*प्रकरण तेरावे* 
      
        *आत्म- दर्शन* 

कितीही सांगेन गा परोक्ष I तरी केलीयावीण नव्हे  अपरोक्ष I 
तया अपरोक्षाचा पक्ष। घेवोनि वदेन गुरुकृपे॥१॥

 लावावया आत्मशोध । केवी भरला सर्वी शुद्ध I 
तयाचा व्हावया बोध I आत्मनिरुपण सांगेन हो॥२॥

 आत्मा कोण हे ओळखण I जो देतसे स्वयंस्फुरण I तयास आत्मा ऐसे अभिधान Iदेती योगी ॥३॥

देहाभिमाने साचला मळ I काढून टाकी जो सकळ I तयास आत्मा आहे निर्मळ I हे कळोनि येई॥४॥

आत्मा स्वयंज्योती असोनि एक Iभरला कैसा हो  सकळीक I तयाची व्हावया ओळखI सांगेन थोडे पुढे ते ॥५॥


आनंदामृत        

संपूर्ण काचियाचा महाल । तेथे जाहले एक नवल ।
आत श्वान ते शबल। शिरले असे ।।६॥

तया श्वानाची दृष्टि । जिकडे जाय उठाउठी।
तया सर्वत्र पाठी पोटी। स्वरूपचि दिसे ।।७।।

परि त्या ऐसे न गमेचि। की हे मम स्वरूप निश्चयेसी ।
तो ओरडू लागला मानसी। दुजे म्हणोनि ते वेळा ।।८।।

तयाचे प्रेमे कवटाळणे। आणि क्रोधे चवताळणे ।
देहा कष्टवी द्वैतपणे। दु:खा कारण स्वरूपभ्रांति ।।९।।

तैसेचि बुद्धीचिया गुणे। भ्रमी पडले शहाणे ।
व्यापक आत्मा कोण त्या जाणे । बुद्धिहीन? ।।१०।।

जयाची बुद्धि सरसावली । तयासी एकात्मता दिसली।
वासना वैरवृति निमाली। एक सरे तयाची ॥११ ।।

सर्वथा द्वैतबुद्धीचिया योगे। वासना अहंकारादि वाढ घे।
म्हणोनि आत्मतत्त्वचि वावुगे। दिसते तया ॥१२॥

जेवि आकाशी वायु उठला। सर्व धुळीने धुम्रावला।।
तैसाचि आत्मा बुद्धीने झाकोळला। ऐसे जाण बापारे ! ॥१३॥
सत्य असोनि ठायीच शुद्ध। देहाभिमाने वाटे बद्ध ।
अष्टधा प्रकृतीचे युद्ध। दिसो लागे त्याच्याचि सत्ते ।।१४।।

जयासी असे जनन-मरण। तो समजावा अनात्मा जाण । तेथे आत्म्याचे प्रमाण । न लागे की॥१५ ।।


आनंदामृत        


अंध दृष्टीचे जे जन । तयांची दृष्टी ऐसी आहे म्हण ।
प्राण गेलिया म्हणती जाण। देहासहित मेला आत्मा ।।१६।।

सत्य करोनि शोध पाहता। आत्मा जर नसे तत्त्वता।
चालवी देहेंद्रियसंघाता। म्हणोनि दिसे जड विकारी ॥१७॥

सूर्या झाकोळती ढग। वाटे सूर्यचि झाला अपंग।
परि तो अलिप्तचि, दावी रंग। ढगाचेहि स्वतेजे ।।१८॥

जेवि सत्याचिया योगे। असत्य दिसते त्यातचि जागे ।
की बुद्धीने निर्मिले द्वैतधागे। त्या सर्वा आत्मा प्रकाशक ॥१९॥

परि या जडाचिया आधारे । चेतनहि जणू गुदमरे।
जाणूनि गुणावगुण लावूनि घे तुरे । जडचि दिसे ॥२०॥

पाहता पुढे सूक्ष्म दृष्टी। आत्मज्ञाने लाभे तुष्टी।
जड निवडोनि वारिता सृष्टि । चैतन्य दिसे स्वयंप्रभ ॥२१॥

तयास्तव सांगितला मी नेम। मुख्य सत्संगतीचे काम
उकलोनिया आत्म-अनात्म । स्वानुभव घ्यावा चातुर्ये ॥२२॥


इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । त्रयोदश प्रकरण संपूर्णम् ॥१३॥
     --------------------------