आनंदामृत
*प्रकरण अकरावे*
*भविष्य-दर्शन*
झाले होते आधी कर्म। पुढे कर्म-फळाचा नियम।
कैसे तुटे मायिक प्रेम। कर्माचेनि योगे? ॥१॥
मागे संस्कार झाले फार । तेणे बासना लालचे सुंदर ।
करीतसे तैसाचि व्यवहार। रात्रंदिनी ॥२॥
केवी तुटावे हे कर्म। न कळे जीवा याचे वर्म ।
म्हणोनि फलभोगाचा अनुक्रम। सांगिजेल ॥३॥
घडते होते जे जे काही। नको अहंभाव पाही।
कृष्णार्पण करी त्याहि। सत्य-असत्यासी ।।४।।
पुढे जे ठाकेल पापकर्म । न घेई ओढोनि आत्माराम I परी अहंतागुणे सर्व नेम। वाया गेला ।।५।।
नकळे अंत जया नरा। तो शाश्वत मानील पसारा।
म्हणोनि ज्ञाने पूर्वीच दोरा। तोडावा आसक्तीचा ॥६॥
जरी योगी असेल दूर। तरी तये शोधावे घर ।
कोण गेले, कोण जाणार । आहेत ते ॥७॥
शुक्लपक्षी चंद्रछाया। तये वेळी वनी जावे फिराया।
एकांतस्थान पाहोनिया। स्थिर व्हावे ॥८॥
आपुली छाया पडे पृथ्वीवरी। तेथे लक्ष कंठी धरी।
ऊर्ध्व पाहता अवधारी। छायापुरुष उमटे तत्काळ ।।९।।
आनंदामृत
तया विराटावरी भविष्यखूण । खुलासेवार आता सांगेन I
कोण चिन्ह पाहता कवण। हानि-लाभ होय ।। १०।।
जरी नाही शिर दिसले । धड पूर्ण सर्व असले ।
तरी जाणा मरण आले। सहा मासी ॥११॥
सर्व स्वरूप असोनि पूर्ण। हस्त डावा नसे जाण।
तरी स्त्रीशोक दारुण। घडे तयासी ॥१२ ।।
सर्व असोनि नसे उदर । तरी पुत्र मरे हा निर्धार ।
षण्मासाचे असे अंतर। तया दुर्घटनेसी ।।१३।।
रक्तवर्ण दिसला दृष्टी। तरी निजदेह होईल कष्टी।
स्वरूपी स्पष्टता दिसे गोमटी । तरी लाभ तया असे ।।१४ ।।
दृष्टी पडता श्याम-वर्ण। तरी होय मानखंडण ।
हे सत्य भविष्य जाण। न चुके सर्वथा ॥१५॥
तरी यालागी शोक तो काय? धरा धरा सद्गुरुचे पाय ।
नसे काळापुढे उपाय । दृढ धरोनि नेईल तो ॥१६॥
मायाडंबर लागे गोड । सदगुरुचि याचा करील मोड ।
मोडील जन्ममरणाचे बंड l सत्य जाणा सर्वस्वी ।।१७।।
बहुत काय बोलू आता। सद्गुरु-अंगी सर्वज्ञता।
त्याचिये चरणी ठेवोनि माथा। सुखदुःखचिंता निवारी ॥१८॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
बादास विरचिते । एकादश प्रकरण संपूर्णम् ॥११॥
-----------------