंदामृत
या करिता पुढे श्रवण मनन । त्याचेनि घडे निजध्यास जाण।
तेणे होईल स्वानुभव पूर्ण । तुझिये दृष्टी ।।१०॥
या सर्व साधन-मिळणी। ग्रंथ वाचावे एकान्त स्थानी।
परोक्ष होता निरूपणी। गुरुमुखे रंगोनि जावे ॥११॥
ऐकोनिया श्रीगुरुचा बोध । तुज विराले दिसती जगबंध।
बनेल विदेहस्थिति अगाध । परमानंदे डुलशी तू ।।१२।।
अनंत पुण्याने लाभला। नरदेह हिरा हाता आला।
नराचा नारायण झाला । तो ऐसिया कृती निर्भयपणे ॥१३॥
सांगू केवी गुरु-महिमान। सद्गुरू तोचि देव जाण ।
धरी धरी रे तयाचे चरण । आण माझ्या गळ्याची ॥१४॥
चित्त-एकाग्रते कारणे । साधावी अजपादि साधने ।
परी अंती आत्मज्ञाने । अद्वैत व्हावे गुरुबोधे ॥१५॥
कवण चक्र कैसे पाहावे । ते गुरु योगेश्वरमुखे ऐकावे ।
मग अनुसंधान लावावे । तया चक्राचे ॥१६॥
श्रीगुरुच्या बोधे करून । जंव पाहशी सात रत्न ।
तव साधूनिया आत्मज्ञान । ब्रम्हानंदी डुलशी तू ।।१७।।
आता फार बोलू काय । धरी रे आत्मज्ञानाची सोय ।
तया वाचोनिया उपाय । ते अपाय होती सर्वहि ।।१८ ।।
इतिश्री आनंदामृत गंधे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । अष्टम प्रकरण संपूर्णम् ॥८॥
-------------------