आनंदामृत
*प्रकरण नववे*
*मानस-पूजा (ध्यान)*
मागे कथिली बहु साधने । अनेक पंथ अनेक ज्ञाने ।
परि ती सद्गुरुवाचूनि कवणे। न साधती ॥१।।
जरी साधका व्हावा देव । तरी हाचि सोपा उपाव ।
लीनपणे धरी दृढ भाव। एका सदगुरुचे पायी ।।२।।
सांडी सांडी सर्व पंथ । सद्गुरुवाचोनि होती व्यर्थ ।
म्हणोनि सद्गुरुचा भक्त । पूर्ण होई तत्त्वतः ।।३।।
नम्रतेने करी सेवा। पश्चात्तापे करी धावा ।
ठेवोनिया शुद्ध भावा। शरण जाई सुविचारे ॥४।।
एसे जाण सद्गुरुरूप। जे ब्रम्ह-सोहं-स्वरूप ।
हृदयी जयाचे ज्ञानदीप। उजळले असती ॥५॥
जरी असे नसे सद्गुरु जवळी। नामे राख लावी भाळी।
शीतल तो चंद्रमौळी। करी कृपा हदयीच ॥६॥
असे सांगतो सेवासाधन । करी नीट एकाग्र मन ।
ठेवी स्थिर करोनि आसन । एकांत स्थानी ।।७।।
नासाग्री ठेवी लक्ष। सर्व मनाचीच साक्ष ।
हृदयी धरोनि भावपक्ष । सद्गुरुमूर्ति सन्मुख स्थापी॥८॥
आनंदामृत
रत्नखचित चौरंग जाण | सुवर्णाचे गंगाळ घेऊन I
महागंगेचे पाणी आणून । घालो स्नान तयासी ।।९॥
नेसवी जरीकाठी धोतर। अंगी चोळावं सुगंध अत्तर।
बैसवावे दिव्यासनावर । गुरुमूर्तीसी सद्भावे ॥१०॥
सद्गुरु पूजावा आदरेसी। मनसुमने वाहू नि त्यासी।
बिल्वदले पुष्पाक्षतांसी। चंदनासह अर्पावे ॥११॥
गळा घालावा सुंदर हार । शिरी मुकुटाचा संभार ।
अंगी अंगरखा जरीदार । पायी खडावा रत्नजडित ।।१२।।
मग न्याहाळावे पूर्ण स्वरूप। धरोनि चरण आपेआप ।
सदगुरु-नेत्री ज्ञानदीप। सुहास्य वदन अवलोकावे ॥१३॥
द्यावा नैवेद्य पक्वान्नांचा। हा सर्वहि भाव प्रेमाचा।
समर्पावा गुरुचरणी साचा । भक्तिपूर्वक चिंतूनि ॥१४॥
करोनि नैवेद्य अर्पण । तांबूल द्यावा प्रेमे करून ।
पंचारती ओवाळून । चरणी मस्तक ठेवावे ।।१५।।
करावी नम्रपणे प्रार्थना। स्वरूपसिद्धीची याचना।
ध्यानी रंगवावे मना। जेणे ज्ञाना तेज चढे ।।१६।।
ऐसे करिता बहुत दिनी। चित्त एकाग्र होऊनि ।
ध्यानसमाधी लागेल जनी। सद्गुरू कृपे ।।१७।।
ऐसा चाले निशिदिनी नेम । तंव होईल पूर्ण काम।
हृदयीच भेटे आत्माराम। तया नरा शुद्ध ज्ञाने॥१८॥
आनंदामृत
शुध्द राहवे अंतरी। वैराग्यतेज शरीरावरी।
कृपा करील तंव श्रीहरी। उद्धरावया निधारे ।।१९।।
प्रथम करिता भासेभास । उघडेल कपाट अनायास ।
मोकलेल षड्विकार त्रास । तया नराचा येणे पंथे ।।२०।।
न धरी काही योग-पंच। सोपे सुंदर हेचि मत ।
सद्गुरुवाचोनि ज्ञान-ज्योत। कैसी प्रकटे ? ॥२१ ।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते। नवम प्रकरण संपूर्णम् ॥२१॥
------------------