आनंदामृत
*प्रकरण बारावे*
*अध्यात्मसाधन*
आता सांगेन मुख्य साधन। घेवोनिया शास्त्रार्थ प्रमाण । वासनेचे करी हनन । विशेषत: ॥१॥
जयाची खुंटली वासना। संकल्प मुरले जाणा।
तया प्राणियांच्या यातना। चुकल्या सर्वथा ।।२।।
नित्यानित्य-विचारावीण। वासना न खुंटेचि जाण ।
शोधू जाता नित्य निधान । अनित्य उडेल निश्चये ॥३॥
प्रथम आत्मा-अनात्मा कोण। हेचि काढावे निवडोन ।
तयासीच आत्मविचार जाण। म्हणती संतयोगी ते ।।४।।
जंव तू आत्मविचार करिशी। तवं ते अनात्म सर्व सांडिशी। तीन देहांविरहित होशी । सत्य जाण बापा रे! ॥५॥
देह द्वयाचे चळण। वर्तती इंद्रिये आणि प्राण।
सप्तधातूंचे प्रमाण I त्याहि वेगळा जाण तू॥६॥
अष्टधा प्रकृति म्हणती जे । तिये तुजपाशी न लागिजे।
सर्वा विरहित राहिजे। साक्षिभूत अखंडित ॥७॥
ऐसा हा करिता आत्मविवेक। अनात्म-वासना मुरेल देख।
वृक्ष सर्वहि काल्पनिक। अंत होई तयाचा ॥८॥
आनंदामृत
जगी सर्व विद्याकला असती। अध्यात्म त्याहुनि श्रेष्ठ निगुती।
योगीहि तयासी मान देती। प्रेमादरे करुनिया ।।९।।
असोनिया श्रेष्ठ अध्यात्म । त्यांतहि गहन आत्म-वर्म।
जयासी ज्ञान ऐसे नाम। देती ज्ञानी यथार्थ ।।१०।।
ज्ञान झालिया गोमटे। मग ज्ञेय ज्ञाताचि उमटे ।
कोणी ब्रह्मचि चोखटे। म्हणती तथा ।।११।।
शब्दाचे पोटी लक्षार्थ । तो दाविती ज्ञानीसंत समर्थ ।
तया वाचूनिया भ्रांत। न फिटे मनाची ।।१२।।
सर्व इंद्रिया मना वळण। देई कोण तोचि जाण ।
अष्टधा प्रकृतीचे संचालन। करी साक्षिरूप तो ।।१३।।
सुखदुःख खेळ जाणे तोचि। मुळी वार्ता नसे द्वैताची।
करी सर्व लीला अद्वैतचि । साक्षि आत्मा जाणावा ।।१४ ।।
आत्मसाक्षात्कार झाला। न भासे गुणधर्म तयाला ।
स्थूल सूक्ष्म कारणाला। विसरोनि जाय ॥१५॥
ऐसी जयाची होय स्थिति । तया दृश्य-भेद न भासती।
वासना जिथल्या तिथेचि मुरती। तया नराच्या ।।१६।।
जयाची होय अद्वैत वृत्ति । तया ब्रह्मात्मा दिसे सर्वांभूती।
तेथे अज्ञानाची न चले गति । वासना उरती मग कैच्या ।।१७।।
स्वप्नातूनि ठायी आला। स्वप्नसुख दुःखे कैसी त्याला?
तैसेचि मिळता ब्रह्मस्थितीला । अज्ञानजन्य जग गेले ॥१८॥
आनंदामृत
पाप-पुण्य यांच्या नेम I तेथे न राहे सुखसंभ्रम I
हे तो देहभिमाचे काम I भौतिक वासना उपजविण॥१९॥
ऐसे करावे साजन Iअनात्म जाणूनी आत्मदर्षण I भ्रांती फिटलिया होईल जाण I वासनाक्षय पूर्णपणे ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे I वेदान्तसार संमते l तुकडयादास विचचितेI द्वादश प्रकरण संपूर्णम् ॥१३॥
---------------------